ते नक्की काय होतं???

Submitted by निन्या सावंत on 21 September, 2019 - 13:59

आज खुपंच उशीर झाला निघायला, काय करणार कामच तसं होत, पूर्ण केल्या शिवाय निघणं शक्य नव्हतं. आधी दमन च्या साईट वर पकलो होतो तिथून संध्याकाळी साडेचार ला निघालो. वापी स्टेशन ला यायला पाच वाजले. पुढची ट्रेन साडेपाच ची होती, वेळ जावा म्हणून टपरिवरून सिगारेट घेतली आणि ओढत बसलो. तितक्यात मॅनेजर चा कॉल आला, एक इंजिनिअर तारापूर ला एका कॉल वर अडकला आहे, तू जाऊन बघशील का? म्हटलं जाईन पण पोचायला सात वाजतील.
सव्वासात ला पोहोचलो, जो इंजिनिअर अडकला होता तो सारखा जाऊ का विचारत होता म्हणून वैतागून जाऊ दिलं त्याला. मी आता इथून निघतोय, दहा वाजलेत. बाहेर काळोख इतका आहे की पाच पावलावरचा माणूस दिसणार नाही. आता साधारण वीस मिनिटं चालून मग मला बोईसर साठी रिक्षा मिळणार. मी माझ्याच धुंदीत कानात हेडफोन टाकून माझी आवडती प्लेलिस्ट लावून चालतोय. मोबाईल हातात आहे त्याचा टॉर्च चालू आहे, त्यामुळे थोडाफार रस्ता दिसतोय.
अरे हे काय अचानक मोबाईल चा टॉर्च का बंद झाला? मोबाईल ची चार्जिंग संपली का काय च्यामारी!! एक मिनिट, मोबाईल ची चार्जिंग संपली तर हेडफोन मध्ये गाणी कशी चालू आहेत? मोबाईल बघितला, चालू आहे.. हा टॉर्च कसा बंद झाला हा विचार करतच रस्त्याचा अंदाज घेत चालतोय.
खड्डेयुक्त डांबरी रस्ता आणि दोन्ही बाजूला पावसाने झालेला चिखल, त्यामुळे पाय जपून टाकतोय.
मागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय आणि थोडी लाईट पण दिसतेय मागून येणारी. चला या भयाण रस्त्यावर मी एकटा तर नाही हे एक समाधान. पण हा मागून येणारा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चिखलाच्या पाण्यातून का चालतोय? जाऊ दे ना आपल्याला काय करायचं.. त्याचे पाय, त्याची पद्धत, तो बघून घेईल काय ते. मागून येणारा हळू हळू जवळ येतोय असं वाटतंय, करण त्या चिखलाचा आवाज आता अधिक स्पष्टपणे ऐकू येतोय.
अचानक मी थांबलोय, का? कशासाठी? माहिती नाही. पाय जमिनीत खिळल्यासारखे झालेत, अजिबात हलता येत नाही आहेत, जस कोणी पाय बांधून ठेवलेत. मगापासून येणारा पावलांचा आवाज आणि तो थोडा उजेड अचानक नाहीसा झालाय.
हलकी खसखस ऐकू येतेय माझ्या मागून, अगदी जवळून, म्हणजे इतक्या जवळून की माझ्या कानाजवळ कोणाच्या तरी श्वासाची जाणीव होतेय. मी आठवेल त्या देवांची नावं घेतोय आणि त्यासरशी ती खसखस वाढत जातेय. माझ्या अंगावरील केस अन केस उभा राहिल्याची जाणीव मला होतेय. माझ्या मानेवर काहीतरी जाणवलं आणि पुढच्याच क्षणी मी स्वतःला सावरलं. आता माझे पाय मोकळे झालेत, मी दोन पावलं पुढे टाकली, आता मी चालू शकत होतो. वळून मागे बघितलं तर तिथं कोणीच नाहीय, जमिनीवर काहीतरी पडल्यासारखं वाटतंय पण जाऊदे ना आपल्याला काय करायचंय. अरे वाह, मोबाइलचा टॉर्च पुन्हा सुरु झाला.. पटापट पावलं टाकत रिक्षा स्टँड वर आलो तिथे एक रिक्षा उभी आहे. आत कोणीच नव्हतं म्हणजे हा चार सीट भरायची वाट बघणार तर, बरंय तो पर्यंत एक सिगारेट मारतो. दोन माणसं आली रिक्षात बसली, काही बोलायची गरज नाही, सगळे बोईसरलाच जाणार. मी तिसऱ्या सीट वर जाऊन बसलो. रिक्षावाला तिथेच उभा आहे, कदाचित आणखी एक पेसेंजर येईल या आशेवर, दहा मिनिट झाली तसं बाजूचा खेकसला, "अरे चल, ट्रेन जाईल".तसा रिक्षावाला निघाला. बोईसर स्टेशन आलं, मी रिक्षातून उतरलो, बॅग मधून पाकीट काढून पैसे देई पर्यंत बाकीचे दोघे पैसे देऊन गेले सुद्धा. अरे हा रिक्षावाला असा काय, पैसे नकोत का याला? असा कसा निघून गेला? जाऊदे माझे दहा रुपये वाचले. प्लॅटफॉर्म वर आलो, विरार लोकल लागली आहे. पटकन जाऊन बसतो. ट्रेन पूर्ण रिकामी आहे देतो मस्त ताणून विरार येईपर्यंत.
आता ट्रेन विरार ला पोहोचली, मस्त झोप लागली. अरे वाह.. आणखी काय हवं? हीच ट्रेन चर्चगेट ला जातेय ,म्हणजे ब्रिज चढायला आणि उतरायला नको.. बरंय!! बाजूला एक माणूस आहे, याला विचारतो ट्रेन फास्ट आहे का स्लो. पण हा माणूस मी प्रश्न विचारून सुद्धा साधं बघत पण नाहीय माझ्याकडे, असं का? माझ्या अंगावर सर्रकन काटा आला, मानेवर घर्मबिंदू जाणवतोय. खिशातून रुमाल काढून घाम पुसतो जरा. हे लाल काय लागलं रुमलाला? रक्त? पण हे माझ्या मानेवर?
मला ४४० वोल्ट चा झटका लागल्याचा भास होतोय. मगाशी ऐकलेली खसखस काय होती ते आत्ता कळतंय. म्हणजे ते मानेवर काहीतरी जाणवलं तो सुरा होता, म्हणजे? म्हणजे याक्षणी मी जिवंत नाही? म्हणजे खाली पडलेलं काहीतरी दिसलं ते माझं प्रेत होत? कसं शक्य आहे हे? म्हणजे त्या रिक्षावाल्याला मी दिसलोच नाही?
"पुढील स्टेशन दहिसर" "अगला स्टेशन दहिसर" "next station dahisar" या आवाजाने भानावर आलो, दहिसर ला उतरलो. रिक्षावल्याना हात दाखवतोय पण कोणी थांबत का नाहीय? म्हणजे मी जिवंत नाहीय? खरंच?
चालत घरी आलो. लिफ्ट बंद आहे म्हणजे ६ माळे चढून जावं लागणार. हुश्श सहाव्या माळ्यावर आलो, घराचं दार बंद आहे, अर्थात रात्रीचे बारा वाजून गेलेत, बंदच असणार. मी बेल बटन दाबलं आणि...
आणि समोरून दरवाजा उघडला गेला. समोर बाबा उभे आहेत "अरे काय हे, किती उशीर? आणि किती फोन केले, उचलत का नव्हतास फोन?" पुढचं मला काहीच ऐकू येत नाहीये, याचा अर्थ? मी जिवंत आहे? मी घरात गेलो, आईने पाणी आणून देतेय, म्हणजे..
म्हणजेच मी जिवंत आहे.. म्हणजे मानेवर जाणीव झाली तो सुरा नव्हता, ते खाली पडलेलं माझं प्रेत नव्हतं, रिक्षावाला खरच पैसे घ्यायला विसरला होता. आत्ता आठवतंय, ट्रेन बाजूला बसलेल्या माणसाने कदाचित हेडफोन लावले असावेत त्यामुळे त्याला माझं बोलणं ऐकू गेलं नसावं आणि मी झोपेत होतो त्यामुळे इतकं लक्ष नसेल गेलं माझं.
मग माझ्या मागून येणारा तो आवाज कसला होता?माझे पाय खिळल्यासारखे जाणवले होते, ते काय होत? मला कानाजवळ ऐकू आलेली खसखस कसली होती? मानेवर काहितरी जाणवलं, ते काय होतं? खाली काहीतरी पडलेलं, ते काय होत? जाऊदे ना मला काय करायचंय, असेल काहीतरी. कदाचित भास असेल. असो पण मी जिवंत आहे ही भावना खूप मोठी आहे.
पण ते मानेवरचं रक्त?
"ट्रेन मध्ये झोपला होतास का रे? मानेला टोमॅटो सॉस लागलाय तुझ्या", बाबा.
समाप्त!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!!

शेवटच्या वाक्याच्या आधीपर्यंत फारच मस्त थरार, गूढ होतं पण मग शेवट्चे वाक्य वाचल्यावर शेवट नक्की काय ते कळला नाही. पण शैली मस्त आहे ओघवती.

जिवंत तर आहे ही व्यक्ती कारण आई-बाबांना दिसते आहे, मग ती खसफस , ते थिजून जागच्या जागी उभे रहाणे, मानेवरचा लाल रंग याची संगती कशी लावायची?

जिवंत तर आहे व्यक्ती...पण नक्की काय होते त्याच्या मागे..काय अर्थ काढायचा नाही कळले...पण सुरुवाती पासून शेवट पर्यंत लिखाणाने खिळवून ठेवले Happy

1. खसखस जाणवली ते वटवाघूळ आहे
2. त्याने काही कारणाने लालभडक शी केली जी लेखकाच्या मानेवर पडली.
3. जखमी वगैरे समजून माणुसकीच्या नात्याने रिक्षा वाल्याने पैसे घेतले नाहीत
4. शेजारी बसलेला माणूस बहिरा होता

काय हे
मी इतकी भंगार आणि काय च्या काय थिअरी मांडलिय
किमान मला मूर्खांत काढून चांगल्या थिअर्या मांडायला तरी या.
सगळे भांडण भांडण वाले धागे वर आहेत कंटाळा आलाय.
आणि या कथेत नक्की काय झालं ते कळत नाही त्यामुळे क्लोजर मिळत नाहीये.
माझी दुसरी थिअरी: वटवाघूळ चावलं. त्यामुळे सगळं बधिर झालं.व्हॅल्यूसिनेशन्स चालू झाली.पुढची सर्व कथा हे हल्युसिनेशन.कथा पूर्ण केली तर लेखक तारापूरलाच बेशुद्ध पडलेला मिळेल
बाय द वे तारापूर बोईसर ची गोष्ट वाचून नॉस्टॅल्जिक झालं.तिथल्या दादी महालात आमचा स्कुल बस स्टॉप आणि बुलंद बाका किल्ल्यासमोर शाळा होती.आता दादी महाल तोडून काहीतरी बनलंय.

तुझ्या दोन्ही थिअर्या चांगल्या आहेत अनु Lol
> सगळे भांडण भांडण वाले धागे वर आहेत कंटाळा आलाय. > +१ Sad

छान आहे कथा

@mi-Anu. .मला तर तुमची थिअरी पटली..असचं असावं..बाकी वटवाघळाची शी लाल असते का आणखी कशी ते नाही कधी पाहील ब्वा.. Happy

>>>सगळे भांडण भांडण वाले धागे वर आहेत कंटाळा आलायʼ<<<<<
सेम हिअर...

माबो.करांच्या अश्या टुकार प्रतिसादा मुळे अनेक चांगले लेखक आता मोयबोली वर नाहीत ..बेफिकीर , विशाल कुलकर्णी , अभिषेक नाईक , नंदिनी , कवठीचाफा ह्यांचे लिखाण आता दिसतच नाही

आणि ते जे काय खाली पडलेल होत, ते काय होत.>>>
ते अनुने मांडलेल्या दुस-या थिअरीमधील वटवाघूळ असेल , लेखकाला चावून बेशुध्द होऊन पडला असेल.
Happy
दिवे घ्या. मी फक्त गंमत करतेय.
जे काही लिहिले आहे ते नक्कीच खिळवून ठेवणारे होते.
पुलेशु.