गझल - जितके जितके मनास केले

Submitted by बेफ़िकीर on 16 October, 2019 - 04:34

गझल - जितके जितके मनास केले

जितके जितके मनास केले आरस्पानी
तितके तितके लोक भेटले कारस्थानी

नक्की संशय घेण्याजोगे होते काही
कारण की, हावभाव होते फार इमानी

सत्ता पालटण्यासाठी ती कारण ठरली
शेतकऱ्याची वाया गेलेली कुर्बानी

जगास इतका माज कशाचा हेच कळेना
एक अदानी आहे तर दुसरा अंबानी

धर्म असो कुठलाही, अपुल्या घरात पाळा
रस्त्यावरती हिंडतात जथ्थे सैतानी

विजेऐवजी वाऱ्याने फिरती हे पंखे
माणूसच नसतो बर का बस बेईमानी

तुझे खरे, मी बाकी काही केले नाही
मला बांधता आले घर हे छोटेखानी

काही काही घटनाही घडतात अशा की
म्हाताऱ्यांनाही आठवते पुन्हा जवानी

पुरातही जातीभेदांचे वादळ उठले
अस्मानी तर झाली, मग आली सुलतानी

प्रतीक्षेत हे पहाट होणे, उला असावा
तुझे न येणे, हाच असावा मिसरा सानी

दुसऱ्याचे मन जपणे त्याचे ध्येयच आहे
'बेफिकीर'ची चालत राहो ही मनमानी

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>> नक्की संशय घेण्याजोगे होते काही
कारण की, हावभाव होते फार इमानी>>>> कटु कटू सत्य आहे Sad पटले, कळले , भावले!!

Bhushan sir yacha arth nahi klala..प्रतीक्षेत हे पहाट होणे, उला असावा
तुझे न येणे, हाच असावा मिसरा सानी
Baki apratim