चंद आझाद घड़ियाँ

Submitted by सामो on 23 September, 2019 - 11:07

ठहराव .मौन.silence.शांतता.pause - या विषयाबद्दल लेख वाचत होते. लेख खूप आवडत होता. लेखकाचे म्हणणे होते की कोणत्याही शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या शब्दाच्या अलीकडली व त्या शब्दाच्या पलीकडली या दोन्ही शांततांना फार महत्त्व असते. या शांत जागा नसत्या तर शब्दच नसते केवळ एक सततचे आवाज एवढेच ऐकू आले असते. गदारोळात काहीही ना उमजले असते ना कशाचा अर्थ लागू शकला असता.
.
मग मनात विचार आला दिवसाच्या खरं तर आयुष्याच्या धामधुमीत , प्रत्येक क्षणी नाना विकार मन:पटलावरती उमटत असताना, अनेक भावना, भावावस्था (मूडस) एखाद्या हत्तीसारखा मनात उच्छाद मांडत असतात. मग दिवसभरात अशी कोणती जागा असते, वेळ असते जेव्हा की आपण स्वस्थ होतो. दिवसा ऑफिसमध्ये, संध्याकाळी घरी घडलेल्या घडामोडींचा, प्रसंगांचा अर्थ मूर्त किंवा अमूर्त मनात लावू लागतो. असे क्षण राजरोस येतात का? आणि मला पट्ट्कन आठवला तो रोजचा बसचा प्रवास.
.
पहाटे बस पकडून ऑफिसला जायचे. अर्धा तास लागतो. आणि संध्याकाळी त्याच बसने परत यायचे. हा प्रवास अत्यंत शांततापूर्ण सुखदायी, आरामदायी असतो. का? थोडीच बसमध्ये गाद्यागिरद्या आहेत, सुगंधी अत्तरे आहेत की संगीत आहे मग प्रवास इतका मनस्वी का आवडतो तर तो माझा वेळ असतो (Me Time ). ना नोकरीतील ताबेदारी ना घरात कोणाची ताबेदारी. मन अतिशय शांत होउन जाते. विलक्षण अनुभव असतो.. एक ठहराव.
.
वक़्त की क़ैद में ज़िंदगी है मगर
चंद घड़ियाँ यही है जो आज़ाद हैं
.
बसमधून रोज अगदी न चुकता बाहेर माझ्याकरता सूर्योदय होतो केशराने माखलेल्या आभाळात निसर्ग सढळ हस्ते रंगांची उधळण करतो. कुठे आकाशाकडे प्रार्थानेकरता हात उंचावलेले वृक्ष , हिमाच्छादित भूमी तर कुठे कबुतरांचा थवा दिसतो. मासे पकडण्याकरता तळ्यावर जमलेले सीगलस तर कुठे क्वचित हरणे दिसतात. एकदाच अतिशय देखणा एकटा तरुण नर पाहिलेला आहे बाकी कळपाने हरीणी व पाडसे च दिसतात. हे सारे विलोभनीय दृश्य पहा अथवा नका पाहू, डोळे मीटा, झोपा मनास येईल ते करा. Me Time .. माझ्याकरता निसर्गाने उघडलेले सौंदर्याचे भंडार.
.
बरं असा बसचा प्रवास बाह्य जगाताशीच नव्हे तर आतल्या घडामोडींशी देखील निगडीत असतो. इंग्रजी नंबर 8 म्हणा ना. दोन वर्तुळे एक आधिभौतिक तर एक भौतिक जिथे एकमेकांना छेदतात तो हा प्रवासाचा वेळ. बसमध्ये नमुने दिसतात. बरेचदा, एक म्हातार्‍या आफ्रिकन अमेरिकन बाई दिसतात. भडक मेक अप, हातात काठी, किंचित उसवलेला फ्रॉक, काळ्या कुळकुळीत चेहर्यावर थकवा आणि तरीही न लपणारा मनस्वीपणा आणि हातात मेकडोनाल्डचे पुडके. मनात विचार येतो - कुठे काही विकल्प चुकले तर नाहीत या स्त्रीचे म्हणून कदाचित कुटुंब नाही, पैसे नाहीत. दिसायला एके काळी सुंदर आहे हे भग्नावशेषावरुनही दिसते आहे. कोणता विकल्प चुकला? आणि मुख्य म्हणजे यातून मी काय शिकायचे? ....
एकदा एक भिकारी , बेघर मनुष्य , त्याचा पाळीव कुत्रा घेउन बसमध्ये आला होता. अगदी फाटका, जीर्ण, दुर्दैवी चेहरा व अंगयष्टी, पेहेराव. कसाबसा उभा होता. काय वाटलं माहीत नाही पण माझ्या शेजारी येउन बसला. मला सारखं वाटत होतं की त्याला काहीतरी विचारायचे आहे पण तो संकोचतो पेक्षा घाबरतो आहे. आणि ते खरेही ठरले, खूप वेळानंतर त्याने मला विचारले मला "तुला ट्रान्स्फ़र तिकीटाची गरज आहे का? मी विकायला तयार आहे. माझ्याकडे बसचा पास असूनही , १ डॉलरला मी ते तिकिट विकत घेतले. त्या दिवशी राहून राहून तो आठवत राहिला. काय विकत घेतलं त्याने १ डॉलर मध्ये? मॅकचिकन? चिटोज (चीझवाले चिप्स) की सिगारेट. का आली असेल ही वेळ त्याच्यावर. लहनापण कसं गेलं असेल, त्याच्यावर कोणी प्रेम केलंतरी असेल का? घशात एकदम कढ आला.
नंतर एकदा असाच एक भिकारी मागे एकदम मागे बसला होता. काय की, त्याचा स्टॉप जायला लागला म्हणून त्याने ड्रायव्हरला थांबायची हाक दिली पण ती हाक तरी कशी अगदी प्रिमिटिव्ह , घशातील आवाज, एकदम जोरात विचित्रच प्राण्यासारखा एकदम प्रिमिटीव्ह . बसमधले सर्वच लोक दचकून मागे वळून वळून पाहू लागले. तो उतरला खरा. पण मग मला वाटले कदाचित तो माणूस कोणाशी ही कधी बोललाच नाहीये, त्याचा जगाशी संपर्क इतका तुटला आहे की तो आवाजही modulate करणे विसरला आहे. हीच शक्यता आहे. बसच्य प्रवासात अनेक स्मार्ट बायका दिसतात. कधी चाळीशीमधील आत्मविश्वास असलेली प्रौढा तर कधी कॉलेजमध्ये जाणारी एखादी तरुण खरं तर लहान मुलगी दिसते. अतिशय कर्टियस (ओल्ड फॅशनड ) एखादा पुरुष कधी सर्व स्त्रियांना आधी बसमध्ये चढून देतो व मग स्वतः चढतो. तर कोणी हाऊडी करत हॅट काढत अनेकदा अभिवादन करतो, अनेक प्रकारचे लोक दिसतात. परत आपल्याला स्वातंत्र्य रहाते या गर्दीतच हरविलेला एक चेहरा बनून रहाण्याचे. One in Many & Many in One ही Walt Whitman कवीची कल्पना आपण जगतो. क्वचित एखाद्या दिवशी जुन्या प्रेमाची आठवण येउन मूड अगदी हळवा झालेला असतो , आपण आपल्यात खोल हरवून गेलेले असतो. आणि हे समजून सावरून, गर्दीही आपल्याला निवांतपणा देते. कसलीही अपेक्षा करत नाही, की हक्क गाजवत नाही. खरं तर हा बसचा प्रवासच माझ्या मानसिक शांतीचा कणा आहे. हा प्रवास नसता तर मला माहीत नाही मी कुठे शांती शोधली असती. कदाचित ध्यान वगैरे करायला लागले असते. बाहेरच्या जगातील , नोकरीवरील महत्त्वाकांक्षी (पर्पझ ड्रिव्हन) अस्तित्व आणि घरातील अगदी निवांत आयुष्य या दोहोंना सांधणारा दुवा आहे हा बस प्रवास.

Group content visibility: 
Use group defaults