नवरात्र : जागर स्त्रीशक्तीचा की दैवी शक्तीचा ¿

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 30 September, 2019 - 02:41

नमस्कार मंडळी। स्त्री शक्तीचा जागर अशा आशयाच्या काही मंडळींच्या फेसबुकवर पोस्ट्स आणि कॉमेंट्स पाहिल्या। आणि वर्तमानपत्रात सुद्धा आता अशाच आशयाचे लेख येणं सुरू होईल। आदिम संस्कृती आणि तेव्हाच्या स्त्री पूजक संस्कृती, मग तेव्हाच्या स्त्रियांनी निसर्गाशी झगडत कसं साम्राज्य उभं केलं, मग ती कशी कशी आणि कुठे कुठे, कोणाकोणाशी लढली वगैरे लेख सुरू होतील। मग आत्ता घरात स्वयंपाक, नवरा, मुलं, संसार सांभाळत नोकरी करून स्वतःचे छंद जपणाऱ्या स्त्रियांच्या बद्दल तथाकथित बुद्धिमान लोक शाई संपेपर्यंत ( त्यांच्या पेनातली सॉरी प्रिंटर मधली आणि वर्तमानपत्रातल्या छापखान्यातली सुद्धा ) अशाच "भूमिकेतून" ( काही विशिष्ट लोकांनीच भूमिका घेतली वगैरे म्हणायचं असं काही नाहीये ना? ) म्हणजे अशाच अँगलने, डायमेंशनने, दृष्टिकोनातून, याच आविर्भावात लेख लिहितील। मग पुरुषांना गुन्हेगाराच्या कटघऱ्यात-पिंजऱ्यात उभं केलं जाईल। जगातला सगळा अन्याय म्हणून जर का काही होत असेल तर तो स्त्रियांवरच होतो ( सुनेला छळणाऱ्या विशेषतः सासवाच असतात हे विसरून ) वगैरे नकारात्मक चित्र उभं केलं जाईल। वेद वगैरे काही नसून आदिम संस्कृतीतून देवीची पूजा सुरू झाली असे दरवर्षी प्रमाणे लेख येतील। पुरुष अथवा स्त्री अशी कोणतीही लिंग विशिष्ट पूजा आली की तिथे अहंकार आलाच। आणि अहंकार आला की उपासना संपली। त्यामुळे लक्षात ठेवा की पूजा, उपासना, साधना ही तत्वाची व्हावी, व्यक्तीची नव्हे। कारण व्यक्तींमध्ये दोष असतातच। तत्व शुद्ध, निर्लेप आणि निरपेक्ष असते।

पण स्त्री शक्तीचा जागर हे नवरात्र पूजनात किंवा हिंदूंच्या कोणत्याही स्त्री देवतेच्या बाबत म्हणणं म्हणजे मुलींची कन्याशाळा, घोड्यांची पागा वगैरे म्हणण्यासारखंच आहे। कारण कन्याशाळा म्हणजेच मुलींची शाळा, गोठा गाई-गुरांचा असतो आणि पागा घोड्यांची असते। ( घोडे बांधतात त्या जागेला तबेला सुद्धा म्हणतात ) अर्थातच देवी ही शक्तीरूपच असते। पुरुष देवता या त्या विशिष्ट क्रियेचं ती क्रिया कशी व्हावी हे ज्ञान असतात तर स्त्री देवता म्हणजे त्यांच्या ज्या पत्नी दाखवलेल्या असतात त्या ती ती विशिष्ट क्रिया पार पडणारी शक्ती असतात। ज्ञान आणि कृती किंवा क्रिया यांचा संगम झाल्यावरच घडल्यावरच कार्य घडते। नवरात्राला स्त्री शक्तीचा जागर म्हणायचं असेल तर गणेश उत्सवाला, कृष्ण जन्माष्टमीला पुरुष शक्तीचा किंवा हत्तीशक्तीचा जागर म्हणायचं का? शिव शब्दात शिव हा शब्द शव या पुरुष रुपाला इ हा स्त्री लिंगी स्वर जोडून शिव हा शब्द बनला आहे। हा इ हा स्त्री उच्चारी स्वर नसेल तर शिव हे फक्त शव म्हणजेच प्रेत आहेत। लक्ष्मी ही विष्णूची शक्ती आहे जिला आपण विष्णूची पत्नी म्हणतो। सरस्वती ही ब्रह्मदेवाची कार्यकारी शक्ती। म्हणजे सृष्टी कशी बनवायची हे ज्ञान ब्रह्मदेव आणि ती प्रत्यक्ष बनवण्याची शक्ती म्हणजे सरस्वती। ब्रह्म किंवा परब्रह्म ही सृष्टी बनवणाऱ्या शक्तीचे मूळ अकल्पनिय, अचिंत्य म्हणजे आपल्याला न कळणारे अति सूक्ष्म रूप असून या शक्तीचं साकार आणि खरं भासणारं आभासी रूप म्हणजे माया होय। "शीवी" किंवा पार्वती ही शिवशंकरांची शक्ती होय। ( शिवी नव्हे। शिवी म्हणजे चुकीची वाकशक्ती, वाणी किंवा घातक, वाईट शब्द। )

हां। पण हा जर स्त्री शक्तीचाच उत्सव असेल तर प्रत्येक पुरुषात स्त्रियांच्या जन्माला कारणीभूत ठरणारे "x" क्रोमोझोम्स असल्याने पुरुषांच्या मधल्या स्त्री शक्तीचं नवरात्र हे शुद्धीकरण पर्व असतं असं आपण नक्कीच म्हणू शकू। सांगतो ...... सगळं इस्तरून सांगतो। अहो म्हणजे फोड करून सांगतो। मंडळी, आपण जेव्हा जन्म घेतो तो आपण माणूस म्हणूनच का घेतो, हात, पाय, नाक, डोळे, आपल्या सवयी, आवडी निवडी या काहीशा आपल्या आई-वडिलांच्या सारख्याच का असतात, त्यांच्या सारखेच आपण का दिसतो हे सारं आरेखित केलेलं असतं आपल्या आई वडिलांच्या शरीरातील पेशींच्या मध्ये क्रोमोझोम्सच्या रूपाने। पुरुष बाळ जन्माला येण्यासाठी "y" क्रोमोझोम्स तर स्त्री बाळ जन्माला येण्यासाठी "x" क्रोमोझोम्स आवश्यक किंवा कारणीभूत असतात। आता पुरुषांच्या शरीरातील पेशींच्या मध्ये x आणि y हे दोन्ही क्रोमोझोम्स असतात तर स्त्रीच्या शरीरातील पेशींच्या मध्ये फक्त x क्रोमोझोम्स असतात। आता दोघांच्या शरीरातील एक एक क्रोमोझोम येऊन जोडला जाईल तेव्हा बाळाचं लिंग काय असणार हे ठरणार। पुरुषांमधलं x आणि स्त्री मधलं x एकत्र आलं तर मुलगी जन्माला येणार। आणि जर पुरुषांमधलं y आणि स्त्री मधलं x क्रोमोझोम एकत्र आलं तर मुलगा जन्माला येणार। याचे दोन मुख्य अर्थ होतात। एक म्हणजे मुलगा होणार की मुलगी हे पुरुषामधून x किंवा y यापैकी कोणतं क्रोमोझोम दिलं जातंय यावर अवलंबून असतं। म्हणजेच दुसऱ्या भाषेत मुलगा होणार की मुलगी याला पूर्णतः पुरुष जबाबदार असतो। आणि स्त्री मध्ये दोन्ही क्रोमोझोम्स x असल्याने ती एक कणखर व्यक्ती असते असं म्हणता येईल। अर्थात स्त्री ही पूर्णपणे स्त्री असते तर पुरुषामध्ये काही प्रमाणात स्त्रीत्व असतं। कळलं का रावजी? म्हणजे नवरात्र हा स्त्री शक्तीचा जर जागर असेलच तर तो पुरुषा मधल्या स्त्री शक्तीचा जागर किंवा पुरुषा मधल्या स्त्रीत्वाचं शुद्धीकरण असतं असं आपण म्हणू शकू।

पुढे जाऊन अजून सांगायचं तर देवता या वायुरूप असतात। म्हणजे आपण ज्या रूपात त्यांची आराधना करू त्या रूपात त्या आपल्याला प्रसन्न होतात किंवा दर्शन देतात। म्हणजे सिनेमात होतं तसं गाणं गायलं की मंदिरातल्या ५-५ किलोच्या घंटा एकमेकांवर दाणदाण आदळून लगेच ती देवता आली असं होत नाही। झोकून देऊन उपासना करावी लागते त्यासाठी। जीव आटवावा लागतो। अर्थात अगदी आर्ततेते साद घातल्यावर देवता धावून आली आहे असंही क्वचित प्रसंगी झालेलं आहे। उदाहरण सांगायचं झालं तर जेव्हा एका हत्तीचा पाय पाण्यातल्या मगरीने पकडला होता तेव्हा त्या हत्तीने आर्ततेने विष्णूला साद घातल्यावर त्याने धावून येऊन त्या हत्तीची सुटका केली होती। किंवा अजामिळ नावाच्या एका नास्तिक व्यक्तीला मोक्ष मिळाला ज्याने आयुष्यभर काहीही उपासना केली नाही पण मरताना त्याच्या स्वतःच्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली आणि तो मुक्त झाला। तर सांगायचा मुद्दा हा की देवता जरी माणसा सारख्या दाखवलेल्या असल्या तरी त्या प्रतिकात्मक असतात। त्या जर माणूस असत्या
तर त्यांनाही आपली सारखे राग, लोभ, प्रेम, तिरस्कार वगैरे भावना असत्या। भूक लागली असती। म्हणजेच रोज सकाळी चिंपाट उचलून ...... होय ना?

त्यामुळे देवतांच्या मध्ये स्त्री-पुरुष भेद न माजवता, त्याचं अवडंबर न करता स्त्री शक्तीची नव्हे तर "शक्तीची पूजा" आपण करतोय हे लक्षात ठेवून उपासना करा। जिथे शक्ती असेल तिथेच शांती असते। दुबळ्यांच्या शांतीच्या गप्पाना काहीही अर्थ नसतो। तर मंडळी नवरात्राच्या या काळात आपण शरीराने आणि मनाने शक्ती संपन्न, सामर्थ्यवान व्हायचं आहे देवीची उपासना करून। यात स्त्री-पुरुष सगळे आले। आपण शक्तिमान झालो की समाजात आपल्याला मान मिळतो, हाती घेतलेल्या कामात यश मिळतं। मन आणि शरीर सुद्धा स्वस्थ शांत राहतं। स्त्रियांनी आणि पुरुषांनी एकमेकांचा, एकमेकातील भेदांचा आदर करत एकत्र काम करायला या निमित्ताने शिकायचं आहे। मन आणि समाजातील वाईट गोष्टींचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील रहायचं आहे। उपासना, साधना यांचे अर्थ, प्रकार अनेक आहेत। हिंदू धर्म अति प्राचीन, अति विशाल आहे।

स्रोत : Dr हेमंत सहस्रबुद्धे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users