कवितेसंदर्भातील ३ लेख

Submitted by सामो on 28 September, 2019 - 22:57

या धाग्यात कवितेसंदर्भात ३ लेख एकत्र टाकलेले आहेत..
_____________________________________________________________________
कविता माझ्याकरता काय आहे?

कविता माझ्याकरता काय आहे हे इतक्या कविंनी काव्यमय, सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. Myrna Badgerow या अंध कवयित्रीकरता, कविता ही अर्धवट पडलेलं स्वप्न आहे किंवा पंख लाभलेले चिंतन आहे. एक निसटुन गेलेला क्षण आहे, तर कुठे स्वतःचेच प्रतिबिंबकिंवा,चुकलेला काळजाचा ठोका आहे तर कुठे कधीही स्मृतीपटलावरुन पुसली न जाणारी आठवण आहे,
poetry bleeds
sorrow and radiates joy, marks
time and remains timeless, is rich
tapestry and blank canvas, and
it is the music that fills my heart
and what it means to me is
....everything.

कुठे कॅरोलिना फोर्शे नावाची कवयित्री सहज सांगून जाते की कविता ही मनुष्याला चिंतन करण्यास शिकवते. आत्म्याचा कोवळा हुंकार, आत्म्याचा विलास, आत्म्याचे संगीत म्हणजे कविता तर कुठे जॉय हारो (Joy Harjo) नावाची कवयित्री सांगते की प्रत्येक कविता ही प्रेमातूनच उगम पावते म्हणून प्रत्येक कविता ही प्रेमकविताच असते. पुढे ती म्हणते की कविता ही नादमय कला आहे. एकांतात मनाशी वाचायचा हा प्रकार नसून मोठ्यांने वाचा. कविता कानावर शब्द पडतील अशी वाचा. It's an oral art. कवितेची जादू संपूर्ण बहराला तेव्हाच येते जेव्हा आपण ती ध्वनीरूपाने ऐकतो.

तर कुठे गॅरी स्नायडर (Gary Snyde) सहज कवितानिर्मितीचे विश्लेषण करताना सहज सांगून जातात -
.
How poetry comes to me

It comes blundering over the
Boulders at night, it stays
Frightened outside the
Range of my campfire
I go to meet it at the
Edge of the light

कविता बुजरी आहे. तर्काच्या प्रखर प्रकाशात मला भेटायला येण्यास कविता बुजते. आणि मग मीच तिला सामोरा जातो, सामोरा जातो तो कसा तर ठेचकाळत, चाचपडत एकेक पाऊल टाकत येणार्‍या लावण्यमयी , आदिम, सहजप्रवृत्तीच्या अशा कवितेच्या विश्वाला मी अमूर्त मनाचा मखमली अंधार व तर्काच्या प्रकाशाची सीमारेषा या ऊंबरठ्यावरती सामोरा जातो. हेच स्नायडर कवी कवितेला "कल्पनेच्या जगातील अभयारण्य" अशा विलक्षण नावाने बोलावतात.
.
इतकं काव्यमय आणि परिपूर्ण किंवा मनास चुटपुट लावणारे तर काही मला लिहीता येणार नाही. पण आज चपाती करताना सहजच वाटून गेले की कणकेचा गोळा आपण लाटतो, मधे तेल लावुन पीठ भुरभुरवुन, त्रिकोण करत लाटतो व चपाती करतेवेळी एक क्षण असा येतो की तव्यावर ३ पदर सुटलेली टम्म फुगलेली, खरपूस भाजली जाऊन सुगंधाने दरवळून जाणारी, खाणार्‍याकरता पौष्टिक तसेच खाणार्‍याला तृप्त करुन सोडणारी चपाती फुलते. अमूर्त मनातून निघालेली कविता ही तशीच असते - अनेक पदर असलेली, व वाचकाचे मन सुगंधाने भरुन टाकणारी, आत्म्याकरता पौष्टिक अशी कविता.
___________________________________________________
कविमनाची ओळख - Claribel Alegria

Claribel Alegria या लॅटिन अमेरिकन कवयित्री आहेत. त्यांची ४० पुस्तके व १५ कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत . वयाच्या ६ व्या वर्षी या कवयित्रीने कविता रचण्यास सुरुवात केली. परंतु अन्य मैत्रिणी आणि मुले आपली चेष्टा करतील, आपल्याला त्यांच्या खेळात, नाचात सामावून घेणार नाहीत या भीतीपोटी त्यांनी त्या कविता लिहितात हे कोणास कळू दिले नाही. या कवयित्रीच्या काव्यनिर्मिती च्या कालखंडातील काही कविता व त्यांचे विचार माझ्या आवडत्या पुस्तकात " The Language of Life - A Festival of Poets - Bill Moyers " वाचले त्यातील काही आवडलेले विचार.
.
El Salvador देशात जन्मलेली ही कवयित्री जरी Political Exile (राजकीय विजनवास) मुळे उत्तर अमेरिकेत येऊन राहिली तरी कवितेतून त्यांनी जुलमी राजसत्तेविरुद्ध सतत आवाज उठविला. जसे Ars Poetica ही कविता त्यांनी El Salvador देशामध्ये लढाई चाललेली असतेवेळी लिहिलेली आहे ज्यात त्या भविष्यकालीन Promised Land बद्दलचे स्वप्नरंजन करताना दिसतात.
.
I,
poet by trade,
condemned so many times
to be a crow,
would never change places
with the Venus de Milo:
while she reigns in the Louvre
and dies of boredom
and collects dust
I discover the sun
each morning
and amid valleys
volcanoes
and debris of war
I catch sight of the promised land.

.
बिल मॉयर्स यानी त्याना विचारले की या कवितेतील "condemned so many times to be a crow," या ओळीचा अर्थ काय तेव्हा त्या म्हणतात - कावळा जसा निर्दयी, भावनाशून्य डोळ्यानी जग पहातो तसे मी जग पहाते आहे असे मला वाटते. तशाच कोरडेपणाने मी जग पहाते तसेच स्वतः:मधील दोष देखील पहाते.
.
पुढे "Documentary " नावाची एक नॅरेटीव्ह कविता येते ज्यात कॅमेरा च्या तटस्थतेने कवयित्री, तिच्या देशातील लोकांच्या जीवनातील एक एक सुख-दु:ख-वेदनेचा-आंनदाचा क्षण टिपत जाते आणि कवितेच्या अंती तो कॅमेरा चा डोळा कवीचाच अश्रुपात करणारा डोळा बनतो. या कवितेबद्दल बोलताना त्या म्हणतात की कवीने हस्तिदंती मनोर्यात बसून गोग्गोड कविता लिहाव्यात हे त्यांना मान्य नाही. जेव्हा जगात इतक्या भयावह घटना घडत आहेत , इतके दु:ख व वेदना आहे तेव्हा कवीने कवितेमधून या दु:खाकडे पाहिले पाहिजे, त्या दु:खास आपलेसे केले पाहिजे. याबाबत बिल मॉयर्स त्यांना विचारतात - तुम्ही वहावत ना जाता हे दु:ख कसे टिपू शकता? तेव्हा त्या म्हणतात - "आशा! आशेच्या एकमेव बळावरती हे साध्य होऊ शकते. मी जेव्हा अनेक वर्षांनी Political Exile अर्थात राजकीय विजनवास संपल्यावरती माझ्या लोकांना जाऊन भेटले तेव्हा मला झालेला आनंद मी विसरू शकत नाही. माझा देश , माझी माणसे जी कॉफी आणि देवदूतांची पेरणी करतात ."
यावर बिल मॉयर्स त्यांना विचारतात - तुमचा देश विद्ध (Wounded ) देश आहे. कॉफी मी समजू शकतो पण देवदूतांची पेरणी कशी? त्यावर त्या उत्तरतात - प्रत्येक ५ मिनिटाला El Salvador मध्ये एक लहान मूल दगावते ज्याला पुरले जाते. आमच्या देशात अशी समजूत आहे की २ वर्षे होण्यापूर्वी मूल हे देवदूत असते. म्हणून कॉफी व देवदूतांची पेरणी करणारा देश.
.
पुढे बिल मॉयर्स त्यांना विचारता जर आपण दु:ख, यातना, अन्याय थांबवू शकत नाही तर मग कविता लिहायच्या कशाला? काय अर्थ आहे कविता लिहिण्यात? या प्रश्नावरती त्यांनी फार सुंदर उत्तर दिलेले आहे - "मी जेव्हा Documentary ही कविता लिहिली तेव्हा मला आशा होती की कदाचित El Salvador चे राज्यकर्ते कदाचित अमेरिकेचे राज्यकर्ते, अन्य काही शक्तिशाली, प्रभाव पाडू शकणारे लोक कदाचित माझे लोक, सामान्य लोक माझी कविता वाचतील, त्यांच्या आशा जागृत राहातील. One of my greatest hope is that in my poems there might be a little grain of sun that I can communicate. That's my way of fighting for my country." म्हणजे अर्थात लेखणीला तलवार मानणारी ही कवयित्री आहे. त्यांना त्यांच्या लिखाणातून आशा प्रज्वलित ठेवायची आहे.
.
मग बिल मॉयर्स विचारतात "तुमची कविता सामान्य लोकांपर्यंत पोचली आहे का?" यावर त्या उत्तर देतात "खरंच पोचलेली आहे आणि याचा त्यांना अतिशय आनंद आहे. कारण त्यांना एक व्यक्ती भेटली जिने त्यांना ही बातमी दिली की त्यांच्या बारा वर्षाच्या म्हणजे एक तपाच्या विजनवासात "guerrillas ", त्यांच्या कविता रेडीओवरती वाचून दाखवत. आणि त्या लोकांना आवडत, आशा प्रज्वलित ठेवत विशेषतः: Documentary या कवितेची विशेष दाखल घेतली गेली.
त्यांना विजनवास का पत्करावा लागला याचे कारण सांगताना त्या म्हणतात १९८० मध्ये त्यांना sorbonne मध्ये कवितावाचनाचे आमंत्रण होते. त्या तेव्हा पॅरीसमध्ये होत्या व त्यांना एका मित्राचा संदेश आला की Archbishop Romero यांची हत्या झालेली आहे. त्या दिवशी कवितावाचन करण्याऐवजी त्यानी भाषण दिले. की तेथे कसा जुलूम चालला अन्याय आहे. आणि काही दिवसातच त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना कळले की त्या परत आल्या तर त्यांचा जीव धोक्यात येईल.
हे विशद करत असतानाच त्या एक काल्पनिक किस्सा सांगतात - एकदा युरोपमध्ये बंद होते व नवीन जुलमी राजवट येते. नवीन राजा सत्तेवर आल्यावरती प्रथम काय करतो तर - असे फर्मान सोडतो की सर्व कवींना आधी मारून टाकण्यात यावे.
.
बिल मॉयर्स त्यांना विचारतात तुम्ही कविता लिहिण्याचा निश्चय किंवा सुरुवात कधी कशी केलीत त्यावर Claribel Alegria म्हणाल्या की १४ व्यावर्षी त्यांनी रिल्केचे "Letters to a young poet" नावाचे पुस्तक वाचले. त्या पुस्तकवाचनाचा परिणाम म्हणून नंतर तब्बल ४ तास त्यांनी येरझारा घातल्या, त्यांच्या मनात विचारांचे काहूर माजले व त्यावेळी त्यांनी ठरविले की आपण कवि व्हायचे. पुढे १८ व्या वर्षी त्या अमेरिकेत आल्या असता सुदैवाने त्यांची गाठ - Juan Ramón Jiménez नामक नोबल पारितोषिक विजेते स्पॅनिश कविशी पडली. व Claribel Alegria यांच्या कवितांनी Jiménez यांचे लक्ष वेधून घेतले. Jiménez हेच पुढे त्यांचे मेंटर (वाटाडे) ठरले. पहिल्यांदा त्या मुक्तछंदामध्ये लिहीत असत तेव्हा Jiménez यांनी त्यांना समजावले की मुक्तछंदाकडे एकदम वळू नकोस. प्रथम पारंपारिक फॉर्म हाताळ. कारण मुक्तछन्द हा सर्वात अवघड प्रकार आहे का तर त्यात यमक, अनुप्रास, लय, गेयता नसल्याने कवितेच्या गाभ्यात ते सौंदर्य असणे हे फार महत्वाचे ठरते. Jiménez यांनी Claribel Alegria यांजकडून खूप वाचन करवून घेतले. त्यांनी कौतुक कधीच केले नाही. जेव्हा जेव्हा Claribel एखादी कविता Jiménez यांना वाचून दाखवत तेव्हा ते त्या कवितेत खोड्याच काढत. ही कविता निकृष्ट दर्जाची आहे, ही कविता फारच बाळबोध आहे वगैरे आणि Claribel Alegria नेहमी रडकुंडीस येत. त्यांना वाटे की आपल्याला कविता कधीच जमणार नाहीत. पण एके दिवशी त्या Jiménez यांचेकडे गेल्या असता त्यांना कळले की Jiménez यांनी व त्यांच्या पत्नीने Claribel Alegria यांच्या त्या काळातील निवडक कवितेचे एक पुस्तकाचं छापले आहे. ते त्यांचे पाहिले पुस्तक.
पण पुढे Claribel Alegria हेदेखील सांगतात की कधीतरी वेळ येते जेव्हा आपला वाटाड्या, आपला गुरु सोडून प्रत्येकाला स्वतः:चा रस्ता स्वतः: शोधावा लागतो.
.
मध्य अमेरिकेबद्दल त्या एक विशेष गोष्ट ही सांगतात की तिथे कवितेचे खूप महत्व आहे. जवळजवळ प्रत्येकजण तिथे कवी आहे. जर मी एखाद्याला म्हणालो की "माझी कविता ऐकतोस का?" तर तो म्हणतो "ऐकतो. पण त्या बदल्यात तू माझी कविता ऐकली पाहिजेस."
.
बिल मॉयर्स यांनी या कवयित्रीची Claribel Alegria यांची मुलाखत घेतली त्या वेळेस त्यांचे वय होते ७० आणि त्या त्यांच्या उदंड आयुष्याविषयी अतिशय समाधानी व कृतज्ञ होत्या. त्यांनी स्वतः:च्या आयुष्यातील महत्वाचे क्षण मांडणारी एक कविता लिहिली जिचे नाव आहे - summing up
ती कविता खाली देते आहे -
.
In the sixty-three years
I have lived
some instants are electric:
the happiness of my feet
jumping puddles
six hours in Machu Picchu
the buzzing of the telephone
while awaiting my mother’s death
the ten minutes it took
to lose my virginity
the hoarse voice
announcing the assassination
of Archbishop Romero
fifteen minutes in Delft
the first wail of my daughter
I don’t know how many years yearning
for the liberation of my people
certain immortal deaths
the eyes of that starving child
your eyes bathing me in love
one forget-me-not afternoon
the desire to mold myself
into a verse
a cry
a fleck of foam.
_______________________________________________________________________
श्रोता
'Intimate kisses' या पुस्तकातील, "Listener" ही "Joseph miller" यांची ही कविता मला खूप आवडली. बरीच करड्या रंगाची - depressing, एकटेपणाची छटा असली तरी intimacy चा (जवळीके) वेगळा पैलू ती समोर आणते. मला हे कविता संपूर्ण पण तुकड्यातुकड्यात वाचकांसमोर मांडायची आहे.

the woman with her face pressed
against my chest & both legs
locked around my knee breathing deeply,
has floated into some quiet stream,
swaying past it's wooded banks without me

वरील वर्णनावरुन हे लक्षात येते की - they have made love आणि आता ती स्त्री (बायको? प्रेयसी? मैत्रिण की आणखी कोणी?) ही रतीक्लांत अन शांत झोपी गेलेली आहे. "without me" या वाक्यरचनेवरुन हे देखील जाणवते की नायकाला एकटे वाटते आहे. मग साहजिकच वाचकाच्या मनात प्रश्न उद्भवतो- काय नातं आहे त्यांचं? कोणत्या प्रकारचा मीलन-क्षण त्यांनी अनुभवला? अन नायकाला एकटे का वाटते? या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढील कडव्यात मिळतात
.
somehow I have told her everything, whispered it
through my cracked voice
into the stillness around her
as we sat in the gloom
waiting for the movie to begin
and later by the bridge,
watching dim surf ignite offshore

अर्थातच हे दोघं सिनेमाला गेले आहेत नंतर पुलावरुन त्यांनी चालत चालत, रपेट घेतली आहे, अन त्याने तिला काही सुख-दु:खं सांगीतली आहेत. काय असावीत ती? अन कवितेच्या शीर्षकातील "Listener" ही ती स्त्री असावी असे आता तरी वाटते. म्हणजे तीच शीर्षकातील "listener" आहे

in this bed, I have exploded each grief into her body,
one by one until they come loose:
the drinking, the failed marriages & jobs,
the weight of my children pressing me down

या कडव्यात, कविता अतिशय gloomy होऊन जाते. त्या माणसाचे वय - तो साधारण मध्यमवयीन असावा हे कळून येते. तो समस्यांनी गांजलेला आहे हे कळून येते. अन त्यांच्या संभोगाकडे त्याने त्या तणावापासून मुक्ती, दु:खाचा निचरा म्हणून पाहीले आहे हे सुद्धा जाणवते. कदाचित ती वेश्या असेल, परत भेटणार नाही या कल्पनेतून कदाचित त्याने सर्व दु:खे confide केलेली आहेत.

पुढील कडवे अतिशय touching आहे. त्या माणसाला त्यांच्या intimacy (जवळीक) नंतर आता हलके व तिच्याबद्दल, "Listener" बद्दल कृतज्ञ वाटते आहे हे आपल्या लक्षात येते.

There must be some kindness I could bring
to her dream now listening to her breath
unwind in the small room
and wishing I had never hurt anyone
म्हणजे आता भूमिकांची अदलाबदल झालेली आहे. तिला शांत झोप लागावी, तिच्या स्वप्नात, शांतीत व्यत्यय नको म्हणून आता तो listener झाला आहे/होतो आहे. अन त्याच्या तणावाचा निचरा झाल्याने, त्याला अपरिमीत शांत वाटत आहे. अन इतक्या वेळाने पहील्यांदा तो तिला निरखून बघत आहे, त्याला ती सुंदर वाटते आहे.

what still country I have come to
where the long grass bends under the animals
when they lie down emptied of suffering?
what slow river flows beneath her forehead,
the petals of her ear adrift in her auburn hair
gathering darkness?

sex चा, दोन जीवांमधील संवाद, दु:ख शेअर करुन हलके होणे हा नितांत सुंदर psychological पैलू ही कविता सामर्थ्यानिशी सामोरी आणते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults