भास्कर!

Submitted by प्रसन्न हरणखेडकर on 18 October, 2019 - 23:07

“.....मोटाभाई, हे येडं आपल्या कडे कसं पहात होतं बघा, ‘आ’ वासून!!” राकेश चा ऑफिस च्या काम्युनिकेटर वर आलेला मेसेज पाहून मी नजर इकडे-तिकडे फिरवली, तर खरंच “सख्या” आमच्याकडे अजून ही अनिमिष नेत्रांनी का काय म्हणतात तसा पहात बसला होता. तोंडाचा ‘आ’ अजून ही न मिटलेला... मी त्याच्याकडे पाहून कसनुसं हसलो, तरी “सख्या” ची रि-एक्शन शून्य!! मी राक्याला मेसेज टाकला.... “पार वाय. झेड. आहे रे हा!!” आणि माझ्या कामाला लागलो.....
मी प्रशांत! एका मल्टी-नॅशनल कंपनी मध्ये गेली ८-९ वर्षे तांत्रिक दस्ताऐवजान्चा अनुवादक म्हणून काम करतो, राक्या उर्फ राकेश माझा ज्युनिअर आणि मित्र ही. मुळात आमची कंपनी आहे ‘फारिन’ ची इन्जिनिअरिन्ग कंपनी, आणि १५०-२०० लोकांमध्ये आम्ही मोजके ५-१० लोकं हे नॉन-टेक्निकल वर्गातले आहोत; आणि उरलेले सर्वच टेक्निकल स्टाफ. बरेचसे सिन्सिएअर, काही अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले इंजिनिअर्स तर काही या आमच्या “सख्या” सारखे ट्रेनी-इंजिनिअर्स. अरे हो!, सख्याची तुमची ओळख करुन द्यायची च राहिली.. तर सख्या हे काही त्याचे खरे नाव नाही च मुळात. चांगल्या उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाच्या ह्या नर-पुंगवाचे नाव आहे ‘भास्कर वरणगांवकर’. त्याला सख्या ही पदवी, पु.लं च्या सखाराम गटणे ह्या व्यक्तीरेखेवरुन मी आणि राकेश ने दिली आहे. आता गटणे म्हंटल्यावर तुम्हाला एकंदर अंदाज आलाच असेल कि भास्कर वरणगांवकर असे भारदस्त आणि ‘रिदमिक’ नाव असून ही ह्या माणसाची एकंदर व्यक्तीरेखा कशी असेल ते गटणे आणि भास्कर दोघे ही प्रचंड पुस्तकी आणि बरेचसे नाटकी ही बोलतात...
भास्कर ची आणि माझी पहिली भेट इथे आमच्या हापिसात च झाली. सुमारे ६ फुट उंची व त्याला साजेसे प्रमाणबद्ध वजन ह्या मुळे खरं तर भास्कर चार चौघांमध्ये सहज उठून दिसायचा. खास आमच्या सारखाच भाजणी च्या थालीपिठाचा ‘देशस्थी’ वर्ण, कुरळे केस, डोळ्याला चष्मा त्यातून समोरच्या कडे कायम च आश्चर्यचकित नजरेने लुकलुक करत बघणारे डोळे आणि दात आत घालण्यासाठी लावलेल्या क्लिपा! भास्कर ह्या सगळ्या सरंजामामुळे च खरं तर उठून दिसायचा. पुण्यातील एका नामवंत इंन्स्टीट्युट मधून वरणगांवकरांच्या ह्या सुपुत्राने एक पोस्ट-डिग्री अभ्यासक्रम केला होता, व त्याच्या जोरावर च स्वारी आमच्या हापिसात येवून चिकटली होती. त्याला सख्या ही उपाधी मी आणि राकेश ने जरी नंतर दिलेली असली तरी सुरवातीपासूनच भास्कर चे बोलणे-वागणे अगदी “सख्या-टाईप” चे होते हे आमच्या लक्षात आले होते. समोरच्याशी बोलताना अतिशय विनम्र होऊन बोलणे ..... अगदी इस्ट इंडिया कंपनी समोर समस्त मांडलिक राजे ज्या अजीजीने बोलतील तशीच आवाजात व्याकुळता. मला तर नेहेमी ह्या भास्कराचे हात बोलताना समोर नमस्काराच्या पोझिशन मध्ये जोडलेले आहेत असे च वाटायचे. अश्या ह्या भास्करशी ओळख व नंतर मैत्री होणं ही एखाद्याला सर्दी-पडसे होण्यासारखी च एक आकस्मिक घटना होती. झाले असे की गेल्या ४-५ वर्षांपासून आमच्या कंपनी मध्ये आम्ही गणेशोत्सव साजरा करु लागलो होतो, आणि त्यात एक कार्यक्रम असायचा सामुहिक अथर्वशीर्ष पठणाचा, दरवर्षीप्रमाणे अथर्वशीर्ष पठणासाठी निर्दोष व उत्तम उच्चार असलेल्या व्यक्ती शोधण्याची जबाबदारी होती राकेशची. मी नेहमी सारखा माझ्या अनुवादाच्या कामात आकंठ बुडालेलो... आयत्या वेळी अर्जंट मध्ये हे डॉक्युमेंट करुन द्या म्हणून मागे लागलेल्या काही लोकांवर चिडलो ही होतो, भराभर अनुवाद करताना तोंडाचा पट्टा ही सुटला होता आणि अश्यावेळी हे भास्कराचार्य माझ्या बाजूला येवून उभे राहिले. पहिले दहा मिनिटे तर माझे त्याच्या कडे लक्ष च गेले नाही, जेव्हा गेले तेव्हा त्याच्या गोल चष्म्यातून त्याचा तो पेटंट “आ” वासून ही असामी माझ्या कॉम्प्युटर कडे बघत बसली होती. “काही हवंय का तुम्हाला?” – माझा सरळ प्रश्न.. तर त्या वर “हो” एवढेच उत्तर देऊन हा माणूस पुन्हा माझ्या कॉम्प्युटर कडे बघत बसलेला. मुळात कुणी माझ्या कॉम्प्युटर कडे असं रोखून बघत असेल तर त्या व्यक्ती ची मला मनस्वी चीड येते पण आमच्या सख्या च्या चेहेऱ्यावर नाशिकच्या कुंभमेळ्यात हरवल्याचे व ते जे काही हरवले आहे ते माझ्या कॉम्प्युटर वर च सापडेल असे जे काही लाजवाब विक्षिप्त भाव होते त्या मुळे त्याच्यावर न चिडता माझा प्रश्न मी पुन्हा अधिक जोराने विचारला... त्यावर “ते अथर्वशीर्ष पठणाचे सगळे बघणारे देशपांडे कुठे बसतात हो?” असे भास्कराने अत्यंत आदरपूर्वक मला विचारले. “कोण? आमचा राक्या? तो गेला असेल एखाद्या पारावर.... बारा पिंपळावरचा मुंज्या आहे भोxxxxx” माझा कामाच्या वेळेला समोरच्याने टी.पी. केल्यावर होणारा सात्विक संताप भ-कार रुपाने बाहेर पडला. भर ऑफिस मध्ये पाच-दहा टाळकी आजूबाजूला असताना माझ्या तोंडून अशी शिवी गेलेली पाहून सख्या एकदम गांगरलाच आणि मटकन माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसला. “नाही, हो!एकदम असे शिव्या देऊ नका बरे. देशपांडे नसतील जागेवर तर येतो मी थोड्या वेळाने पुन्हा” असे म्हणून तो एकदम जायला लागला. मी त्याला थांबवले आणि विचारले की नक्की काम काय आहे त्याचे राक्या कडे. “अथर्वशीर्ष पठणामध्ये मला सहभाग घ्यायचा आहे, तर देशपांडे कुठे सापडतील आत्ता?”- सख्या चे एकदम सात्विक मराठीत उत्तर आले. मला मोठी गंमत वाटली त्याची. मुळात भाषेच्या क्षेत्रात अनुवादक म्हणून काम करत असलो तरी मी काय किंवा राकेश काय आम्ही दोघे हि इतके छापील बोलत नाही. मला आलेली हसण्याची उबळ मी कशी बशी दाबून धरली आणि ह्या असामीला बसायला सांगितले. एखाद्या तामिळ चित्रपटातील अवाढव्य व्हिलन शेजारी एखादी अबला ज्या नाखुशीने आपला पदर सावरत बसेल तसा तो माझ्या बाजूच्या खुर्ची वर अवघडून बसला, लक्ष माझ्या कॉम्प्युटर च्या स्क्रीन आणि कि-बोर्ड वर चपळपणे फिरणाऱ्या माझ्या बोटांवर! आणि तेवढ्यात आमचे मित्रवर्य राकेश देशपांडे फोन वर जोरजोराने बोलत आमच्या क्युबिकल च्या दिशेने आलेत. कुणाला तरी त्या दिवशीची गणपती ची पूजा आणि त्या आधी संपन्न होणाऱ्या अथर्वशीर्ष-आवर्तनाच्या कार्यक्रमाचे डीटेल्स देणे सुरु होते आणि त्या आवाजाने सख्या ची तंद्री भंगली. फोन संपल्यावर माझा हा शेजारी, स्प्रिंग लावल्यासारखा टून्नकन उडी मारून उभा राहिला. राक्याला नखशिखांत न्याहाळत त्याने अपार भक्तिभावाने हात जोडून प्रश्न केला: “राकेश देशपांडे आपण च ना?” दोन मिनिटे लागलीत आमच्या राक्याला त्याचा प्रश्न कळायला, कारण गेल्या ३.५ वर्षात आमच्या ह्या हापिसात त्याचे इतके पूर्ण नाव कुणीच घेतले नव्हते. राक्या ने माझ्या कडे भुवया उडवत बघितले आणि मी ही त्याला प्रत्युत्तर म्हणून “हे एक आपलं गिऱ्हाईक दिसतंय” अश्या अर्थाचे पाहून हसलो... आणि अश्या रीतीने सख्याचा आमच्या आयुष्यात चंचुप्रवेश झाला. त्या वर्षीच्या अथर्वशीर्षाच्या कार्यक्रमात भास्कर ने अचूक व स्पष्ट उच्चार, आवाजातील योग्य चढ उतार ह्या मुळे आमच्या कंपनी च्या सी इ ओ फडके साहेबांसकट सगळ्यांना आपल्या खिशात टाकले. दिसामाजी ह्या वल्ली दिसणाऱ्या पण सहृदय असलेल्या माणसाची आमची ओळख होत होती. मुळचा विदर्भातील असलेला हा भास्कर, आपले मूळ गांव सोडून गेली कित्येक वर्षे विरारला रहात होता. इथे पुण्यात येवून त्याला चार एक वर्ष होऊन गेली होती. वारजे ला एक छोटा फ्लॅट भाड्याने घेऊन तो एकटाच रहात होता. इन्जिनिअरिन्ग उत्तम मार्काने पास होऊन गेले काही वर्षे भास्करशेठ पुण्यात एका मोठ्या कॉलेजमध्ये चक्क व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून ही काम करत होते. मेकॅनिकल इन्जिनिअरिन्ग केले होतेच, त्यातच भर म्हणून आमच्या कंपनी मध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये आवश्यक असलेले कॅटिया टूल त्याने थोडेफार शिकून घेतले आणि एक पोस्ट-डिग्री कोर्स करुन आमच्या कंपनी मध्ये दाखल ही झाला. एक दिवस मी नेहेमीच्या वेळेला कंपनीत पोचलो तर माझ्या क्युबिकल मध्ये च बाजूच्या टेबलावर नवीन सिस्टीम लागलेली होती. छोटासा एक गणपतीचा फोटो समोर ठेवलेला होता. खुर्ची नीट पुसून ठेवलेली होती. मी विचार च करत होतो की इथे आता कोण नवीन व्यक्ती येणार बसायला, आणि तेवढ्यात वॉशरुम मधून हात पुसत भास्कर शेठ बाहेर आले आणि त्याच्या त्याच नम्र सुरात मला म्हणाले.. “मी आलो बरं का इथे बसायला सर! तुम्हाला माझा काही त्रास तर होणार नाही ना?” बोलताना मंद सप्तकातील ही अगदी खालचा सूर लागलेला. आवाजात पराकोटीची विनम्रता आणि गोल चष्म्यातून लुकलूक लुकलूक करणारे डोळे....आता खरं तर बाजूला हा नम्र गडी असो वा कुणी नम्रता असो मला सहसा माझ्या कामात काही हि फरक पडत नाही. मी म्हणजे माझे काम बरं, आणि ते करताना हेडफोन्स मध्ये माझी आवडती गाणी बरी, पण मला असं कुणी अती-नम्र/सालस व्यक्ती किंवा अती-आगाऊ व्यक्ती समोर असली ना कि उगाच शिष्टपणा करायची फार हुक्की येते. मी भास्कर ला हसत-हसत म्हंटलं “आता तू त्रास दिला नाहीस तर मला त्रास होणार नाही, आणि दिलासच तर काय तुझी फार खैर नाही” मात्र मी हे बोललो आणि भास्कर वर माझ्या थट्टेचा अगदी विपरीत परिणाम झाला. साठ-सत्तर च्या दशकातील हिरो अथवा हिरोईन च्या आया जश्या नहीss! करुन चीत्कारायच्या थोडा फार तसाच साउंड काढून भास्कर म्हणाला.. “नाही हो! नाही देणार त्रास तुम्हाला. तुमच्या ह्या महत्वाच्या कामांमध्ये यत्किंचीतही त्रास होणार नाही माझा” ह्याच्या डोळ्यात काय वेडा-बिडाची झाक वगैरे दिसते कि काय हे बघायला लागलो मी एकदम, आणि निमुटपणे माझं काम करायला सुरुवात केली.
नंतर च्या महिन्याभरात च मी आणि राक्या ने भास्कर चे नामांतर “सख्या” असे करुन टाकले. पु.लं.च्या गटणे सारखेच भास्कर चे ही ‘चिवित्र’ फंडे होते. आमचा ऑफिस बॉय पंकज सकाळी-सकाळी आणि लोकांना आवडेल अशी कॉफी देण्यात पटाईत.. आणि सख्या चा रिपोर्टिंग मॅनेजर त्याच वेळी मिटिंग लावायचा. एकदा पंकज ने आणलेली कॉफी गारढोण होत जवळपास एक तास सख्या च्या टेबल वर पडून होती. तासा-दीड तासाने मॅनेजर सख्याला आणि सख्या आपल्या मॅनेजर ला चावून आपल्या जागी येवून बसला. त्या दिवशी मिटिंग मध्ये बरीच बाचाबाची झाली असावी, कारण सख्या गलितगात्र झालेला होता. आल्या आल्या राक्या ने त्याला छेडले.. “काय मग वरणगांवकर, कशी वाटते आहे आमची कंपनी? काम कसं आहे? दिनेश (पक्षी: सख्या चा मॅनेजर) त्रास देत नाही ना रे?” सख्या ने ह्यावर एक दीर्घ सुस्कारा सोडला. वर बघत डोळे गरगर फिरवले आणि म्हणाला ... “कसं आहे देशपांडे, दिनेश काय बोलतात, कधी कधी मला काही कळतच नाही बघा, आणि मी सांगितलेले त्यांना काही पटतच नाही, जाउद्या हो आप-आपले भोग असतात ते इथेच भोगून संपवायचे असतात” आता आपलं बोलणं आपल्या रिपोर्टिंग मॅनेजर ला काळात नाहीये ही एकदम गेल्या जन्माच्या भोगांवर नेऊन ठेवण्याची गोष्ट आहे का? खरे तर नाही... पण भास्कर समोर कुणाचं काही चालत नाही. विषय भलत्याच वळणावर जातोय म्हणून मीच त्याला म्हंटलं, “जाऊ दे रे होतं असं कधी कधी, तू कॉफी घे... अरे पण तुझी तर कॉफी पण थंड झाली.. आता ही कोल्ड कॉफी म्हणून घे बरं (माझा आपला ओढून ताणून विनोद करण्याचा प्रयत्न!) किंवा सरळ गरम करुन आण” त्या वर सख्या ने एकदम ऊर्ध्व लागल्या सारखं केलं “छे छे, काहीतरीच काय भलतं-सलतं बोलता सर तुम्ही? आता त्या कॉफी चे विष झाले असेल नं!” हा सख्या चा रिप्लाय ऐकून मी आणि राक्या अशक्य फुटलो, आणि आमच्या गडगडाटी हसण्याने भास्कर खिन्न होऊन “आ” वासून आमच्या कडे पाहायला लागला... आमचा हा सख्या बरेचदा असे आयटेम देत असायचा पण ह्या माणसाकडे एक सगळ्यात मोठ्ठा प्लस पॉइंट होता तो म्हणजे ह्या इसमाचा सुतासारखा सरळ स्वभाव! कुणाच्या ही अध्यात ना मध्यात अशी वृत्ती असल्याने तो लोकांमध्ये, मित्र-मंडळींमध्ये लोकप्रिय ही होता, आणि मुळात मी तितकाच क्लिष्ट असल्याने असेल बहुदा पण त्याच्या ह्या चांगुलपणा चे मला एक सुप्त आकर्षण ही होतं. अर्थात त्याच्या ह्या चांगल्या वागणुकीचा त्याला ही नेहेमी त्रास होत असणारच पण बऱ्याचदा असे हि होते की अश्या प्रकारच्या माणसांना चांगुलपणाचे सुद्धा व्यसन जडते. मी अती-नम्रपणे, चांगल्या रीतीने लोकांसमोर पेश झालो नाही तर लोकं आपल्याला नावे ठेवतील अशी एक अनामिक भीती ह्या लोकांना वाटत असावी असा माझा एक कयास आहे आणि सख्या च्या रूपाने माझ्या ह्या विचाराला अजून अजून खत-पाणी मिळत होते. सख्या एक उत्तम खेळाडू ही होता. कंपनी च्या विविध क्रीडाकौशल्याच्या स्पर्धांमध्ये त्याने चांगलीच चुणूक दाखवली होती, पण तेवढ्यापुरता चमकणारा हा सितारा, स्पर्धा संपल्या की मात्र एखाद्या धुमकेतू सारखा कंपनी च्या अवकाशावरून आणि लोकांच्या नजरेतून गायब होऊन जायचा. मध्यंतरी सालाबाद प्रमाणे आमच्या कंपनी ची ॲन्युअल पार्टी झाली. आदल्या दिवशी मी आणि राक्या ने सख्या चा क्लास घेतला. तो पार्टी ला यायला तयार नव्हता आणि आम्ही मागे लागलो होतो, काही ही करुन तू पार्टी ला येच म्हणून... शेवटी आमच्या तास-दीड तासाच्या आग्रहानंतर सख्या म्हणाला “ते कसे आहे ना, तिथे मद्यपान, अभक्ष्य भक्षण वगैरे फार होईल हो, आणि तसं ही उद्या एकादशी आहे” मग मात्र मी सख्याला चिडूनच म्हंटलं की “लेका गेल्या वर्षभरात मी काय किंवा राक्या काय, आम्ही दारू-सिगारेट ची व्यसनं करताना पाहिले आहे का तू आम्हांला? आणि इतर लोकं करतात ते त्यांना करु दे की तू नको करुस, मोठ्या एकादश्या ठीक आहे पण दर महिन्याच्या पण करतोस होय रे वगैरे वगैरे...” ह्या वर एकदम ताठ मान करुन साहेब म्हणालेत... “होय तर... मानसिक आणि आत्मिक बलोपासनेसाठी हे मासिक एकादशी चे व्रत चांगले असते.” आम्ही त्याचे हे वक्तव्य ऐकून आमच्या तलवारी मुकाट पणे म्यान केल्यात पण बरेच सामाजाऊन ही सख्या काही दुसर्या दिवशी आला च नाही पार्टीला.
कंपनी मध्ये दाखल होऊन त्याला वर्ष होत आलं होतं, माझ्या बाजूला बसायला येवून ही ८-१० महिने होऊन गेले होते. एकमेकांचा भरपूर परिचय झाला होता. मैत्री ही झाली होती. माझा जन्म मुंबई चा ते ही पश्चिम उपनगरातला हे जाणून सख्या अगदी मोहरून च गेला होता. माझ्या विषयी, राक्या विषयी, आमच्या कामाविषयी जाणून घ्यायला तो प्रचंड उत्सुक असायचा, भारंभार प्रश्न विचारायचा, मात्र चर्चा कौटुंबिक पातळीवर आली की त्या विषयी चकार एक शब्द न काढता त्याचा तो पेटंट “आ” वासून बघत बसायचा. मग पुढे कधी तरी त्याच्या कडून नकळतपणे आणि दिनेश कडून बोलता बोलता कळले कि त्याला आई-वडील नाहीत. मला आणि राक्याला ह्या गोष्टीने नाही म्हंटल तरी धक्का च बसला आणि दु:ख ही झाले. इतक्या सरळमार्गी, निर्व्यसनी मुलाच्या बाबतीत असे घडावे, हे खरंच क्लेशदायक होते. त्याचे आई-वडील कश्याने गेलेत, कधी गेलेत हे कळले नाही पण मी आणि राक्याने एका शब्दाने ही त्याला ह्याबाबत कधी हि विचारायचे नाही असे ठरवले. ऑफिस च्या कलीग्स मध्ये ते ही मित्र-मित्रांमध्ये पोरी हा विषय बर्याचदा आणि आवडीने चघळला जातो. आमचे ऑफिस ही त्या बाबतीत अपवाद नव्हते. माझे लग्न होऊन जमाना लोटल्यामुळे आणि राक्याच्या लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस ओसरल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा मध्येच कधी तरी सख्या कडे वळविला होता. “लेका तुला एखादी गर्लफ्रेंड नक्कीच असेल ना”- असे राक्या ने म्हंटल्याबरोबर सख्या ने थेट कानाच्या पाळ्यांना हात लावून ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या साठी ‘अब्रह्मण्यम’ असल्याचा पुरावा आम्हांला दिला होता. अर्थात सख्या ने तशी कबुली दिलेली असली तरी आजकाल त्याचा मोबाईल मुलींच्या असंख्य फोटोज ने भरलेला असायचा. तासनतास शादी डॉट कॉम वगैरे मधून डाउनलोड केलेले लग्नाळू मुलींचे फोटो सख्या समस्त जगाला लपवून बघायला लागला होता. मधूनच सांगायचा की त्याची लग्न झालेली सख्खी मोठी बहिण आणि तिचे मिस्टर त्याच्या साठी मुली बघताहेत. हळूहळू सख्या मध्ये चांगले बदल होऊ लागले होते, आमच्या दृष्टीकोनातून सख्या “माणसाळत” होता, एका-पाठोपाठ एक मुली पहात होता, अनेक नकार पचवत होता आणि येणाऱ्या प्रत्येक नकारातून सुदैवाने काही चांगलं, काही पॉझीटीव्ह घेत होता. कधी मधी आपल्या सीनियर्सना आपले म्हणणे पण जोर लावून सांगायला लागला होता, जे पटत नाहीये त्या विषयी आपले म्हणणे मांडायला लागला होता... चक्क एखाद्या नॉनव्हेज जोक वर हसत ही होता! एकंदर चांगलं चाललं होतं त्याचे. दोन सल मात्र फार बोचत होते त्याला एक म्हणजे आमची कंपनी दीड वर्ष उलटून ही त्याला पे-रोल वर घेत नव्हती आणि मनात किती ही ‘ट्विंकल- ट्विंकल’ होत असून ही लग्न काय ठरत नव्हतं. अर्थात कुणाला पे-रोल वर घ्यायचं, कुणाला भरल्या ताटावरून उठवायचे आणि कुणाला इंटर-डिपार्टमेंटल शिफ्टिंग च्या नावाने ऑफिस मध्ये च फिरवायचे हे संपूर्णपणे मॅनेजमेंट वर अवलंबून असतं. जून महिन्यातल्या एका सकाळी असंच आम्हाला सांगण्यात आलं की गेले ८-९ वर्ष ह्याच जागी बसून काम करताहात, तेव्हां आजपासून मी व राक्या ने कंपनी च्या दुसऱ्या अद्ययावत इमारती मध्ये आपले बस्तान त्वरित हलवावे. कामाशी काम असणाऱ्या मला ह्या आदेशाने फार फरक पडला नाही, परंतु राक्या ला मात्र सर्व गोतावळा सोडून नवीन जागी शिफ्ट होणे कठीण झालं. आम्ही आमचं सामान-ड्रॉवर आवरायला घेतले आणि एखाद्या लहान मुला सारखा डोळ्यात आसवं दाटून सख्या माझे हात हातात घेऊन म्हणाला “सर, तुमची, तुमच्या भाषा- आणि नाट्यवेडाची फार फार आठवण येईल हो!! तुमच्या सारख्या भाषाप्रभू शी ओळख झाली हे माझे भाग्याच हो, किती नानाविध गुण तुमच्या मध्ये एकवटले आहेत...तुमच्या आणि राकेश च्या जर्मन गप्पा आता आम्ही कश्या बरं ऐकायच्या?” सख्या अजून ही बरेच काय काय बोलत होता, माझ्या ठायी इतके गुण खरेच आहेत का ? आणि असले तर सालं लोकांना का बरे दिसत नाहीत असा एक प्रश्न मात्र त्यावेळी मनाला चाटून गेला माझ्या. हे असले प्रसंग आले की माझी फार गोची होते..काय बोलावं अजिबात काळात नाही. हा रडतो-बिडतो की काय वाटून मी पण त्याला “सेम हिअर माय फ्रेंड आय एम अल्सो गोइंग टू मिस युअर प्रेझेन्स, पण आपण आजूबाजूच्या बिल्डींग्स मध्येच आहोत आणि मी लंच ला तसे ही इथेच येणार आहे तेव्हा भेट होतच राहील की” येवढ च म्हणून तिथून निघालो......
राक्या लेकाचा अजून ही आपलं सामान आवरतच होता. मी आवर आवर म्हणत त्याच्या शी जर्मन मध्ये कडकड करायला सुरवात केली.. आणि सहज लक्ष गेलं... सख्या माझं जर्मन ऐकून नेहमी सारखाच “आ” वासून माझ्या कडे आश्चर्यचकित पहात होता... राक्या ही नेहमी प्रमाणे च हळू आवाजात म्हणत होता “मोटाभाई, हे येडं आपल्या कडे अजूनही कसं पहातंय बघा, ‘आ’ वासून” आणि मी पण नेहमी सारखा च मनातल्या मनात म्हणत होतो
“पार वाय. झेड. आहे रे हा!!”....................................

- प्रसन्न हरणखेडकर
वरील व्यक्ती व घटना जरी खऱ्या असल्यात तरी पात्रांची नावे व स्थळ बदललेली आहेत Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults