माझी आजी

Submitted by सामो on 24 September, 2019 - 10:13

"लिव्ह योर बेस्ट लाइफ" या "ओ - द ऑपराह मॅगझिन" च्या अंकामधील एका लेखाचे भाषांतर. हा लेख त्यातील लहान लहान वाक्यशैली व मसुद्यामुळे मला खूप आवडला.
_____________________________________________________________

बालपणी, उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू. कॅलिफोर्नियामधील "पॅरडाइज" नावाच्या गावात माझी आजी रहात असे.गाव नावाप्रमाणेच देखणे, वनश्रीने नटलेले खेडे होते.आमच्या सुटीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकविले नाही?शिवणकाम म्हणा, विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनविणे म्हणा सर्व काही शिकविले. हे सर्व तर शिकविलेच परंतु आमच्या आजोळी बेसिनच्या सिंकखाली टर्पेंटाइनचा बॉक्स, बरेचसे ब्रश व ३ डझन एनॅमल पेंटच्या बाटल्या होत्या.माझी बहीण व मी शास्ता तलावाकाठून शोधून शोधून आणलेल्या काळ्याभोर चपटोळक्या दगडांवर बेडूक व बदके रंगविण्यात दुपार व्यतित करत असू. आजीने ही कला सुद्धा आम्हास शिकवली होती. मला नाही वाटत तिच्याइतकी प्रेमळ व दक्ष आजी अन्य कोणास लाभली असेल. माझ्या आजीसारखी प्रेमळ व दक्ष आजी मिळायला खरच पुण्यच लागत असणार. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात म्हणा, छंदात म्हणा, पाहुण्यारावळ्यात, घराची देखभाल करण्यात व्यग्र असे. आम्ही तिला टी व्ही पाहताना असे कधी पाहीलेच नाही. तिच्याकडे आमच्या आजोळी एक पाळीव कुत्रासुद्धा असल्याचे मला स्मरते होता त्याच्याशी खेळण्यातही वेळ कसा निघून जाई ते कळतच नसे. मला, माझ्या वयाला साजेसा, पोस्टचे स्टॅंप गोळा करण्याचा छंद जडला होता.माझी आजी या छंदामध्ये माझी मदत करत असे. अजुन एक प्रिय आठवण म्हणजे रात्री मी सिंकसमोर स्टूल घेऊन उभी रहात असे व आजी माझे लांबे केस हलकेसे लिंबू पिळलेल्या ऊन ऊन पाण्याने स्वच्छ धुवून देत असे. अशा अनेक मोहक, निरागस आठवणींचे कोलाज माझे आजोळचे वास्तव्य होते. आजोळच्या मातीत माझी मूळे घट्ट अगदी पक्की रोवली गेली ती याच काळात.

जसजसा काळ गेला तसतशी मात्र आमच्या दोघींच्या भूमिकांची अदलाबदल होत गेली.पूर्वी आजी मला रपेटीला नेत असे , आता मी तिला चक्कर मारवून आणते.पूर्वी आम्ही दोघी वाचलेल्या पुस्तकांवर भरभरुन चर्चा करत असू, अजूनही करतो फरक एवढाच की पूर्वी ती मला पुस्तके वाचून दाखवित असे आता तिची नजर अधू झाल्याने, मी तिला मी लिहीलेली पुस्तके वाचून दाखविते.पूर्वी आम्ही एकत्र, नाटकांना जात असू ते मात्र अजुनही जातो. पण तेव्हाही नाटक सिनेमात तिला रस म्हणावा असा कमीच होता. कोणते पात्र कोणती भूमिका करत आहे याची गल्लत अन गोंधळ उडून ती तेव्हाही चिडचिडेपणा करत असे.

१६ वर्षे आजी माझ्या आईबरोबर होती.त्या काळात आजीने दुर्दैवाचे दशावतार पाहीले. तिने काय पाहीले नाही! तिच्या आजीच्या डोळ्यांसमोर तिने तिच्या मैत्रिणी, ८ भावंडे व तिच्या पतीचा मृत्यू पाहीला. माझी आजी कशी तगली तिचे तिलाच ठाऊक. तिच्यासाठी आयुष्याचे रहाटगाडगे खूप चेंगटपणे व वेदनामय रीतीने त्या काळात सरकत होते आणि त्याचा निषेध म्हणून म्हणुन की काय ती खाण्यावर राग काढत असे.अगदी कृश, १०३ पौंडांची अशी ती झाली तेव्हा मात्र आम्ही नाइलाजाने तिला वृद्धाश्रमात दाखल केली.

कधी माझी आई तिच्याकडे चक्कर मारत असे तर कधी मी. आम्ही काळाची अशी वाटणीच जणू केली आम्ही परस्परात जबाबदारी वाटून घेतली. मी गेले की बरेचदा आजीला माझ्या घरीच घेऊनच येत असे व पहाटे आंघोळीच्या वेळी, सिंकजवळ वाकायला लावून तिचे आता विरळ झालेले शुभ्र केस धुवून देत असे.आमची एक चाकोरीच ठरुन गेली होती म्हणा ना.मी तेव्हासुद्धा कधी दगडांवरती नक्षीकाम, रंगकाम करत असे व आजीला सोबत देत असे तर कधी काकवीची गरमा गरम ताजी बिस्कीटे बनवून तिला भरवत असे. जरा विरंगुळा म्हणुन तिला बाहेर घेऊन जात असे,कधी खरेदीला तिला घेऊन जात असे तर कधी वाणीसामान आणवयास आम्ही एकत्रच जात असू. तिच्या वेणीफणीबद्दल, आवरण्या बद्दल बोलायचे झाले तर माझे रुपांतर जणू त्या इवल्या इवल्या दक्ष इजिप्शिअन पक्ष्यांतच झाले होते, जे मगरीच्या पाठीवर ऊभे राहून मगरीचे खवले चोचीने साफ करुन देत. मी तिला शांपू करत असे , नंतर कंडीशनर ने मसाज करुन ऊबदार टॉवेल तिच्या केसांना, डोक्याला बांधून शेक देत असे, नंतर ड्रायरने केस कोरडे करुन सुंदरशी वेणी निगुतीने घालून देत असे. मग हनुवटीवरची लव काढण्याची पाळी. आजीला स्वयंपाकघराच्या खिडकीसमोर सोनेरी कवडशात बसवून मी ट्वीझरने तिच्या हनुवटीवरची लव काढून देत असे. आजीही हे सर्व हक्काने करवून घेइ, मध्येच हनुवटीवरुन हात फिरवत हक्काने ती एखादा चुकार केस माझ्या लक्षात आणून देई "हा बघ हा राहीला." नंतर तिची नखे कापून , तासून (फाईल करुन) व तिचा मूड बघून मी रंगवूनही देत असे. नंतरची पावलांची मालीश हा माझ्या आजीचा आवडीचा कार्यक्रम असे. माझ्यकडे निळा मोठ्ठा असा चीनी मातीचा सूपचा बोल होता. त्यात कोमट पाणी घेऊन, किंचित सुगंधी सफरचंदाचे सायडर व्हिनेगर घालून मी आजीची पावले त्यात १५ मिनीटे बुडवून ठेवत असे. तिच्या पावलांची नखे नरम पडली की पाय बाहेर काढून कोमट टॉवेलने पुसून मग मी लव्हेंडर तेलाने त्याची मालीश करुन देई.

या संदर्भात बायबलमधील एक वाक्य मला पक्के स्मरते - दुसर्‍याची पावले मालीश आदि करुन सेवा करणे हे सर्वात मोठ्या विनम्रतेचे व साधेपणाचे लक्षण वा खूणगाठ आहे असे काहीसे ते वाक्य आहे. अजूनही मला जेव्हा लोकं म्हणतात की किती ग्लॅमरस आयुष्य तू जगतेस तेव्हा मनातल्या मनात आजीच्या पवलांची केलेली ही सेवा आठवून मी हसते. मला आठवते क्वचित मी नखे कापू लागण्याआधीच, दुखेल या भीतीने आधीच आजी लहान मुलीसारखी आरडाओरडा करते. मध्यंतरी मला कोणीतरी सांगीतले की वृद्धाश्रमातच "फॅन्सी पेडीक्युअर" ची सुविधा उपलब्ध आहे. मी खूप आनंदाने आजीला घेऊन तेथे गेले. सगळे सोपस्कार होईपर्यंत मी आजीजवळच होते. सगळे पार पडल्यावर निघताना आजी कुरकुरली "मला अनोळखी लोकांच्या हाती माझी पाय सोपवायला कसेसेच वाटते. तुला होत नसेल तर मला सांग, मी पाहते काय करायचे ते." आता आजीला स्वहस्ते पायाची काळजी घेणे हे तिच्या वयोमानानुसार तिला शक्य नाही हे ती देखील जाणून होती. त्यामुळे परत ये रे माझ्या मागल्या झाले

पूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी जेव्हा आजीच्या बटव्यात पैसे असत व आम्ही एकत्र खरेदीला जात असू तेव्हा मी तिला सुटी नाणी नीट मोजून देत असे. आजीला काय त्याचे कौतुक होते. त्या लहानशा कृतीचेही किती अप्रुप होते, किती कौतुक वाटे. अगदी ठेल्यावरच्या (काऊंटर) अनोळखी मुलीला ती मोठ्या कौतुकाने सांगे, "गुणाची हो माझी नात.ती नसती मी काय केले असते बरे?" पण मग माझ्याकडे वळून काळजीने ती विचारत असे "माझं सगळं तू करतेस ग माझी बाय पण माझ्या वयाची तू होशील तेव्हा तुझं कोण करेल गं?" आणि ते खरंही होतं. मला ना मूल ना नवरा. पण मला ते नकोही वाटते. खरच मी म्हातारी झाले की माझी नखे कोण कापणार, कानातला मळ कोण काढणार अन हनुवटीवरची लव कोण काढून देणार हा प्रश्नच आहे. पण माझी काळजी कोणीतरी घ्यावी या हेतूपोटी मी मुलांना जन्म देणार नाही हे नक्की. आणि तसेही पाहता आता मी ३९ वर्षाची आहे पण मी ९४ वे वर्ष पाहीन याचा काय भरोसा? आयुष्याच्या धुमश्चक्रीत कारचे अपघात आहेत, कर्करोगासारखे रोग आहेत , अनेक संकटे आहेत. ९४ वर्षे पूर्ण व्हायच्या आत माझा घास घेतला जाऊ शकतोच.

पण तिच्या या प्रश्नावर मी तिचा हात हातात घेउन तिला विश्वास देत असे की "का गं काळजी करतेस? तुझी नात रग्गड पैसा बाळगून आहे बघ.मी किनई म्हातारपणी माझ्या दिमतीला एक नात भाड्याने घेणार आहे. ती जगातील सर्वात गुणी नात असेल. मी तुझी जितकी काळजी घेते तिच्या १० पट जास्त ती नात माझी काळजी घेईल. मी मरतेवेळी माझी संपत्ती तिच्यासाठी सोडून जाईन. आता कळला तुला माझा बॅक अप प्लॅन?" हे माझी बोलणे तिला पटून जात असे आणि हायसे होऊन, माझा हात दाबत ती उद्गारे "मोठी शहाणी आहेस ग तू. नकोच अडकूस मुलाबाळांच्या पसार्‍यात." पण तिच्या या शब्दांमागला अर्थ मला कळत असे. तिला म्हणायचे असे "मी तुझी एकमेव लेक...मला कुण्णी कुण्णी वाटेकरी नको."

पण एक गोष्ट मात्र चांगली झाली, वृद्धाश्रमाच्या वातावरणात आजीने खाण्यापीण्याशी परत दोस्ती केली. एक दीड वर्षात तिने चांगले बाळसे धरले. आम्ही जेव्हा रुटीन चेक अपला डॉक्टरांकडे गेलो तेव्हा ती १८० पौंड भरली. त्या आकड्यावर तिचा विश्वासच बसेना. "काय! अगं काय हे!मला स्वेटर काढून परत वजन करु देत ." यावर मी मिष्कीलपणे हसत म्हणाले "७५ पौंडाचा स्वेटर की काय तुझा?" त्यावर लटक्या रागाने ती म्हणाली "लोकरीचा आहे. असूही शकतो." डॉक्टर मात्र तिने धरलेल्या बाळशावर खूष दिसले. तिचा मधून मधून जाणवणारा स्म्रुतीभ्रंश व अधू नजर सोडता तिची तब्येत टुणटुणीत आहे व ती नक्की शंभरी पार करेल याची मला खात्री आहे.

माझ्या लहानपणी आजी बाथटबमध्ये माझी पाठ स्क्रबरने घासून देत असे.आणि पाठ घासता घासता चिंता करत पुटपुटत असे "मी पुढची १० वर्षे तरी बघेनसे वाटत नाही." आता ९४ व्या वर्षी ती बाथटबमध्ये असते आणि मी तिची गोरी गुलाबी पाठ घासून देते. हो मला माहीत आहे की वृद्धाश्रमात आजीच्या ऊन ऊन स्नानाची सुव्यवस्था आहे पण पाण्याचा शेक देत तिच्या नातीने तिला मायेने स्नान घालणे यातील प्रेमाची सर त्या व्यवस्थेला थोडीच येईल? माझे तिच्यावर अतोनात प्रेम आहे, ती माझी आहे, माझाच एक हिस्सा आहे.

मला आठवते एक वेळ होती जेव्हा माझा समज होता की प्रेम म्हणजे दुसरेतीसरे काही नसून केवळ उष्ण श्वास, दीर्घ चुंबन आणि आसक्तीपूर्ण मीठी आणि स्पर्शाची देवाणघेवाण यातच फक्त ते सामावलेले असते. पण जसजसा काळ सरत गेला, मी प्रगल्भ होत गेले. आज, आत्ता या टप्प्यावर मला प्रेमाचे काही आगळेच रुप गवसले आहे. आता मी जाणते की प्रेम अन्य रुप हे वाट सरता सरत नसताना एकाने दुसर्‍याला दिलेली दूरवरची साथ, आधार, विश्वास हेसुद्धा आहे..

मी आजीला टबमधून बाहेर येण्यास मदत करते. माझे हात व झगा पाण्याने भीजला आहे पण आजीला थंडी लागू नये म्हणून मी कोरडा टॉवेल तिच्यासमोर धरते. मी हातावर गुलाबाच्या मंद सुगंधाचे लोशन घेऊन तिच्या पाया - पाठीवर चोळू लागते व आजी विचारते "काय आहे ग ते? कसला वास येतो आहे इतका छान?" मी तिला लोशनचे नाव सांगते. ती म्हणते "कधी ऐकलं नाही पण बरं वाटतय." आणि मी समाधानाने मनाशी म्हणते "लोशन आवडणे, हवेसे वाटणे हेच तिच्यातील जीवनावरच्या प्रेमाचे लक्षण आहे नाही का!

Group content visibility: 
Use group defaults

छान

आमचं आणि आमच्या आजीचं असंच गुळपीठ होतं, आता आजी नाही पण प्रेमाचे क्षण निरंतर आहेत. Happy

इंग्लिश कथा दे ना प्लीज. लेकीला देते वाचायला. ती तिच्या आजी सोबत निर्माण करेल काही तरी असलीच गंमत.

आता ९४ व्या वर्षी ती बाथटबमध्ये असते आणि मी तिची गोरी गुलाबी पाठ घासून देते. हो>> ओफ्रा मासिकात व्हाइट म्हातारीवर लेख आला. किती मोठे मन आहे ओफ्राचे.

....