पड रं पाण्या .....

Submitted by रमेश भिडे on 25 September, 2019 - 14:09

गेल्या महिन्यात कोकणात गावी गेलो होतो. संध्याकाळी गावाबाहेर फिरायला गेलो आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. छत्री असूनही नखशिखांत भिजायला झालं. कोकणात जोरदार बरसणाऱ्या पावसाला,'मुसळधार 'म्हणतात. म्हणजे पडणारी धार कशी?' मुसळा' सारखी (उखळातले जाडजूड, सरळसोट मुसळ). झोडपणारी! बाजूच्या भाताच्या खाचरात, डोक्यावर ईरली घेऊन एक शेतकरी उभा होता. झाडाचा भक्कम आडोसा घेत, मी त्याला विचारले," काय गाववाले! यंदा पाऊस कसा पडतोय? "पावसा पासून चेहरा वाचवत तो उत्तरला,"एकदम भारी !' सासूचा पाऊस'! भयंकर कडाडतोय! हाणतोय नुसता!"
आता शहरातल्या लोकांना 'मोसमी पाऊस' एवढच माहित असत.हा ग्रामीण भागातला 'सासूचा पाऊस' कुठला ?असा त्यांना प्रश्न पडला असेल.

धान्य पिकवणारी जमीन आणि कष्ट करणारी स्त्री हे भारतीय संस्कृतीचे दोन महत्त्वाचे मूलाधार आहेत. जमिनीला आम्ही,' भूमाता' म्हणजे आई मानत आलो आहोत. पाण्याच्या साह्याने, सृजनाची किमया साधणारी आणि माणसाला अन्न, वस्त्र, निवारा देणारी ही 'काळी आई', आणि या काळ्या आईत, पावसाच्या पाण्यावर धान्य पिकवणारा तिचा भूमिपुत्र शेतकरी. आपण पावसाला ओळखतो, रिमझिम बरसणारा ,झिम्माड खेळणारा, मोसमी वाऱ्यावर, ठराविक मोसमात येणारा, एक बरवा आणि हिरवा ऋतू म्हणून. पण शेतकऱ्याचे पावसाशी नाते मात्र त्या पलीकडले आहे. रोहिणी, मृग, आर्द्रा वगैरे वगैरे ही सारी, आपल्यासाठी, नक्षत्रांची पंचांगातली नावे! शेतकऱ्यांनी याच नक्षत्रांना, हमखास बरसणाऱ्या पावसाला, नातेसंबंधातली खास नावे दिली आहेत. त्याच्या भाषेत!

जीवन जगत असताना वेगवेगळ्या नात्यांमध्ये, वेगवेगळी स्वभाववैशिष्ट्ये आढळतात. मानवी भावनांचे कंगोरे दिसतात. शेतकऱ्यांनी पाऊस कसा पडतो, याचे अनेक पिढ्यांपासून निरीक्षण केले. मग त्यांनी,पावसाच्या या नक्षत्रांना ,नातेसंबंधातील, नात्यांच्या भाव बंधातील, मजेशीर नावे दिली आहेत. ही नावे शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत.
रोहिणी ,मृग आणि आर्द्रा नक्षत्रात पाऊस, तर्‍हेवाईक पणे पडतो. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला, तो कधी सुरू होईल? किती प्रमाणात आणि कुठे पडेल? याची काहीच खात्री नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या नक्षत्रांना कोणतीच नावे दिली नाहीत. हवामान खात्याचा सुरुवातीचा पावसाविषयी चा अंदाज असाच बेभरवशी असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनीही या नक्षत्रांना अनुल्लेखाने टाळले आहे. पुढची ठेवणीतली ग्रामीण नावं मात्र अशी आहेत.

(१) पुनर्वसू नक्षत्रात पडणारा पाऊस जोरदार, मुसळधार, जोशपूर्ण, पण बिन्डोक असतो म्हणून या पावसाला शेतकऱ्यांनी 'तरणा 'असे नाव दिले आहे.

(२) पुष्य नक्षत्रात असलेल्या पावसात सातत्य असते, पण तो बारीक-बारीक पडतो. शेतीसाठी तो अत्यंत उपयोगी असतो. या पावसाला जोश नसतो आणि तो रीप रीप, रीप रीप, असा पडत राहतो म्हणून त्याला' म्हातारा' असे नाव दिले आहे.

(३) मघा नक्षत्रात पडणारा पाऊस जोरदार ,कडाडणारा आणि त्रास देणारा असतो, म्हणून त्याला 'सासूचा' पाऊस म्हणतात. या पावसात ढग सतत गडगडाट करीत असतात.गेल्या महिन्यात त्यादिवशी मी पावसाच्या तडाख्यात सापडलो, तो हा सासूचा पाऊस होता. या पावसाकडे मान वर करून बघणं कठीण असतं.

(४) पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात, पाऊस शांतपणे पडतो. हा पाऊस शेतीला खूप उपयोगी असतो, म्हणून त्याला 'सुनांचा पाऊस' म्हणतात. ( हे ऐकून सुना खुश होतील पण वास्तवात या 'सुना' नंतर केव्हा तरी 'सासू' होणार असतात)

(५) हस्त नक्षत्रात पडणारा पाऊस, मध्ये मध्ये पण दमदारपणे पडतो. हा सुद्धा शेतीला उपयोगी असतो. दमदार, डौलदार, पण जड पणे विजांच्या कडकडाटात, पडणाऱ्या या पावसाला 'हत्तीचा पाऊस' म्हणतात.

(६) उत्तराफाल्गुनी नक्षत्रात पडणारा पाऊस, नंतर येणाऱ्या रब्बी पिकासाठी उपयुक्त असल्याने त्याला 'रब्बीचा पाऊस' म्हणतात.

नक्षत्रांच्या या खास नावां व्यतिरिक्त आणखीन एक मजेशीर गोष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या पडणाऱ्या पावसाशी संबंधित, वापरत असलेल्या वेगवेगळ्या म्हणींची. या छोट्या-छोट्या पण रांगड्या भाषेतील म्हणींमध्ये, मोठा आशय दडलेला आहे.

चित्रा नक्षत्रात पाऊस पडला तर, तयार झालेल्या उभ्या पिकाचे नुकसान होते, आणि भातासारखे पीक शेतात आडवे पडून कुजून जाते. यावरून शेतकरी म्हणतात, "पडतील चित्रा ,तर भात खाईना कुत्रा!"

प्रामुख्याने नक्षत्र पाऊस, आणि पिके यांच्या आडाख्यावर तयार झालेल्या , शेतकऱ्यांच्या या म्हणी फार काही सांगून जातात.

" पडती मघा, तर वरतीच बघा !" हे मघा नक्षत्रातल्या पावसासंबंधी शेतकऱ्यांचे म्हणण. खरं म्हणजे ,म्हणता म्हणता म्हणून निर्माण झाली ती म्हण !आणि म्हणून ती ग्रामीण भागात बोलीभाषेत , सहज रूढ झाली.

उत्तरा नक्षत्रात पाऊसच पडला नाही तर ,भात पीक तयारच होत नाही आणि मग शेतकरी म्हणतो, "न पडे उत्तरा, तर भात न मिळे पित्तरा!"

स्वाती नक्षत्रातील पाऊस पिकांना चांगला असतो म्हणून, स्वाती नक्षत्रात पाऊस पडला तर" पडतील स्वाती, तर पिकतील मोती !" असं शेतकरी आनंदाने म्हणतो.

हस्ता तील पाऊसही शेतीसाठी उपयुक्त असतो. त्यामुळे," पडतील हस्त ,तर शेती होईल मस्त!' असे सहज उद्गार म्हणी च्या रूपाने ग्रामीण भागात उमटतात.

पावसाच्या नक्षत्रांना, शेतकऱ्यांनी दिलेली मजेशीर नावे आणि रुजलेल्या गमतीदार म्हणी, आपण पाहिल्या. या साऱ्या मागे शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि अनुभव आहे.
पावसाशी निगडीत, इतर म्हणी सुद्धा प्रचलित आहेत.

"शेता जाय पावसू अन पुत्ता जाय आवसू (आई) !"असं कोकणात म्हणतात.
"नवऱ्यानं मारलं नी पावसाने झोडलं तर सांगायचं कुणाला?" असं कुणबी स्त्रिया बोलतात तेव्हा आक्रंदणारे समाज जीवन डोळ्यातून बरसतं.

अति पावसामुळे शेतातून पाणी वाहायला लागले की शेतकरी उद्विग्नपणे "वावरात नको नाला आणि घरात नको साला !" असं नकळत नातेसंबंध उलगडत बोलून जातो.

ओल्या दुष्काळात पीके खराब झाली की "शेतातली सुपारी नासली नी, पैशाला पासरी विकली!" असं शेतकरी अगतिकपणे म्हणतो तेव्हा मन विषण्ण होतं.

यंदा सगळ्या नक्षत्रांत, सलगपणे , अतिवृष्टी करणाऱ्या पावसाकडे पाहिले तर या धरणीला 'सासु'रवास' भोगावा लागतोय काय? असा प्रश्न पडतोय; आणि काळजी वाटते कि हा पाऊस चित्रा नक्षत्रातही, असाच चालू राहिला तर "पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा!"ही परिस्थिती येईल काय ?
वरुणराजा कृपा कर!

संपादित : मूळ लेखक : प्रमोद टेमघरे ,पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार सुरेख लेख आहे हा. खूप आवडला. हे काहीही माहीत नव्हते.
>>>>>>>>>>>>>>>>> "नवऱ्यानं मारलं नी पावसाने झोडलं तर सांगायचं कुणाला?" असं कुणबी स्त्रिया बोलतात तेव्हा आक्रंदणारे समाज जीवन डोळ्यातून बरसतं.>>>>>>>>>>>
माझी एक मैत्रीण एकदा सहज बोलून गेली नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरचा विंचू, ठेवत येत नाही की वहाणेनी ठेचता येत नाही.
बाप रे!!! मी चमकले होते. पण ती कदाचित म्हण असेलही.

मस्त माहिती. ह्यातले बरेच आढाखे ऐकून माहित आहेत. काही म्हणीही. ह्या सगळ्याचं नीट डॉक्युमेंटेशन करायचं डोक्यात होतंच केव्हापासून.