शहा साहेब

Submitted by सोमा वाटाणे on 5 October, 2019 - 06:16

सरकारी नोकरी करत असताना अनेक सहकारी लाभले. वेगवेगळे अधिकारी अनुभवायला मिळाले. कधी मी नवीन ठिकाणी बदलून गेलो तर कधी नवीन अधिकारी, सहकारी बदलून आले.
आमची कार्यालयं म्हणजे सिमेंट किंवा लोखंडी पत्र्याच्या खोल्या, त्यात मोठ मोठी सागवानी टेबलं, लाकडी खुर्च्या आणि लाकडी लोखंडी कपाटं. फायलींचे गठ्ठे कपाटात आणि कपाटांवर रचून ठेवलेली. कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या खेडवळ लोकांचा राबता. आम्हीच आमच्या जागेत कसंतरी बसून कामं उरकित असायचो. गर्दीमुळे आणखीनच कोंदट वातावरण निर्माण होत असे.
त्यात आमचे काही अधिकारी सतत मिटिंगा लावत. मिटिंगचं गुर्हाळ दोन तीन वाजता सुरू झालं की सुटी कधी होईल हे साहेबाच्या मनावर ठरत असे. कामानधामाचा कीस काढत महत्वाचा वेळ वाया जाई.
मग कामं पेंडिंग राहिले की परत साहेब रुबाब झाडणार. काही अधिकारी खुर्ची उबवण्यासाठीच जन्माला आले की काय असे वाटायचे.‌ आमचे काही अधिकारी नवाला ऑफिसमध्ये आले की सहा सात वाजले तरी काम त्यांना उरकत नसे. खराब, डोकं खाणारा अधिकारी असेल तर त्याच्या सोबत एक दिवस काम करणं हे वर्षभर काम केल्यासारखे वाटायचं. अधिकारी बदलला की पहिली चर्चा नवीन साहेब कसा असेल याची रंगत असे. कोणीतरी नवीन अधिकाऱ्याला ओळखत असायचं. जर त्यानं येणाऱ्या अधिकाऱ्याला खडूस म्हटलं की सगळ्यांच्या उत्साहावर पाणी फिरायचं.
नोकरीत अशीच वर्षे चालली होती. तोच तोच पणा आल्यानं मी देखील सराईत, टिपिकल सरकारी नोकर बनलो होतो. कामाशी काम, कागदाला कागद.
अशातच नवीन अधिकारी म्हणून शहा साहेब हजर झाले. चांगले पावणेसहा फूट उंच, गोरेगोमटे, तब्येतीनं सडपातळ अगदी पोरगेलेसे वाटावेत असे. एकदम हसतमुख आणि शांतपणे बोलणारी व्यक्ती.
आम्ही सवयीप्रमाणे साडेदहा पावणे अकरा वाजता कार्यालयात गेलो तर साहेब केव्हाच येऊन कामाला लागलेले. आम्ही आत गेलो तर हसून आम्हालाच नमस्कार केला त्यांनी सगळे आल्यावर लगेच शिपायांना चहा आणायला सांगितले. पहिल्याच दिवसापासून पटापट निर्णय घेत कामं पूर्ण करण्याची साहेबांची हातोटी पाहून आधीचे अधिकारी आठवले. रोज साहेब बरोबर दहा वाजता हजर असत. सर्वांना चहा पदरच्या पैशाने सांगणार. जेवण ते घरूनच करुन येत. जैन असल्याने संध्याकाळी लवकर जेवण करत म्हणून दुपारी डबाही आणत नसत. चार वाजता सगळी कामं मार्गी लागलेली असत. पाच वाजता कुणालाही घरी जायची परवानगी नुसती मान डोलावून देत असत.
खेड्यावर काम असले तर साहेब जे वाहन असेल ते, बऱ्याचदा आमच्यापैकी कुणाच्याही मोटारसायकलवरून भेटीला जात असत. नियमात बसणारे कोणतंही काम कुणाकडून एक रुपया न घेता तात्काळ मार्गी लावत. शहा साहेब बदलून आल्यापासून कार्यालयानंही कात टाकली होती. सगळे वेळेवर हजर असत. कुणाला अडचण असेल आणि रजा हवी असेल तर साहेब अर्ज न मागता फोनवरच हरकत नाही, म्हणून परवानगी देत असत. नेहमी एकमेकांशी न पटणारे कर्मचारी आता आनंदाने टिमवर्क करत होते.
कामासाठी येणारे लोकसुद्धा शहा साहेबांच्या वागण्यानं प्रभावित झाले. बरेच जण त्यांचं कौतुक करत असत. आपल्या हसऱ्या चेहऱ्याने ते कुणालाही आपलसं करीत. आता लोक आम्हाला शहा साहेबांच्या हापिसातला माणूस म्हणून ओळखायला लागले.
आपल्या ऋजू वागण्यानं सरकारी कर्मचाऱ्यांनी कसं आचरण करावे याचा वस्तुपाठच घालून देत होते जणू.
अशा निर्मळ मनाच्या साहेबांचा द्वेष करणारी काही मंडळी ऑफिस मध्ये होतीच. त्यांचे लोकांकडून पैसे खाणे बंद झाले होते ना.
अनेकदा खेड्यातील लोक साहेबांचा गैरफायदा घेत. भाड्याला पैसे मागणे, कागदपत्रे जमा करण्याची फि भरण्यासाठी कोणी पैसे मागितले तर साहेब लगेच देत असत. पैसे परत येतील ही अपेक्षा सुध्दा करत नसत.
एकदा एका पुढाऱ्यानं खोटं काम करण्यासाठी दबाव आणला होता,पण शहा साहेबांनी नियमात बसत नाही म्हणून त्याचं ऐकलं नाही. तेव्हा डूख धरून त्या पुढाऱ्यानं त्यांचा पंचायत समितीच्या सभेत अपमान केला तेव्हा साहेब फार व्यथित झालेले दिसले होते. पण त्यांनी मनात काही ठेवलं नाही.
साहेब हे स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा होते. हे त्यांचे वडील वारले तेव्हा समजलं. मला असा हा शांत, मनमिळाऊ अधिकारी लाभला हे माझं भाग्यच समजतो.

Group content visibility: 
Use group defaults

होय. जिथे जाल तिथे खडूस बॉस असतोच. मी स्वतः असे विचार बाळगणाऱ्या बॉसचा बळी ठरलो. कितीही काम केले तरी कौतुकाचे चार शब्द नाहीत. सतत कपाळावर आठया आणि कामात चुका काढून कधी मेमो, कधी वॉर्निंग लेटर, कधी नेमकं ऑफिस सुटायच्या वेळेला केबिनमध्ये बोलावून दिवस भरातल्या कामाचा उगीचच आढावा घेणे असा त्रास. मी कंटाळा येऊन नोकरी सोडली. You don't leave jobs, you leave bosses. ही उक्ती माझ्या बाबतीत खरी ठरली. आणि मी जेंव्हा बॉस बनलो तेंव्हा ठरवलं कि माझ्या हाताखालच्या माणसांनी गैरफायदा घेतला तरी चालेल पण सौजन्य सप्ताह वर्षभर पाळायचा आणि चालूच ठेवायचा. आपली वैखरी शुद्ध ठेवायची. समोरच्या व्यक्तीशी सौजन्याने वागून मगच जबाबदारी सोपवायची. ती व्यक्ती संवेदनशील असेल तर नीट समजून घ्यायची. आपण नकारात्मक भूमिकेत शिरलो कि नात्यातली सहजता हरवून जाते. शहा साहेब संवेदनशील असणार म्हणून त्यांच्या वागण्यात माणुसकी होती.

धन्यवाद सतिशकुमार भाऊ. मी लेखात लिहिले आहे बॉस खडूस असेल तर एक दिवस वर्षासारखा वाटतो.
हाताखालच्या लोकांशी गोडीगुलाबीने वागून कधी कठोर होऊन सुध्दा काम करता आले पाहिजे.

छान लिहलंय. सतिशकुमार यांचा प्रतिसाद देखील चांगला आहे.
साहेबांबद्दल लक्षात राहणाऱ्या २-३ घटना डिटेलमधे लिहल्या असत्या तर अजून रंजक झालं असतं.

Chhan