मृगया

Submitted by सामो on 20 September, 2019 - 15:59

अनंत मृगया लीलया पार पाडलेल्या त्या तरुण व्याधाकरता जर ही मृगया हातची गेली असती तर फार मोठा फरक पडणार नव्हता. पण यावेळेस कोणत्या तरी अनामिक कारणामुळे, स्वप्रेरणेमुळे त्याला भरीस पडावेसे वाटले. अन त्याचा हट्ट अनाठायी नव्हता. सकाळपासून मृग शोधून दमलेल्या, त्याला दुपारी कधी नव्हे ते हा मृग दिसला होता. धनुष्याच्या प्रत्यंचेवरती विषारी टोकाचा बाण खोचून त्याने या मृगाचा वेधही घेतला होता. अन वायूच्या वेगाने धावणारा, पाय जमिनीवर न पडणारा तो मृग अडखळून, धाय मोकलून भुईवरती असहाय पडला होता. त्याच्यात अजुनही धुगधुगी होती, जीवनेच्छा, जिजीवीषा होती. तोंडास फेस आलेला , आचके देणारा तो शेवटचे क्षण मोजत पाय झाडत पडला होता. व्याध त्या मृगाजवळ जाऊन बाण काढणार तो बाजूच्या विशाल वृक्षामागून त्याच्यासारखीच भिल्ल स्त्री विजेच्या वेगाने धावत आली अन मृगावरती पाय रोवून उभी राहीली.
.
सर्वात प्रथम व्याधाचे लक्ष वेधले ते त्या तरुण स्त्री च्या आव्हान देणार्‍या डोळ्यांकडे. जाळीतील करवंदासारख्या, तिच्या काळ्याभोर डोळ्यात काय नव्हते? क्रोधाची ठिणगी अन आव्हानाचे स्फुल्लिंग होते, चित्त्याची सावधता अन मोहफुलाची मादकता होती.उन्मत्त सौंदर्य ओसंडून वहाणार्‍या त्या स्त्रीच्या अंगावरती तोकडी वस्त्रे होती. हरीणशावकाच्या मऊ कातड्याने तिचे खालचे शरीर जेमतेम झाकलेले होते अन वरती ती फक्त मोठ्या पसरट, रक्तवर्णी फुलाच्या माळा ती ल्याली होती. तिचे स्वतःचे ओठ रक्तवर्णी पुष्प उलल्याप्रमाणे भरीव होतेच पण शरीर उन्हातान्हाने रापून कृष्णवर्णी शिसवासारखे झाले होते. घर्मबिंदू गळ्यावर, स्तनांवर डवरुन येऊन ती दवबिंदूनी न्हालेल्या कृष्णवर्णी अन रानटी फुलासम दिसत होती. मोकळे सोडलेले तिचे केस, अंगास चिकटले तर होतेच पण आत्यंतिक उत्तेजित झाल्याने तिचे स्तन वरखाली होत होते. एखाद्या उन्मादक पण मत्त वनदेवीप्रमाणे ती त्याला भासली.
.
तरुण व्याध अनिमिष नेत्रांनी तिच्याकडे पहात राहीला पण क्षणभरच कारण तिने पहीले शब्द उच्चारले - हा मृग माझा आहे. मी नेणार.
तिच्या आवाजात सर्पाचा फुत्कार होता की मोहफुलांचा गोडवा याविषयी त्याचा निर्णय होइना. तिच्या आवाजाने, त्याच्या शरीरातून एक उष्ण वीज खेळली हे मात्र सत्य होते.
व्याधाला हसू आले व तो म्हणाला - तुझा कशावरुन? याच्या अंगात तर मी मारलेला दोन जिव्हेचा सर्पिल बाण रुतला आहे.
त्या व्याध स्त्रीने त्याच्याकडे परत उद्दाम आव्हान फेकले - द्वंद्व करण्यास मी तयार आहे. जो जिंकेल , हा मृग त्याचा.
अन त्या क्षणी त्याच्यातल्या नराला उत्कटतेने वाटून गेले ते म्हणजे अशा उद्दाम स्त्रीला काबूत आणण्याची, तिला वेसण घालण्याची, तिच्यावर स्वामित्व गाजवण्याची इच्छा. अन का कोणास ठाऊक तो विचार त्याला स्वस्थ बसू देइना.
.
तो तिला नखशिखान्त निरखत म्हणाला - द्वंद्वाने मृगया जिंकली जात नाही. असे काहीतरी बोल ज्यायोगे हा मृग माझाही होईल अन तुझाही.
माझी हो. तुला तिथे नेईन जिथे मोहाचे असंख्य वृक्ष तर आहेतच पण जिथे विपुल पशूधन आहे, माझा तांडा आहे, पर्णकुटी आहे. माझ्या तांड्यातील लोक तुला आनंदाने स्वीकारतील. त्याच्या बोलण्यावर ती व्याध स्त्री थरारल्यासारखी झाली. एका भिल्ल जोडप्याने वाढवलेल्या तिने, पित्याखेरीज अन्य पुरुष पाहीला नव्हता. एक तर वनदेवासारखा दिसणारा ह पुरुष पाहून, ती संभ्रमात पडली होती अन तिला तिच्या भावना सुधरत नव्हत्या, त्यातून त्याच्या आवाजातू मध ठिबकतो आहे असे काहीसे तिला वाटत होते अन त्याच्या हास्यामुळे, त्याच्या शब्दागणिक, तिच्या शरीरातून र्ठिणग्या उमटत होत्या. त्याच्या डोळ्यातील गारुडाबद्दल ती सावध अन साशंक होती. स्वतःच्या अस्तित्वाला काहीतरी अनाम धोका तिला जाणवत होता. एक तर ती नाही तर तो असे राहून राहून वाटत होते अन असे का वाटते याचा तर्काने तिला थांग लागत नव्हता. याठिकाणी तिचे मृगयेचे सर्व कौशल्य निष्फळ ठरत होते. स्वतःच्याच मनातील भावना तिला खरच उमजत नव्हत्या.
.
अन स्वत:च्या विचारांत ती अशी बेसावध असतानाच, व्याधाने पुढे येऊन तिचा हात पकडला.तिच्या मागे हात नेऊन गच्च पिरगाळत तो म्हणाला - ये चल. तुला भरपूर दारु देइन, शिकार करुन तुझ्या पायाशी आणून टाकेन. हरीणाच्या तर कातड्यांची रास रचेन. एवढे बोलून तो थांबला तर नाहीच तिच्या मानेचे चुंबन घेतघेत त्याने तिच्या मानेवरती दंतव्रण उमटविले.
या आवेगाने तिला भोवळ आले की त्याच्या धिटाईचे आश्चर्य वाटले, त्याच्याबद्दलच्या अनाठाइ भीतीस साकारत्व आले की तिलाही त्याची आसक्ती वाटली? या सरमिसळ झालेल्या भावना तिला उमगेनात. जाळ्यात सापडलेल्या चंदेरी मासोळी सारखी ती व्याकुळ तर झालीच पण सर्प ज्याप्रमाणे केवड्याच्या पानांकडे ओढला जातो तद्वत काहीशी ओढ तिला जाणवली. त्याचा रासवट गंध तिला जाणवला अन त्या गंधाने ती एकाच वेळी सावध झाली अन आसक्तदेखील. नेमक्या याचवेळी, सर्पाच्या डोळ्यांनी भारुन जाऊन, त्याच्याकडे आपण होऊन जाणार्‍या पक्ष्याच्या पिल्लाची तिला आठवण का यावी? मोठ्या प्रयत्नांनी प्रतिकार करत उसने अवसान आणत, त्याला दूर लोटत ती म्हणाली, "दूर हो, दूर हो, मला हा खेळ मान्य नाही. द्वंद्वाला तू घाबरतोस." यावर व्याध उत्तरला - "आमच्या तांड्यात स्त्रियांशी द्वंद्व खेळले जात नाही. मला तू हवी आहेस. आत्ता या क्षणी."
.
खरे तर तिला त्याच्या बोलण्याचा राग यायला हवा होता पण तसा तिला आला नाही. अन क्रोध का येत नाही याचे असीम आश्चर्य तिला वाटल्यावाचून राहीले नाही. ती एक पाऊल मागे सरुन म्हणाली- "मला तुझी भीती वाटते. तुझ्यात काहीतरी घातक आहे. नक्की काहीतरी घातक आहे."
यावर व्याध मनापासून हसला.
पुढे ती म्हणाली -"अन आश्चर्य आहे, की तरीही मला तुला परत भेटावेसे वाटते. परत सूर्य डोईवर येइल, तेव्हा तू मला इथेच भेट. तेव्हा मी निर्णय देईन."
.
तिच्या या विनंतीस अनिच्छेने का होईना मान देऊन, व्याध परत फिरला हा विचार करतच की उद्या येताना कोणत्या प्राण्याचे कातडे तिच्या पायावर ठेवायचे. मृगया झाली होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ok Happy

छान आहे, आवडली पण मृगया म्हणजे काय ? मृगया झाली होती याचा अर्थ कळला नाही. उद्या ती त्याला होकार देणार हे कळले .

मृगया म्हणजे मृगाची शिकार असावी. महाभारतात मृगयेचा उल्लेख आहे. राजे जंगलात शिकारीला जात त्याला मृगया म्हणत असावेत बहुधा.

ननि, अजिंक्यराव आणि अमर, आपल्या सर्वांचे आभार.
अमर करेक्ट मृगया म्हणजे शिकार/पारध परंतु फक्त मृगाची पारध असे मात्र नसावे. शब्दकोशात तरी वन्य प्राण्यांच्या शिकारीकरता केलेले प्रस्थान असे म्हटले आहे.

मस्त जमलीय! उत्सुकता वाटावी, टिकावी पण संत्र पूर्णच सोलले जाणार नाही इतपतच डीटेल्स, (त्या स्त्रीच्या कपड्यांसारखेच) आणि क्रिस्प शेवट सर्व एकदम जमून आले आहे. Happy

मस्त जमली आहे.

शेवट तर खासच! मृगया - कुणी? कुणाची? हे वाचकांवरच सोडून देणारा शेवट आणि सगळी उत्तरे चपखल सामावून घेणारी कथा!

आपले सर्व धागे वाचले व आवडले. प्रत्येकावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा इथेच सुस्पष्ट मांडणी आणि सर्व विषयाचे नावीन्य याबद्दल आपले अभिनंदन करते.

सुरेख कथा आहे.
पुढच्या भागाची हूरहूर राहणार.

नितांत सुंदर! संयत शब्दात समर्पक उपमा देऊन श्रुंगार रस . तिचं शरीर सौंदर्याचं वर्णन, मनाची तगमग खूपच छान.

Pages