तरुणांनो युवराज नको युवकराज शोधा

Submitted by palwerm on 8 October, 2019 - 10:31

*तरुणांनो,युवराज नको युवकराज शोधा*

तरुण हा शब्द ऐकताच डोळ्यापुढे उत्साह,जिद्द,प्रचंड सामर्थ्य,ठरवेल ते मिळवण्याची ताकद आशा अनेक गुणांनी समृद्ध असे व्यक्तिमत्व उभे राहते.हिंदुस्थानात तर अगदी प्राचीन काळापासून अनेक युवा होऊन गेले आहेत.मर्यादापुरुषोत्तम श्रीराम,युगंधर श्रीकृष्ण,स्वराज संस्थापक छ.शिवराय,अपराजित योद्धे छ. संभाजी महाराज,स्वामी विवेकानंद अशी व्यक्तिमत्वे आपल्या देशात होऊन गेलीत,आजही आहेत.ही युवाशक्ती आजच्या तरुणाईत ठासून भरलेली आहे.आजचा युवाही विचार करू पाहतोय,चांगल्या गोष्टी उचलू पाहतोय.त्यासाठी मेहनत आणि धडपड करण्याची तयारीही त्याच्याकडे आहे.हे सर्व असतानासुद्धा ज्या प्रमाणात शक्ती अविष्कृत व्हायला हवी त्या प्रमाणात ती होताना दिसत नाही.देशाच्या एकूणच वर्तमान आणि भवितव्य ज्या क्षेत्रातून निश्चित केले जाते त्या राजकारणात,राजकीय व्यवस्थेत हाच तरुण कोठे आहे?तो काय विचार करतोय?याबाबत फारसे कोणी गांभीर्याने विचार करायला तयार नाही.ज्या तरुणांच्या हिमतीवर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगतो आहोत तो या देशाच्या सत्ताकारणात नक्की कुठे आहे हे लक्षात घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे.प्रत्येक निवडणुकीत राजकारण्यांचे भवितव्य निश्चित करण्यात हाच तरुण महत्वाची भूमिका निभावत असतो.त्यामुळे सर्वच मार्गाने या तरुणांना आपापल्या पक्षाकडे खेचण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येते.पण या सगळ्या रणधुमाळीत तरुणांना संधी देण्याबाबत,त्यानं थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची संधी देण्याचे धाडस राजकीय पक्ष कधी दाखवणार? हा खरा प्रश्न आहे.आजवरच्या राजकीय पक्षांना तरुणांची मते हवी आहेत,तरुण कार्यकर्ते हवे आहेत आणि त्यांचा नेता आपल्या घरातील तरुणाला बनवायचे आहे.निवडणुकीच्या तोंडावर तरुणांच्या बेरोजगारी,अशिक्षितपणा,दारिद्र्य याचा फायदा घेत त्यांच्यातील उपयोगिता मूल्य ओळखून 'की जय','हम तुम्हारे साथ हे','कोण आला रे कोण आला','एकच वादा' असा नारा देणारा,खांद्यावर झेंडा प्रसंगी नेत्याला मिरवणुकीत खांद्यावर उचलणारा आणि विवेकाचा अभाव असणारा कार्यकर्ता इतकंच काय ते तरुणाच लेखी मूल्य आहे.हेच वास्तव आहे.स्वातंत्र्यानंतरच्या प्रस्थापित राजकारण्याकडून या देशाच्या तरुण पिढीला परिपक्व व्यवस्था देणं अपेक्षित असताना राजकीय घराण्याची तळी उचलणारी व्यवस्था तयार झाली आणि त्यामुळेच अघराणेशाहितुन नव्याने राजकारणात येऊ पाहणाऱ्यांसाठी आशादायक चित्र नाही.
आजच्या तथागतीत समाजसेवकरुपी राजकारण्यांना त्यांच्या दुसऱ्या ,तिसऱ्या पिढीला जे अपेक्षित आहे तशीच व्यवस्था रूढ करण्यात यश मिळाले आहे.तरुणांच्या ताकदीचा वापर योग्य ठिकाणी न करता आपल्या स्वार्थकरिता ही राजकीय मंडळी तरुणांना फसविण्यात,त्यांना खोट्या जगात जगविण्यात यशस्वी ठरताना दिसत आहेत.जितक्या प्रमाणात तरुणांना फसवू शकू तितक्याच प्रमाणात आपण यशस्वी होऊ शकतो हे समीकरणच जणू तयार झालं आहे.या भयावह आणि भविष्यविरहित व्यवस्थेत जेवढे राजकारणी जबाबदार आहेत तेवढाच सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेला तरुण देखील आहे.अशिक्षित तरुण राजकीय भंपकबाजीत जसा जाळ्यात फसतोय दुर्देवाने तसाच काही प्रमाणात शिक्षित तरुण देखील फसतोय हे आपल्या देशाचा दुर्देव म्हणावे लागेल.
जेष्ठ आणि थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे एक सुंदर वाक्य आहे"क्षीण क्षणांना संजीवनी देतो तो खरा तरुण".देशाच्या क्षीण होत चाललेल्या राजकीय व्यवस्थेला संजीवनी देण्यासाठी आता तरुणांनाच एकत्र येऊन राजकीय युवराजानां बेदखल करून घराणेशाहीमुक्त युवकराज आणण्यासाठी चळवळ उभी करावी लागणार हे नक्की.....

आपलाच,
प्रा.रजनीकांत पालवे,
एम एम पॉलीटेक्निक,थेरगाव पुणे
९८६०७१६३८९

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users