पोस्ट-पार्टम

Submitted by सई केसकर on 27 September, 2019 - 04:26

पहिला मुलगा झाला तेव्हाच तिच्या लक्षात आलं होतं तिच्या जाणीवा चारचौघींसारख्या नाहीत.
सतत पिरपिर करणारं ते मूल तिला अगदी नको नको झालं होतं. नवऱ्याच्या सरकारी नोकरीमुळे राहायला मिळालेलं ते भकास क्वार्टर. तिथे सकाळपासून दुपारपर्यंत सतत घुमणारं बाळाचं रडू. कधी कधी वाटायचं त्या जीवाला उचलावं आणि फेकून द्यावं वरच्या मजल्यावरून. असा विचार आला की तिला स्वतःचीच भीती वाटायची. नवरा जेवायला घरी यायचा तेव्हा कशीतरी ती भाजी पोळी करायची शक्ती आणायची. पण नवरा घराकडे बघून वैतागायचा.
"काय करतेस तू दिवसभर? बाळ झोपलेलं असताना थोडं घर नीट ठेवता येत नाही का?"

तिला त्रास नको म्हणून एक बाई लावली दिवसभराची.  
एकदा बाळ आतमध्ये रडून लाल झालं तरी ती एकटक खिडकीबाहेर बघत होती. बाईनं मग बाळाला उचलून बाहेर आणून दिलं. त्याच्या रडण्याने तिची तंद्री तुटली आणि का कोण जाणे तिनी टेबलावरचा फ्लॉवर पॉट उचलून जमिनीवर आपटला. बाळाला बाईकडून हिसकावून घेत मग त्या काचांमधूनच ती चालत त्याला पाजायला घेऊन गेली. एकदा बादलीतलं पाणी किती कढत आहे हे न बघताच बाळाच्या अंगावर ओतलं. बाई तिथेच मदतीला उभी होती. बाळाचा तो कळवळून आलेला टाहो ऐकताच बाईचा तोल गेला.
"तुमचं लक्ष कुटं असतं ताई? बाळाचे किती हाल चालवलेत! एवढा सोन्यासारखा मुलगा झालाय. मला तीन पोरी हायेत. पन त्यांस्नीबी मी कदी असं वागवलं न्हाई."

त्यादिवशी संध्याकाळी बाईचा पगार देऊन तिला हाकलली. बाईपाठोपाठच ती बाळाला घेऊन सोनाराकडे गेली. सासूने बाळाच्या गळ्यात घातलेली साखळी विकून आली. मे महिन्याची संध्याकाळ होती. रस्त्याच्या दुतर्फा केशरी गुलमोहराच्या वावटळी होत्या. सोनाराकडून परत येता येता कुल्फीवाल्याकडे थांबली आणि बाळाला  पदराखाली घालून दोन कुल्फ्या खाल्ल्या तिनं. पण नजर सतत भिरभिरत होती. क्वार्टरमधल्या कुणी बघायला नको. आपण असे एकटे बाहेर खायला जातो आहे हे कळले तर उगाच चर्चा होईल. नवरा यायच्या आत ती घरी आली आणि मुलाच्या गळ्यातली साखळी बाईने चोरल्याची खबर त्याला दिली. नवऱ्याने रात्रभर घराचा कोपरा अन कोपरा धुंडाळला. जणू काही त्याला खात्री होती की चोरी बाईने केली नाहीये. ती स्वस्थपणे पडून होती. बाळाला भूक लागली की उठायची. त्याचे लंगोट बदलायची. पण दुःख, राग, चिंता यांचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता.

काही दिवसांनी तिचा भाऊ आणि वहिनी बाळाला भेटायला आले. तिला मदत म्हणून वहिनीनं स्वयंपाकघराचा ताबा घेतला. एकदा काहीतरी शोधाशोध करताना एक डबा उघडला तशी अनेक पाखरं त्यातून बाहेर आली. दचकून वहिनीच्या हातातून डबा निसटला आणि जोरात आवाज झाला. तशी ताडकन ती स्वयंपाकघरात आली.
"वन्स, तुम्हाला होत नाहीये घरचं काम. मी उद्या हे सगळे डबे घासून देते तुम्हाला", वहिनी प्रेमानं म्हणाली.
"तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस. खरंतर माझ्या सासूबाईंनी हा झाला तेव्हाच सांगितलं होतं, वहिनीला मदतीला आणू नकोस म्हणून. तुमच्या लग्नाला सात वर्षं झाली तरी अजून पाळणा नाही. मला काही वाटत नाही पण आमच्या सासरचे मला जपून राहायला सांगतात", वहिनीच्या डोळ्याला डोळा देत ती साफ खोटं बोलली.  
वहिनीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. नंतर बराच वेळ भाऊ आणि वहिनी गच्चीवर गेले. भावानं संध्याकाळी, एखादी बाई लाव असे सांगितले तेव्हा नवऱ्याला बाहेरची बाई घरात आलेली चालत नाही असं तिनं सांगितलं. त्यांच्यापाशी विषय  काढू नकोस कारण मी तुला सांगितलं असं वाटेल अशी सूचना दिली.
भाऊ वहिनी लगेचच आपल्या गावी निघून गेले.

मुलगा चालायला लागला. पण अजूनही आईने जवळ घ्यावे म्हणून त्याला फार प्रयत्न करावे लागत. दिवसभर ती बसून राहायची. मुलाला खूप भूक लागली की डाळ तांदूळ कुकरमध्ये लावायची. वाढताना कधी मीठ आहे की नाही हे पाहायचा उत्साहदेखील तिला नसायचा. एकदा बाळाची आत्या तिच्या तीन मुलांना घेऊन राहायला आली. जवळच शंकराचं एक प्रसिद्ध मंदिर होतं. ते पाहायला जायचा सगळ्यांनी बेत केला. मंदिरात लाईनमध्ये निदान चार तास लागले असते. पण अचानक तिची पाळी आली त्यादिवशी. म्हणून तिचा मुलगा आणि त्याची भावंडं मिळून आत्या आणि तिच्या नवऱ्याबरोबर मंदिरात गेले. ते जाताच ती बाजारात गेली. शहराच्या अगदी जुन्या भागातल्या एका खानावळीत. गरम गरम पुऱ्या, तिखट रस्सा, रबडी असं भरगच्च ताट तिनं संपवलं. तरी अजून बराच वेळ होता म्हणून विठ्ठलमंदिरात भजन ऐकायला गेली. भाजनातल्या टाळ आणि मृदंगाच्या तालात  तिची वेगळीच तंद्री लागली. जेव्हा भानावर आली तेव्हा बराच उशीर झाला होता.

"कुठे गेली होतीस?" नवऱ्याने येताच विचारलं, "आम्ही किती काळजीत होतो! मुलांनाही भूक लागली होती. शेवटी वाट पाहून ताईनं स्वयंपाक करायला घेतलाय"

"दूध लागलं असतं म्हणून आणायला गेले होते. जवळच्या सगळ्या दुकानातलं संपलं होतं", ती दुधाची पिशवी दाखवत म्हणाली.

एकाला एक हवं  म्हणून दुसरा मुलगा झाला तिला. पहिल्यावेळी विचित्र वागणूक मिळाली म्हणून यावेळी सासू आलीच नाही. तिला आई-वडील नव्हते.
तिची अक्का आली मग काही दिवस. मोठ्या मुलाशी अक्का छान गप्पा मारायची. त्याला लाडू करून द्यायची. तिच्या मुलांबरोबर तो छान रमायचा. अक्का चमचमीत भाज्या करायची, गरम गरम पोळ्या थेट तव्यातून ताटात वाढायची. तिच्या सासरच्या गुऱ्हाळातली काकवी घेऊन आली होती. मुलं गरम पोळी आणि तूप काकवी खायची. तिचा नवरादेखील खूष होता. घराच्या कोपऱ्यावर येताच घरातल्या हसण्याखिदळण्याचा आवाज त्याच्या कानावर पडायचा. त्यात तिचा सहभाग नसला तरी आपल्या घरातून कुणीतरी आनंदी असल्याचे पुरावे येतायत याचे त्याला कौतुक वाटायचे. नवऱ्याकडून जेवणाची रोज तारीफ होऊ लागली. आणि रात्री त्याच्या भोवती सगळी मुलं गोष्ट ऐकायला गोळा होऊ लागली. ती तिथेच बाळाला घेऊन बसायची. नवरा सिंहासारखी डरकाळी फोडताना डोळ्याच्या कोपरायतून तिच्याकडे बघायचा. पण त्याच्या त्या अभिनयाचे थोडेही कौतुक तिच्या डोळ्यात दिसायचे नाही.

दोन-तीन दिवसातच नवरा घरी आला तेव्हा अक्काचे गोरे गोरे नाक लालबुंद झाले होते. रात्रीच्या गाडीने ती नागपूरला निघाली होती.
"मी काही इथे तुमचे पैसे वाया घालवायला आले नाही हो भावजी", असं म्हणून तिनं टेबलावर हजार रुपयांची नोट ठेवली.
"गेल्यावर घरचे गहू तांदूळसुद्धा पाठवून देईन. माझ्या सासरी कशाची कमी नाही"

रात्री नवऱ्यानं तिला खोदून खोदून विचारलं, "काय म्हणालीस तू नक्की अक्काला? मी तुला खर्चाबद्दल काहीच बोललो नव्हतो!"
कितीतरी वेळ ती निर्विकारपणे धाकट्याला पाजत होती. पण नवऱ्याची बडबड असह्य झाली तशी ती चढ्या आवाजात म्हणाली,
"मला ती आणि तिची मुलं इथं नको होती. मला त्यांचा त्रास होतो"
आणि मुलाला पाळण्यात घालून झोपी गेली.

घरात अन्नाचा कणही नव्हता. आणि मोठा भुकेनी व्याकुळ झाला होता.
नवऱ्याने स्वयंपाकघरातला दिवा लावला आणि बटाटे चिरायला घेतले. 

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याला पोस्ट पार्टेम म्हणतात? असे असेल तर हा खूप भयंकर रोग आहे. मूल जन्माला घालायचा निर्णय घ्यायच्या आधी ह्याची टेस्ट करायची सोय असायला हवी. कारण कथेतील आई कितीही क्रूर वाटली तरी मूल नकोसे असताना त्याचा जन्म व नंतर सांभाळण्याची जबाबदारी त्या आईच्या गळ्यात ढकलणे मला तितकेच क्रूर वाटते.

क्रमशः आहे का ?
पोस्ट-पार्ट्म मध्ये कोणती बाई अशी आणि इतकी चमत्कारिक वागते ?

पोस्ट-पार्ट्म कंडीशन इतक्या टोकाला जाउ शकते?
साधं डीप्रेशन येणं वैगेरे माहितीये.
आणि पहिल्यावेळचा अनुभव असताना दुसरं मुल जन्माला घालणारा नवरा किती बेजबाबदार आहे.

>>>>आई कितीही क्रूर वाटली तरी मूल नकोसे असताना त्याचा जन्म व नंतर सांभाळण्याची जबाबदारी त्या आईच्या गळ्यात ढकलणे मला तितकेच क्रूर वाटते.

आई क्रूर नसून आजारी आहे.
पण त्याचे स्वच्छ निदान होण्यासाठी असेही होऊ शकते याची जाणीव घरच्यांना हवी.
नाहीतर जन्मभर बाईला मेंटल इलनेसशी झुंज द्यावी लागते.

पोस्टपार्टम अधिक पूर्वी आयुष्यात झालेल्या त्रासांमुळे एखादी आई नक्कीच असं वागू शकते.
नवऱ्याला आपली बायको कशातून जातेय ते न कळणं, तिला मदत करायला कोणी नसणं, टोमणे मारणं , योग्य औषधोपचार न मिळणं या आणि अशा अनेक गोष्टींमुळे हे डिप्रेशन आयुष्यभरासाठी पाठीमागे लागू शकतं.

ओळखीतल्या एक काकू अशाच प्रेग्नन्सी नंतर पूर्णपणे डिप्रेशन मध्ये गेल्या , त्यांच्या सासूने 25 वर्ष कुठले कुठले बाबा, धागे दोरे वगैरे केले. औषध न मिळाल्याने त्या काकू आता ठार वेड्या झाल्यात

>>आणि पहिल्यावेळचा अनुभव असताना दुसरं मुल जन्माला घालणारा नवरा किती बेजबाबदार आहे.

ही कथा काल्पनिक आहे.
पण बऱ्याचदा घरातील आईला मेंटल इलनेस आहे हे कळायलाच खूप उशीर होतो.
पण कधी कधी थेट जजमेंट होते तर कधी कधी अशा व्यक्ती जजमेंट होईल याला घाबरून आधीच बंदोबस्त करतात. त्या अनुशंघाने कथा लिहिली आहे.

हा पोस्ट पार्टेम नावाचा रोग आहे ?
- पहिल्यांदा ऐकल.
- फार चर्र्र्र झाल काळजात. +१११

छान लिहीलंञ असं कसं म्हणू Sad

>>>>>हा पोस्ट पार्टेम नावाचा रोग आहे ?
- पहिल्यांदा ऐकल.
- फार चर्र्र्र झाल काळजात
हो. त्याला पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणतात. पण मी पहिला एकच शब्द वापरला आहे. आईला आधीपासून इतर undiagnosed मनोविकार असतील तर गरोदरपण आणि बाळंतपण तणावपूर्ण वाटू शकतं. आणि इतरांपेक्षा अशा आयांना पोस्ट पार्टम डिप्रेशन तीव्रतेने जाणवतं.

कथेतल्या आई आणि दोन्ही बाळांसाठी जीव कळवळला. अक्का आलेली असताना तिच्या लक्षात येते तर उत्तम होते. परीचयातल्या एका डॉक्टर आईला दुसऱ्या डिलिव्हरी नंतर हा त्रास झाला. घरच्यांचा पूर्ण सपोर्ट, डॉक्टरांच्या उपचाराने यातून बाहेर आल्या.

आमच्या आळीत अशी एक बाई रहात होती. मी साताठ वर्षांचा असेल तेव्हा. तर साखरबाई नावाची बाई नवरा घरी नसताना भेळीसारखे खाऊ एकटीच खात असायची. मुलाला देत नव्हती. तिचा मुलगा लोकांनी कचऱ्यात टाकलेल्या केळाची कातडं ( साली) खरवडून खायचा. गल्लीतल्या सगळ्या बायका फार चिडायच्या तिच्या वागण्यानं.

>>>अक्का आलेली असताना तिच्या लक्षात येते तर उत्तम होते.
कुणी फाडकन टाकून बोलले की आपला पहिला फोकस स्वतःवर येतो. त्यामुळे कदाचित समोरची व्यक्ती न्यूनगंडातून किंवा आपल्याशी तुलना होऊन लोकांच्या नजरेत ती अजून खालावेल या भीतीतून असं बोलत असेल असं पटकन लक्षात येत नाही.

कथेतल्या आई आणि दोन्ही बाळांसाठी जीव कळवळला. >>> + १२३ नवरा सुद्धा. माणूस भला वाटतोय पण त्याला नक्की प्रोब्लेम कळलाच नाहीये.

पोस्ट पार्टम डिप्रेशन ह्या इतक्या थराला जाऊ शकतं ह्याची कल्पना नव्हती Sad

आई क्रूर नसून आजारी आहे.
पण त्याचे स्वच्छ निदान होण्यासाठी असेही होऊ शकते याची जाणीव घरच्यांना हवी.
नाहीतर जन्मभर बाईला मेंटल इलनेसशी झुंज द्यावी लागते.>>> +१११११११११

आई क्रूर नसून आजारी आहे.
पण त्याचे स्वच्छ निदान होण्यासाठी असेही होऊ शकते याची जाणीव घरच्यांना हवी.>>>>

पोस्टपार्टमबद्दल माहिती आहे/होती पण जन्म देणारी आई इतरांना न कळणाऱ्या किंवा सयुक्तिक कारण न दिसणाऱ्या नैराश्याने ग्रस्त होऊन मुलाला इजा करण्याइतपत हिंसक होऊ शकते हे प्रत्यक्ष बघितले तेव्हाच विश्वास बसू शकला. ज्यांना पोस्ट पार्टेम माहीत नाही त्यांना आई क्रूर वाटणार.

रिया, 25 वर्षे पोस्ट पार्टेम नैराश्य टिकले? काही महिन्यात स्त्री पूर्वपदावर येते असे मी वाचलेय. माझ्या ओळखीत जी स्त्री होती तिला सहा महिने लागले पण नंतर सर्व पहिल्यासारखे नीट झाले. ती अगदीच खेडवळ असल्यामुळे कसलेही उपचार झाले नाही. डिलिव्हरीनंतर लगेच लक्षणे दिसायला लागल्यावर हॉस्पिटलात गाईनकने व तिने रिफर केलेल्या डॉक्टरने जे उपचार केले तेवढेच. त्या गायनेकमुळेच मला कळले ही पोस्ट पार्टेमची केस आहे. पण तिला नंतर वेड लागले म्हणत गावीच घेऊन गेल्याने उपचार झाले नाही. नशीब चांगले म्हणायचे, आपोआप बरी झाली.

मी तर पोस्ट मार्टम समजून वाचले,आणि लेख संपला तरी कळेना पोस्ट मार्टम चा संदर्भ कसा ते,शेवटी प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले
खरंच अगदी चर्रर्रर झाले,

माझ्यासाठी देखिल अगदी नविन माहिती आहे ही.
खुप छान लिहीले, तुमचे लेख / कथा आवडतात खुप, अन माहितीपुर्ण असतात.

ह्याला पोस्ट पार्टेम म्हणतात? असे असेल तर हा खूप भयंकर रोग आहे. मूल जन्माला घालायचा निर्णय घ्यायच्या आधी ह्याची टेस्ट करायची सोय असायला हवी >>>> Postpartum depression occurs in women soon after giving birth. आधीच टेस्ट कशी करणार? चाइल्ड बर्थच्या आधी १००% निरोगी- मानसिकदृष्ट्या- बायांना पण थोड्या-अधिक प्रमाणात पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असते. इतर प्री-क्न्डिशन असेल तर त्यात भर पडू शकते.

साधनाताई, सुरुवातीच्या 6-8 महिन्यांमध्ये जे पोस्टपार्टम होतं त्याकाळात जो मानसिक त्रास + शारीरिक त्रास झाला त्याने खचून जाऊन लॉंग टर्म डिप्रेशन आलं गं त्यांना.

आणि मग सुरुवातीच्या वर्षात कसले कसले गंडे दोरे, कुठे चर्च मध्ये जा कुठे दर्ग्यात जा , कुठे करणी काढणाऱ्या बाबाकडे जा , 70-70 तास पाण्यातच काय बसा काय आणि काय असल्या अघोरी उपायांमुळे आणखी त्रास वाढला असणारंच

मी तर पोस्ट मार्टम समजून वाचले,आणि लेख संपला तरी कळेना पोस्ट मार्टम चा संदर्भ कसा ते,शेवटी प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आले
खरंच अगदी चर्रर्रर झाले, >+११

कदाचित काही स्त्रिया बाळंतपणानंतर खूप लठ्ठ होतात व शरीर बेढब दिसू लागतं याला पोस्ट पार्टम डिप्रेशन कारण असू शकेल बहुतेक. नैराश्यामुळे भुक नसतानाही खाल्लं जातं भरपूर.

>>>बाळंतपणानंतर खूप लठ्ठ होतात व शरीर बेढब दिसू लागतं
त्यांना लठ्ठ आणि बेढब म्हंटल्यामुळेही येत असावे.

Sad नैराश्यामुळे लठ्ठपणा आला आणि लठ्ठपणा मुळं नैराश्य. वाईट दुष्टचक्र.

पोस्ट पार्टम डिप्रेशन हे इतके अननोन आहे का खरंच? इथल्या बर्‍याच पोस्टी बघून मला खरंच खूप आश्चर्य वाटते आहे.>>>

हो, इथे फारसा awareness नाही. लोक आता आता कुठे डिप्रेशन व त्यासाठी औषधोपचार लागतात हे स्विकारायला लागलेत... पोस्ट पार्टेम फारसे माहीतच नाही. बहुतेक जण बाहेरची बाधा झाली असेच समजतात, त्यांनी वेगळे काही समजायचा प्रयत्न केला तर इतर त्यांना समजवतात. डिप्रेशन अवेअरनेसवर जितके काम केले जातेय सध्या, त्या तुलनेत याचा उच्चारही होत नाहीये अजून.

रिया, खूप वाईट गं.. त्यांचा अपराध नसताना शिक्षा झाल्यासारखे झाले.

कथा खूप आवडली. अंगावर तर आलीच परंतु ..... कुठेतरी स्वतःचे पोस्ट्पार्टेम डिप्रेशन्शी मी आयडेंटिफाय करु शकले. अर्थात इतके सिव्हिअर नव्हते पण पुरेशी झोप न मिळाल्याने चिडचिड होतसे. आई आणि बाबा बाळाला रात्री आळीपाळीने बघत असत. माझाही राग बाळावर निघत नसे. पण फार थकवा आला होता, झोपेची तीssssव्र गरज होती. पण झोपच लागत नसे. आणि जरा कुठे लागली की बाळाला दूध पाजायची वेळ आलेली असे. मग शू काढणे , परत थोपटत बाळाला झोपविणे यातच वेळ जाई. बाळही कॉलिकी होतं ते वेगळच.
.
डिलीव्हरी नंतर किमान २ माणसं दिमतीला लागतात. एकत्र कुटूंब पद्धतीची आठवण तेव्हा येते.

महत्वाचा विषय...परिणामकारक कथा.

पीपीडी सोबत नवमाताना जे जज केलं जातं त्यामुळेही त्रास होत असावा.
उदाहरणार्थ- जर बाप असा बाहेर आईस्क्रीम कुल्फी किंवा पुरीभाजी खाऊन आला तर त्याला अजिबात जज केलं जाणार नाही. रादर, ते अपेक्षितच आहे. बापाने भात भरवताना मीठ चेक केलं नाही तर त्याला जज केलं जाणार नाही. 'व्हेन फादर्स बेबीसीट' नावाखाली विनोदी मीम्स बनवलेले असतात. आईच्या बाबतीत मात्र सतत प्रत्येकच जण तिला मार्क द्यायला बसलेला असतो. मग ते रियल लाईफमध्ये असो वा सोशल मीडियावर. समाजाच्या डोक्यात आदर्श मातेची जी कल्पना असेल त्यात फिट न होणारी कोणी आई असेल तर ती एकतर आळशी, क्रूर किंवा मग मानसिक आजारी किंवा शी निड्स हेल्प किंवा सम सच स्टफ. डिप्रेशन आलं नाही तरच नवल. खरोखर जेन्यूईन पीपीडी केसेस असतात त्यांची गोष्टच वेगळी. पण कोणीतरी आई 'आळशी' आहे,बेपर्वा आहे, शी इज नॉट ट्राइंग हार्ड इनफ- हे जजमेंट खूप सहज पास केलं जातं मग भले तिला खरोखर डिप्रेशन असो वा नसो, ती तिच्या दृष्टिने १०० टक्के देत असो वा नसो.

Pages