मग तुझी आठवण येते

Submitted by माउ on 16 October, 2019 - 15:02

ही फसवी पहाट आहे
की चांदण वेडी भूल
केसांतून हात फिरावा
अलवार अशी चाहूल
तू विझणा-या ता-यांचा
हळुवार निसटता भास
हे स्वप्न म्हणावे मी की
नुसताच जुना परिहास?

ना नीज पापणी येते
गुंतून असावे कोण
कर्णाच्या दानामध्ये
आजन्म हरवतो शोण
ही हळवी माया फसवी
मी अजून हरते आहे
गुरफटल्या उ:श्वासांना
कळते सावरते आहे

या स्निग्ध धुक्याला आहे
मौनाचा आर्त किनारा
तू शब्दांच्या पैलतीरावर
मी भिरभिरता पहाटवारा
हा अवघा प्रवास कसला
ही रात्र पुन्हा का आली?
मन पुन्हा पुन्हा का जाते
आसक्त नभाच्या खाली?

अंधार धुमसतो जेव्हां
रात्रीला उमजत नाही
मी ओढून घेते स्वप्ने
आभास जुनेसे काही
हे अर्थ लावणे फसवे
जगण्याचे आंदण होते
श्वासात चांदणे होऊन
मग तुझी आठवण येते

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults

वा! सुंदर कविता.

खाली चिकटवलेल्या २ ओळी खूप मस्त आहेत, पण बाकी ओळींशी त्यांचा मीटर जुळत नाही. १ मात्रा जास्त वाटते आहे. (हे अगदी नगण्य निरीक्षण आहे, वाटल्यास दुर्लक्ष करा)
"तू शब्दांच्या पैलतीरावर
मी भिरभिरता पहाटवारा"

छान

खूप सुंदर कविता!

कर्णाच्या दानामध्ये
आजन्म हरवतो शोण >> बेस्ट

<<या स्निग्ध धुक्याला आहे
मौनाचा आर्त किनारा
तू शब्दांच्या पैलतीरावर
मी भिरभिरता पहाटवारा
>>

khup sunder..

सुंदर.

हे अर्थ लावणे फसवे
जगण्याचे आंदण होते
श्वासात चांदणे होऊन
मग तुझी आठवण येते - अप्रतिम