दोघी

Submitted by क्षास on 10 October, 2019 - 01:14

एकदा महाराष्ट्र टाइम्स मध्ये 'दोघी' या चित्रपटाविषयीचा लेख वाचनात आला. सुमित्रा भावे यांनी लिहिलेला. याआधी मी सुमित्रा भावे यांचं नाव ऐकलं नव्हतं. सुमित्रा भावे यांनी मराठीतल्या अनेक उत्कृष्ट संवेदनशील सिनेमांचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अस्तु , कासव या सिनेमांची नावं माझ्या कानावरून गेली होती पण यांचं लेखन दिग्दर्शन त्यांनी केलंय हे मला माहीत नव्हतं. लहानपणी टीव्हीला दहावी फ नावाचा सिनेमा अनेकदा लागायचा. तो पण यांचाच आहे हे विकिपीडियावर पाहिल्यावर कळलं. घो मला असला हवा हा राधिका आपटेचा सिनेमा एकदा टीव्हीवर लागला म्हणून सहज पाहिला. ती ही सुमित्रा भावेंचीच एक हलकीफुलकी कलाकृती होती. त्यांनी बाधा, वास्तुपुरुष, देवराई यासारखे अनेक सुंदर सिनेमे आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. दोघी या सिनेमाला तर चिक्कार पुरस्कारही मिळालेत. त्यादिवशी याच दोघी या सिनेमावरचा लेख मी पेपरमध्ये वाचून भारावून गेले. हा सिनेमा वेळ मिळेल तेव्हा बघायचाच असं मनोमन ठरवून टाकलं. जास्त शोधाशोध करायची गरजही नाही लागली. युट्युब वरच सापडला. 

दोघी ही कृष्णा ( सोनाली कुलकर्णी ) आणि गौरी ( रेणुका दफ्तरदार ) या दोन बहिणींची गोष्ट. बहुतांश कृष्णाचीच. साधी सरळ पण चुणचुणीत, निर्भीड स्वभावाची कृष्णा सोनालीने अत्यंत समरसून साकारली आहे. तिची देहबोली, तिचे डोळे, तिच्या संवादांतला खोलपणा थेट आपल्याला त्या कथेशी एकरूप करतो. थोरलीचं, गौरीचं लग्न ठरलेलं असतं, पण दुर्दैवाने लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाला अपघात होतो आणि नवऱ्यामुलाकडची सगळी मंडळी दगावतात. हा आघात कृष्णाच्या कुटुंबाला उध्वस्त करतो. बातमी ऐकताच कृष्णाचे वडील पक्षाघाताने अंथरून धरतात. सगळं कुटुंब कोलमडून पडतं. त्यात दुष्काळाने शेतजमिनी सुकलेल्या. हातावर हात ठेवून बसून काहीही होणार नाही याची दोघींना जाण असते. उपजीविकेचं साधन शोधत कृष्णा आणि गौरी गावभर हिंडतात. पण अपशकुनी, सासर गिळणारी मुलगी म्हणून गौरी आणि कृष्णाला कोणीही समोरही उभं करत नाही. कृष्णासाठी हे फार गोंधळात टाकणारं असतं. जे झाले त्यात आपल्या अक्काची काहीही चूक नसूनही सगळा गाव तिला टोचून बोलतो हे तिला सहन होत नाही. तुलाही अक्काच अपशकुनीच वाटते का असं ती अस्वस्थ होऊन आईला विचारते. आईचाही जीव थोरलीसाठी तुटत असतो. गौरी मुंबईत काही ना काही काम करून चार पैसे पाठवेल असं आईच्या मनात येतं. ती जड मनाने तिला मामासोबत मुंबईला पाठवते. मुंबईत ती काय काम करते हे कधीही विचारु नका असं म्हणून मामा तिला मुंबईला घेऊन जातो. स्वतःच्या पोटच्या मुलीला स्वतःच्याच हाताने नरकात ढकलल्याच्या विचाराने आईचा जीव गलबलतो पण अंथरुणाला खिळलेल्या नवऱ्याचे उपचार, कुटुंबाच्या पोटापाण्याचा खर्च आणि धाकटीच्या लग्नाची चिंता या गोष्टी तिला छळत असतात. कृष्णाला आपली बहीण मुंबईत काय काम करते याची तिळमात्र कल्पना नसते. पण मामाच्या चेहऱ्यावरचा अपराधी भाव बघून जे चालू आहे ते चांगलं नाही ही भावना तिच्या मनाला चाटून जाते. थोरल्या बहिणीची काहीच कशी काळजी वाटत नाही याचा जाब ती आईला विचारते. आईशी भांडते. आईकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. मनावर दगड ठेवून नाईलाजाने आई दिवस ढकलत राहते. मुंबईहून पैसे येत राहतात. आर्थिक परिस्थिती सुधरत जाते. आईप्रमाणेच मामालाही आपण काय करून बसलो याची टोचणी सुरु होते. हातून घडलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तो कृष्णासाठी शेष नावाच्या प्रगल्भ, शिकलेल्या, सामाजिक कार्यकर्त्याचं स्थळ आणतो. शेष अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता असतो. शेष आणि त्याचे मित्र कृष्णाच्या कुटुंबाची भेट घेतात. कृष्णा त्याला ठणकावून सांगते "गावाने वाळीत टाकलेल्या कुटुंबातली मुलगी म्हणून माझ्याशी लग्न करत असाल तर करू नका. तुम्ही परिवर्तन करायचे म्हणता ना, मग माझ्या या अक्कावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न न करता तिच्याशी करा".

कृष्णाशी लग्न करणं हे शेषसाठी फक्त सो कोल्ड सामाजिक कार्य नसतं. निर्भीड, तडफदार पण निरागस कृष्णा शेषला आवडते आणि लग्न ठरतं. तो कृष्णालाही चळवळीत सामील करून घ्यायचं, शिकवायचं ठरवतो. लग्नासाठी गौरी सगळं विसरून गावी येते. एकमेकींना बघून दोघींना भरून येतं. पण कृष्णा गौरीचं बदललेलं रूप पाहून गोंधळून जाते. तिची भपकेदार रंगीत साडी, कपाळावरची भडक टिकली, अंगावरचे दागिने या सगळ्या गोष्टींमुळे कृष्णाला कळून चुकतं की ही माझी पूर्वीची अक्का नाही. कदाचित हाच तो क्षण असतो जेव्हा गौरीच्या मुंबईतल्या कामाची कृष्णाला चाहूल लागते. दोघी एक शब्दही न बोलता खूप काही बोलून जातात. गौरीला अचानक समोर बघून आई चक्रावून जाते. तिला कृष्णाच्या लग्नावर तिची सावली नकोशी वाटते. पुन्हा कोणताही विध्वंस नको म्हणून तिला लग्नघरातल्या विधींपासून; इतर माणसांपासून लांब ठेवलं जातं. आईचं वागणं सहन न होऊन कृष्णा आईला विचारते, "तिचा पैसा तुम्हाला चालतो मग ती का नाही चालत तुम्हाला." हा प्रश्न सगळ्यांना निरुत्तर करतो. ठरल्याप्रमाणे हुंडा, मानपान काहीही न करता साधेपणाने कृष्णाचं लग्न होतं. लग्नाचे विधी सुरु असताना कोणालाही न सांगता गौरी परत मुंबईला जायला निघते. कृष्णा भर मंडपातून उठून गौरीला थांबवायला तिच्या मागे जाते, तिची समजूत काढते, जाऊ नकोस म्हणून विनवते. "त्या वाटेवरून मागे फिर, माझा हात धरून मी तुला नव्या वाटेवर नेईन, आपण खूप शिकू, आपली शेती करू, आपली वाट नेटाने चालू " असं पोटतिडकीने सांगताना तिचा कंठ दाटून येतो. चित्रपटातला हा शेवटचा प्रसंग मन ढवळून काढतो. गौरी पुन्हा घरी येते. शेषचा मित्र निवृत्ती गौरीची पिशवी स्वतःच्या हातात घेतो. कोणताही संवाद ना वापरता तिचा सगळा मानसिक भार स्वतःच्या खांद्यावर घेण्याची, तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा सिम्बॉलीकली दाखवली आहे. कृष्णाचं गौरीला हात धरून परत न्याय आणि आत्मसन्मानाच्या मार्गावर आणणं, पुन्हा नवीन वाटेवर चालण्याची प्रेरणा देणं, मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास दाखवणं हे मन हेलावून टाकतं. कधीही न पुसता येणारा खोल भावनिक ठसा उमटवून कृष्णा या व्यक्तिरेखेने माझ्या मनात कायमचं घर केलंय.

हिंदीमध्ये काही वर्षांनी याच कथेवर आधारलेला राणी मुखर्जीचा 'लागा चुनरी मे दाग' हा चित्रपट काढण्यात आला. या चित्रपटाची झलक बघून या कथेला मराठीमध्ये किती बारीक विचार करून हाताळलं गेलंय हे दिसून येतं. दोघी या सिनेमामध्ये जे दाखवायचं टाळलंय तेच हिंदीमध्ये चवीने दाखवण्यात आलंय. गाणीही बरीच आहेत. राणी मुखर्जी व अभिषेक बच्चनचा डान्स बघताना प्रेक्षक सिनेमाचा मूळ गाभा विसरूनही जात असतील. या सिनेमात आणि दोघीमध्ये फार वैचारिक अंतर जाणवतं.
दोघी हा सिनेमा त्या काळातील इतर हळदी-कुंकू सारख्या सिनेमांसारखा गोड पाकात घोळवलेल्या संवादाने, कट कारस्थानाने, ढीगभर गाण्यांनी भरलेला सिनेमा नाही. ही कथा निती-अनितीचे अनेक कंगोरे उलगडत समाजजीवनावर भाष्य करते. कमी संवाद पण परिणामकारक दृश्यांनी डोळ्यांचे काठ नकळत ओले करते. गौरीची घुसमट, कृष्णाच्या मनातला chaos, आईची द्विधा अवस्था, वडिलांचा पॅसिव्ह विरोध, शेष आणि त्याच्या मित्रांचं याकडे solutionary नजरेने पाहणं या सगळ्याचा उत्तम मेळ या सिनेमात जमलाय. शेवटी कृष्णा आणि गौरी दोघींचे आयुष्य रुळाला लागल्याचं समाधान वाटतं आणि भरून येतं. हा आशयघन सिनेमा आणि कृष्णाची व्यक्तिरेखा नेहमी माझ्या मनात घर करून राहील. जर कधी बघावासा वाटला तर हा सिनेमा आवर्जून बघा. यूट्यूबवर आणि झी5 वर उपलब्ध आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसर्‍याच ओळीत भावे चं महाजन झालंय.
सिनेमाबद्दल माहिती नव्हती. बघावा लागेल.
एक 'आम्ही दोघी' पण आहे ना सिनेमा?

छान आहे 'दोघी'.
खूप आधी बघितलेला.
छान परिक्षण.
Bollywood चांगल्या स्टोरीची वाट लावण्यात पटाईत आहे. त्यांना ओढून ताणून love story, songs इ. घालायचेच असतात मुव्ही मध्ये.

अकरावी / बारावीत असताना बघितला होता. नंतर त्याची सी डी आली बाजारात ती पण घेतली होती. प्रचंड आवडता चित्रपट. ह्यातली गाणी सुद्धा अप्रतिम आहेत. 'भुई भेगाळली खोल' ह्या गाण्याला बहुदा अंजली मराठेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ह्यातच माधुरी पुरंदरेंचं 'फाल्गुन मास येता' हे अत्यंत सुरेख गाणं आहे. सुमित्रा भावेंच्या बऱ्याच चित्रपटात उत्तरा बावकर असतात आणि त्यांचा उत्तम अभिनय बघायला मिळतो. सोनाली कुलकर्णी , रेणुका दफतरदार , सदाशिव अमरापूरकर, मधू कांबीकर ह्यांची कामे पण मस्त झाली आहेत. वास्तुपुरुष हा असाच अप्रतिम चित्रपट आहे.

चित्रपट जसा संयमित आहे, तसंच परिक्षण लिहीलं आहे. खूप छान.
सस्मित, 'आम्ही दोघी' गौरी देशपांडे यांच्या गोष्टींवर आधारित चित्रपट आहे. हा वेगळा.

सस्मित, 'आम्ही दोघी' गौरी देशपांडे यांच्या गोष्टींवर आधारित चित्रपट आहे> हो. ते गुगललं.
रेणुका दफतरदार आणि देविका दफतरदार नातेसंबध आहे काय? आई-मुलगी?

चांगलं लिहलंय.
कथा वाचताना लागा चुनरी में दाग आणि मी-अमि ने म्हणलाय तो मुमताजचा कोणता तो सिनेमा आठवत होते. राजेश खन्ना होता ना त्यात, बिंदिया चमकेगी गाणं?

तो मुमताजचा कोणता तो सिनेमा आठवत होते. राजेश खन्ना होता ना त्यात, बिंदिया चमकेगी गाणं? : तो सिनेमा ' आईना'. हा बघितलाय. मुमताज त्यात मराठी ब्राहमण कुटुम्बातली दाखवली होती. आश्चर्य म्हणजे त्यात राजेश खन्ना आणि तिच डयुएट गाणच नाहीये. बिंदिया चमकेगी गाणं ' दो रास्ते' मध्ये आहे.

ह्या सिनेमाची विकीवरची माहिती वाचताना मला ही इण्टरेस्टिन्ग माहिती मिळाली. खखोदेजा:

This film was Kamal Haasan's first Hindi film, though he was cast in a very unimportant role of an assistant director of shooting a film of Dharmendra and Neetu Singh.