:- सल -:

Submitted by jayshree deshku... on 5 October, 2019 - 13:12

रात्रीचे अकरा वाजायला आले होते. रमाबाई त्यांच्या नेमाचा जप करत होत्या. आणि इकडे झोपेची आराधना सुध्दा चालू होती. एवढी माळ झाली की अंथरुणाला पाठ टेकायची. बघू झोप आलीच तर झोपायचं, नाहीतर पुनश्च नामस्मरण सुरूच. ह्या झोपेच सुध्दा अस विचित्र झालं आहे ना! दुपारी अकरा वाजता नाश्ता झाल्यावर काय झोप येते. तिन्ही सांजेला काय येते. आणि रात्री आपली टक्क जागी. घड्याळाचे पुढे सरकणारे काटे पहात आणि ठोक्यांचा आवाज ऐकत दिवाणावर पडून रहायचं. बऱ्याच वेळा दुपारीच पुस्तक किंवा पेपर वाचता वाचताच इतकी पेंग येते. पुस्तक बाजूला पडत, डोळ्यावर चष्मा तसाच असतो आणि रात्रीसारखी गाढ झोप लागते. नातवंड हळूच खोलीत डोकावून जातात. आणि मग जागेपणी माझी चेष्टा करत राहतात. मग माझ मलाच शरमल्या सारख होत. शरीर थकलं आहे आता. मुल म्हणतात,
“आई झोप येईल तेव्हा झोपत जा.आता ह्यावेळी कसं झोपू असा वेळेचा विचार करू नकोस. तुला नाहीतरी आता काय काम आहे? कुठ जायचं नाही ना यायचं नाही. आयत ताट पुढ येत ते जेवायचं आणि हरी हरी करत बसायचं. झालं ना वयाच्या पंचाहत्तर ऐंशी पर्यंत काम करत होतीसच ना! आता वयाची नव्वदी आली. आता बाकीचे विचार कशाला?”
मुलांचं बरोबर आहे पण विचारांना मनात आणायचं नाही म्हणून ते थोडेच थांबणार आहेत? वेड असत मन आणि त्यात येणारे विचारसुध्दा. अशा ठरवून प्रत्येक गोष्टी थोड्याच होतात? नामस्मरणात , चिंतनात मन गुंतवत असतेच की! पण हा माझा स्वभावच मेला विचित्र, नाही त्या गोष्टीच्या चिंता करत राहतो.
आता नातवंडांचे प्रपंच सुरु झाले. आपले दिवस सरले, काळ बदलला. तरी मी का गुंतते कुणास ठाऊक? मोह कमी करायला हवा हे समजत पण उमजत नाही. एक एक करत हळू हळू सर्व अवयव कुरकुरू लागले आहेत. पूर्वीसारखी साथ देत नाहीत. ऐकायला कमी येत. पण घरातल्या सगळ्या गोष्टी सर्वांनी आपल्याला सांगाव्यात अस वाटत असत. आणि घरात सगळ्यांना वाटत, कशाला म्हातारीला सगळ्या गोष्टी सांगायला हव्यात?
‘नातीची सासू थोडी विक्षिप्तच वाटते. नाही म्हणजे सुनबाई बोलत होती लेकाशी तेव्हा कानावर पडल. एवढा कसला अहंकार बाई! स्वत:ला तरुण समजते आणि सुनेची बरोबरी करते.’ ‘नातवाची बायको अंमळ लाडातच वाढली आहे. आणि ह्या गध्याला परजातीच्या मुलीशी कुणी लग्न करायला सांगितल होत? केल ते केल आणि पुन्हा तिच्यापुढे शेपूट घालून असतो. घरात पुरुष म्हणून काही दरारा नको? ह्या बायकांच्या मेल किती कला कलाने नाचल तरी ह्यांचा पापड मोडतच असतो. आमच्या वेळेला फक्त घरातल्या पुरुषाचा मूड सांभाळला जायचा. बायकांना पण भावना असतात हे कधी कुणी विचारात घेतच नव्हत. बायकांनी मुरडीचे कानवले स्वताच्या स्वभावाला मुरड घालत बनवत रहायचे. नाही तर आमचे हे, मरेपर्यंत ताठ मानेने जगले. कुणी त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हता. मी तर हे जाई पर्यंत ह्यांची सेवा केली. घड्याळाच्या ठोक्याला जेवण खाण सार सांभाळत आले.ते सुध्दा वयाच्या ८० पर्यंत. हे गेले आणि माझी रयाच गेली. हळू हळू सुनेने माझे स्वयंपाकघर वर्ज्य करून टाकले. म्हणायला लागली, ‘अंगात नाही अवसान आणि उगीचच कशाला तडमडायला येता? निवांत बसून दोन घास खा ना! मी आहे, नातसून आहे दिमतीला. आणि पणतू पण आहेच की! ’ सगळ खर बाई तिचं, पण वेळेला ५०-६० माणसांचा स्वयंपाक केलेला, धुणी भांडी घरात केलेली. नणंदाची, पोरींची बाळंतपण केली. त्यामुळेच शरीर काटक राहिलं. तरी पण थकल आहे आता. पण मन निवृत्ती घेत नाही ना! नातवंडाना हौसेने त्याच्या आवडीचे चार पदार्थ करून घालत होते. तसे प्रतवंडाला पण करून घालावेत अस वाटत पण हात कापतात. आणि सून, नातसून ओरडत रहातात. घरात देवपूजा करायला मात्र कुणाची तयारी नसते. जाऊ दे म्हणा. त्यामुळे देवपूजा तरी हळू हळू शांतपणे अगदी मनाजोगती करते मी. अजूनी माझ्या मेलीची हौस काही गेली नाही. देवाला नटवायला आवडत. हार करत रहाते, देवीच्या फोटोसाठी. रांगोळीची चिमुट हातात टिकत नाही. रेष वाकडी येते आणि मनासारखी रांगोळी नाही जमत. मग फुलांची रांगोळी काढते, तर आमची सुनबाई लगेच धुसपुसते, म्हणते,
“आई हारासाठी आणि रांगोळीसाठी फुले वाया घालवत जाऊ नका. महाग आहेत म्हणल!” पण मी म्हणते, बायानो तुमच्या हॉटेलसाठी आणि नटण्या मुरडण्या साठी, नको त्या शॉपिंग साठी कितीतरी पैसे उडवता ना! मग देवाला चार फुले जास्त वाहिली तर कुठे बिघडल? पण हे आपलं मनातच बरका! उघडपणे बोलायची सोय नाही हो! मध्यंतरी तीन चार दिवस फुलपुडा आलाच नाही म्हणून फ्लॉवर्सपॉट मधली धूळ खात पडलेली कृत्रिम फुल काढून धुवून ती देवाला वाहिली. माझ्याच कल्पनेवर खुश होते मी. तर काय सांगू, नातसून माझ्यावर खेकसली, म्हणाली, ‘आजी तुम्ही फ्लॉवर्सपॉटचा सगळा शोच घालवून टाकला. का काढली ती फुलं?’ म्हणल, “सॉरी बाई, घे तुझी फुल तुला.’ देवावरची फुलं काढून तिला देवून टाकली. पण बया राहू दे आजी आजच्या दिवस देवावर अस काही म्हणाली नाही. बोलायचं खुप असत मनात पण वितंडवाद नको वाटतो. डोक बधीर होत माझ. पणतू म्हणाला सुध्दा, “मम्मी राहू दे ना देवावर फुलं छान दिसतात. नको ना पणजीला बोलू.” पण ती थोडीच ऐकणार मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून त्याला घेऊन गेली. मी म्हणत होते, “नको मला फुलं पण त्याला मारू नकोस ग.” पण ऐकायला थांबलीच कुठे? आता उद्याला सुध्दा फुले नाहीतच देवाला. गावभर फिरतात सारे, पण फुल आणावी अस काही वाटत नाही. माझा लेक बाहेर गेला तर तोच तेवढा आठवणीने आणतो. तोही बिच्रारा आता सत्तरीचा झाला, काय बोलणार त्याला? सारखा कावलेला असतो. मागच्या महिन्यातच त्याची प्लास्टी का काय झाली. हृदय विकाराचा झटका येऊन गेला. देवाला म्हणत असते, “अरे बाबा, आता ह्या वयात नको रे शोक आणि चिंता! हसता हसता वर ने!” लेकाच्या चिडचिडेपणा मुळे हल्ली सुली माझी लेक, गावात असून देखील पंधरा-पंधरा दिवसात इकडे फिरकत नाही. ती येऊन गेली की जरा बर वाटत. मायेने विचारपूस करते. काही हव का ते विचारते. आणि येताना आठवणीने चांगली पावशेर आर्धा किलो फुल तुझ्या देवासाठी आणली म्हणत देऊन जाते. तुला तोंडात टाकायला घे म्हणून कधी गोळ्या किंवा चोकलेट हळूच माझ्या जपमाळेच्या पिशवीत टाकून जाते. मला चमचाभर आईस्क्रीम खायचं असत, पण त्यासाठी सगळ्या घरा-दारासाठी मोठा एक लिटरचा बॉक्स घेऊन येते. तिलाही तिच्या घरातून लवकर सुटका होत नाही हल्ली. सुना सर्व्हीसला जातात. नातवंडाच कराव लागत. ती म्हणते, “आई मुलांपेक्षा ह्या नातवंडामध्ये जास्त गुंतून व्हायला झालं आहे ग.” मी मनात म्हणते, ‘हो बाई खर आहे तुमचं, तुम्ही सर्व कामाचे, मी बापडी बिन कामाची. कुणाशी बोलायला नको की, मन मोकळ करायला नको. मग बसते त्या रामाला गाऱ्हाणी सांगत. रंजी म्हणजे माझी मोठी लेक रंजना. मुंबईला असते.तिच्या फोनची चातकासारखी वाट पहात असते. खुप शांत आणि हळवी बिचारी! माझ सगळ भडाभडा बोलण ऐकून घेते. मग म्हणते ,’ आई मी थोड बोलू का ग?’ मग मी भानावर येते, कळत मला, तिलाही काहीतरी बोलायचं असेल. हितगुज करायचं असेल. ती कधी जावया किंवा सुने बाबत बोलत नाही. तिने स्वत:च वेगळ विश्व निर्माण केलय. समाजसेवा करत असते. एका वृध्दाश्रमाच काम पहात असते. त्यामुळेच सगळ्यांच ऐकून घेण्याची तिला सवय आहे. दोघी बहिणी भावापासून दुरावल्या आहेत. एकमेकात गैरसमज निर्माण झाले आहेत. पूर्वी सारखे हसून खेळून बोलण बसण होत नाही त्याचं. रंजी एवढ वृद्धाश्रमाच काम बघते मग भावाला समजून घ्यायला काय झालं? मी काही सांगायला गेले की म्हणतात, “आम्ही आमचं बघू! तू कशाला नाही त्या गोष्टीचा विचार करतेस? तुझ्याशी सगळी सुना, नातवंड, जावई, सार गोत गोड आहे ना! मग झालं तर!” पण अस म्हणून कसं चालेल? सगळ गण गोत माझच तर आहे ना! सगळे एकमेकांशी निदान मनाने तरी जोडलेली असावीत असे वाटत रहाते. मुलाने म्हणजे दिनूने त्याच्या नातवाच्या मुंजीला आपल्या दोघी बहिणींना बोलवलं नव्हत. म्हणून धुमसत राहिल्या आहेत सुली आणि रंजू! मी आपलं म्हणलं दोघींना, अग कशाला कटुता ठेवता नात्यात, सोडून द्या. त्याच्या मुलांच्या लग्नाला त्याने तुम्हाला मानाने बोलावले. नातवाचे त्याच्या हातात नाही ना! मुलांचे विचार वेगळे पडतात. आपण कशी त्यांच्यावर कुठल्या गोष्टीची जबरदस्ती करायची? उलट बोलून मोकळे होतात. मग मनस्ताप आपल्यालाच होतो ना! लेकाच तेच तर झालय ना! मुल ताळतंत्र सोडून वागतात. आणि हा जीवाला घोर लावून घेतो. आमची मुल कशी धाकात, वडिलधाऱ्यांचा मान ठेवून राहिली. हे उघड बोलायची सुध्दा चोरीच बरका. लगेच ‘तुमचा काळ वेगळा होता’, शब्द तोंडावर फेकले जातात. चला रात्रीचे दोनचे ठोके पडले. अजूनी झोप आली नाही. ‘रामराया एकदा कायमचे डोळे मिटू दे बाबा! तुझ्या पायाशी येऊ दे रे. नको दूर लोटूस आता. तुला तरी किती गाऱ्हाणी ऐकवायची. कंटाळत असशील. तरी पण ऐक बाबा! तेवढ्या मुलांमधल्या गैरसमजाच्या गाठी सोडव बाबा! घर कसं हसत खेळत राहू दे. कशाला हवे आहेत अहंकार जपायला? परंपरा जपा, नाती जपा. आपलेपणा जपा. इतर खुप गोष्टी आहेत जपायला, आणि वाढवायला.
रमाबाईंच्या डोळ्यातून त्यांच्या नकळत आसवं ओघळत होती. उशी ओली होत होती. तशातच त्यांचा डोळा लागला.
सकाळी रमाबाईना जाग आली, पण डोळे उघडावे असे वाटतच नव्हते. त्यांनी खुप कष्टाने कूस बदलली. लगेच लेकाने डोक्यावर हात ठेवला, म्हणाला,
“आई तुला खुप ताप चढला आहे ग, नेहमीच्या वेळेला उठली नाहीस म्हणून बघायला आलो. तर अंगात ताप! डॉक्टरांना फोन केला आहे. येतील आता. थोडा चहा घेशील का? बर वाटेल. मी तुला हात देतो उठ हळूच.” रमाबाईंच्या लेकाने त्यांना आधार देऊन उठून बसवलं. नातू चहा घेऊन आला. त्याने तोंडाशी कप धरला. रमाबाईनी दोन घोट चहाचे घेतले. त्यांना थोड बर वाटलं. पण जास्त वेळ बसवेना म्हणून पुन्हा त्या आडव्या झाल्या. डॉक्टर येऊन तपासून गेले. म्हणाले,
“आजींच वय पाहता त्यांना हा ताप सहन होईल अस वाटत नाही. तेव्हा हॉस्पिटल मध्ये दाखल केलेले चांगले. आणि त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना पण बोलावून घ्या. त्यांना पाहून कदाचित आजींना बर वाटेल.” आजींच्या मुलाने फोन करून दोघी बहिणींना बोलावून घेतले.
तापाने आलेल्या ग्लानी मधून जेव्हा आजींनी डोळे उघडले, तेव्हा उश्या पायथ्याला जमा झालेला, आणि त्यांच्या चिंतेत व्यग्र असलेला परिवार त्यांनी पाहिला. आणि त्यांना भरून आले. त्या थरथरत्या आवाजात बोलल्या, “का ग सुले आणि रंजू तुम्हाला आश्या वेळी आईला भेटायला यायचं सुचलं का? माझ्या जीवाला घोर लावून इतके दिवस दूर का राहिला?”
सुली म्हणाली, “अग आम्ही तुझ्यावर थोडच रागावलो होतो. दादावर रागावलो होतो. तेसुद्धा त्याने आम्हाला मुंजीला बोलावले नाही म्हणून नाही. तर साधा फोन करून मुंज घरातल्या घरात करून घेतली, बोलावू शकलो नाही सॉरी एवढ तरी म्हणण अपेक्षित होत. बिल्डींग मधले लोक भेटतात आणि तुम्ही मुंजीला का आला नाही म्हणून विचारतात. मग वाईट वाटत ग!” रंजुने सुलीचीच री ओढली. “अग आई आम्ही फक्त त्याच्या फोनची वाट पहात होतो. आणि बघ आता तुला हॉस्पिटलमध्ये आणल्यावर ह्या पठ्ठ्याने फोन केला. येऊन जाऊन ऐका रक्ताची तिघे तर भावंडे आहोत. त्यात कुठे ठेवायचा आहे इगो आणि मान पान? ह्याने फोन केला नसता तरी भाऊबीजेला येणारच होतो आम्ही. तूच तर म्हणायची, ‘अहंकाराचा वारा न लागो माझ्या पाडसा’. शब्द देते, दादाला आम्ही कधीही अंतर देणार नाही आई.” रमाबाई मलूल हसल्या आणि म्हणाल्या,
“हे ऐकण्यासाठीच माझे कान उत्सुक होते ग. तुमच्यातला दुरावाच माझ मन पोखरत होता ग. नको तो सल माझ हृदय जाळीत होता.” एवढ बोलून रमाबाईनी श्रीरामाचा जप सुरु केला. लेक हसत म्हणाला, “पाहिलस रंजू आईचा श्रीरामाशी संवाद सुरु झाला.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सामो, अज्ञातवासी, शारदा, सुनिधी, आदू , भाग्यश्री, मन्या, सोमा सर्वाना मनापासून धन्यवाद

उर्मिला, विनिता, सिध्दी, लबाड कोल्हा, जाई , मीरा, उमानु सर्वांचे मनापासून धन्यवाद. रसिक वाचक आहेत म्हणून काही लिहावसं वाटत.

जयश्रीताई

ही कथा साप्ताहिक सकाळ मध्ये वाचली
अभिनंदन

मस्त आहे

पुलेशु