बस्स! जास्त मागणं नव्हतं

Submitted by सामो on 21 September, 2019 - 14:34

"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "What we should have done" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -
.
१९३० ची बात आहे ... ९ पूर्ण करुन मला १० वं वर्षं लागलं होतं. बापाचा अन माझा सुटीचा एकच दिनक्रम असे तो म्हणजे बाप पुढे अन मी मागे उड्या मारत दोघे जंगल, ओढे, ओहळ, दलदल्,हिरवळ तर कुठे नदी नाले तुडवत जात असू. बाप पुढे अन मी मागे, बाप त्याच्या आवडत्या गँगबरोबर अन मागे मी बापाबरोबर फरफटत. वाटेत विस्कॉन्सिनच्या बर्फाळ थंडीने कधी कान लाल होत तर कधी पाय सोलवटून निघत, कपडे भीजत तर कधी अंग काट्याकुट्यांनी ओरबाडून निघे. पण बाप काही केल्या थांबत नसे, जशी जशी गँग पुढे जाई तसतसा बाप त्यांच्या मागून वणवण करे अन मी त्याच्या ही मागे. अन हे सर्व सहन करताना, त्या कोवळ्या वयात मला हे जाणवे की गँगमधले बाकी शिकारी, धाडसी rugged पुरुष अन आपल्यात, आपल्या बापात फरक आहे. आम्ही दोघे त्या गटाकरता उपरे आहोत, त्या गटामध्ये मिसफिट आहोत. शिकार-मासेमारी हा आपला प्रांत नव्हे, त्या रांगड्या, राकट लोकांची अन आमची बरोबरीच होऊ शकत नाही.
पण बाप कुठचा ऐकायला?
माझ्या आईने तर या गँगचे नाव रागाने 'मच्छर गँग' ठेवलेले होते याचे कारण यातील सर्वांच्या अंगावर काट्याने ओरबाडल्याच्या, डासांनी चावे घेतल्याच्या खूणा असत. आईला म्हातार्‍याने त्या कंपूबरोबर फिरलेले अजिबात आवडत नसे अन मला त्या कंपूत घेऊन जाणे याला तर तिचा सख्त विरोध होता."काय तर म्हणे शिकार करतायत. सगळे देवाने निर्माण केलेले प्राणी ही यांच्या बापाचीच जहागीरी ना ....अस्वच्छ, धुडगुशे, नुसतं उंडारायच, काम-पैशाच्या नावाने बोंब. " अशी सुरुवात करुन ती जी तोंडपट्टा चालू करे त्यात बापाला बोलायला जागाच नसे. अन तरीही बाप क्वचित हे सांगण्याचा केवीलवाणा प्रयत्न करे की जसे आपण मासे-कोंबड्या-डुक्कर खातो तसेच आम्ही हरीणे, खार, पक्षी मारतो. त्यातले आम्ही म्हणजे गँगमधले तरबेज शिकारी हे तो लपवून ठेवे कारण त्याला शिकारीचे कौशल्य अजिबातच नव्हते ना जिगर होती.
आईने एकदा बापावर चिडून त्याच्यापुढचं ताटच ओढून भिरकावलं तो दिवस मी विसरु शकत नाही कारण म्हातार्‍याच्या डोळ्यात पाणी आल अन तो पुटपुटला होता , "मी काय माझ्याकरत करतो होय? या पोराला मर्द बनवायला मी धडपडतो. I want to make a man out of him" त्याचं ते केवीलवाणं मूक रडणं अन ते शब्द माझं काळीज चिरत गेलेले. मला हे कळलं नाही की "मला मर्द बनवायला" म्हणजे काय पण आपल्यासाठी बाप काहीतरी झटतोय हे जाणवले.
एके दिवशी बापाने पक्षी मारायचा नेहमीप्रमाणेच असफल प्रयत्न केला अन तो च पक्षी गँगमधील, आगाऊ अन उर्मट गोफर रायन ने एका गोळीत मारुन दाखवला. याच Gopher Ryan ने बाबांना पक्ष्याचे एक पीस देऊ केले. अन म्हणतो कसा - "घे ना....ऐष कर." अन त्याचा भाऊ अली बापाला खिजवून हसत म्हणाला "हा घे हां, रडू नको.उगी उगी!" मला खूप राग आला. बापाचा नेम नेहमीच चुकत असे अन त्यांचे हसे नेहमीच होइ, यात नवे असे काहीच नव्हते. पण मला राग या गोष्टीचा येइ की बापाचे रक्त उकळत कसे नाही का माझा बाप हा अपमान सहन करतो का त्या गोफर ला ,अली ला अपमानास्पद लागेल असं बोलत नाही. पण नाही बाप नेहमीच कसनुसा हसे अन इतरांचे अपमान हसण्यावारी नेई. गोफर ने मला पेरु दिला अन म्हणाला "बापाला शिकार धड येत नाही अन आणतोय पोराला. ए घे पेरु खा, तू पण ऐष कर." मी रागाने मान हलवून नाही म्हटलो तर बाप म्हणतो कसा "घे तो पेरु.".
एवढ्यावरच थांबले नाही, त्याच दिवशी आम्ही एका खुराड्याजवळून जात असताना, गोफर ने बापाला परत उचकावले, "मारुन दाखव ते कोंबडं" अन त्याला नकार देण्याऐवजी माझ्या मूक अन लाचार बापाने परत बंदूक चढवली अन नेम धरुन त्या कलकलाट करणार्‍या कोंबडीवर झाडली. अर्र! परत नेम चुकलाच....नेहमीप्रमाणे. यावेळेला गोफर अन अली दोघांनी ढुंकुनही न पहाता त्यांच्यातील बोलणे सुरुच ठेवले अन बापाने ओशाळत मला डोळा मारला. त्याचं ते लाचार ओशाळलेपण त्या वयातही माझ्या अंगावर आलं.
हां शॅडो ! मला त्या गँगमध्ये सर्वात कोण आवडायचं तर तो होता - शॅडो. एकदम चुस्त अन स्वाभिमानी माणूस. कणखर, कोणाचा ब्र नाही ऐकून घेणार. दुसरा एक होता मिन्क मोठ्ठं कुरण, जमीनजुमला होता त्याचा स्वतःचं अन ते सुखवस्तूपण त्याच्या अंगावर, चेहेर्‍यावर दिसायचच. एक तेज होतं त्याच्या डोळ्यात अन करारीपणा नाहीतर माझा बाप! थूत तेजायला, या गँगमध्ये सामावून जाण्यासाठी मेलेली बेडकीही खाल्ली असती म्हातार्‍यानं.
हां तर काय सांगत होतो - मच्छर गँग नेहमी, शनिवार-रवीवार किंवा सुटीच्या दिवशी, एका पड्क्या केबिनवजा खानावळीत जमायची, तिथे त्यांचे शिकारीचे प्लॅन आखले जायचे, जोकस व्हायचे. बहुतेक लोक बापासारखेच, कामगार होते, बापासारखेच फॅक्टरीत काम करत होते.काही जण सुजाण नागरीक होते तर काहीजण लुख्खे, पडीक अन काहीशा गुन्हेगारी वृत्तीचे, सर्व रंगाचे, प्रकृतीचे रांगडे लोक जमत अन गफ्फा हाणत. त्यात माझा बाप लै विसंगत दिसे. ना कोणी त्याला बोलावे ना हाकले, त्याचे अस्तित्वच कोणालाही दखल घेण्याजोगे वाटत नसे. इतरांच्या शिकारीच्या कहाण्या डोळे विस्फारुन ऐकणार्‍या त्याच्याकडे स्वतःच्या शिकारीची, मासेमारीची अशी एकही कहाणी नव्हती. तो टेबलापाशी घुटमळे, अन कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही तरी एखाद्या कोपर्‍यात बसून जाइ, नुसता ऐकत राही. मध्येच एक्साईट झाला तर पुटपुटे, "माझ्या पोराला मर्द बनवाया मी आणतो त्याला हिते." मला ते सर्व विचित्र अन निरुद्देशी वाटे.
याच गँगमधील एकाने मला शिकारविषयक मासिकाचे जुने अंक दिले होते. ते अंक बापाला आवडले व त्याने ते मासिकच subscribe केले होते. मग दर महीन्याला आम्ही दोघांनी ते वाचलं की बाप मागच्या जाहीराती बघून काय काय पॉश वस्तू मागवायचा - दुर्बिण, मोठे बूट, शिकारीची हॅट, गळ तर कधी महागाची बंदूक, गॉगल्स यंव न त्यंव. खिशात पैसा नसतानाही तो अशा वस्तूंवर खर्च करतो हे आईला आवडत नसे, ती त्रागा करे. पण बाप बाह्यरुपाला महत्त्व देई त्याला वाटे त्याच्या शिकारीचे अ-कौशल्य कदाचित या वस्तूंनी भरुन निघेल. पण होई उलटच, असा सर्व जामनिमा करुन आम्ही बाहेर पडलो की गँगमधले लोक आम्हाला हसत. म्हणत "शिकार तर येत नाही, थाटच बघून घ्यावा." पण माझ्या बापाला त्याची खंत नसे.
माझी स्वप्ने काही वेगळीच होती. मला एखाद्या Outdoor मासिकाचा Editor बनायचे होते. माझे मन शब्दात रमे, शब्द, भाषा मला वेडी करे, मोहवे. मी लेख लिहीण्याचा प्रयत्न करे. माझा बाप १९४० मध्ये ४० वर्षाचा झाला अन मी "Field & Stream" मासिकात एक पत्र लिहीले ज्याचा मतीतार्थ हा होता की - मी त्या मासिकातला अस्वलमारीचा एक लेख खूप एन्जॉय केला, मला फार आवडला. यंव अन ट्यंव. आनि काय आश्चर्य, अन कोणतीही आशा नसताना माझे ते पत्रं चक्क छापून आले. पहीलं माझ्या बापाने काय करावं तर ते कात्रण घेऊन तडक तो त्या गँगकडे गेली जिथे अली आणि गोफर बर्फात भोक पाडून बर्फातली मासेमारी करत बसले होते. बाप आल्याकडे त्यांनी ढुंकुनही पाहीले नाही. तरी बापाने आपले घोडे दामटलेच अन तो ते कात्रण त्यांना दाखवू लागला. यावर अली खेकसला "ए म्हातार्‍या! तुझ्या आवाजाने आमचे मासे पळतील. चल तूही पळ इथून, मंग नंतर ये कसे?" यावर बाप बरं म्हणून निघाला वाटेत मला म्हणाला - "या लोकांना डोकी थोडी कमीच आहेत. जाऊ देत आपण माघार घ्यायची. मी परत येईन."
माझा बाप माझ्याकरता संमिश्र गुणावगुणांचे गाठोडे होता. तो लाचार होता, भ्याड अन ओशाळा होता पण माझा बाप होता. मला शेवटी बाप म्हणून त्याच्याबद्दल प्रेम वाटेच.
आम्ही दोघेच जेव्हा भटकू तेव्हा जी मजा येई ती गँगसोबत कुठून यायला? गँगबरोबर बाप नेहमी तणावाखाली आणि संकोचलेला, अवघडलेला खरं तर न्यूनगंड घेऊन वावरे याउलट आम्ही दोघेच असताना तो सैल, रिलॅक्स्ड असे. आम्ही रात्री तळ्याच्या कडेकडेने चालत असू, चंद्रप्रकाशात तळं किती सुंदर दिसे अन शिवाय शिकार करण्याची धवाधाव, यातायात देखील नसे. नीरव शांततेत आकाशातील तारे मोजणे, काजवे मोजणे, रातकीड्यांचा आवाज ऐकत ऐकत मनातील विचार बोलून दाखविणे, फार मजा मजा येत असे.ते दिवस खरच सुंदर होते पण फार कमी मिळाले..
आता विचार करतेवेळी मला हेच वाटते की जर बापाने त्या रासवट गँगमागे, माझी व स्वतःची फरफट केली नसती, अपमान लाचारीला थारा दिला नसता तर कदाचित मी बापाचा अधिक आदर करु शकलो असतो. खरं तर मर्द बनण्यासाठी, मला फक्त बाबांच्या एका बक्षीसाची , पाठीवर शाबासकीच्या थापेची गरज होती. बस्स! .... जास्त मागणं नव्हतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झालं आहे स्वैर रूपांतर. मन दुखलं कुठेतरी.
मुलांच्या भवितव्यासाठी पडतं घेऊन धडपडणारी, अपमान सहन करणारी बापमाणसं दिसतात आजूबाजूला.

मूळ कथा चांगली आहे. पण अनुवादावर अजून मेहनत घ्यायला हवी. बरेच इंग्रजी शब्द आहेत. पाडस हा अनुवाद वाचून घ्या. मस्त आहे.

पाडसबद्दल ऐकून आहे. अनुवाद ठिकठाक आहे हेदेखील पटते. मूळ कथा फार सुंदर होती. अनुवाद वाचतानाही माझे डोळे ओलावतात परंतु मूळ कथेत इतके सुरेख वर्णन आहे, गळ्यात, आवंढाच येतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमा.

आवडलं. बापाचे ते शॉपिंग पाहून आमच्या गावातील एक व्यक्ती आठवली. निरक्षर माणूस खेड्यातला. पण कोट घालून वर हॅट खाली बुट, डोळ्याला गॉगल. हातात एक छोटीशी सुटकेस. स्वारी तालुक्याच्या बसस्टँडला जाऊन इंग्रजी पेपर घेऊन दिवसभर बसत असे. बहुतेक वेळा पेपर उलटा धरुन बसलेला असे असं गावातील लोक बोलत. बिचाऱ्याची बायको, पोरं समजावून कंटाळून गेले होते.

'मर्द बनविणे' म्हणजे शिकार करणे, मासेमारी करणे. डास चावोत, काट्याकुट्यांनी त्वचेवर ओरखाडे पडोत, परंतु हूं की चूं न करता, छंद जोपासणे, टपरीवर बसून, सिगरेटी ओढत गफ्फा हाणणे - बरोबर बेफिकीर वागणेच - असा काहीसा पगडा त्या बापावर असावा.
प्रतिसादाकरता धन्यवाद.

मस्त कथा आहे. छान लिहिलंय. ‘बाप’ शब्द चपखल बसलाय, त्या ऐवजी दुसरा कोणताही शब्द असता तर नाटकी वाटले असते.

अनुवाद आवडला. अगदी जी ए आणि पटवर्धनांच्या पंक्तीत नाही बसला तरी (फारच थोडे लोक पोचतात तिथपर्यंत) खरोखर छान आहे. अभिनंदन. असंच चालू राहू दे.

अनुवाद छान लिहिला आहे...मी मूळ कथा वाचली नाही पण हे वाचताना छान वाटले...
>>>खरं तर मर्द बनण्यासाठी, मला फक्त बाबांच्या एका बक्षीसाची , पाठीवर शाबासकीच्या थापेची गरज होती. बस्स! .... जास्त मागणं नव्हतं.>>> हे तर मस्तच...मुलाचे बोल भिडतात अगदी

धन्यवाद सुनिधी आपले नीरीक्षण अचूक आहे. होय त्या कथेतही माय डॅड वगैरे शब्द नसून वडीलांना 'माय ओल्ड मॅन' हे संबोधन वापरलेले होते.
उमानु प्रतिसादाबद्दल, आपले आभार.

Pages