इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल

Submitted by radhanisha on 13 October, 2019 - 09:52

साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं ..

" 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात "

अशी अगदी थोडक्यात माहिती वाचून मालिका पाहण्याची मुळीच इच्छा झाली नव्हती . वर्षभरापूर्वी जेव्हा पाहायचं ठरवलं तेव्हाही साशंकताच होती .. पण 10 - 15 एपिसोड पाहिल्यानंतर या मालिकेच्या प्रेमात पडले . त्यानंतर गेम ऑफ थ्रोन्स , स्ट्रेंजर थिंग्ज , वॉकिंग डेड अशा फँटसी जेनर मधल्या आणखी काही मालिका पाहिल्या ... त्या कितीही आवडल्या असल्या तरी सुपरनॅचरलचं आवडत्या मालिकांमधलं पहिल्या क्रमांकाचं स्थान नेहमीच अढळ राहिलं यात शंका नाही . खरं तर कथानक , दिग्दर्शन आणि इतर गुणांचा विचार केला तर या मालिका सुपरनॅचरल पेक्षा नक्कीच खूप वरच्या दर्जाच्या आहेत यात जाणकार प्रेक्षकांचं दुमत होणार नाही .. पण तरीही सुपरनॅचरलने फँटसी जेनरच्या मालिकांमध्ये आपलं जे स्थान निर्माण केलं आहे ते निश्चितच दखलपात्र आहे .

नेहमीच्या पॅरानॉर्मल गोष्टी म्हणजे आत्मे , वॅम्पायर , वेअरवुल्फ इत्यादी व्यतिरिक्त डेमन्स , स्वर्ग , नरक , एंजल्स , बायबलवर आधारीत सैतान / डेव्हील / लुसिफर , आर्केंजल्स , नेफिलीम , अपोकॅलिप्स , देव अशा आणखी कितीतरी कल्पना सुपरनॅचरलने वापरून घेतल्या आहेत ... दोन भावांचं नातं हा धागा सगळ्या सिजन्स मधून मुख्य विषय ठेवला आहे ...

गेम ऑफ थ्रोन्स सारखा वर्ल्डवाईड मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग नसला तरी तरी सुपरनॅचरलने जवळपास सर्वच देशात आपला थोडासा का होईना खास प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यात यश मिळवलं आहे .. ह्या वर्गाची ही मालिका म्हणजे जीव की प्राण बनली आहे .

विनोदी , इमोशनल , ऍन्गस्ट असे सगळे पैलू हाताळून प्रेक्षक वर्गाला जे आवडेल ते बरोबर देत मालिकेने 300 एपिसोडचा पल्ला गाठला आहे . शेवटच्या 4 - 5 सिजनची क्वालिटी खूप ढासळली आहे तरीसुद्धा काही ठराविक प्रेक्षकवर्ग असा आहे की मालिकेविरुद्ध एक शब्द ऐकून घ्यायला तयार नसतात , "आवडत नाही तर बघू नका कोणी जबरदस्ती केली आहे का , आम्हाला आवडते आणि अजून जितके सिजन बनवतील तितके सगळे आम्ही पाहू " असे चक्क उसळूनच उठतात .... त्यामुळे एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला जिंकून घेण्यात मालिका किती यशस्वी झाली आहे हे लक्षात येतं .

मुळात पाच सिजन्स नंतर संपणार असणारी मालिका प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे आणखी 10 म्हणजे एकूण 15 वर्षं चालली आणि आता पुढच्या वर्षी संपणार आहे .

नुकतीच या सिजननंतर मालिका संपणार असल्याची घोषणा झाली आणि बरेचसे फॅन्स अतिशय नाराज झाल्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर मालिकेशी संबंधित पेजेस , ग्रुप्स वर उमटली , मालिका संपू नये असंच बहुतेकांना वाटतं आहे .

हाय लेव्हल बौद्धिक मालिका आवडणाऱ्यांना आवडेल असं वाटत नाही पण साध्या फँटसी मालिका ज्यांना आवडतात त्यांना आवडेल असं वाटतं ..

हा एक फॅनमेड व्हिडीओ आहे , अनेक सिन एकत्र करून बनवलेला , याने थोडासा अंदाज येईल मालिकेचा . खूप सुंदर आहे .

https://youtu.be/NxKnXDMFAzk

पहिल्या एपिसोडची सुरुवात एखाद्या टिपिकल हॉरर चित्रपटात अगदी फिट बसेल अशा सिनने होते .. छोट्या बाळाला पाळण्यात ठेवून आई वडील आणि बाळाचा छोटा भाऊ आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला जातात .. थोड्या वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून आई खोलीत जाते . तिथे पाळण्यासमोर एक माणूस पाठमोरा दिसतो , साहजिकच नवरा बाळाचं रडणं ऐकून आला असं म्हणून ती जायला निघते पण खाली हॉल मध्ये तिचा नवरा टीव्ही पाहता पाहता झोपलेला दिसतो .. ती बाळाच्या खोलीत धाव घेते .. खाली झोपलेल्या बाळाच्या वडलांना वरून किंचाळी ऐकू येते , ते घाईघाईने वरच्या खोलीत जातात आणि बाळाची आई सिलिंगवर असते , पोटावर जखम असते त्यातून रक्त सांडत असतं आणि संपूर्ण सिलिंग पेटलेलं असतं आणि कुठल्याही क्षणी संपूर्ण खोलीचा भडका उडणार असतो ... बाळाचा छोटा भाऊ धावत येतो , त्याच्याकडे बाळाला देऊन त्याला बाहेर घेऊन जायला सांगतात .. आणि आपल्या बायकोला वाचवणं आता अशक्य आहे हे समजताच नाईलाजाने आपणही बाहेर पडतात .. फायर ब्रिगेड , पोलीस येऊन आपलं काम करत असताना दोन्ही मुलांना जवळ घेऊन उभ्या राहिलेल्या वडलांच्या चेहऱ्यावर हे जे कोणी केलं त्याला शोधून काढून संपवायचा निश्चय दिसतो .

https://youtu.be/dKtE0l0J0uA

19 वर्षांचा लीप घेऊन पुढचा सिन येतो ..

सॅम आपल्या गर्लफ्रेंडसोबत अपार्टमेंट रेंट घेऊन राहत आहे .. स्टॅनफोर्ड या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये तो लॉ शिकत आहे आणि पुढच्या अनुभवासाठी येत्या सोमवारी कुठेतरी अप्लाय करणार आहे , जो इंटरव्ह्यू त्याच्यासाठी फार महत्वाचा आहे ... त्याच रात्री त्यांच्या अपार्टमेंट मध्ये कुणीतरी घुसतं , झटापटीनंतर समजतं की तो डीन आहे , सॅमचा मोठा भाऊ आणि जॉनचा मोठा मुलगा ... तो वडील हंटिंग ट्रिप वरून परत आलेले नाहीत त्यांना शोधायला माझ्याबरोबर चल म्हणून सांगतो ... पुढच्या काही संवादांत कळतं की बायको मेरीच्या मृत्यूनंतर जॉनने सुपरनॅचरल गोष्टींविषयी त्या क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून , इतर हंटर्स कडून माहिती मिळवत मिळवत त्या क्षेत्रातला तो स्वतः एक तज्ज्ञ हंटर बनलेला असतो .... आणि दोन्ही मुलांना लहानपणासुन तेच शिक्षण दिलं आहे ... सतत शाळा बदलणे , सतत फिरती , गन्स आणि इतर शस्त्रांचं - निःशस्त्र लढण्याचं ट्रेनिंग ... ज्या गोष्टीने मेरीला मारलं तिचा शोध घेऊन संपवणं हे त्याचं ध्येय आहे पण गेल्या 19 वर्षात ती गोष्ट सापडलेली नाही , आता मात्र ती गोष्ट / अस्तित्व काय असेल याची बरीचशी माहिती त्याच्या हाती लागलेली आहे आणि त्याला कसं ठार करायचं ह्याच्याविषयी त्याचे प्रयत्न चालू आहेत .

डीनला याबाबत काही तक्रार नाही पण सॅमला या प्रकारे जगण्यात रस नाही त्याला नॉर्मल आयुष्य हवं आहे आणि म्हणून तो वडलांशी भांडून लॉ कॉलेजला आला आहे , त्याने पुढे शिकायला जावं यालाही जॉनचा विरोध होता .... शेवटी डीन त्याला तयार करतो आणि ते जॉनच्या शोधात निघतात ....

https://youtu.be/5IeSBWRGRHs

दरम्यान याच एपिसोडच्या शेवटी सॅमची प्रेयसी त्याच पद्धतीने मरण पावते जशी त्याची आई सिलिंग वर जळून मरण पावली होती ... आणि सॅम लॉयर होण्याचं ध्येय बाजूला ठेवून ज्याने तिला मारलं त्याच्या शोधकरता वडिलांच्या मदतीसाठी त्यांना शोधण्याचा निर्णय घेतो .

https://youtu.be/ay5pXNTBFtU

.
.
.

या मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत .... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ... भयपटांमध्ये बऱ्याच वेळा नुसतं दचकावून वगैरे घाबरवण्याच्या तंत्राचा वापर केलेला असतो .. कॅरॅक्टर डेव्हलपमेंटला त्यात फारसं महत्व नसतं .

या सिरिअल मधली अनेक पात्रं प्रेक्षकांच्या अगदी आवडीची बनून जातात .... उदाहरण म्हणजे बॉबी हे पात्र - बॉबी हा हंटर दाखवला आहे , बॉबीला स्वतःची मुलं नाहीत , पत्नी मरण पावली आहे .. जॉनची हंटिंगच्या निमित्ताने बॉबीशी ओळख आणि मैत्री होते ... जॉन ज्या पद्धतीने मुलांना वाढवत असतो कडक मिलीटरी शिस्तीत, सतत ट्रेनिंग ते बॉबीला पसंत नसतं .. जेव्हा जेव्हा जॉन मुलांना बॉबीकडे सोडून हंटिंगला जात असे तेव्हा बॉबी त्यांना लहान मुलासारखं खेळता , मजामस्ती करता येईल याकडे लक्ष देत असे . दोघे मोठे होऊन स्वतः हंटर्स झाल्यावरही बॉबीशी असलेली त्यांची मैत्री टिकून राहिली .. त्यांच्यावर तो स्वतःच्या मुलांप्रमाणे प्रेम करतो ..... बॉबी हंटिंगसाठी लागणाऱ्या माहितीचा एक्स्पर्ट आहे , त्याची अनेक हंटर्सना आणि सॅम आणि डीन यांनाही अनेकदा मदत होते ... जॉनच्या कडक स्वभावाच्या तुलनेत काहीसं सॉफ्ट केअरिंग कॅरॅक्टर दाखवलं आहे . जॉन आणि त्याच्या मुलांमधले वाद , त्याचा दृष्टीकोन , त्याचा हुकूम गाजवण्याचा स्वभाव , सॅम मोठा झाल्यावर त्याने जॉनला झुगारून घराबाहेर पडणं , डीनची त्या दोघांच्या मध्ये होणारी घालमेल ... एकीकडे वडिलांचा प्रत्येक शब्द ऐकायचा हे त्याच्या रक्तात भिनलेलं आहे दुसरीकडे भावाला गमवावं लागण्याचं दुःख आहे , काही करून तिघांचं लहानसं कुटुंब परत एकत्र आणायची त्याची इच्छा आहे पण लहान भाऊ आणि वडील यांच्यात सतत खटके उडतात त्यात मध्यस्थी करताना त्याचा जीव मेटाकुटीला येतो ...

हंटिंग साठी जाताना कुठे कशासाठी जात आहोत याचं कारण न सांगता जॉन सॅम आणि डीन यांना एके ठिकाणी ड्राइव्ह करायला सांगतो . कुठे , कशासाठी जात आहोत असे प्रश्न विचारायची डीनला गरज वाटत नाही , डॅड आवश्यक ती माहिती योग्य त्या वेळी सांगणारच हे त्याला माहित आहे .... पण सॅमला राग येतो , की पार्टनरसारखं न वागवता जॉन अजूनही आपल्याशी बरोबरीच्या नात्याने माहिती शेअर करत नाही , आपलं मत विचारात घ्यायची तसदी घेत नाही ... हुकूम सोडतो ... दोघांत खटका उडतो . म्हणूनच मी घर सोडून गेलो असं सॅम म्हणतो तर आम्हाला तुझी गरज असताना तू सोडून गेलास ( इतका तू स्वार्थी आणि बेजबाबदार आहेस ) असा आरोप जॉन करतो , यावर उसळून - घरातून बाहेर गेल्यावर परत येऊ नकोस , तुझा आमचा संबध संपला असं जॉनने म्हटल्याची आठवण सॅम करून देतो . डीन कसंतरी त्यांना शांत करतो आणि सगळे पुढच्या कामासाठी निघतात .

https://youtu.be/T1aSCXK_lF4

डीन एक काम करायला गेलेला असतो , जॉन आणि सॅम त्याची वाट पाहत असतात ... तेव्हा जॉन सॅमला सांगतो , ज्यावेळी त्याचा जन्म झाला तेव्हापासून प्रत्येक महिन्याला 100 डॉलर्स काढून त्याच्या नावाने अकाउंट मध्ये ठेवले .. डीन साठी सुद्धा तसंच - दोघांच्या शिक्षणासाठी म्हणून .... हे मेरीचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे सॅम सहा महिन्यांचा होईपर्यंत .... म्हणजे तो सांगू इच्छितो की हे हंटिंगचं आयुष्य त्याला आपल्या मुलांसाठी अपेक्षिलेलं नव्हतं ... पण मेरीच्या मृत्यूनंतर त्याचा बदला घेणं आणि मुलांना सुरक्षित ठेवणं या विचाराने तो एवढा झपाटून गेला की त्यांना काय हवं आहे याचा विचार करणं बंद झालं ... तू जेव्हा कॉलेजला जायचं म्हणालास तेव्हा माझ्या डोक्यात आधी हा विचार आला की तिकडे तू एकटा असणार , असुरक्षित , काही झालं तर वाचवायला आम्ही नसणार म्हणून मी विरोध केला .... तुझी स्वप्नं - आकांक्षा यांचा मी विचारच करत नव्हतो .... तू माझ्यापेक्षा वेगळा आहेस हे मी समजून घेऊ शकलो नाही ... सॅम म्हणतो मी वेगळा नाही , माझी प्रेयसीही त्यांनी आईला मारलं तशीच मारली .. मी तुम्हाला समजू शकतो ... मग मस्करीत त्या कॉलेजसाठी ठेवलेल्या फंडचं काय झालं म्हणून विचारतो , त्यावर जॉन ते पैसे बंदुका , गोळ्या आणि इतर शस्त्रांवर खर्च होऊन गेले म्हणून सांगतो आणि दोघे हसू लागतात ... तेवढ्यात डीन येतो आणि मगाशी भांडण झालेलं असून आता दोघे हसत आहेत हे बघून आश्चर्यचकित होतो पण दाखवत नाही .

https://youtu.be/LEoLDiPtYJw

जॉनने त्याची माफी मागताना दिलेलं स्पष्टीकरण - की तुमच्या आईच्या मृत्यूनंतर तुम्हाला सुरक्षित ठेवणं , स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम बनवणं हे माझं उद्दिष्ट बनलं , ते साध्य करत असताना मी तुमचा ड्रिलमास्तर बनत गेलो आणि वडील बनण्यात कुठेतरी कमी पडलो .....

असे खूप इमोशनल प्रसंग , गुंतागूंंती दाखवल्या आहेत ... ते बघताना रंगून जायला होतं ..
.
.
.

सुपरनॅचरल मध्ये डेमन कसा निर्माण होतो ही कल्पना उत्तम दाखवली आहे .... जे माणसांचे आत्मे वाईट कर्मांमुळे नरकात जातात , त्यांना तिथे वेगवेगळ्या पद्धतीने टॉर्चर केलं जातं ... इतक्या वेदना दिल्या जातात की त्यांचं माणूसपण गळून जातं आणि त्या आत्म्याचं डेमनमध्ये रूपांतर होतं . ज्याला शरीर नसतं फक्त काळ्या धुराच्या स्वरूपात त्याचं अस्तित्व असतं . डेमनमध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया फार वेदनादायी असते पण एकदा डेमन झाल्यावर काही शक्ती प्राप्त होतात , अमानवी शक्ती , माणसाच्या शरीरात शिरून ते वापरणं , स्पर्श न करता वस्तू इकडच्या तिकडे करणं आणि आणखी बऱ्याच .... डेमन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत ... बहुसंख्य डेमन्स जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतात तेव्हा त्याचे डोळे पूर्ण काळे होतात ...

सुपरनॅचरल मालिकेमध्ये क्रॉसरोड्स डेमन डील ही संकल्पना बऱ्याचवेळा वापरली आहे ... क्रॉसरोड्स डेमन्स हे हेल / नरकाचे कर्मचारी दाखवले आहेत .. त्यांचे वरचे अधिकारी म्हणजे पुरातन अधिक शक्तिशाली असे डेमन्स , त्यात प्रिन्सेस ऑफ हेल , क्नाईट्स ऑफ हेल वगैरे श्रेणी आहेत .. क्रॉसरोडस डेमन्सचे डोळे लाल असतात तर पिवळे डोळे असलेले फक्त 4 डेमन्स आहेत - प्रिन्सेस ऑफ हेल - नरकाचे राजकुमार , त्यांचं बाकीच्या सगळ्या डेमन्सवर नियंत्रण असतं ...

क्रॉसरोड्स डील म्हणजे ज्या माणसांना या प्लँचेट , स्पिरिटना आवाहन करणे , जुनी चेटूक , तंत्रमंत्र शिकवणारी पुस्तकं किंवा ऐकीव माहितीवरून या सैतानी गोष्टींमध्ये गती आहे ते लोक यश / एखादी इच्छित वस्तू मिळवा आहे 2 - 3 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जाऊन डेमनला आवाहन करू शकतात ... त्याची पद्धत म्हणजे अशा 2 -3 रस्ते एकत्र येतात त्या ठिकाणी मध्यभागी ( अर्थातच अशी जागा शहरी भागात नाही तर जिथे अजून काँक्रीटचे रस्ते झाले नाहीत अशाच ठिकाणी असते ) एक लहान खड्डा खणून त्यात एका लहान पेटीत आपला फोटो , काही नाणी , इतर काही वस्तू उदा . विशिष्ट झाडाची फुलं किंवा विशिष्ट प्राण्याचं विशिष्ट हाड आदी घालून त्या खड्ड्यात पुरतात ..... काहीवेळा आवाहनाचा ठराविक मंत्र उच्चारावा लागतो .

हे केलं की क्रॉसरोड्स डेमन तिथे हजर होतो ... हे डेमन्स बहुधा तरुण सुंदर मुलींची शरीरं वापरतात ( म्हणजे पझेस करतात ) .... डीलमध्ये अमाप पैसा , टॅलेंट किंवा काहीही एक गोष्ट मागता येऊ शकते . डील / करार पक्का करण्यासाठी त्या डेमनचं चुंबन घेणं हीच पद्धत आहे .... एखादेवेळी मुलगी नसली आणि पुरूषाचं शरीर असेल तरीही त्याशिवाय पर्याय नाही .

पण हा करार करून मिळवलेली ती गोष्ट उपभोगण्यासाठी फक्त 10 वर्षं मिळतात . आणि त्या बदल्यात त्या व्यक्तीला आपला आत्मा विकावा लागतो . म्हणजे ती गोष्ट मिळाल्यानंतर 10 वर्षांनी त्या व्यक्तीचा मृत्यू होणार .... त्या व्यक्तीला मारण्यासाठी नरकातले क्रूर राक्षसी कुत्रे / हेलहाऊन्ड्स पाठवले जातात ... आणि ते शरीर रक्तबंबाळ करून मृत्यू झाल्यानंतर आत्म्याला / सूक्ष्मशरीराला धरून नरकात नेतात ...

डीलची 10 वर्षं संपल्यानंतर काय होणार याबद्दल डील करणाऱ्यांना माहीती नसेल तर ती माहिती द्यायला क्रॉसरोड्स डेमन्स बांधील नसतात ... एखादा डेमन अशी जितकी डील्स महिन्याला करेल त्यावर त्याला मिळणाऱ्या सवलती वगैरे असतात ... त्यासाठी हे डेमन्स असं डील करण्यासाठी उत्सुक / डेस्परेट असणारी माणसं शोधून त्यांना मोहात पाडतात ..

उदा . या मालिकेत काहींनी केलेली डील्स म्हणजे -

एका सामान्य डॉक्टरने सर्वाधिक यशस्वी सर्जन बनण्यासाठी डील केलं , तो रातोरात टॅलेंटेड झाला . तसंच एका सामान्य आर्किटेक्टने यशासाठी डील केलं तो नावाजलेला कुशल श्रीमंत आर्किटेक्ट बनला .... एका चित्रकाराने मागताना चूक केली आणि श्रीमंतीऐवजी टॅलेंट मागितलं , तो उत्कृष्ट चित्रं काढू लागला पण ती खरेदी करण्यात कोणाला रस नव्हता त्यामुळे तो गरिबीतच राहिला ... एकीने आपली आजारी आई मृत्यू पावू नये म्हणून तर एकाने आपली प्रिय पत्नी कँसरमधून बरी व्हावी म्हणून 10 वर्षांचं डील करून आत्मा विकला .

हा असा विकलेला आत्मा हेलच्या राज्यकर्त्यांच्या प्रॉपर्टीखाली येतो ... जितके आत्मे अधिक तेवढी त्यांची शक्ती वाढते .... यातल्या बहुतेक आत्म्यांना टॉर्चर करून डेमन्स बनवलं जातं ...

या मालिकेत पत्नीच्या मृत्यूनंतर जॉन सुपरनॅचरल गोष्टींना शोधून मारणारा हंटर बनतो ... त्यात डेमन्सही येतात ... डेमन्सना ठार मारण्याचा मार्ग जॉनला माहीत नाही , पण त्यांना डेमन ट्रॅपमध्ये अडकवता येतं आणि लॅटिनमधला एक्सॉर्सिजम वाचून परत नरकात पाठवता येतं , जिथून परत यायला त्यांना बराच वेळ आणि कष्ट पडतात ...

त्याच्या पत्नीला मारणारा नरकाच्या चार प्रिन्सेसपैकी एक असलेला अतिशय शक्तिशाली असा डेमन आहे ... त्याचं नाव समजेपर्यंत त्याला यलो आईड डेमन या नावाने संबोधलं जातं ... त्याच्यावर एक्सॉर्सिजमचा काही परिणाम होणार नाही ..... जॉन त्याला मारण्याचा मार्ग शोधण्याच्या बराच जवळ पोहोचला आहे ... त्याला पूर्ण ठार मारू शकेल अशी एकमेव गन जी काही शतकांपूर्वी बनवली गेली होती आणि त्यानंतर बराच काळ बेपत्ता होती ती शोधून काढण्यात तो यशस्वी झाला आहे ......

या गनला कोल्ट असं नाव आहे . या कोल्टमध्ये वापरण्याच्या विशिष्ट गोळ्याही मर्यादित म्हणजे 6 -7 च आहेत ... त्यामुळे प्रत्येक गोळी जपून वापरणं त्यांना आवश्यक आहे .. या गोळीने सामान्य डेमनही मरतात पण गोळ्या संपल्या तर अझाझेलला संपवणं अशक्य आहे .

या बाप मुलांना कोल्ट मिळाली हे समजल्यावर डेमन्स जॉनला ट्रॅप करून किडनॅप करून एका हॉटेलच्या रूम मध्ये नेतात . गन त्याच्या मुलांकडे म्हणजे सॅम आणि डीन यांच्या ताब्यात असते . वडील जिवंत हवे असतील तर गन आपल्या हवाली करा असा निर्वाणीचा इशारा सॅम आणि डीन यांना दिला जातो .

दोघे मोठ्या कुशलतेने डेमन्सच्या पहाऱ्यातील जॉनला सोडवून आणतात . डेमनने त्याच्या शरीरात प्रवेश तर केलेला नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याच्यावर होली वॉटर शिंपडतात ... कारण होली वॉटर हे डेमन्ससाठी ऍसिडसारखं वेदनादायी असतं . पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही त्यामुळे तो पझेस झालेला नाही याची खात्री होते .

त्या प्रयत्नात सॅमचा जीव वाचवण्यासाठी डीनला कोल्टमधली गोळी वापरून एका सामान्य डेमनला मारावं लागतं . याआधीच अशाच जीवनमरणाच्या प्रसंगी गनचा वापर करावा लागल्याने आता फक्त 3 - 4 च गोळ्या शिल्लक असतात .

सॅम आणि डीन जॉनला घेऊन त्यांच्या लपण्याच्या केबिनमध्ये येतात ... आता काही वेळातच डेमन्स त्यांच्या मागावर येतील अशी परिस्थिती असते . डीन जॉनला विचारतो , मी गोळी वापरली त्याबद्दल तुम्ही रागावला तर नाहीत ना ? सॅमला वाचवण्यासाठी गोळी वापरण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता .

जॉन उत्तर देतो की तो रागावलेला नाही , उलट त्याला डीनचा , त्याच्या धाडसाचा अभिमान आहे ..

डेमन येत आहेत असं खिडकीतून दिसू लागतात जॉन डीनकडे कोल्ट गन मागतो . पण डीनला संशय आलेला आहे ... गोळी वापरली कळल्यावर खरंतर जॉन संतापला असता आणि डीनला उभा आडवा तासला असता ... असा त्याचा कडक / तिरसट स्वभाव डीन पुरेपूर ओळखून आहे .... त्यामुळे किडनॅप झालेला असताना डेमनने त्याला पझेस केलं असावं असा त्याला दाट संशय येतो ... होली वॉटरचा परिणाम झाला नसला तरी ... डीन गन द्यायला नकार देतो .. सॅमसुद्धा डीनच्या बाजूने उभा राहतो ... जॉन आपण पझेस नसल्याचं पटवण्याचा प्रयत्न करतो पण भाऊ ऐकत नाहीत ... मग एवढी तुला खात्री आहे झाड गोळी असा डीनला भावनाविवश करणारा पवित्रा जॉन घेतो .
डीनची दुविधा मनस्थिती होते ... आणि त्याचा फायदा घेऊन जॉनच्या शरीरात असलेला अझाझेल दोघांना उडवून भिंतींवर खिळवून ठेवतो , गन हातातून पडते .
अझाझेल सांगतो की मी इतका पुरातन आणि शक्तिशाली आहे की होली वॉटरसारखी गोष्ट माझ्यासारख्यावर परिणाम करू शकत नाही ....

https://youtu.be/srnMqERpf0Y

डीन अझाझेलचा अपमान करतो . त्याबरोबर डीनच्या छातीतून रक्ताच्या धारा वाहू लागतात ... डीन जॉनला डॅड अशी हाक मारून जागृत करण्याचा प्रयत्न करतो .. जॉन मोठ्या प्रयत्नाने स्वतःच्या शरीराचा काही क्षणांसाठी ताबा घेतो आणि सॅम आणि डीन अझाझेलच्या बंधनातून मुक्त होतात , लगेच सॅम गनचा ताबा घेतो आणि जॉन / अझाझेलवर रोखतो . तू मला मारलंस तर तुझा बापसुध्दा मरणार , अशी दर्पोक्ती अझाझेल करतो ... सॅम जॉनच्या छातीत गोळी घालण्याऐवजी पायात गोळी घालतो . शरीराचा ताबा अझाझेलकडून जॉनकडे येतो . तो सांगतो की डेमन शरीर आता सोडेल कोणत्याही क्षणी..... मी फार तर काही क्षण त्याला धरून ठेवू शकतो ... तेव्हा छातीत गोळी घाल ... ह्यालाच शोधण्यात मी माझं पूर्ण आयुष्य खर्च केलं आहे , ह्यानेच तुमच्या आईला आणि सॅमच्या गर्लफ्रेंडला मारलं आहे .... छातीत गोळी घालण्यासाठी जॉन अक्षरशः भीक मागतो .... तिकडे जखमी अवस्थेत डीन वडील मरता कामा नयेत म्हणून काही झालं तरी गोळी घालू नको अशी विनवणी करत असतो ... शेवटी सॅम गन खाली घेतो आणि डेमन जॉनच्या शरीरातून बाहेर पडतो .... जॉन हताश होऊन सर्व काही हरल्यासारखी त्याची मनस्थिती झालेली असते .

https://youtu.be/sk-NYlWJq9Q

तिथून बाहेर पडताना त्यांच्या गाडीला डेमन्स अपघात घडवून आणतात . डीनला गंभीर इजा होते ... त्याला वाचवण्यासाठी जॉन स्वतः त्याच यलो आईड डेमनला म्हणजे अझाझेलला आवाहन करून त्याच्याशी डील करतो ... डीनला वाचवण्याच्या बदल्यात गन त्या डेमनला द्यावी लागते शिवाय जॉनचा आत्मासुद्धा . त्याला 10 वर्षंपण मिळणार नाहीत ... डीन बरा झाला की लगेच जॉनचा मृत्यू होणार .... पण जॉन ते डील स्वीकारतो ....

तिकडे जबरदस्त दुखापत झालेला डीन आऊट ऑफ बॉडी एक्सपेरिएन्स घेत असतो ....

https://youtu.be/1ic1AvlP1bo

त्याला मृत्यू स्वीकारण्यासाठी तयार करायला आलेली रिपर / मृत्यूनंतर आत्म्याला न्यायला आलेली कर्मचारी एंजल त्याला समजावत असते .... त्याचवेळी यलो आईड डेमन म्हणजे तिने धारण केलेल्या शरीराचा ताबा घेऊन डीनला परत आपल्या शरीरात पाठवतो ,

https://youtu.be/h5j2JF_6Abg

त्याच्या सर्व इंटर्नल जखमा भरून आलेल्या असतात .. त्यानंतर डीनशी बोलून झाल्यानंतर काही वेळाने जॉन मृत अवस्थेत सॅमला आढळतो ....

https://youtu.be/xQSKQFz_MQw

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आवडती सिरियल....पण आताशा तोचतोचपणा येऊ लागला होता. शेवटचा सिझन 10 ऑक्टोबरला युएसमध्ये सुरु झालाय. आपल्याकडे एएक्सएन कधी लावत्ं बघू. लागला की इथे चर्चा करायला आवडेल. अजून लेख पूर्ण वाचला नाही. मग वाचून प्रतिक्रीया देते.

वाचला लेख. गोषवारा चान्गला मांडलाय तुम्ही. मी ही सीरियल मधल्या कुठल्या तरी सिझनपासून पहायला सुरुवात केली. त्यामुळे आधीचं कथानक तुटक माहित होतं. डीन, सेम आणि केस्टीएल ह्या तिघात कोण अधिक handsome मला अजूनही ठरवता येत नाही Happy क्राऊली मालिका सोडून गेला तेव्हा भारी वाईट वाटलेल्ं. रोविना डोक्यात जाते पण सॉलिड पॉवरफुल आहे म्हणून आवडते. ल्युसीफरच्या तोंडाला पण फेस आणला होता तिने. अर्थात मालिकेत बरेचसे रेफ्रन्सेस बायबलचे असल्याने कधिकधी गूगल सर्च करावा लागतो. असो. शेवटच्या सिझन मध्ये कोण कोण मरतं तेव्हढ्ं पाहायचं आता.

क्राऊली मालिका सोडून गेला तेव्हा भारी वाईट वाटलेल्ं. >> हो व्हिलनपासून आवडतं कॅरॅक्टर कधी झाला समजलंच नाही , रोवेना पण तशीच बदलली .. पुढे जॅकसोबत राहून हळूहळू लुसीफरचं हृदयपरिवर्तन होऊन तोही यांचा मित्र बनेल अशी मला खूप आशा होती पण ती पूर्ण झाली नाही . मेरी पुन्हा जिवंत केली त्याआधी तिचं जे एक कॅरॅक्टर रंगवलं होतं ते आवडायचं , परत आणल्यावर कॅरॅक्टर पूर्ण बदलून टाकलं ; ते अजिबात आवडलं नाही ...

नवीन बॉबी तोच ऍक्टर असूनही "आम्हाला हा आवडत नाही , जुना परत आणा" असं फॅन्स म्हणतात तेव्हा कपाळावर हात मारून घ्यावासा वाटतो ... चांगले फॅन फेव्हरेट कॅरॅक्टर लोकांना आवडायचे थांबतील अशी माती दिग्दर्शकांनी खाल्ली आहे .. तरी बरं सॅम आणि डीनच्या बाबतीत तसं काही होऊ दिलेलं नाही .... त्यांच्या जीवावरच मालिका इतकी वर्षं चालली आहे ...

लेटेस्ट ट्विस्ट मला आवडला नाही , मला चक ऍक्चुली आवडत होता त्याला व्हिलन करून टाकलं ... पहिला एपिसोड 10 - 11 तारीखलाच टॉरेंट वर आला आहे .. पण तुमचा जेव्हा पाहून होईल टीव्हीवर किंवा दुसरीकडे तेव्हा या इथे ... इंग्रजीत चर्चा करायला खूप लोक आहेत युट्युब - फेबु वर पण मराठीत आपल्या आवडत्या मालिके बद्दल वाचायला - चर्चा करायला मिळण्याची वेगळीच खुमारी आहे ...

मला तो चक गॉड म्हणून अजिबात पटला नव्ह्ता. त्याची ती बहिण डीनवर खुश झाली होती ते पण कैच्या कै वाटलं होतं. खरं तर मला ते वेगवेगळ्या प्रकारच्या अमानवी शक्ती असलेल्या केसेस असलेले एपिसोडस फार आवडायचे. हे उगाच ल्युसिफरचं लचांड कुठून मागे लावलं असं झालं होतं. अर्थात केसेस मध्ये पण तोचतोचपणा येऊ लागला होता नंतर. जेक उर्फ leonardo dicaprio चं धुवून काढलेलं व्हर्जन मला आधी आवडलं नव्हतं. नंतर तो बराच सुसह्य झाला. तरी US president च्या शरिरात ल्युसिफर घुसला असताना conceive झालेला जेक ल्युसिफर चा मुलगा कसा हे खूप विचार करुन सुध्दा मला काही कळलं नाही. Happy दर सिझनला डिन, सेम किंवा केस्टिएल ह्यापैकी एक कोणितरी जाणार अशी भीती वाटायची. मग लक्षात आलं की ह्यात बहुतेक सगळी गेलेली जनता बुमरेंग सारखी परत येते. एक क्राउली सोडला तर. मग ती भीती गेली.

इथे एपिसोडस सुरु झाले की येते नक्की. बाकी मायबोलीवर ही सीरियल पहाणारं कोणीच नाही वाटतं.

फायनल सिझनचा पहिला एपिसोड पाहिला. आधीच्या सिझनचे शेवटचे एपिसोडस पाहायचं ठरवलं होतं. जमलं नाही. त्यामुळे ह्या एपिसोडची टोटल लागली नाही. तरी पुन्हा hell मधून सारे आत्मे बाहेर येणं शिळ्या कढीला उत आणण्याचा प्रकार वाटला. जेकमध्ये demon शिरलाय तरी तो जेकसारखीच acting करतोय की. केस्टिएल एकटाच लढतोय. बाकी एंजल्स नेहमीसारखेच तटस्थ दिसताहेत. मला एक कधीच कळलं नाही की God एकच आहे मग स्वर्गही एकच हवा. म्हणजे प्रत्येक angel एकच हवा. मग कितीका universes असेनात. ह्या दुसर्या दुनियेत मायकल कसा आहे मग??? असो. बाकी उद्या लिहिते.

ओह, आज परत एकदा जाणवलं की Sam च्या उंची आणि खळ्यांवर मी आजही जाम फिदा आहे Wink

शेवटच्या सिझनपर्यंत ह्या लोकानी crisp dialogues टिकवून ठेवलेत हे कौतुकास्पद आहे खरंच. चकची कटकट गेली ते बरं आहे. हा असला गॉड असल्यापेक्षा नसलेला बरा. तरी जेक मध्ये शिरलेला demon तो माणुस रुपात पृथ्वीवर असताना दगडाची पुजा करायचा असं काहितरी म्हणतो त्यात हिंदू धर्मातल्या पुजेचा derogatory reference होता का ते कळलं नाही. त्या वाक्यातला एक शब्द ऐकू आला नाही आणि सबटायटल्समध्ये त्या जागी फुल्ल्या दिसल्या. पण तो काय असावा ह्याची कल्पना आली. असं केलं असेल तर निषेध!!

मी गेल्या सिजनचे शेवटचे 3 - 4 एपिसोड पाहिलेच नाहीत एवढी स्टोरी बोअर झाली होती ... मला पहिल्या सिजनपासून सॅमच आवडतो Happy अर्ध्या मुली डीन वर का फिदा आहेत समजत नाही .. तो भारी आहेच दिसायला , वयाने जवळजवळ काहीच स्पर्श केला नाहीये त्याला उलट पूर्वीपेक्षा हॅन्डसम दिसतो , तर सॅमचा सुरुवातीचा गोंडस निरागस चेहरा पार बदलून गेला आहे पण मला मात्र सॅमच आवडतो .. सॅम क्रश , डीन फेव्हरेट कॅरॅक्टर ..

एंजल स्टोरीलाईन तर 8 व्या 9 व्या सिजन मधेच नावडू लागली होती ... काही अर्थ नाही .. एंजल म्हणजे माणसांपेक्षा सुप्रिम बिइंग असणं अपेक्षित होतं तर हे एकमेकांतच लढू लागले ... ते अपॉकॅलिप्सच्या वेळी म्हणजे 5 व्या सिजनमध्ये 2 तट पडणं एकवेळ ठीक होतं पण नंतर 9 व्या सिजन मध्ये एंजल वॉर , त्यांचे आपापसात पडलेले गट , हाती लागलेल्यांना टॉर्चर करणं काहीच अर्थ नव्हता .... डेमन्स बरे म्हणायची पाळी आणली ... एंजल्स एवढे कसे रक्तपिपासू , ब्रदर्स म्हणायचे ना एकमेकांना ...

तरी मध्ये मध्ये कॉमेडी , सॅम डीनचं ब्रदर रिलेशन ह्या सगळ्यामुळे पहायची बंद करावी एवढी वेळ आली नाही ..

पॅगन गॉड्सचा एपिसोड पाहिला होता का , गणपती आणि कालीचा सरळसरळ अपमान केला आहे आणि इतर देशांच्याही देवांचा ... पण त्यांनी स्वतःच्या बायबल मधल्या देवाला आणि एंजल्स ना सोडलं नाही तिथे दुसऱ्या धर्माचा आदर करतील ही अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही .. तरी त्या एपिसोड च्या युट्यूब व्हिडीओ वर मी निषेध व्यक्त केला होता .. काली कोण नि गणेश कोण आणि त्यांना काय दाखवलं आहे याबद्दल राग व्यक्त केला होता .

> पण त्यांनी स्वतःच्या बायबल मधल्या देवाला आणि एंजल्स ना सोडलं नाही तिथे दुसऱ्या धर्माचा आदर करतील ही अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही > कोणात्याही धर्मचा आदर करत नसतील तर ठीकच आहे की!
===

बादवे कोणत्या इंग्रजी मालिका बघायच्या हे तू कसं ठरवतेस?
कोणकोणत्या मालिका बघितल्या आहेत आतापर्यंत?

बादवे कोणत्या इंग्रजी मालिका बघायच्या हे तू कसं ठरवतेस?
कोणकोणत्या मालिका बघितल्या आहेत आतापर्यंत? >>

जास्त नाही , मी अजून नवीन आहे इंग्रजी मालिकांच्या प्रेक्षकवर्गामध्ये .. मला फॅन्टसी , सायन्स फिक्शन - सायन्स थ्रीलर , क्राईम - डिटेक्टिव्ह या जेनर्स मधल्या मालिका आवडतात मग जास्त रेटिंग कुठल्या मालिकेला आहे ते शोधते , स्टोरी वाचते , आवडली तर 1 - 2 एपिसोड बघते आणि पुढे पहायची की नाही ठरवते ... मी जास्त नाही पाहिलेल्या अजून ..

1 . डॉक्टर हू - सायन्स + थोडीशी फॅन्टसी आहे .. 1963 ते 1989 पर्यंत चाललेली जुनी मालिका होती , ती 2005 पासून नव्या रुपात सुरू केली , 2005 पासून ते आतापर्यंतचे सर्व सिजन पाहून संपवले .. 2012 मध्ये सापडली मला .

2 . सुपरनॅचरल . 14 सिजन

3. वॉकिंग डेड - रिकची . 10 सिजन

4. स्ट्रेंजर थिंग्ज - 3 सिजन

5. गेम ऑफ थ्रोन्स पूर्ण

6 . ब्रेकिंग बॅड - भारी आहे तरीपण नाही आवडली मला , एवढं रियल झेपलं नाही , शेवटचे 3 एपिसोड पाहिले नाहीत , वॉल्ट आणि त्याच्या फॅमिली बरोबर कनेक्ट व्हायला झालेलं , मोठ्या मुश्किलीने सगळं सेटल होत आलं असताना जेस्से आणि हॅन्कच्या मूर्खपणामुळे सगळ्याची माती होत असताना बघून जीव तडफडला आणि शेवटी नाही पाहिली , एन्ड काय ते वाचलं फक्त ( म्हणजे मालिका आवडली की आवडली नाही , प्रश्नच आहे ₹₹ Happy )

7 . शेरलॉक , बीबीसी .

8 . द गुड डॉक्टर - ऑटिस्टिक डॉक्टरची स्टोरी आहे पण बाकीची पात्रं पण खूप महत्त्वाची आहेत , त्याच्या एकट्याच्या भोवती फिरणारी कथा नाही .. मेडिकल ड्रामा आहे .. पण हल्लीचे काही एपिसोड पहायचे राहिलेत , बघणार आहे कधीतरी .. थोडी बोअर झाली . हाऊस चे 1 - 2 एपिसोड पाहिले पण तोपर्यंत मेडिकल ड्रामाचा कंटाळा आला होता मग पुढे पाहिले नाहीत .

9 . लुसीफर - छान आहे थोडी कॉमेडी , थोडा रोमान्स , फॅन्टसी - ड्रामा .. सगळा मसाला आहे नुसता ..

10. ब्रॉडचर्च

11. जेसीका जोन्स - एकच सिजन पाहिला .. माईंड कंट्रोल करु शकणारा व्हिलन आणि सुपर स्ट्रेंथ असणारी नायिका अशी साधारण स्टोरी आहे .

12 . डेथ नोट - जपानी ऍनिम आहे , इंग्रजी डब पाहिलं .. छान आहे . एका कॉलेज कुमाराला एक डायरीसदृश्य वही मिळते , त्यात ज्याचं नाव लिहाल - त्या व्यक्तीचा चेहरा मनात ठेवून ती व्यक्ती मरेल असं लिहिलेलं असतं , इतर काही नियम असतात . पहिल्यांदा त्याला ते खोटं वाटतं पण ट्राय केल्यावर सत्य निघतं ... हातात आलेल्या शक्तीने जगातल्या गुन्हेगारांना ठार करून जग गुन्हेगारीमुक्त करायचं तो ठरवतो पण पॉवरची नशा त्याच्या डोक्यात जाते आणि अनेक इनोसंट पोलिसां आणि इतर लोकांनाही तो मारतो , मुळातच एम्पाथी कमी असलेला तो संपूर्ण निर्मम होतो , एक पॉईंट असा येतो की स्वतःची ओळख उघडी पडू नये यासाठी शत्रूच्या हातात पडलेल्या आपल्या सख्ख्या बहिणीला डायरीत नाव लिहून मारावं लागेल त्याशिवाय इलाज नाही असा विचार तो करतो ... 22 - 23 चं एपिसोड आहेत ... खूप छान आहे .

विझार्ड ऑफ वेव्हर्ली प्लेस ही लहान मुलं - टीनेजर्ससाठी बनवलेली डिजनीची सिरिअल आहे ... 120 वगैरे एपिसोड असतील .... कॉमेडी - फॅन्टसी .. कधी मूड डाऊन असला तर एखादा एपिसोड लावला की हसून मूड ठीक होतो ...

नार्कोस , वायर , प्रिजन ब्रेक ह्या मालिका पुढच्या बघायच्या मालिकांच्या लिस्ट मध्ये आहेत .

कंपनीच्या कृपेने नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन प्राईम सोबत मिळालंय.
या सर्व मालिका बघायच्या आहेतच, पण सगळ्यात आधी पिकी ब्लाइंडर्स आणि मोझार्ट इन द जंगल बघून संपवेन!!!
Happy
बादवे कुणी अल कमिनो बघितला का? नसेल बघितला, आणि ब्रेकिंग बॅडचे फॅन असाल, तर नक्की बघा! एक सुंदर नॉस्टॅल्जिक ट्रिप आहे, आणि फॉलोव अप सुद्धा!!!

मीपण नवीनच आहे. इंग्रजी मालिका, चित्रपट बघायला चालू करून अडीचेक वर्षच झाली असतील. संवाद कळत नाहीत, सबटायटल्स लागतातच. बरेचदा पॉज करून , मागे पुढे करून काय झालं ते वाचावं, बघावं लागतं.

मी या यादीचा उपयोग करते
https://m.imdb.com/chart/toptv/
दर सहा महिन्यांनी रिफ्रेश करायचं पान.
+ एमी, गोल्डन ग्लोबकडे लक्ष ठेवते.
+ पुस्तकं वाचत असल्याने त्यावर बेतलेली मालिका येणार असेल तर लगेच कळते.

मलापण सबटायटल्स शिवाय पूर्ण डायलॉग्ज कळत नाहीत .. end of the f****g world 8 च एपिसोड आहेत , 2 टीनेज मुलांची ... सुरुवातीला आवडेल अशी वाटत नव्हती पण शेवटपर्यंत दोन्ही पात्रं आवडती झाली ..

IMDb ही इंग्लिश सिरीज आणि मुविज साठी बायबल आहे हे माझं मत.
पण फक्त त्याच्या रेटिंग वर जाऊ नये, बऱ्याचदा काहीबाही रेटिंग दिलेली असते.
त्यापेक्षा रॉटन टोमॅटोज, मेटाक्रिटिक यांचे रिवयुज जास्त रिलायबल असतात.
आणि rogerebert.com सुद्धा!

बादवे मला ऍमेझॉन प्राईम चं एक फिचर प्रचंड आवडतं, कोणताही सिन चालू झाला, की बाजूलाच त्यातल्या मायनर ते मायनर कलाकारांची नावे येतात. त्यामुळे नावे शोधावी लागत नाही.
इंफॅक्ट बॉईजमध्ये हुई चा बाप सायमन पेग आहे, ते मला तिकडे बघूनच कळलं.
एमी अवॉर्ड ॲमी फॉलो करत नाही???? Wink
जोक्स अपार्ट, गोल्डन ग्लोबपेक्षा मला एमी अवॉर्ड जास्त चांगले वाटतात. द टुरिस्टला गोल्डन ग्लोब गेल्यापासून माझा विश्वासच उडालाय त्याच्यावरचा.

सो अज्ञातवासी काय करतो?

१. प्राईम आणि नेटफ्लिक्स वर लक्ष ठेवतो.
२. बॉक्स ऑफिस मोजोवर सोमवारी जातो. (फक्त नविन चित्रपट कोणते आले, ते बघण्यासाठी.)
३. अवॉर्डस फॉलो करतो. सिरीजसाठी तर emmyच
४. रिवयु साईटवर लक्ष ठेवतो. Rotten tomatoes, metacritic and Rogerebert
५. क्लासिक साठी AFI वर चक्कर मारतो
६. ॲमीचा धागा कधीकधी उघडतो.

हुश्श!!! One life is not enough!!!

>>पॅगन गॉड्सचा एपिसोड पाहिला होता का , गणपती आणि कालीचा सरळसरळ अपमान केला आहे आणि इतर देशांच्याही देवांचा ... पण त्यांनी स्वतःच्या बायबल मधल्या देवाला आणि एंजल्स ना सोडलं नाही तिथे दुसऱ्या धर्माचा आदर करतील ही अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही

नाही. मी मधल्याच कुठल्या तरी सिझनपासून पहायला सुरुवात केली होती. पण मला त्यांचा हा irreverence आवडतो. आपल्या इथल्या सिरियल्समध्ये उठसुठ 'हे मातारानी रक्षा करना' असले डायलोगज असतात तसं नाही. स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास. किती संकट आलं तरी देवाचा धावा करत बसत नाहीत.

>>कोणात्याही धर्मचा आदर करत नसतील तर ठीकच आहे की!

पटलं

>>मला पहिल्या सिजनपासून सॅमच आवडतो  अर्ध्या मुली डीन वर का फिदा आहेत समजत नाही .. तो भारी आहेच दिसायला , वयाने जवळजवळ काहीच स्पर्श केला नाहीये त्याला उलट पूर्वीपेक्षा हॅन्डसम दिसतो , तर सॅमचा सुरुवातीचा गोंडस निरागस चेहरा पार बदलून गेला आहे पण मला मात्र सॅमच आवडतो .

सेम बॉयफ्रेंड आणि हजबन्ड मटेरियल आहे. You can take him home to mama and mama would approve! डीन one night stand आहे तर सेम शुभमंगल सावधान आहे. Happy काल त्याच्या जखमेवर औषध लावताना डीन त्याला लहानपणीची आठवण करुन देतो तो सीन मला फार आवडला. नाती फार सुरेख दाखवली आहेत. आता रोवेना येईल पुढल्या एपिसोडमध्ये. मला ते ब्रिटिश मेन ऑफ़ लेटर्स चा ट्रेक आवडला नव्हता. पण ह्या लोकानी आता ketch सुध्दा बोलवायला हवं.

मी Elementary पहायचे. आधुनिक काळातला शेरलॉक आहे आणि वॉटसनचं काम Lucy Liu ने केलंय. दर सिझनला ह्या दोघांचं 'रुप तेरा मस्ताना' होतंय की काय ही भीती वाटायची Proud that would have been too much. पण मला ती सिरीयल आवडायची. नवा सिझन दाखवला की नाही माहित नाही भारतात.

डीन one night stand आहे >> असंच काही नाही अगदी .. लिसा आणि बेन सोबत 1 वर्षं राहिला की बेस्ट हबी आणि बेस्ट डॅड बनून .. बेनला तर तोच हवा होता पर्मनंट डॅड म्हणून .. पण सॅम आला आणि हा जायला तयार ... सॅम हजबंड मटेरियल आहे हे खरं , पण ही मालिका पाहिल्यावर वाटतं जेवढं प्रेम डीन सॅम वर करतो तेवढं प्रेम आपल्यावर करणारा , डीनसाठी सॅम जेवढा इम्पॉर्टन्ट आहे त्याच्या लाईफमध्ये तेवढे आपण ज्याच्यासाठी महत्वाचे असू असा लाईफ पार्टनर मिळायला हवा .. Lol आठव्या सिजनच्या फिनालेचा सिन आहे ना - Don't you dare think that there is anything, past or present, that I would put in front of you! पण अशाची आशा ठेवून बसलं तर एकटंच राहावं लागेल बहुतेक ... Lol फिक्शनल कॅरॅक्टर्स चे गुण खऱ्या लोकांमध्ये मिळतील अपेक्षा करणं चूक होईल .. किमान सॅम सारखा उंच आणि देखणा तरी असू दे रे देवा Happy

बीबीसी च्या शेरलॉकचे बरेच फॅन्स शेरलॉक आणि वॉटसनना शिप करतात पण मला ते फ्रेंड्स म्हणूनच आवडतात ...

केच येणार आहे तिसऱ्या एपिसोड मध्ये , अमारा आली दुसऱ्या एपिसोड मध्ये .. जे जे ऍक्टर येतील त्यांना परत आणणार आहेत बहुतेक ... सगळ्यांना घेऊन लास्ट सिजनचा गोंधळ घालणार आहेत ... क्राऊलीशी डायरेक्टर मंडळींपैकी कुणाचं तरी वाजलं आहे तेव्हा तो काही येणार नाही Sad

>>फिक्शनल कॅरॅक्टर्स चे गुण खऱ्या लोकांमध्ये मिळतील अपेक्षा करणं चूक होईल

बरोबर

>> .. किमान सॅम सारखा उंच आणि देखणा तरी असू दे रे देवा

Amen Happy आणि खळ्या विसरू नका!!

>>केच येणार आहे तिसऱ्या एपिसोड मध्ये , अमारा आली दुसऱ्या एपिसोड मध्ये

हरे रामा! ती अमारा माझ्या फुल डोक्यात जाते. एक तर गॉडची बहिण वगैरे ये बात कुछ हजम नही हुई. वर ती डीनवर खुश. म्हणून इथे उगाच माझा जळफळाट. Proud रच्याकने, सॅम आणि डीनची लग्नं झाली असती तर त्यंचं एव्हढं सख्य राहिलं नसतं नै. Uhoh क्राऊलीबद्दल सहमत. पण त्याला सॅमला 'Moose' म्हणण्यासाठी तरी परत आणायला हवं होतं. ल्युसिफरही येईलच.तोही नाही आवडत मला.

शेवटच्या सिझनमध्ये एक केस for old times' sake दाखवायला हवी. अजून एपिसोडस बाकी आहेत तरी मी आत्ताच सेंटी होतेय. Sad

पहिल्या एपिसोडच्या मानाने दुसरा एपिसोड बरा वाटला. तरी पण आताच्या फेसबुक, ट्वीटरच्या जमान्यात लोकाना थाप मारुन एके ठिकाणी थांबवून ठेवणं कितपत शक्य आहे असं वाटलंच. Ketch ला तर मी ओळखलंच नाही. त्याचा लुक बराच chiselled होता आधीच्या सिझन्समध्ये. त्याला मेरी विन्चेस्टर गेली हे माहित आहे का? Rowena rocks!! दर वेळी तिचे स्पेल्स ह्याना वाचवतात. तिचं आणि ketch चं प्रकरण आता लास्ट सिझनमध्ये comic relief म्हणूनही नको वाटतंय. Jack चं काम करणारा नट अजूनही तीच acting करतोय. त्याला demon चं बेअरिंग घेणं जमलेल्ं नाहिये अजिबात. केव्हिनला पुन्हा बघून छान वाटलं. पण त्याला God ने hell मध्ये का टाकलंय ते कळलं नाही.

God चा नक्की काय प्रोब्लेम झालाय? God चं काम करायला असा काय सामान्य दिसणारा नट निवडलाय अशी माझी पहिली प्रतिक्रीया झाली होती. पण ती निवड अचूक वाटतेय आता. उगाच thor सारखा tall, blonde,handsome, masculine नट निवडला असता तर stereotyped झालं असतं. डीनचा त्याच्याबद्दलचा उद्वेग पटला. फक्त God च्या वागण्यामागचा उद्देश त्यानी शेवटी स्पष्ट करायला हवा.

पिकी ब्लाइंडर्सचा पहिला सिजन संपवून हे सुरू केलं. काय माहिती, can't get connected!!!
कंटाळून lucifer चालू केलं, पण तेही बोर झालं.
मग काय, पिकी ब्लाइंडर्स सिजन २ Lol

मी दुसरा आणि तिसरा एपिसोड अजून पाहिलाच नाही .. युट्यूब वर 2 - 4 व्हिडीओ पाहूनच पाहण्याची इच्छा होत नाहीये फारशी ... तिसरा खूप इमोशनल केला आहे असं कमेंट्स वरून दिसतं .. पण मला आता कॅरॅक्टर्सशी काही अटॅचमेंटच उरली नाहीये गेल्या 1 - 2 सिजन मुळे ... ओढून ताणून 1 सिजन आणखी करताहेत , आटोपतं घ्यायचं म्हणून हे स्पष्ट दिसतंय .. त्यामुळे कोणाच्याही मृत्यूने इमोशनल होत नाहीये ...

केविन हेवन मध्ये गेला असं वाटत होतं आणि तेच छान होतं .. त्याला हेल मध्ये पाठवला दाखवून बऱ्या संपलेल्या स्टोरीचीही माती करताहेत ... गॉड पूर्णच सायको दाखवला आहे .. मला हा अँगलच आवडलेला नाही ... पूर्वीचा चक प्रॉपर गॉड वाटायचा ... सॅम आणि डीन त्याच्याशी बोलतात तो सीन किती सुंदर होता जेव्हा तो सांगतो ,

Chuck: You're frustrated. I get it. Believe me, I was hands-on -- Real hands-on, for, wow, ages. I was so sure if I kept stepping in, teaching, punishing, that these beautiful creatures that I created... would grow up. But it only stayed the same. And I saw that I needed to step away and let my baby find its way. Being overinvolved is no longer parenting. It's enabling.

Dean: But it didn't get better.

Chuck: Wel,l, I've been mulling it over. And from where I sit, I think it has.

https://youtu.be/ROQIxST88fw

फिलॉसॉफिकली खूप हाय पॉईंट गाठला होता ह्या डायलॉगने ... माझ्या डोळ्यात ऍक्चुली पाणी आलं होतं .. आणि आता शेवटी कोणीतरी मोठा व्हिलन हवा म्हणून गॉडला व्हिलन करून वाट लावताहेत .. चांगल्या सिरिअल्स ना बेकार लास्ट सिजनचा शाप असतो की काय असं गेम ऑफ थ्रोन्स आणि आता सुपरनॅचरल पाहून वाटायला लागलं आहे ...

प्राचीन काळच्या लढाया , अनियंत्रित राजसत्ता , मध्ययुगातली हिंसा , साम्राज्यवाद , महायुद्धं पासून ते आताची सिव्हीलाईज्ड मानवी संस्कृती , न्यायव्यवस्था हा माणसाने पार केलेला टप्पा पाहता l, I've been mulling it over. And from where I sit, I think it has.

ह्याबद्दलच देव बोलत असावा ... आणि खरा देव असेल तर तोही कदाचित असं म्हणाला असता , असा विचार करून इमोशनल व्हायला झालं होतं ...

Pages