माया

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 1 October, 2019 - 13:29

माया
*******
ती एक वेडीच
अति मूर्ख बया
नाचे थयथया
डोक्यावरी ॥
काय तिज हवे
कळेना मजला
घोरची जीवाला
लावितसे ॥
उधळिते जन्म
गरज नसून
येतसे धावून
भ्रमात चि .॥
करीतसे हट्ट
हक्क तो नसून
जाते बजावून
काही बाही ॥
कुणीतरी सांगा
तिला वेडाबाई
मूढ घरी राही
अज्ञानाच्या॥
बोलावितो जिस
तिचा न हुंकार
हाक हाके वर
हिचे असे ॥
अशी अवधूता
करशी का थट्टा
अडव रे वाटा
तिच्या आता ॥
कोंडुनिया घाली
हवे तर बळे
मजला मोकळे
राहू दे रे ॥
ऐकू दे मनात
निजलेले गाणे
शारद चांदणे
लपेटून ॥
स्मृतींच्या पखाली
साठवली गाणी
गुढ आळवणी
सदोदित ॥
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रामविजय ग्रंथात मूळमायेचे इतके सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.
_________

जैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||
की समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||
एक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||
जिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||
एवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||
विधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||
ब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||
चैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||
इने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||
हे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||
नानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||
कोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||

* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.

तूं विचित्र गारुडीण काय खेळ मांडसी
रक्तमांसअस्थिच्या गृहांत जीव कोंडसी
प्राण कंठिं पातल्याहि सोडसी न कां मला
हें विहीत काय, सांग, माय रेणुके ! तुला ॥१॥

विष्णूदासांच्या ओळी आहेत या.