कविता आणि स्तोत्रांची आवड

Submitted by सामो on 12 October, 2019 - 07:01

अमा यांचा, डिटॉक्स (https://www.maayboli.com/node/13515?page=3#comment-4436683) हा छानसा धागा वाचला आणि माझ्या स्तोत्र वाचनाच्या छंदाची आठवण आली. कविता आणि स्तोत्रवाचन दोन्ही विरंगुळा आणि बॅटरी रिचार्ज करण्याची साधने. दोन्हींची अतोनात आवड आहे मला. या विषयावरती लेख लिहीलेले आहेत ते इथे पुनर्प्रकाशित करते आहे.
_________________________________________________________________
कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे.

खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्‍याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते.

रामरक्षा हे स्तोत्र (कविता) बुधकौशिक ऋषींना स्वतः शंकरांनी स्वप्नामध्ये सांगीतले आणि बुधकौशिक ऋषींनी ते आठवेल तसे प्रातःकाळी लिहून काढले असा उल्लेख या स्तोत्रांत आहे. मी लहानपणापासून कितीदा तरी रामरक्षा ऐकली, पठण केली. परंतु खूप उशीरा मला या स्तोत्रांतील काही संदर्भ लागले. जसे - जिव्हां विद्यानिधी: पातु, कण्ठं भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातु या काही ओळी. माझ्या जिव्हेचे रक्षण विद्येचा ठेवा (निधी) करो यामध्ये विद्या आणि जिव्हा हा संबंध भेदक आहे. राम-भरत भेटीमध्ये रामचंद्रांनी , भरतास कडकडून मीठी मारली आणि असा हे भरतास वंदनीय श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो हा गळाभेटीचा आणि कंठाचा अन्वय किती मनोहर आहे. माझ्या स्कंधाचे रक्षण दिव्य आयुधे (खांद्यावर धनुष्य) धारण केलेले प्रभू रामचंद्र करोत. - या प्रत्येक अवयव आणि नामाच्या जोडीमधील अन्वय (संबंध) माझ्या लक्षात आला. करौ = सीतापती: (सीतेचे पाणिग्रहण केलेले राम), शृती = विश्वामित्रप्रियः वगैरे.

तीच गोष्ट विष्णूशोडषनाम स्तोत्राची - भोजने च जनार्दनं (सर्व जनांचे पालन करणारा), विवाहे तु प्रजापतीम (प्रजेचा नाथ), युद्धे चक्रधरं देवं या ओळीत पहा युद्धात रक्षण करण्यासाठी पद्महस्त वगैरे नावाने आठवण न काढता सुदर्शन चक्रधारी रुपाची आठवण काढली आहे. प्रवासे च त्रिविक्रमम (तीन पावलांत पृथ्वी व्यापणारा), संकटे मधुसूदनम (मधु राक्षसाचा वध करणारा), कानने नारसिंहं च म्हणजे वनामध्ये रक्षण करण्यास साक्षात नरसिंह रूप आठविले आहे, पावके जलशायिनम म्हणजे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी क्षीरसागरामध्ये शयन करणार्‍या रुपाचे चिंतन आहे. प्रत्यक नामाचा अन्वय नंतरच्या चिंतन केलेल्या विशेषणास किती भेदक चपखल लागतो आहे. हे जेव्हा लक्षात आले , तेव्हा मला एक अननुभूत आनंद मिळाला.

तीसरे उदाहरण "हनुमान चालीसा"चे. बरेच दिवस म्हणत असे आणि एके दिवशी एका ओळीचा अर्थ लागला. "कुमती निवार सुमती के संगी" - आहाहा. सुमती म्हणजे शुभ बुद्धी असलेले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे कळले आणि मला अवर्णनिय आनंद झाला.

एका लक्ष्मीस्तोत्रात , देवीचा उल्लेख श्रीपतीप्रिया आहे. सहज वाचतेवेळी किंवा अन्य कामात असताना स्फुरले अरे याचे २ अर्थ होऊ शकतात श्री जी पतीची प्रिय (लाडकी) आहे किंवा ती जिला श्रीपती (विष्णू) प्रिय आहेत. आणि अवर्णनिय वाटले.

एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे. लहानपणी स्तोत्रांचे बोट धरुन बाळपावले टाकलेली आहेत. खूपदा मनात येते मुलीला ही गोडी लावता येत नाही कारण ती इंग्रजी माध्यमातून शिकते, मीदेखील दूर असते आणि मन खंतावते. असो त्या आडरानात नको शिरायला. आपल्याला कधी कोणत्या कवितेच्या ओळीचा अर्थ असा स्फुरला असेल, गवसला असेल, तर तो आनंद या धाग्यावर जरुर शेअर करा.
_________________________________________________________________
श्री. विश्वास भिडे यांच्या एकोहम या ब्लॉगवरती "आदि शंकराचार्यांवरचा कल्याणी विशेषांक" वाचत होते. "सौंदर्यलहरी" या रचनेचे रसग्रहण वाचतेवेळी फार सुरेख उपमा वाचनात आल्या. डॉ प्रमोद ग लाळे यांनी हे रसग्रहण केले आहे. मी केवळ त्या रसग्रहणातील काही भाग माबोकरांकरता जसाच्यातसा येथे उधृत करत आहे. संपादकांना अयोग्य वाटल्यास हा धागा उडवावा.
.
सुंदर शब्दरचनेबरोबरच सर्व श्लोकांत शांत, शृंगार, करुण, अद्भुत यांचे सौंदर्यलहरी माहेरघरच आहे. या स्तोत्रात ओज आहे कारण ते पराशक्तीचे वर्णन आहे. प्रसाद आहे कारण ती शंकराचार्यांची रचना आहे, माधुर्य आहे कारण त्या स्तोत्रात देवीच्या सुरम्य देहसौष्ठवाचे वर्णन आहे.

एका श्लोकात असे सांगीतले आहे की देवीच्या चरणांवरचा धूलिकण, अज्ञानांच्या अंतःकरणातील अंधाराचा नाश करणार्‍या सूर्याची नगरी आहे. जडबुद्धीच्या लोकांसाठी चैतन्यपुण्यांच्या गुच्छातून सतत वाहणारा असा पुष्परसाचा किंवा मधाचा झरा आहे. दरीद्री लोकांच्या इच्छा पूर्ण करणारी, चिंतामणी रत्नांची एक माळा आहे व तो रजकण म्हणजे, भवसागरात बुडणार्‍या लोकांना वर काढणारी विष्णूस्वरूप वराहाची दाढच आहे.

आचार्य एका श्लोकात सांगतात की चारही वेद देवीच्या पादपीठाजवळ हात जोडून ऊभे असतात, ते जेव्हा आपले हात मुकुटाला लावून, नम्रभावाने देवीला नमस्कार करतात, त्यावेळी त्यांचे मुकुट तुरे लावल्याप्रमाणे दिसतात.

आचार्य दीनतेने देवीला विचारतात, "आई मी तुझी पूजा काय करणार? कारण माझ्या निसर्गाने किंवा इच्छेने होणार्‍या हालचाली, तेच सर्व पूजाद्रव्य रूपाने तुझ्या चरणीच अर्पीत होतात.

देवीचे कटाक्ष बाणाच्या टोकाप्रमाणे तीक्ष्ण असून ते शंकरांच्या वैराग्यमूलक शांतरसाचा भेद करणारे आहेत.

आकाशातील चंद्रापेक्षा देवीच्या मुखचंद्राचे आस्वायत अधिक आहे हे सांगताना आचार्यांनी व्यतिरेकाचे एक उत्तम उदहरण दिले आहे.- चकोरपक्षी देवीच्या मुखाचे "स्मितज्योत्स्नाजल" नित्य पीत असतात. त्या माधुर्यातिरेकाने, त्यांच्या तोंडात जडत्व येते. त्यांना काहीतरी आंबट खावेसे वाटते. तेव्हा ते चंद्राच्या चांदण्याचे ती आंबट कांजी आहे असे समजून सेवन करीत असतात.

देवीचे वक्ष हे जणू काही अमृत रसाने भरलेल्यामाणिक रत्नाच्या कुप्याच आहेत.

देवीचे दोन्ही चरण लाक्षारसामुळे रक्तवर्ण झाले आहेत. प्रमदवनकंकेलित म्हणजे अशोकवृक्ष फुलाफळांचा बहर यावा या इच्छेने तुझ्या चरणाच्या आघाताची नेहमी आकांक्षा बाळगून असतो. त्यमुळे शंकर त्या अशोक वृक्षाची फार असूया करतात.

एका श्लोकात- शंकरांनी चुकून गंगेचे नाव घेतले, शंकरांना देवीच्या पादप्रहाराचा प्रसाद लाभला, व त्यामुळे मदनाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असे गमतीचे वर्णन आले आहे.

साध्या कमळात आणि देवीच्या चरण कमळात किती फरक आहे त्याचे वर्णन आचार्यांनी सूक्ष्म दृष्टीने केले आहे. निसर्ग कमलांना थंडी सहन होत नाही तर तुझे चरण हिमालयात निवास करतात. निसर्ग कमळे रात्री मिटून जातत, तर तुझे चरण अहोरात्र प्रसन्न असतात. साध्या कमळात फक्त लक्ष्मीच वास करते पण निष्ठेने उपासना करणार्‍या "समयी" जनांना तुझे चरण लक्ष्मी किंवा अतिस्पृहणीय निजानंदरुपी ऐश्वर्य स्मर्पित करतात. देवांगना ज्यावेळी तुझ्या चरणांना नमस्कार करतात त्यावेळी त्यांची करकमळे कळ्यांसारखी मुकुलित होतात. खरेच आहे, दिनविकासी कमळांवर चंद्रकिरणे पडली की ती मिटणारच. असा महीमा असणारे तुझे चरण कल्पवृक्षांना पाहून हसतात. कल्पवृक्ष स्वर्गात राहणार्‍या देवांचीच इच्छा पूर्ण करतो, पण तुझी चरणकमळे पृथ्वीवरच्या दरिद्री लोकांना देखील रात्रंदिवस समृद्धी देत असतात. तुझे चरण रत्नखचित नुपूरांनी सुशोभित झाले आहेत. त्यांची छुमछुम म्हणजे राजहंसांना सुंदर चालीचे धडे देत असताना त्यांनी केलेला मधुर ध्वनीच होय.

आचार्यांनी चंद्राचा देवीशी कसा अद्भुत संबंध जोडला आहे पहा. चंद्र हा एक पाचूचा करंडा आहे त्यात देवी आपली प्रसाधने ठेवीत असते. चंद्राचा कलंक ही कस्तुरी, जलांश म्हणजे गुलाबजल, पांढरा कलात्मक भाग हा कापूर आहे. जेव्हा देवी त्या वस्तूंचा उपयोग करते, तेव्हा त्या कमी होत जातात म्हणजे कृष्णपक्षात चंद्रकलांचा क्षय होतो. ब्रह्मदेव पुनः तो भरतात व शुक्लपक्षात पुनः चंद्रकलांची वृद्धी होत जाते.

शेवटी आचार्य म्हणतात की देवी जरी ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती, विष्णूची पत्नी लक्ष्मी व रुद्राची सहचारिणी पार्वती असली तरी तिचे यथार्थ स्वरूप या तिन्ही देवतांच्या पलीकडचे आहे.

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलंय.. Happy
मलाही विविध स्तोत्रे वाचायला /म्हणायला आवडतात.

अतिशय सुंदर लेख आहे. भाषा ओघवती आहे. मन प्रसन्न होते वाचल्यावर. जटाटवि गलज्जल प्रवाह पावितस्थले या बद्दल पण लिहा ना.

सुंदर.
वेगळा विषय पण छान हाताळला आहे.

सर्वांचे मनःपूर्वक आभार. अमाचेही विशेष. तिच्या लेखामुळे हा विषय आठवला अर्थात लेख पूर्वप्रकाशित आहे.
ते कल्याणी अंकातील विवेचन / रसग्रहण , 'डॉ प्रमोद ग लाळे ' यांचे आहे. त्यात माझा काहीच हातभार नाही Happy