कधी वाटतं...

Submitted by वैभव जगदाळे. on 5 October, 2019 - 13:45

कधी वाटतं संध्याकाळचा मंद वारा बनून तुझ्या श्वासात सामावून जावं...
कधी वाटतं सकाळचं कोवळं उन बनून तुला अलगद स्पर्श करुन पहावं....

कधी वाटतं पावसाच्या सरी बनून तुझ्यावर मनसोक्त बरसावं...
कधी वाटतं चंद्र बनून खिडकीतून तुला पाहण्यासाठी तरसावं...

कधी वाटतं एखादं सुंदर फुल बनावं आणि तु अलगद मला तोडावं...
मग मीही तोडण्याच्या वेदना विसरून तुझ्याशी सुगंधाने नातं जोडावं...

कधी वाटतं मावळत्या सुर्याचे रंग बनून तुझी सायंकाळ रंगवून टाकावी...
कधी तुझ्या डोळ्याची नाजुक पापणी बनून तुझी सुंदर स्वप्ने झाकावी...

वाटतं तर खूप काही पण ते स्वप्नांच्याच दुनियेत राहून गेलं...
देवाने उगाचच माणूस बनवून मला तुझ्यापासून दूर नेलं....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults