आदर्श संगोपन

Submitted by सतीशकुमार on 12 October, 2019 - 02:09

लहान मुलांचे संगोपन हा विषय फार गहन आहे. या विषयावर अनेक मंडळींनी अनेक पुस्तके लिहिली आहेत परंतु त्याचा उपयोग होईलच असे नाही. काही गृहितके धरून ती लिहिली जातात आणि तशी स्थिती प्रत्यक्षात नसतेच. प्रत्येक मूल हे असाधारण असते आणि प्रत्येक घरातील वातावरण वेगवेगळे असते . अमुक एका पद्धतीने संगोपन होऊ शकत नाही किंवा त्या साठी एखादी स्टँडर्ड आँपरेटींग प्रोसिजरही अस्तित्वात नाही. साधारण अडीच तीन वर्षाची आणि त्या नंतरची मुले, कळती होईपर्यंत सांभाळणे याला फार सहनशक्ती लागते आणि आताच्या पालकांकडे ती कमी प्रमाणात असते.

आईवडील दोघेही नोकरी करीत असतात आणि घरात आजी आजोबा नसतात अशा मुलांची अवस्था फार केवीलवाणी होते. पाळणाघर हा उपाय असला तरीही पाळणाघरातल्या आया मावश्या कशा असतात आणि कसे संगोपन करतात हा संशोधनाचा विषय आहे. आता अशी मुले जेव्हा संध्याकाळी आईबरोबर घरी येतात त्या नंतर मुले आईबाबांना चिकटून बसलेली दिसतात.त्या नंतर थोड्या वेळांनी दोघांपैकी कोणाचातरी मोबाईल वाजतो. दोघांच्या प्रेमाचे भरते ओसरते आणि मूल परत खेळण्यांकडे वळते.

बहुतेक सदनिका प्रकल्पात आता लहान मुलांसाठी खेळायला जागा असते जिथे घसरगुंडी, झोका वगैरे तत्सम प्रकार असतात .अशा ठिकाणी आई त्या मुलाला घेऊन जाते आणि मुलाला घसरगुंडीच्या हवाली केले जाते. आई परत मोबाईलमधे डोके खुपसते .मुलांपेक्षा मोबाईल जास्त हाताळला जातो. आईमुलाच्या नात्यावरचे व्हाँट्सअँप मँसेजेस फिरत राहतात आणि मूल बिचारे "मी मोबाईल असतो तर आईबाबांच्या हातात जास्त वेळ राहिलो असतो " असा विचार करत खेळत राहते. या आधुनिक आया एवढया कठोर कशा असा प्रश्न पडावा अशी यांची वागणूक असते.

मागच्या महिन्यात मुंबईहून पुण्याला येत असताना समोरच्या सीटवर अशीच आधुनिक ललना बसली होती. गाडी सुटली तशी तिने बँगेची चेन ओढली, आतून खेळण्यातली कार काढली आणि आपल्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या हातात सोपवून मोबाईल उघडला. चांदणी चौक येईपर्यंत तिने मोबाईल मधून डोके वर केले नाही. मुलगा बिचारा कार शी तासभर खेळत राहिला आणि मग पेंगुळलेल्या डोळ्यांनी कलंडला.

थोड्या फार फरकाने सगळीकडे हेच चित्र आहे.
आईबाबा आणि मुलांमधला हा दुरावा मिटविण्यासाठी काही पथ्ये पाळणं आवश्यक आहे. सर्वप्रथम प्राथमिकता कशाला द्यावी, मोबाईलला कि मुलांना हे ठरवायला हवे.आँफिसमधून घरी आल्यावर मोबाईल शक्यतो बंद ठेवावा.फक्त महत्त्वाचेच बोलणे करावे आणि तेही लवकर आटपावे. संपूर्ण वेळ केवळ मुलांबरोबर घालवावा.
मोबाईलचा विषय निघाला असल्याने ब-याच पालकांना हा प्रश्न पडतो कि मुलांना मोबाईल/टँबलेट बघू द्यावा कि नाही? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि आपण जे जे करतो ते मुलं करणार. मोबाईल द्यायला हरकत नाही.मोबाईल मधून घातक किरण बाहेर पडतात ही समजूत आहे. चांगल्या कंपनीच्या मोबाईल फोनला स्पेसिफिक अँब्साँर्प्शन रेटींग या चाचण्यातून जावे लागते याचे निकष पूर्ण केलेल्या फोनलाच मान्यता दिली जाते. शिवाय मोबाईल मुळे काही विशिष्ट आजार झाल्याची नोंद कुठे झाली नाही .मोबाईल देण्यापूर्वी डेटा कनेक्शन आणि वायफाय बंद करावे. ब्राईटनेस कमी करावा, गेम्स असल्यास काढून टाकावे आणि द्यावे. पंधरा वीस मिनीटात मुले कंटाळतील. मोबाईल ठेवून देतील आणि दुसऱ्या कशात तरी गुंततील.
मुलांनी टीव्ही पहावा कि नाही या बद्दल ही बरंच लिहिले आहे पण हीही न टाळता येणारी गोष्ट आहे. मोजकी दोन तीन चँनेल्स ठेवावी आणि संध्याकाळी सात नंतर लाँक करावी.जेवण करताना टीव्ही पहावा कि नाही या बद्दल दुमत आहे.परंतु टीव्ही पाहात निदान जेवत तरी असतील तर टीव्ही पाहण्यात गैर काय? उपाशी राहण्यापेक्षा हे निश्चितच बरे.
मारून रागावून घास भरविण्याचे दुष्परिणामच होतात. जेवताना मन आनंदी आणि समाधानी असायला हवे. टीव्ही मुळे हे साधत असेल तर त्याचा उपयोग करून घ्यावा.

आता ज्यांच्याकडे आजीआजोबा असतात आणि मुलगा /सूनबाई नोकरीला जातात तिथे काय परिस्थिती असते ते पाहू.
मुलांची शाळा- पूर्व प्राथमिक शाळेचे वर्ग अनेक संस्थाचालक सकाळीच का ठेवतात हे न उलगडणारे कोडे आहे.पूर्वी कंदील असायचे तेव्हा मुले लवकर झोपी जात परंतु आता ढळढळीत लाईटच्या उजेडात रात्रीचे झोपायला साडेदहा अकरा म्हणजे लवकर म्हणायला हवे.सकाळी मुलांना शाळेसाठी तयार करणे म्हणजे रोज एक दिव्यातून पार पडावे लागते . मुले उठतात ती रडतच. मग शी,शू आणि दूध हा कार्यक्रम उरकताना कस लागतो .गणवेशाची तयारी ,त्यांचा डबा, पाण्याची बाटली, दफ्तर , पायमोजे, बूट इत्यादी गोष्टींची पूर्तता करतांना दमछाक होते.मुलगा आणि सून सकाळी नोकरीला गेल्यावर नातवांच्या सेवेत असणा-या आजी-आजोबांची स्थिती फार केवीलवाणी होते. दुधावरची साय ह्या नात्याने नातवांवर हात ही उगारता येत नाही.शाळेत सोडणे आणणे आणि आणल्या नंतर कपडे बदलणे, मग घास भरविणे ह्या कामात दुपार संपून जाते.मूल जेवल्याशिवाय आजी आजोबांच्या घशातून घास उतरत नाही.त्या नंतर होमवर्क करवून घेण्याची जबाबदारी असते कारण संध्याकाळी मुलांची खेळायची वेळ असते आणि त्याच वेळी मुलगा आणि सून थकून येतात. मग त्यांच्या कडून मुलांचा गृहपाठ करवून घेणे अशक्यच. ज्युनी/सिनी.केजीला पण तीन तीन विषयांचा गृहपाठ देतात.ती पेन्सिलीने पूर्ण करायची. सकाळी शाळेत वर्गपाठ आणि दुपारी घरात गृहपाठ. लहान मुलांची नाजूक बोटे दुखून जातात आणि इथूनच अभ्यासाचा तिटकारा वाटू लागतो. गृहपाठ करायचा राहिला कि " होमवर्क इनकम्प्लीट" असा शेरा येतो आणि ते पाहिल्यावर सून आणि मुलाचे डोळे विस्फारतात. शाळेतल्या शिक्षिकेला दया माया नसते आणि अश्रू ओघळतात ते मात्र आजी आजोबांच्या डोळ्यांतून.
आता रात्र होते आणि अकरा वाजतात. मूल झोपावे म्हणून साम दाम वगैरे प्रकार होतात आणि कधीतरी मूल झोपी जाते. आणि त्या नंतरच आजी आजोबांची, उद्याच्या युद्धासाठी सज्ज व्हायला पाठ टेकते.
अशा परिस्थितीत आदर्श संगोपन कसे करावे या वर कुणी प्रकाश टाकेल काय?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>तिकडे एखाद दिवस जायला मिळालं नाही की पोरं रडारड करतात (याचं देसी मानसिकतेने आम्ही बिलकुल वाईट वाटून घेत नाही). तिकडे/ शाळेत कायकाय भारी गोष्टी असतात/ जसं शिकवतात ते बघुन मला माझ्या बालपणाची आणि शाळेची दया येते.
+1
आमच्याकडे जेव्हा कुणी ज्येना "विक्रमला भाऊ हवा की बहीण? " असं भोचकपणे विचारतात तेव्हा तो "मला आजोळमध्ये खूप भाऊ बहीण आहेत" असं स्वतः हून सांगतो.
त्याचे डेकेअरमधले मित्र मैत्रिणी, शाळेतले आणि आमच्या सोसायटीमधले असे सगळे पाहता मलाही अनेकदा हेवा वाटतो त्याचा.
आणि एवढा स्क्रीन फ्री दिवस असूनही विक्रमसुध्दा रात्री मोबाईल किंवा टीव्हीवर कार्टून बघतोच. आणि शाळेतसुद्धा छोटा भीम वगैरे डिस्कशन्स होतातच. इथे मायबोलीवर सुध्दा दर 30 सेकंदाला येऊन लोक प्रतिसाद बघतात. मग आपली मुलं यातून बाहेर कशी राहतील? त्यांनी फक्त आहारी जाऊ नये (आणि आपणही) याची काळजी घेता येते. आणि प्रत्येकाचा मोबाईल वापर, त्याहून कमी वापर असलेल्या व्यक्तीला जास्त वाटू शकतो. पण आपण खरंच आहारी गेलोय का वगैरे पर्सनल लेव्हल वर ज्या त्या माणसानी तपासायचा गोष्टी आहेत.
आणि इथे जजमेंटबद्दल डिस्कशन चाललंय म्हणून, मी स्वतः असे कित्येक नवपालक पाहिले आहेत जे त्यांचे मूल 6 महिन्याचे असताना एखाद्या 2-3 वर्षांच्या मुलाचा हातात मोबाईल पाहून "I am never doing that" वगैरे म्हणतात आणि मूल त्या वयाचे झाले की हळूच त्याच्या हातात मोबाईल देऊ लागतात. स्वतः ला अजून मूल झालेले नसतानासुध्दा मैत्रिणींना जज करून नंतर त्यांना ज्या गोष्टींसाठी जज केले त्याचं गोष्टी करणाऱ्या बायका बघितल्या आहेत.
आणि एखादा पालक against all odds स्वतः मोबाईल पासून दूर राहून मुलालासुद्धा तसें ठेवत असेल तर ती व्यक्ती ते कसे करते याबाबद्दल आम्हाला वाचायला जास्त आवडेल. आम्ही जे करतोय ते चूक आहे वगैरे आम्हाला खूप जणांनी सांगून झाले आहे. एखादे "मोबाईल फ्री पॅरेंटिंग" वगैरे पुस्तक यावे ज्याची इ बुक आवृत्ती कुठेही उपलब्ध नसावी.

मस्त सुरू आहे संवाद, माझे मुलंही आता शाळा/ डे केअर च्या जगात अडकणार आहे . मीही अशाच एका चांगल्या डे केअर च्या शोधात आहे. वर सई यांनी उल्लेखलेले डे केअर पुण्यात कुठे आहे कळू शकेल का??

धन्यवाद चुन्नड, त्वरित प्रतीसाद दिलात, एवढया branches आहेत पण माझ्या घराजवळ पिंपरी मध्ये branch नाही त्यांची. So sad...

आदर्श संगोपनाची व्याख्या काय हे आधी स्पष्ट करा.. सर्वसंमत व्याख्या अशक्य आहे.. एका पट्टीने सर्व पालक /पाल्य/घरातील ज्येष्ठ यांची तुलना करणे बरोबर नाही. पालक आपली कुवत जाणून मुलांना शक्य तेवढे चांगले वाढवत असतात. काही अपवाद असणारच..

Pages