आणि आषाढी पावली...

Submitted by रवींद्र दत्तात्... on 10 October, 2019 - 12:10

या वर्षी आषाढी एकादशीला मी नागपूरला होतो...रात्र सरता सरता आलेला अनुभव आषाढी पावल्याची पावती होता...तो इथे देत आहे...

काही प्रसंग आठवणीत घर करून जातात.

12 जुलैला आषाढ़ी एकादशी होती...उपासाचा दिवस...मी नागपुरहून शिवनाथ एक्सप्रेसनी बिलासपुरला परत येत होतो. त्रिमूर्तिनगरहून आम्ही रात्री 11 वाजता निघालो...गाडी 11.55 ची होती. इतवारी स्टेशनावर पार्किंगला ही गर्दी...स्टेशनाच्या दारापर्यंत पोचायला वीस मिनिटे लागली.

कोच नंबर होता एस-9. बर्थ 65, 68. दाेन्ही लोअर बर्थ होत्या. सात-आठ तासांचा प्रवास...लोअर बर्थ मिळाली म्हणून आम्ही खुशीत होतो...11 वाजता घरून निघालो...पिल्लू घरीच झोपून गेलं होतं. स्टेशनावर गाडी पार्क करून उतरलो तर पिल्लू कडेवरून खाली उतरायला तयार नव्हती. प्लेटफार्म वर एंट्री घेताच समाेर पहिले एसी कोच, नंतर थ्री टायरचे कोच होते. तिला घेऊन वैन पासून एस-9 पर्यंत पोचता पोचता चांगलीच दमछाक झाली...(ती दहा वर्षांची झाली यावर्षी) बर्थवर मंडळी स्थानापन्न झाली. आम्हाला सोडायला माझ्या बहिणीचा मुलगा हेरंब आला होता...सोबत माझी मामी होती-सुनंदा पात्रीकर...वय वर्षे 77. मी हेरंबला म्हटलं देखील इतक्या रात्री मामीला का बरं घेऊन आलास...या वयात इतकं पायी चालणं...जड जाइल तिला...तर हेरंब म्हणाला काय सांगू मामा...मी जाेपर्यंत घरी पोचणार नाही, ही जागीच राहणार एकटी...बाकी सगळे झोपलेले...त्यापेक्षा मी म्हटलं सोबत चल, स्टेशनावरून दोघं सोबतच परत येऊ...तेवढंच तिचं फिरणं होईल...म्हणून सोबत आणलंय...

तर... गाडी सुटायला थोडा उशीर होता. घड्याळात पावणे बारा होत होते...हेरंब म्हणाला मामा, आम्ही निघतो...मी त्यांना सोडायला सोबत निघालो...दोन कोचपर्यंत गेलो...त्यांना सोडून परत आलो...तर आमच्या बर्थवर एक बंगाली कुटुंब येऊन बसलं होतं. ते म्हणत होते की आमच्या बर्थचा नंबर देखील एस-9 मधे 65, 68 आहे...

झाली ना गडबड...

मी आनलाइन रिजर्वेशन करवून घेतलं होतं. तो मैसेज मी पुन्हां बघितला...त्यांना देखील मैसेज दाखवला...आणि टीटीईच्या शोधात निघालो...तो मला एस-4 च्या जवळ दिसला.

तिकडे निघालो आणि फोन वाजला...बायकोचा होता. ती म्हणत होती बर्थ नंबर सेम आहे...पण आपलं तिकिट एक दिवसापूर्वीचं म्हणजे 11 जुलैचं आहे...

अरेच्चा...असं कसं झालं...इतकी मोठी चूक...काहीच सुचेना...आता काय करायचं...?

तिला मी म्हणालो- त्यांना सांग बर्थ तुमचीच आहे...तुम्ही बसा...टीटीई जसं सांगेल आम्ही तसं करू...मग मी विचारलं पर्स मधे काही पैसे आहेत की नाही...ती म्हणाली एक-दीड असतील....इतकं बोलता बोलता मी टीटीई जवळ पोचलो देखील.

मी घाबरत घाबरत त्याला विचारलं...बिलासपुर के लिए दो बर्थ मिलेगी क्या...?

तो हिंदी साइडर होता...म्हणाला बिलकुल मिलेगी साहब...

मग मी त्याला माझा प्राब्लम सांगितला...मेरे पास टिकट नहीं है...मेरा टिकट एक दिन पहले का था। मैंने देखा नहीं और रिजर्वेशन आज का ही है, समझकर आ गया...अभी गलती समझ में आई। अब 11.50 हो गए हैं। जनरल टिकट लाने का भी समय नहीं है। (मी विसरूनच गेलो होतो की भाचा आणि मामी अजून पार्किंगपर्यंत पोहचले देखील नसतील. तो तिकिट आणून देऊ शकतो...)

टीटीई म्हणाला अरे...यानी आप बेटिकट हो...

मी म्हटलं - होय...

काय म्हणाला असेल तो...

तो म्हणाला - मी असं करतो...तुमचं जनरल टिकट बनवून देतो...। ...इतके पैसे लागतील...

मी म्हटलं तो प्रश्न नाहीये...चूक झाली आहे तर परिणाम भोगायला मी तयार आहे...जनरल तिकिट...ठीक आहे...मग रिजर्वेशन चार्ज किती लागेल...एकूण किती लागतील...

तो म्हणाला दोघांचं जनरल तिकीट 740 रुपए...

मी विचारलं रिजर्वेशन चार्ज...

तो म्हणाला - छोड़िए ना...इतना ही लगेगा...

मी पर्समधून हजार रुपए दिले...तर तो म्हणाला चिल्लर नहीं है...अच्छा रहने दीजिए...त्याने उरलेले पैसे परत केले...

मी त्याला म्हणालो साइड लोअर बर्थ मिल सकेगी क्या...

हां..हां..क्यों नहीं...

मी म्हणालो दो लोअर बर्थ चाहिए...मिसेस कैंसर पेशेंट आहे...

त्याचं पुढचं वाक्य ऐकून मी सर्दच झालो...आणि टचकन डोळयात पाणीच आलं...

तो म्हणाला...अरे साहब...तो ये बात पहले बतानी चाहिए थी न...हम आपसे कोई चार्ज ही नहीं लेते...आप भी गजब करते हैं...अगल बगल की साइड लोअर चलेगी...

मी म्हणालो - चलेगी...

चार्ट बघून तो म्हणाला आप ऐसा कीजिए एस-5 में जाकर .../... पर बैठ जाइए...

ठीक है...

मी त्याला थैंक्यू म्हटलं...मला गहिवरून आलं होतं...तो दुसरयाचं तिकिट करू लागला...

मी हिला फोन केला एस-5 मधे यायचंय...एस-9 पर्यंत आलो...त्या बंगाली कुटुंबाला म्हटलं सॉरी...आपकी ही बर्थ है...मुझसे चूक हुई...

हिला आणि पिल्लूला कंपार्टमेंटच्या आतून एस-5 मधे यायला सांगितलं आणि मी सामान घेऊन प्लेटफार्म वरून एस-5 पर्यंत आलो...पुन्हां घोळ झालाच...मी त्याने दिलेले बर्थ नंबर विसरलो. कारण त्या बर्थवर कुणीतरी बसलेलं होतं...

सामान एका बर्थवर ठेवून मी पुन्हा त्याला गाठलं आणि बर्थचा नंबर विचारला...त्याने सांगितला आणि मी परत येऊन त्या बर्थवर सामान ठेवलं. ही दोघं आली नव्हती म्हणून बघायला गेलो...हिने सांगितलं पिल्लू इतकी झोपेत आहे की वाटेत दोन जागी खाली बर्थ दिसताच त्यावर झोपून गेली...

बर्थवर स्थानापन्न होईस्तोवर गाडी सुटायची वेळ झाली होती...वेळेवर गाडी सुटली...खिडकीतून येणारया थंड वारयामुळे ही आणि पिल्लू झोपून गेले होते. सोबतीचे प्रवासी देखील झोपले. सामसूम झाल्यावर मी कानाला इयरफोन लावून वसंतरावांची ‘अब ना सहूंगी...’ ‘रंग भरन दे मोहे श्याम...’ चीज ऐकत होतो...अशी एखादी रात्र आपली असते...या आषाढीची रात्र आठवणीत राहील...

रूटीन चेक वर ताे आला...तेव्हां साडे बारा होऊन गेले होते. तो म्हणाला अरे, सोये नहीं अब तक...

मी म्हणालो रात्री अडीच नंतर झोपायची सवय आहे...मी हात जोडले आणि त्याचं नाव विचारलं...

त्याने हसून माझ्याकडे बघितलं...म्हणाला बंदे को लालसिंह कहते हैं...

बिलासपुर डिवीजन या नागपुर डिवीजन...

तो म्हणाला नागपुर डिवीजन...आणि हसत हसत निघून गेला...

आषाढी एकादशी सरता-सरता मला देव पावला होता...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला अनुभव आहे. पण तुम्ही खरं नाव आणि डिव्हिजन दिली आहे का त्या मदत करणाऱ्याची? त्यामुळे तो अडचणीत येऊ शकतो का?
तुम्ही स्वतः रेल्वे कर्मचारी आहात ना? मग तुम्हाला, कुटुंबाला फुकट/सवलतीत प्रवास नसतो का?