सरांनी सांगितलेली गोष्ट

Submitted by बिपिनसांगळे on 15 October, 2019 - 12:36

सरांनी सांगितलेली गोष्ट
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(बालकथा - वयोगट - मोठा )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आज शाळेचा पहिला दिवस होता. उन्हाळ्याची सुट्टी संपली होती. आकाशात ढगांची गडगड होती आणि वर्गात मुलांची गडबड !
क्रीडांगणाच्या एका बाजूला प्राथमिक आणि दुसऱ्या बाजूला हायस्कूल .
सर यायला वेळ होता. नवीन वर्ग असूनही हर्ष बिनधास्त होता. अफाटच पोरगा होता तो ! त्याने फळ्याजवळचा खडू उचलला. त्याने फळ्यावर एक चित्र काढलं -
सुरवार - झब्बा घातलेला एक माणूस. तो घसरलाय आणि त्याच्या डोक्यावरची गांधी टोपी उडाली आहे. आणि त्यामुळे त्याचं टक्कल दिसतंय ,असं गंमतीशीर चित्र त्याने काढलं होतं.
ते चित्र चव्हाण सरांचं होतं. ते प्राथमिकचे पर्यवेक्षक होते.
आठवीचे वर्गशिक्षक विश्वनाथ सर वर्गात आले.दणकट बांध्याचे , बारीक केस कापलेले .
त्यांच्या पहिलवानी शरीराकडे पाहून मुलं 'आता पुढे काय होणार ?' याचा विचार करू लागली. हर्षकडे पाहू लागली. तो गप्प झाला.
सरांनी शांतपणे डस्टर उचललं व फळ्यावरचं चित्र पुसलं. मग ते म्हणाले, " मुलांनो, मी तुम्हाला इतिहास शिकवणार आहे . त्याआधी, आपण शिवाजीमहाराजांचं चित्र काढू या. कोण काढेल ? कोणाची चित्रकला चांगली आहे ? "
मुलं ओरडली - "हर्ष !"
मुलांना मजा वाटली. चित्र काढणारा मुलगा अलगद सरांच्या जाळ्यात अडकला होता..... सर भारी होते !
" हर्ष, पुढे ये. फळ्यावर शिवाजीमहाराजांचं चित्र काढ ," सर म्हणाले .
हर्ष वरमला.
"अरे, घाबरू नकोस. खरंच काढ ."
त्याने एक घोड्यावर बसलेल्या शिवाजीमहाराजांचं छान चित्र काढलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा, सरांनी हर्षकडे पाहिलं. ते हसले. त्यांना काही आठवलं. ते म्हणाले," मी एक गोष्ट सांगतो."
मुलं येsss करुन ओरडली. पहिल्याच दिवशी गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून !
सर सांगू लागले.-
" ही गोष्ट खूप जुनी आहे. जवळजवळ १९५० सालातली.कोकणातली.
कोकणात दापोली नावाचं शहर आहे. त्या जवळच्या एका खेड्यात एक साधा पण हुशार मुलगा राहायचा. त्याला शिकण्याची खूप गोडी. पण घरची अतिशय गरिबी. त्यावेळचं वातावरण , कष्ट व गरिबी असलेल्या आयुष्याचा तुम्ही आज विचारही करू शकणार नाही.
अंगभर कपडे नाहीत. खाली फक्त एक लंगोटी. दप्तर नाही. एका फडक्यात वह्या-पुस्तकं बांधायची. शाळा दहा मैल दूर. शाळेत चालत जायचं. कधी कोणी बरोबर असायचं नसायचं . बरं, रस्ता ? तोही धड नाही. खाच-खळगे, दगड -धोंडे, ओढे-नाले आणि साप-विंचू ! ... सकाळी खायचं आणि शाळेला सुटायचं. घरी आलं की अभ्यास. पटपट अभ्यास उरकायचा. अंधार पडायच्या आत- कारण लाईट नाही आणि दिव्यात वात असली तरी तेल नसायचं. पोटं रिकामी असली तरी रात्री जेवण नसायचं !...."
सर सांगत होते. मुलं डोळे विस्फारून ऐकत होती.
"एकदा काय झालं ? शाळा सुटली. रस्त्यावर गारुड्याचा खेळ चालू होता. तो एका देखण्या नागाला टोपलीबाहेर काढून त्याच्याशी सहजपणे खेळत होता. मुलं आश्चर्याने पहात होती. घाबरून नव्हे, कारण कोकणातल्या मुलांना सापाचं काय कौतुक ? त्यांच्या इथं साप पैशाला पासरी . त्यांना गारुड्याचं कुतूहल वाटत होतं. तो विषारी नागाशी लीलया खेळत होता. डोलत होता. पुंगी वाजवत होता, डमरू वाजवत होता.
- आणि जमलेली गर्दी पैसे देत होती !
त्या मुलाला फक्त पैसे गोळा करणारा तो गारुडी दिसत होता.
खेळ संपला तसा मुलगा निघाला. त्याच्या डोक्यात आता जणू विचारांची पुंगी वाजत होती. तो त्या धुनेवर जणू डोलत पुढे सरकत होता.
झाडांच्या शेंडयावरून संध्याकाळ खाली उतरत होती. त्याला झपाझप पाय उचलायचे होते. पण ? - त्याच्या वाटेवर एके ठिकाणी सागाची झाडं होती. त्यापलीकडे वारूळ होतं. त्याच्या आसपास त्याने एक चमकदार नाग दोन-तीन वेळा पहिला होता... काय असावं त्याच्या डोक्यात ? ...
- त्याला तो नाग धरायचा होता. जिवंत, तुकतुकीत, विजेसारखा सळसळणारा !
आणि त्याला तो गावला. तडफदार फण्याचं रुबाबदार जनावर !डोक्यावर काळसर दहाचा आकडा असलेलं .
मुलाने विचार न करता त्याच्यावर झेप घेतली. ते जनावर कसलं चपळ ! ते झटक्यात पुढे गेलं. पण हवाच कोंदटलेली होती. अस्वथ करणारी. त्या नागालाही कसनुसं होत असावं.तो पुढे गेला आणि मागे वळून फणा काढून उभा राहिला.
आता मात्र मुलगा घाबरला. आता प्राणाशी गाठ होती ! आजूबाजूला कोणी नव्हतं.मुलाने धडपडत त्याची पुस्तकं उचलली व तो पळत सुटला. जीव खाऊन , वेडावाकडा -लांब ! धापा टाकतच तो घरी पोचला.
आई त्याच्याकडे पहात राहिली. " काय रे ? काय झालं ? "
मग त्याने आईला सगळं सांगितलं. त्याला तो नाग धरायचा होता. गारुड्यासारखा खेळ करण्यासाठी ! पैसे मिळवण्यासाठी, गरिबी दूर करण्यासाठी.
आई कडाडली ," मी अजून काम करीन. उपाशी राहीन. पण असल्या थेराच्या मागे लागू नकोस. शिक अन मोठा हो."
मुलगा शरमला.
पुढे तो शिकला. खूप शिकला. शिक्षक झाला. मग मुख्याध्यापक ! पण तो त्याची परिस्थिती व आईची शिकवण विसरला नाही.
गरिबीमुळे कोणाच्या शिक्षणाला अडथळा येऊ नये, याची त्याला तळमळ होती. तो विद्यार्थ्यांना नेहमी मदत करायचा. जमेल ती, वाट्टेल ती !
त्याच्या शाळेत एक मुलगा होता. त्याला गरिबीमुळे एकदा फी भरणं शक्य नव्हतं. तेव्हा त्या मुख्याध्यापकांनी ते पैसे स्वतः भरले. त्यावेळी त्यांनी स्वतःची कहाणी त्या विद्यार्थ्याला सांगितली.
मग त्यांचा तो विद्यार्थी पुढे शिकतच गेला. पण तो मुख्याध्यापकांची शिकवण विसरला नाही. नेहमीच त्याने शिक्षणाला महत्व दिलं. आपण शाळेत शिकण्यासाठी येतो, हे तो कधीच विसरला नाही.....
आता तुम्ही मला सांगा. उद्यापासून तुम्ही दंगा करणार का अभ्यास ?"
इतक्या वेळ गोष्ट ऐकणाऱ्या मुलांच्या माना खाली गेल्या. वर्गात चिडीचूप शांतता पसरली. एखादा हळू आवाज-' अभ्यास ! '
सर पुढे बोलू लागले , " साप पकडायचा प्रयत्न करणारा तो गरीब मुलगा, जो पुढे मुख्याध्यापक झाला, तो म्हणजे या हर्षचे आजोबा !......"
मुलं आश्चर्यचकित . हर्ष त्यांच्या दुप्पट !
" आणि त्यांचा तो लाडका विद्यार्थी विशू- म्हणजे मी !...."
पूर्ण वर्ग अवाक होऊन सरांकडे पहात राहिला.
"हर्ष, संध्याकाळी नुसतं खेळण्यापेक्षा, मोबाईलमध्ये डोकं घालून बसण्यापेक्षा आजोबांच्या जवळ बस. त्यांच्या तोंडून हे सारं ऐक . त्यांच्याकडे गोष्टींचा ,ज्ञानाचा , अनुभवांचा खजिना आहे."...
सरांचं बोलणं ऐकून हर्षला लाजल्यासारखं झालं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं . पण जवळ येऊन सरांनी जेव्हा स्वतः त्याची पाठ थोपटली , त्याच्याकडे प्रेमाने पाहिलं, तेव्हा त्याचे डोळे काहीतरी चांगलं करण्याच्या उर्मीने चमकले.
बाहेर- तास संपल्याची घंटा वाजली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सांगळे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हर्पेनजी
आभार .
तुमचं म्हणणं मान्य . आपण ज्येष्ठ आहात .
--------------------------------------------
नाहीतर चुकीच्या प्रतिक्रियांवर प्रतिवाद करत बसण्यात मला अर्थ वाटत नाही.
इथे सध्या ज्या पद्धतीने प्रतिसाद येतात , ते पाहून मला वाईट वाटतं - कशाचं ?
मी कोणा एका लेखकाबद्दल बोलत नाहीये - तर एकूणच -माबो
मला वाईट वाटतं कि प्रतिक्रिया देताना आपण त्या व्यक्तीला नाही तर स्वतःलाच खाली दाखवतो
हे लोकांना कळत नाही.

निगेटिव्ह प्रतिक्रिया नक्की असू शकतात . त्याचेही स्वागत करायला हवे . पण
ते सांगण्याची पद्धत असते .
समोरच्याला सुधारण्याची संधी देणारी , घडवणारी

गंमतीशीर चित्र काढू नयेत. चांगलं दाखवणारी, चांगल्या माणसांचीच चित्रं काढावीत.
संध्याकाळी नुसतं खेळूही नये.
आजोबांचं ऐकत बसावं.
दंगा अजिबात करू नये. (दंगा म्हणजे काय?)

Submitted by भरत.

गंमतीशीर चित्र काढावीत कि
का नाही ? पण त्याचे चांगले विषय असू शकतात कि

सरांचं विडंबन कशासाठी ?

मी अशा सोशल साईट वर पहिल्यांदाच आलो /
ट्रोलिंग बद्दल ऐकलं होतं . पण इथे ते पाहिलं
चालायचंच
स्वतःची खरी ओळख लपवली कि आपण वाट्टेल ते बोलायला मोकळे .
स्वतः ग्रेट आहोत हे दाखवण्याच्या भरात आपण आपल्या दुःखाने दुसऱ्यावर प्रहार करत असतो
त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची निगेटिव्ह बाजू समोर येते.
अपना अपना नजरिया .

हाब
आपण जो संदर्भ दिला आहे -
तिचा कथानायक हा शाळकरी मुलगा आहे पण ती कथा त्या मुलांसाठी नाही .
तर ती मोठ्यांसाठी आहे . मोठ्यांनी ती वाचून पुन्हा आपल्या बालपणात जाण्यासाठी .
मी ही कथा शाळेतल्या मुलांना वाचा म्हणून सांगू शकत नाही .
काही मुलं तो वाचतही असतील , तो भाग वेगळा .

माझ्या कथेचा नायक शाळकरी मुलगा आहे आणि ती शाळेतल्या मुलांना वाचण्यासाठी आहे
मला हे भान पाळायला हवं .

एक अनुभव
एका मोठ्या मासिकासाठी मी बालकथा दिली होती . संपादक हि जाणकार ,अलीकडच्या पिढीतले
त्यामध्ये - वाया गेलेली ,मवाली मुलं - असे शब्द होते
त्यांनी ते शब्दही काढायला लावले , मला मान्य नसताना

त्यांचं म्हणणं होतं - मुलांपर्यंत चुकीच्या गोष्टी जाता कामा नयेत

सध्या मोबाइलने आपलं आयुष्य व्यापलं आहे
त्याचे फायदे तसे तोटे
पण आपल्या डोळ्यांसमोर फक्त तीच मुलं असावीत जी मोबाईलच्या जगात राहतात
मर्यादित ...

-----------

१. ऑफिस मधल्या एका सहकार्याने जो गावाकडचा आहे
लोकांना सांगितलं , तुम्हाला जमेल तशी वह्या पुस्तक द्या .
माझ्या गावाकडे मुलांना साधी पुस्तकं नसतात , वह्या नसतात , असल्याच तर जुन्या- पान्या , फाटक्या .

२. एका बालमासिकासाठी जेव्हा कथा दिली तेव्हा त्यांनी सांगितलं , कि आम्ही आमचा अंक खेड्यापाड्या पर्यंत पोचवतो
रिमोट गावांमधेसुद्धा . ती मुलं आमच्या अंकाची वाट पाहतात . खूप आवडीने वाचतात कारण त्यांना दुसरी गोष्टींची पुस्तक पाहायला सुद्धा मिळत नाहीत
त्यांना दुसरी काही एंटरटेनमेंट नाही.

३. एकदा एका गावामध्ये मुलांसाठी मोठं प्रदर्शन भरलं होतं
त्या साठी आसपासच्या गावांमधली अनेक शाळां मधली शेकडो मुलं आली होती . छोटी सुद्धा .
खूप ऊन होतं . चटका जाणवत होता . आम्हाला त्या डांबरी रस्त्यावर अनवाणी पाय ठेवण्याची कल्पना सुद्धा नको वाटत होती
त्या उन्हात ती पहिली ते चवथी मधली कित्येक मुलं ,छोटी बिचारी, चप्पल बुटांविना , अनवाणी चालताना दिसत होती .

त्यांच्या आई वडलांना त्यांना ते सुद्धा द्यायला परवडत नसणार , कारण अनेक मुलं तशी होती

वरच्या तीन उदाहरणामध्ये कळेल कि आपल्या सुरक्षित आयुष्याचा पलीकडे हि भयाण आयुष्य आहे

जे मोबाइलच्या पलीकडचं आहे
रोजच्या गरजेच्या वस्तू जिथे परवडत नाहीत , तिथे मोबाईल कुठं ?
--------------------------------------------------------------
आपल्या कल्पने प्रमाणे आपल्या डोक्यात तीच मोबाइलवाली मुलं असावीत फक्त
कदाचित माझी कथा. त्या मुलांसाठी नसेल -

पण ती इतर मुलांसाठी नक्कीच आहे

मुलांना रोज नवीन उपलब्ध होतेय ,
नवीन तंत्रज्ञान -ते आपसूक मिळतेय

आपण तंत्रसमृद्ध होतोय
पण आपली मुलं भावना हरवत चालली आहेत का ?
तसं असेल तर, जी आपली मुळ गोष्ट आहे - भावना
ती मुलांमधल्या रुजवण्याची गरज आहे

खरं तर त्याची आवश्यकता नसताना , ते सारं नैसर्गिक असताना

बिपीन सांगळे, दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.
मी ज्येष्ठ वगैरे नाही. मी देखिल तुमच्या सारखाच एक सर्व सामान्य मायबोलीकर आहे.

प्रतिक्रिया देताना आपण स्वतःलाच दाखवतो हे तुमचे म्हणणे मला पटलं.

अनेकदा लेखकाची / प्रतिसादकांची लिहीण्याची पद्धत (आपल्या दृष्टीकोनातून) चुकीची असली तरी समोरची व्यक्ती त्याच्या स्वभावातल्या जडणघडणीमुळे एखाद्या विशिष्ट प्रकारे व्यक्त होत असतो, जास्त मनावर नाही घ्यायचे; मुद्दा महत्वाचा वाटला तर घ्यायचा नाहीतर सोडून द्यायचे.
मी माझ्याकडून असे वागू पाहतो / तसा प्रयत्न असतो.

ठिकय गोष्ट.

> हर्ष मधे कलागुण आहेत आणि वयानुरुप व्रात्यपणाही आहे. याचा अर्थ तो पुढे वाया जावू शकेल का ? तर नाही. पण हर्षकडे जे चांगले आहे त्याची त्याला जाणीव करुन देणे हे चांगल्या शिक्षकांचे कर्तव्य. हर्षला शिवाजी महाराजांचे चित्र काढायला सांगणे ..........त्याचाच एक भाग. > हे पटलं. पण

हाबला जे म्हणायचं आहे (असं मला वाटतंय) तेदेखील एका प्रकारे बरोबर आहे वाटतंय. ती आजोबाची गोष्ट सेपरेटली चांगली आहे. चित्राची गोष्ट सेपरेटली चांगली आहे. दोन्ही एकत्र केल्या तर पेट्रोल आणि पाणी मिसळल्यासारखं वाटतंय. आणि शेवटचा संस्कारी उपदेश त्या मिश्रणावर आयसिंग ठेवल्यासारखं वाटतंय..
शिवाजी महाराजांचे चित्र काढून झाल्यावर चित्राबद्दलचीच एखादी गोष्ट चालली असती. म्हणजे एक लहानपणी खोड्या करणारा उंड्रत फिरणारा मुलगा घ्यायचा, त्याने खोडी म्हणून एक चित्र/मूर्ती बिघडवली, पण चित्र/मूर्तिकारने त्याला न रागवता शिक्षा म्हणून रोज मदतीस बोलावले, पुढे त्याला गोडी लागून तो गुरुपेक्षा महान झाला वगैरे.

खर्‍या आयुष्यातही अशा तार्किकतेच्या कसोटीवर न उतरणार्‍या गोष्टी घडताना कधीच दिसल्या नाहीत का तुला? आणि तसे पाहता ह्याचा एकमेकांशी अजीबातच, काहीही संबंध नाही असे तुला का वाटतेय? >> हर्पेन, अशा अतार्किक गोष्टी दिसणे आणि त्या अतार्किक असणे ह्यात फरक आहे ना. If you take a hard enough look, you may actually find that things are always more correlated than they appear, in other words things always happen for a reason.

मी जे काही वाचतो (मायबोली एक साईट आहे पण बाकी सगळेच), पाहतो ते आपोआप (स्वाभाविकपणे म्हण हवं तर) critical reasoning च्या चाळणीतून चाळल्या जाते, जर चाळणीत वर जास्त अडकले असेल तर ते गाळण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतात. म्हणजे मला स्वतःला नवी माहिती जमवून स्वतः reasoning करावे लागते किंवा subject matter experts ला किंवा content producer ना प्रश्न विचारावे लागतात.
जेव्हा गाळणीतून सगळे खाली गाळल्या जाते तेव्हा वाचल्याचे समाधान मिळते मग भाषा, भावना, मूल्य, artistic value वगैरे पुढच्या गाळण्या आपोआप येत राहतात. एका गाळणीतून जेवढे जास्त पुढच्या गाळणीत पडत राहील तेवढे जास्त आत्मिक समाधान मिळत राहते.
ही सगळी तो "Yes, that makes sens. किंवा वाह! काय अप्रतिम लिहिलय" मिळविण्या पर्यंतची माझी प्रोसेस आहे. ती काही ठरवून नाही तर आपोआप होते.

आता लहान मुलाने काही गमतीशीर चित्र काढणे आणि त्याला काऊंटर म्हणुन दोन पिढ्यांच्या आधीची गरिबीची गोष्ट सांगणे ह्याची reasoning न कळल्याने सगळी कथाच गाळणीत अडकून पडली, म्हणुन त्या अनुषंगाने प्रश्न विचारला.
अजून एक अशीच कथा होती ज्यात एक मास्तर शिक्षा झाल्याने बिथरलेल्या मोठया भावाच्या वळणाने लहान भाऊ जाऊ नये म्हणून त्याची चूक माफ करतात असे काहीसे. That seemed logical to me.

खरोखरच असे कोणी मुलाने तुला हा प्रश्न विचारला तर तू त्याला आणि त्याआधी तुला पटेल असे काय उत्तर देशील हे वाचायला आवडेल मला.>> ह्याचे उत्तर आहे cognitive dissonance. जसजसे मोठ्यांना इगो, अपमान, नकारात्मकता, लज्जा, स्वार्थ, आनंद, दुःख, करुणा embarrassment अशा भावना समजायला लागतात त्यांचा cognitive dissonance (CD) थोडक्यात एखाद्या बाह्य गोष्टीमुळे मनातल्या मनात uncomfortable वाटणे वाढते. थोडक्यात आपण जे म्हणतो लहान मुले निरागस असतात, त्याचे कारण त्यांचा cognitive dissonance अतिशय कमी असतो. लहान मुलांना आपण उत्तरे देताना अडखळतो कारण नकळत आपल्याच CD, thought compartmentalization (जे वागणे आपण स्वतः काही कारणाने प्रॅक्टिस करत नाही ते मुलांना preach करणे) मध्ये पाय अडकून पडत राहतो.

काही गमतीशीर चित्र काढण्याच्या निरागस (without any intent) कृतीला असे उपदेशाचे डोस पाजून खजील करणे हा मोठ्यांचा CD प्रॉब्लेम आहे, लहान मुलांचा नाही.

आपण जो संदर्भ दिला आहे - तिचा कथानायक हा शाळकरी मुलगा आहे पण ती कथा त्या मुलांसाठी नाही .
तर ती मोठ्यांसाठी आहे . मोठ्यांनी ती वाचून पुन्हा आपल्या बालपणात जाण्यासाठी . >> बापरे! म्हणजे मोठ्यांचे महाभारत आणि स्वराज्याच्या लढाया लहान मुलांसाठी आणि लहान मुलांचे शाळाजीवन मोठ्यांसाठी Uhoh

बिपिनजी,
माफ करा, पण तुमच्या ह्या कथेसारखेच तुमचे प्रतिसादही मला begging for logic वाटत आहेत .. पण असो... माबुदोस.
आता ह्या धाग्यावरून रजा घेतो.

बिपिन जी कृपया हाब सरांसारखे लोकांना इग्नोर करा. चाळण्या घेऊन लेखन चाळण्याची सवय असलेल्या लोकांनी नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकांचे लेखन वाचावे हेच सुचविन. प्रतिसाद देणारांनी नम्र पणे लेखात या या गोष्टी, प्रंसंग असते तर असे प्रतिसाद देणं मला अपेक्षित आहे.

१. मोठ्यांचे महाभारत आणि स्वराज्याच्या लढाया लहान मुलांसाठी आणि लहान मुलांचे शाळाजीवन मोठ्यांसाठी.
हा तुमचा पॉईंट मला पटला .
२.पण मराठीत असं सुदैवाने की दुर्दैवाने आहे .

३. पण माझी खात्री आहे की खुद्द लेखकाने ती कादंबरी लहान मुले हा वाचक वर्ग आहे असं समजून लिहिललेली नसणार

४. इंग्लिशमध्ये जशा त्या त्या वयोगटाच्या कादंबऱ्या असतात आणि लिहिताना त्याच भान पाळलं जातं , तसं आपल्याकडे नाही .

५.तुम्ही चांगलं लिहिता , तर तुम्ही अशी एखादी कादंबरी लिहा आणि मराठी मध्ये जिथे कुठे मुलांचं साहित्य प्रकाशित होतं , त्या संपादकांना ती 'मुलांसाठीची कादंबरी' म्हुणुन दाखवा . कोणते संपादक ते मान्य करतात , ते बघा .

६मोठ्यांचे महाभारत आणि स्वराज्याच्या लढाया लहान मुलांसाठी-
हे असं का ? तर मुलांच्या मनावर संस्कार होण्यासाठी . धर्म आणि देशप्रेम .

हे योग्य की अयोग्य - हा मोठा विषय आहे , ते जाणकारांनी सांगावं / ठरवावं .

अन ते begging for logic सोडा राव .
तुमच्या दृष्टिकोनातून -
ही कथा चांगली नाहीये , तर नाहीये .
ओके . प्रत्येक कथा प्रत्येकाला आवडेल असं नाही . मान्य .

वाचकांना विनंती
माझे प्रतिसाद बाजूला राहू दे
या निमित्त्ताने आपले काही, या बाबतीतले विचार घासून पुसून चेक करावेत

(आज वेळ होता , पाऊस होता म्हणून प्रतिसाद द्यायला जमलं . नाहीतर वाचायला वेळ मिळत नाही तर प्रतिसाद लिहायला वेळ कुठून मिळणार ? )

हाब जी
आपण रजा घेतली तर मीही घेतो .
पण एवढे प्रतीसाद देण्याचे कारण -
आपल्या प्रतिक्रिया . ..
आपण आपल्याला सोयीच्या मुद्द्यांचाच काय तो परामर्श घेतला .
त्यामुळे शंका येत राहते हो आपल्या स्टॅन्ड बद्दल
असो

खरोखरच असे कोणी मुलाने तुला हा प्रश्न विचारला तर तू त्याला आणि त्याआधी तुला पटेल असे काय उत्तर देशील हे वाचायला आवडेल मला.>> ह्याचे उत्तर आहे cognitive dissonance. >>> रोचक , विचार करावा म्हणतो Happy

मोहना
खूप आभारी आहे
माझ्या इतरही बालकथा मुलांना वाचून दाखवा हि विनंती .
प्रतिक्रिया कळवा .

तुमची ही गोष्ट माझ्या मराठी शाळेतल्या मुलांना वाचून दाखवली.
हे मला कळले नाही .
आपण अमेरिकेत असता ना ?
कृपया कळावे

बिपीन,
हो, मी अमेरिकेत असते. इथल्या महाराष्ट्रीयन मुलांना मराठी शिकवते. एका पॅरीसच्या मुलालाही online शिकवते. मतुमच्या इतरही गोष्टी मुलांना नक्की सांगेन. मध्यंतरी मुलांनी इथल्या मंडळातर्फे (FB live) गोष्टी सांगितल्या होत्या.

इथे पाहता/ ऐकता येतील.
https://bit.ly/3dmUP7a

मला वादविवाद करण्यात रस नाही आणि एक लेखक म्हणून मीच बरोबर असा माझा कधी दावाही नाही .
पण मराठी का होईना , अमेरीकेत वाढलेल्या मुलांनाही हि कथा अपील होते . यात माझा या कथे बद्द्लचा अंदाज योग्य आहे .
हे मी पुन्हा ठाम पणे नोंदवू इच्छितो
कृपया जाणकारांनी योग्य नोंद घ्यावी

मोहना ताई
क्षमा असावी
अनेक गोष्टींसाठी

पण खूप आभारी आहे

तसेच आपलेही कौतुक आहे
आपण मुलांना तिथे मराठी शिकवता

तुमच्या गोष्टी मुलांच्या तसेच मोठ्यांची कथाही ऐकली
कौतुकास्पद आहे ते सारं !
पुढील उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा

०५.०७. २० ला आपला लेख सकाळ पुणे येथे प्रकाशित झाला आहे. उत्तम अन गंभीर लेख .
अभिनंदन

Pages