गूढ, अद्भुत तरीही विलोभनीय ....गिरनार (भाग ३)

Submitted by आशिका on 20 September, 2019 - 13:35

चालविसी हाती धरुनिया

आम्ही निघालो त्यावेळी पाऊस अजिबात नव्हता. काही पायर्‍या चढून होताच घाम येऊ लागला. पहिल्या पाचशे पायर्‍या खूप थकवणार्‍या असतात. त्यापुढे शरीराला सवय होते. आम्हाला दिलेल्या सुचनांनुसार आम्ही सावकाश चढत होतो. तसेच चढत असतांना जास्त बोलत राहिले की दम लागतो हे ही लक्षात घ्यायला सांगितले होते. पाणी अगदी गरज वाटली तरच, घोटभर पित चढण्यास सांगण्यात आले होते. काही अंतर चढून गेल्यावर आमच्या मागे-पुढे मराठी भाषिक लोक दिसू लागले. चौकशी करतां तो ५० जणांचा ग्रुप नाशिक, मनमाड येथून आला होता असे कळले. आपल्या सोबतच आपली भाषा बोलणारी मंडळी आहेत हे पाहून जरा बरं वाटलं. आमच्या ग्रुप मध्ये सर्वांत पुढे आयोजकांतील एक व शेवटी सर्वांत सावकाश चढणार्‍या सदस्याच्या मागे एक आयोजक अशी ग्रुपची रचना सुरुवातीपासून होती. त्यामुळे कोणीही रस्ता चुकण्याची, भरकटण्याची भिती नव्हती. तसंच चढत असतांना सर्वांत पुढे गेलेला ग्रुप जिथे थांबून विश्रांती घेई, तिथे मागून चालणारी मंडळी पोचली की आधी पोचलेली मंडळी मार्गस्थ होत असत आणि हेच मग त्या नंतरच्या मंडळींनी पुढच्या टप्प्यातील मंड्ळींसाठी केले, त्यामुळे चढतांना संपूर्ण ग्रुपमध्ये एक समन्वय होता . कुणीतरी फारच पुढे निघून गेलंय आणि कुणीतरी मागे एकटं पडलंय अशी मिसिंग लिंक कोणाच्याच बाबतीत चढतांना घडली नाही.

पहिल्या पाचशे पायर्‍या चढून होण्याआधीच आमच्या ग्रुपमधील एक काका थकले. त्यांनी मी चढू शकत नाही. डोलीनेच जाईन हा निर्णय घेऊन टाकला. ते खरच घामाने निथळत होते, प्रचंड धापही लागली होती. त्यांनी वेळीच योग्य निर्णय घेतला होता.ते जरा स्थिरस्थावर झाल्यावर आयोजकाने डोलीची व्यवस्था केली. डोलीवाल्याचे पैसे ठरवले. काकांना त्या डोलीवाल्याच्या ताब्यात देऊनच मग आयोजक पुढे चालू लागले.

मजल दरमजल करीत आमचे चढणे सुरु होते. आजूबाजूला बरीचशी टपरीवजा बंद दुकाने दिसत होती. साधारण अडीच हजार पायर्‍यांपर्यंत जंगलातील रस्ता असल्यामुळे वन्य श्वापदे आढळू शकतात. मध्यभागी दगडी पायर्‍या, एका बाजूला दरी तर दुसर्‍या बाजूला जंगल अशी रचना. ज्या बाजूला दरी होती,त्या बाजूला कठडा होताच असे नाही. त्या जंगलात कीर्र अंधारात पाहिले तर धुक्यामुळे काही अंतरावर पुढचे अजिबात दिसत नव्हते. भयपटात दाखवतात तसे झाडाचे बुंधे आणि धुक्यात अस्पष्ट होत गेलेली वाट...यामुळे वातावरणातील गुढ अजून वाढत होते. एका बाजूची अंधारात हरवलेली खोल दरी आणि दुसर्‍या बाजूचे धुक्यात अस्पष्ट दिसणारे जंगल. या दोन्ही गोष्टीची नाही म्हटलं तरी भिती वाटत होती. एकदा कधीतरी मी एकटीच राहिले. पुढची मंडळी किती पुढे गेलीत आणि मागून कोण येतंय हे धुक्यामुळे समजत नव्हते. कुणाचा बोलण्याचा आवाजही येत नव्हता. त्या क्षणी मी प्रचंड घाबरले आणि मनापासून सद्गुरुंना आळवले, मला भिती वाटतेय हे ही बोलले, काही वेळातच मागून आमची मंडळी येतांना दिसली. आता यापुढे चुकुनही डाव्या-उजव्या बाजूला बघायचे नाही, फक्त समोरच्या पायर्‍यांवर लक्ष केंद्रीत करुन पुढे चालायचे हे ठरवले.

हळूहळू चढतां चढतां ५०० पायर्‍या, १००० पायर्‍या, १२०० पायर्‍या असे टप्पे येत होते. अनेकदा येऊन गेलेल्या आयोजकांना ते टप्पे ओळखता येत होते आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. नवर्‍याला सांगून ठेवलं असल्यामुळे मला जेव्हा कळत होतं की ५०० पायर्‍या झाल्या, १००० झाल्या मी त्याला मेसेज करत होते. मी बरी आहे, फ्रेश आहे, हेही सांगत होते. माझा मेसेज गेल्यावर लगेच त्याचे उत्तर येत होते. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याला सांगितलं की आता कधीही नेटवर्क जाईल आणि मग तू काळजी करशील, त्यापेक्षा झोप आता.तसेच झाले. चार हजार पायर्‍यानंतर मेसेजेस जात नव्हते.

आता बरेच उंचावर आलो होतो. धुकं वाढत असल्यामुळे सुरुवातीला जसा दरदरून घाम येत होता तो येणं थांबलं. धुक्यातूनच आमचे मार्गक्रमण चालू होते. साधारण दोन फुटांवरचंही दिसत नहतं. आजूबाजूचेही थांबत चढत होते. माझ्यासाठी आश्चर्याची वाटणारी गोष्ट घडत होती ती म्हणजे मला अजूनतरी धाप लागली नव्हती, थकवा जाणवत नव्हता. एरव्ही थोडेसे चालून दमणारी मी, चालण्याचा आळस करणारी मी चढत असूनही ताजीतवानी होते. मी माझ्या आयुष्यात स्वतःला इतके फिट फक्त या चढाई दरम्यान अनुभवले. तरीही अति आत्मविश्वास दूर सारून मी अधे मधे थांबत होते. घोटभर पाणी, खजूर, स्निकर्स हे अधे मधे खात होते.

माझी मैत्रीण हळू हळू चढत होती. तिचा आणि एका काकींचा चालण्याचा वेग समान होता. त्यामुळे त्या दोघी एकत्र चालत होत्या. मी त्यांच्या जरा पुढे चालणार्‍या मंडळींसमवेत होते. चारहजार पायर्‍या झाल्यावर पहिला टप्पा - नेमिनाथ स्थान म्हणजे जैन मंदिरे आली. खूप भारी वाटत होते. इथवर तर सुखरुप पोचलो हा अनांद सोबत होता. जैन मंदीरांना वळसा घालून आम्ही पुढचा रस्ता धरला.

काही अंतर चालून गेल्यावर एके ठिकाणी दोन रस्ते आढळले. एक डाव्या बाजूला जिथे आता जशा पायर्‍या चढत आलो त्याच धाटणीच्या पायर्‍या होत्या तर उजवीकडे पायर्‍या नसून साधी वळणावळणांची वाट दिसत होती. प्रथम येणार्‍याला अर्थातच जिथे पायर्‍या दिसत आहेत तिथून जायचे असे वाटले असते. त्यानुसार मी डावीकडे वळणार तोच आमचे नेहमी सर्वांत शेवटी रहाणारे आयोजक आता 'वाटाड्याची' भुमिका चोख बजावत होते. त्यांनी उजवीकडे जिथे पायर्‍या नव्हत्या तो आपला रस्ता असे सांगितले. मी प्रश्न केला की मग ही पायर्‍यांची वाट कुठे जातेय? त्यावर तिथे थोडे अंतर चढून गेल्यावर रस्ताच नाही असे समजले. त्या प्रसंगी गिरनारसारख्या ठिकाणी रात्री चढत असताना अनुभवी ग्रुप सोबत असणं किती गरजेचं आहे हे जाणवलं.

आता पुढचा टप्पा अंबाजी धाम - ५००० पायर्‍या हे आमचं लक्ष्य होतं.आमच्यासोबतच ज्या दुसर्‍या ग्रुपने चढण्यास सुरुवात केली होती त्या ग्रुपमध्ये एक गॄहस्थ झांजांच्या तालावर "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असा नामघोष करत चढत होते. त्या नीरव गूढ शांततेत त्यांचा धीरगंभीर आणि खणखणीत आवाज आश्वस्त करीत होता.बाळ जसं आईला "आई, आई" हाकारत तिच्या दिशेने पुढे चालत रहाते तसं वाटत होतं. ग्रुपमधील अनेकांनी गिरनार उतरुन परतल्यावर हाच अनुभव सांगितला की ते "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" नामस्मरण ऐकले की एक प्रकारची उर्जा मिळत होती चढण्यासाठी आणि चालण्याचे श्रम जाणवत नव्हते.

आता चढतांना ढग आम्ही ज्या उंचीवर होतो त्यापेक्षा खाली दरीत विहरतांना दिसू लागले. हळू हळू जमिनीपासूनचे अंतर वाढत आहे हे दरीत नजर टाकतांच लक्षात येत होते. दिवसाउजेडी हा परिसर किती विहंगम दिसत असेल याची कल्पना मनात करत चालत होते. अजूनतरी पाऊस आला नव्हता. अगदी एखादी चुकार सरही नाही. मात्र वातावरण तसेच धुक्याचे. चढत असतांना हा एकच फोटो वरुन दिसणार्‍या वाटेचा काढला. बाकी सारे फोटो दुसर्‍या दिवशी उजेडात काढलेले आहेत.

night view Girnar1.jpg

कालपर्यंत एकमेकांना अनोळखी असलेल्या ग्रुपमध्ये आता चढतांना मात्र मस्त 'बाँडींग' झालं होतं. कुणाला कसलीही मदत लागली तरी अनेक हात पुढे सरसावत होते. सोबत आणलेला खाऊ, चॉकलेटस यांची देवाणघेवाण होत होती. जे आयोजक नव्हते त्या पुरुषांनीही स्वतःहून एकेका स्त्रियांच्या ग्रुपसोबत राहून, त्यांच्या वेगाने चढत कोणीही एकटे मागे पडणार नाही याची खबरदारी घेतली.

आम्हां सर्वांची चढत असतांना करमणूक करण्याची, श्रमपरिहार करण्याची जबाबदारी जणू आमच्यातील छोट्या सदस्याची होती. तो पठ्ठ्या भारी उत्साही. पटापट पायर्‍या चढून तो पुढे जाई आणि आपल्या घरची माणसे कुठवर पोचली हे तपासायला वरुन टॉर्च मारुन शोधत बसे. नेमका तो प्रकाशझोत मागून चढणार्‍यांच्या डोळ्यांवर पडून डोळे दिपत असत. बर्‍याचदा तर वीसेक पायर्‍या चढून गेलेला रजत परत तितक्याच तत्परतेने आई कुठवर आली हे बघायला खाली उतरत असे.या हिशोबाने मला तर वाटते त्याने गिरनार पर्वत सलग दोन वेळा चढून उतरला असावा.

हळूहळू वातावरणातील बदल जाणवत होते. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली होती. तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. आमचीसुद्धा ही एक प्रकारची उपासनाच चालू होती की आणि ती देखील या सिद्ध भुमीत जिथे साक्षात दत्तगुरुंनी स्वतः तपाचरण केले आणि त्यांना सद्गुरुस्थानी मानणार्‍या त्यांच्या कैक शिष्य, साधकांनी देखील. अशा कित्येकांच्या तपसाधनेची पवित्र स्पंदने या पवित्र भुमीत, इथल्या आसमंतात भरुन राहिली असतील जी आम्ही त्या ब्राह्म मुहुर्तावर ग्रहण करु शकत होतो. आधी जाणवली तशी भिती आता अजिबात वाटत नव्हती.खूप प्रसन्न असे वातावरण अनुभवत आमचा प्रवास सुरु होता.

धिम्या गतीने चढत-चढत आता अंबाजी धाम दॄष्टीपथात येऊ लागले. बघता-बघता ५००० म्हणजे निम्म्या पायर्‍या होत आल्या की. मी ज्यावेळी अंबाजी मंदीराजवळ पोचले तेव्हा ३.५८ वाजले होते. ११.३५ वाजता पहिल्या पायरीपासून सुरुवात करुन, मध्ये अनेकदा विश्रांतीसाठी थांबूनही साडे चार तासांत आम्ही ५००० चा टप्पा गाठू शकलो होतो. मंदीर तर अजून बंदच होते. माझ्या आधी पोचलेली मंडळी हसतमुखाने स्वागत करत समोर आली. त्यांनी सांगितल्यानुसार मंदीराच्या पायरीवर डोके टेकवून नमस्कार केला. ‘इथवर सुखरुप आणलंस आई, आता पुढेही असंच सुखरुप ने अशी प्रार्थना केली ‘आणि जिथे सगळे बसले होते त्या टपरीवजा हॉटेलात आले. आधी पोचून ताज्यातवान्या झालेल्या मंडळींनी नुकत्याच पोचलेल्यांना जागा करुन दिली. आयोजकांनी या हॉटेलच्या मालकांना झोपेतून उठवून आमची मंडळी आता हळूहळू पोचतायत तर चहा तयार ठेवा असे सांगितले. गरम गरम चहा आणि पार्ले़ जी बिस्कीटस खाऊन तरतरी आली.

हळूहळू एकेक करत सर्व पोचले. सारे वेळेत पोहोचलो होतो. आता पावणेपाचपर्यंत इथेच थांबायचे होते.कारण यापुढचे अंतर एक ते दीड तासात पूर्ण होणार होते. गुरुशिखर -मंदीर पहाटे साडे पाच वाजता दर्शनासाठी उघडते. त्या आधी तिथे पोचल्यास कुठेही थांबायची सोय नव्हती. पायर्‍यांवर बसावे लागले असते. त्यामुळे इथेच थांबलो. खरं तर अजून निम्म्या पायर्‍या बाकी होत्या. मग दीड तासांत कसे काय पोचलो असतो आम्ही? असं म्हणतात की ५००० पायर्‍या चढून अंबा मातेचा आशिर्वाद घेतला की यापुढचं अंतर ती अंबा माता लीलया पुरे करुन घेते, तिच्या कूपाशिर्वादाने पुढचा टप्पा झरझर पार केला जातो. ती आईच दत्तगुरुंच्या पुढ्यात आपल्याला नेऊन ठेवते, हे ऐकतांच अगदी भारावून गेले.

आमचे पाचही आयोजक मदतीस तत्पर होते. गिरनार पर्वत यात्रेचा आनंद जो आपल्याला मिळाला तो इतरांनाही मिळावा या नि:स्वार्थी भावनेने या यात्रेचे आयोजन केले जाते आणि ही नि:स्वार्थी वॄत्ती प्रत्येकाच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत होती, हे विशेष. कुठेही चिडचिड नाही, हातचे राखून माहिती देणे नाही. आताही जिथे थांबलो होतो तिथे थोडं स्ट्रेचिंग करा म्हणजे पाय मोकळे होतील अशी हळुवार सुचना त्यांनी दिली. त्यानुसार स्ट्रेचिंग करुन आम्ही पावणे पाचच्या सुमारास पुन्हा निघालो.

आता गोरक्षनाथ शिखराकडे जाऊ लागलो. याच रस्त्यावर प्रचंड वारा असतो. इथे एकमेकांचे हात पकडून कडं करुनच पुढे जाता येते असे ऐकले होते. आम्ही जेव्हा इथे पोचलो त्या वेळी वारा तर होताच पण असा वादळी वारा नव्हता. व्यवस्थित एकेकटे चालता येत होते. आता हा पर्वत उतरुन दुसरा चढायचा होता. त्यामुळे १०००-१५०० पायर्‍या उतरायच्या होत्या. काठीच्या आधारे त्या नीट उतरुन पुन्हा पुढील पायर्‍या चढू लागलो.

याच वाटेवरुन जात असतंना जर कदाचित मुसळधार पाऊस आला असतां तर?..... पाऊस पडत असतांना आजूबाजूच्या कडेकपार्‍यांतूनही पाण्याचे ओहोळ वहात पायर्‍यावर येतात, वार्‍याचा वेग अशा वेळी प्रचंड वाढतो, चढणे मुश्कील होते असे ऐकले होते. अंगावर सरसरून काटा आला. आम्ही दुसर्‍या दिवशी दुपारी खाली उतरेपर्यंत पाऊस मात्र अज्जिबात आला नाही. जुनागढ हा भाग कमी पावसाचा, त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस संपला असावा असे म्हणावे तर आम्ही मुंबईत परतल्यावर नंतरच्याच आठवड्यात तिथे मुसळधार पाऊस पडला होता, रस्त्यांवर पावसाचे पाणी वेगाने वहात असल्याचे व्हिडीओज आमच्या गिरनार यात्रेच्या ग्रुपवर पाहिले आणि मनोमन देवाचे आभार मानले.

या घटनेचा नंतर विचार करीत असतंना जाणवलं की अरे आपल्याला तर गिरनारच्या वाटेवर व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळत होती जणू काही, तेही कसलेही व्ही आय पी स्टेटस नसतांना. पण व्ही आय पी स्टेटस नाही कसे म्हणावे बरं? आपण सारी तर ‘दत्तगुरुंची बाळं’... हा एकच निकष पुरेसा आहे की व्ही आय पी पास मिळवण्यासाठी. जणू काही दत्तगुरुंनी स्वतः आमच्यासाठी रदबदली केली होती. पंचमहाभुतांना जणू आदेश दिले होते की "माझी बाळं डोंगर चढतायत मला भेटायला येण्यासाठी. तुम्ही तुमचं रौद्र रुप दाखवलंत तर भांबावतील बिचारी, हाल होतील त्यांचे. खरी 'राज की बात' तर ही आहे की ती सारी चढत नाहीचेत मुळी, मीच त्यांना कडेवरुन घेऊन येतोय. तेव्हा हे पंचमहाभुतांनो, माझ्या कार्यात मला मदत करा." आणि या आदेशाचे पालन प्रत्येक ठिकाणी केले जात होते. आम्हाला मोकळा मार्ग मिळत होता. अगदी जिथे कुठे पायर्‍या पाण्यामुळे ओल्या आढळल्या, तिथे त्यांच्यावर शेवाळ मात्र नव्हते. त्यामुळे कुठेच घसरायलाही झाले नाही.

आजूबाजूला आता स्थानिक काठियावाडी स्त्री-पुरुष दिसू लागले. आसमंत हळूहळू उजळू लागला होता. काळ्याकुट्ट अंधाराचे रुपांतर निळ्या सावळ्या रंगात होत होते. पुढे जात असतांना हळूहळू गुरुशिखराचा सुळका दिसू लागला. सरळसोट सुळका.... बघूनच धडकी भरावी असा. पण पायर्‍या मात्र वळणा-वळणाने सावकाश वर जाणार्‍या होत्या. घाटातल्या रस्त्यासारख्या. या शेवटच्या टप्प्यावर पोचलो आणि मन भरुन आले.

Girnar dawn.jpg पहाट होत असतांना

आजूबाजूचं वातावरण भारलेलं जाणवत होतं. कोणत्याही मंदीरात, मंदीर परिसरात आपण पावित्र्य अनुभवतो. मात्र त्यात त्या स्थानमहात्म्याइतकेच योगदान इतर गोष्टींचेही असते, जसं फुलांचा मंद सुवास, धूप, उदबत्तीचा दरवळ, त्यांची हवेत विरत जाणारी वलये, शांतपणे तेवणारी समई, निरांजन, सोबत त्या मंदीरातील आराध्य दैवताची ऐकू येणारी आरती, स्तोत्र, धीरगंभीर आवाजातील मंत्रोच्चरण या सार्‍या गोष्टींचा तो एकत्रित परिणाम असतो. म्हणून गर्दीत,कोलाहलातही आपण ती शांती, पावित्र्य अनुभवू शकतो. इथे मात्र त्यांपैकी काहीच नव्हते. जे होते ते अजून नजरेस पडलेही नव्हते, तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. अरुणोदयाची मंगल वेळ आणि गुरुशिखराचे सान्निध्य.....

गुरुशिखराबाहेर चपला, बूट काढायला जागा नाही, त्यामुळे आधी पन्नास एक पायर्‍या शिल्लक असतांना चौथरा असेल तिथेच काढून वर जा असे सांगितले होते आम्हांला.त्यानुसार ज्या टप्प्यावरुन मंदीराचे प्रवेशद्वार दिसत होते तिथे बूट काढले आणि सुरु झाला अखेरचा पन्नास पायर्‍यांचा प्रवास.....भावभावनांचे कल्लोळ मनांत उठवणारा.. तरीही मनाला तॄप्तीची अनुभुती देणारा......
क्रमशः
girnarsteps.jpg पायर्‍यांची झलक
Gurushikhar-Girnar1.jpg
गुरुशिखर - गिरनार (या सुळक्यावर वरती जे निळ्या पांढर्‍या रंगात दिसतंय ते गुरुशिखर)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे! शेवटचा फोटो बघून धडकीच भरली.
तुम्ही वर्णन फारच सुंदर करता आहात पण!! सविस्तर तर आहेच, पण कुठेही कंटाळवाणं होत नाहीये.

खरच एक से एक सरस भाग!!
>>तीन- सव्वातीनची वेळ असेल. ब्राह्म मुहुर्ताची वेळ. यावेळी केलेली उपासना, साधना अधिक फलदायी असते असं मानलं जातं. >> वाह!!! शीख समाजाच्या जपजी साहीब मधील, 'अमृत वेला' ती हीच असावी.

मस्त लिहिलंय. अगदी सविस्तर. असं वाटलं की तुमच्याबरोबर मीही तिथे आलेय. इथे नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये गेलं तर हवा फार थंड असेल का? हे आयोजक वर्षभर तिथे घेऊन जातात का काही विशिष्ट महिनेच?

फार सुंदर!
जंगलातल्या वाटेवरच्या पायऱ्यांना असे कठडे नसतील ना?
त्या वाटेवर श्वापद दिसलं का कोणाला? आलं अचानक कुठून तर काय करायचं असतं? कारण दुसऱ्या बाजूला तर दरी आहे.

धन्यवाद सर्वांना.
स्वप्ना-राज- तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी आमच्या आयोजकांना विचारूनच इथे प्रतिसादात लिहीन, म्हणजे योग्य माहिती मिळेल. वेळ लागेल कदाचित करण सध्या ते सर्व तिथेच आहेत. आमच्या नंतरची बॅच कालच गिरनार चढून खाली आली.

अश्विनी - हो, जंगलाच्या बाजूला कठडे नाहीत, काही ठिकाणी दरीच्या बाजूलाही नाहीत. उजेडात सगळं लख्ख दिसू लागलं, कठडा नसलेल्या बाजुची खोल दरी वगैरे तेव्हा भीती वाटत होती उतरत असताना.

आम्हाला कोणालाही श्वापद दिसलं नाही, पण दिसू शकतं आणि अशा वेळेस काय करायचं ते ही सांगितलं असतं. एकत्र येऊन सर्वांनी काठी जोरजोरात आपटायची दत्तगुरूंचा जयघोष करीत. दत्त अनुभूती या पुस्तकात वाघ दिसल्याचा अनुभव वाचला होता.काठयांच्या एकत्रित आवाजाने तो मागच्या मागे फिरून आत जंगलात गेला. ग्रुपने जाणे आणि काठी व टॉर्च सोबत असणे यामागे हेच कारण आहे.

आशिका, आजच ५ दत्तयाग घडवले गेले हातून. यागाला बसताना मध्यरात्री वाचलेल्या ह्या भागाची आठवण झाली होती Happy

इथूनच यात्रा घडली धन्यवाद. पायऱ्या चढताना घरच्यांना मेसेजेस करत राहणे मला 'आवा चालली पंढरीला' सारखं वाटलं. काही काळ का होईना अलिप्त झाले पाहिजे तिर्थक्षेत्री गेल्यावर. राग मानू नका.

धन्यवाद आशिका. जंगली प्राणी दिसले तर काय करायचं ते सान्गीतलंत तेही बरं झालं. माझी मकर रास. त्यामुळे वाघ च काय पण डायनॉसॉरही दिसू शकतो मला तिथे Proud पण ह्या यात्रेचा फार जबरदस्त अनुभव असणार ह्यात शंकाच नाही. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

आशिका,
खूपच सुंदर लिहीत आहात आपण. मला गिरनारबद्दल काही जुजबी माहिती होती व काही नातलग तिथे जाऊन आलेत.
एक विलक्षण योगायोग
नुकतच माझ्या मित्राने मला "गिरनारला येशील का ?" असं विचारलं आणि मी त्याला काहीही विचार ना करता हो सांगून टाकलं.
त्यानंतर काही दिवसातच मला कधीही संपर्कात नसलेल्या एका नातलगाचा संदेश आला आणि त्यांचा डीपी वर गिरनार शिखराचा फोटो होता.
आणि दुसऱ्याच दिशी तुमचा पहिला लेख वाचला ..... आता लवकरच तिथे जायची ओढ लागली आहे. तुमच्या लेखातून बरीच माहिती, अनुभव कळतायेत. फारच ओघवते लेखन. पुलेशु.

तीनही भाग अतिशय सुंदर लिहलेय
भारावून टाकणारा प्रवास हा, दत्तगुरुंचीच किमया
तुमच्यामुळे गिरनार बद्दल पहिल्यांदाच एवढ कळाले.
पुभाप्र

खूप सुंदर! बारीकसारीक तपशीलासह लिहीलंय हे फार बरं केलंस हं..... .. मागच्यावर्षी जुनागढच्या पायथ्यावरुन दुर्बिणीने जैन मंदिर दाखवलं होतं पण तिथून गुरुशिखर दिसत नव्हतं पण उंचीचा अंदाज आला होता. माझ्याच्याने होईल की नाही माहीन नाही पण तू मात्र फिरवून आणतेयेस...
अमरशी सहमत! आपला कम्फर्ट झोन सोडून कम्फर्टची अपेक्षा न करणं म्हणजे तिर्थाटन बाकीचं पर्यटन! अमरनाथयात्रा, केदारनाथ नर्मदा परिक्रमा किंवा कर्दळीवन इ. ठिकाणं अश्या ठिकाणी असण्यामागे हेच कारण असावे..... ह्या यात्रा म्हणजे तपाचरण!

तरीही ती शांती, ते पावित्र्य, शुचिता प्रत्ययास येत होती. >>> या लेखनातूनही जाणवतंय हे सारं.... प्रत्ययकारी लेखन...

खरोखरच श्री साईबाबा व श्री दत्तमहाराज तुमच्या पाठीशी आहेत असेच वाटते वाचताना...
___/\___

माझा अनुभव सांगते खरंच देवदर्शनाचा योग यावा लागतो....आम्ही वैष्णवदेवीला गेलो होतो. फक्त पैसे व पाण्याची बाटली मिस्टरांबरोबर होती. माझे हात रिकामे! फोन बरोबर ठेवणारच नव्हतो.संध्याकाळी पायथ्याशी पोचलो. घोडेवाले उभे असतात तिथपर्यंत पोचल्यावर एक घोडा उधळला आणि आम्ही पांगल्या गेलो तिथल्या तिथं. अर्धा तास शोधत बसलो. आॅनलाईन तिकीटं काढली होती. तिथे तर नक्कीच भेटू म्हणून तिथे मी वाट पाहत राहिले कारण तिकीटं ह्यांच्याच जवळ होती. तिथेही बऱ्याच वेळ वाट पाह्यली पण नाही भेट झाली नाही. आता अंधार पडू लागला काय करावे समजेना....माझ्याजवळ एक दमडी नाही. शेवटी रिक्षा करून हाॅटेलवर आले व रिक्षावाल्याला पैसे दिले. ह्यांना वाटलं इतक्या दूर आलो आहोत तर मी चढत असेल व वर कुठेतरी भेटू असा विचार करुन हे चढले व दर्शन करुन सकाळी परतले..... माझी श्रध्दा कमी पडली असावी म्हणा किंवा माॅं का बुलावा नही आया था अजूनही आला नाहीये...

काय छान लिहिले आहेस! पहाटेचे वर्णन खुपच छान. सर्वांना अनुमोदन.
मंजुताई, फोन बरोबर असायला हवा होता, म्हणजे तुमचेही दर्शन झाले असते.

आजच ५ दत्तयाग घडवले गेले हातून>>>> वा, छानच. तुझ्याकडून 'तो' करवून घेत असलेल्या भक्ती आणि सेवेमुळे तुझ्या गाठीशी अशा कैक गिरनार वार्‍यांचं पुण्य प्रत्यक्षात तिथे न जाताही आहेच गं. !!

स्वप्ना_राज - डायनॉसॉर - Lol :
तुम्ही विचारलेल्या शंका/प्रश्न मी आयोजकांना विचारले. त्यांनी दिलेली माहिती अशी:- नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये साधारण ५००० पायर्‍यांनंतर थंडी असेल. पण उतरतांना उन्हामुळे गरमही होते. म्हणजे थंडी रात्री आणि फार उंचावरच जाणवेल. तसेच ते असंही म्हणाले की तिथलं हवामान बरंच अन्प्रेडीक्टेबल आहे. त्यामुळे ते असंच असेल अशी खात्री देता येत नाही.
नोव्हेंबर, डिसेंबरच्या यात्रा फुल झाल्या आहेत. सध्या जानेवारीच्या यात्रेत काही जागा शिल्लक आहेत. साधारण दीड ते दोन महिन्यांतून एक यात्रा ते आयोजित करीत असतात.

अमर ९९ - अहो रागवण्यासारखं काय त्यात? तुम्ही योग्य तेच सांगितलंयत. पण खरंच 'आवा चालली पंढरपुरा' हे असंच होत असतं माझं, घर आणि घरातले मनातून दूर होतच नाहीत. अलिप्त होता आलं पाहिजे.

ऋतुराज - खूप छान अनुभव. तुमच्या गिरनार यात्रेसाठी शुभेच्छा. तुमचे अनुभवही वाचायला आवडतील.

मंजूताई- आपला कम्फर्ट झोन सोडून कम्फर्टची अपेक्षा न करणं म्हणजे तिर्थाटन बाकीचं पर्यटन! >> अगदी

शशांक जी - सुंदर प्रतिसाद.
सामो, लंपन, वावे,रश्मी., राजसी, अनघा.पैपिलॉन, सुनिधी- प्रतिसादाबद्द धन्यवाद.

मंजूताई- वैष्णोदेवी दर्शनाची तुमची संधी हुकली हे वाचून जरा हळहळ वाटली. मात्र श्रद्धा कमी पडली असावी असे कॄपया बोलू नका. खरं तर श्रद्धा असते किंवा नसते. ती कमी किंवा जास्त असं काही नसतं. माॅं का बुलावा नही आया था अजूनही आला नाहीये...- यात काहीतरी योजना असावी. काय ते आपल्याला माहीत नाही. पण एक नक्की की एखादी गोष्ट पूर्ण होतेय असं वाटत असता हातून निसटणे यामागे नक्की परमेश्वरी योजना आहे. तो त्याच्या लेकरांना 'उचित' तेच देत असतो. भक्तांना दर्शन घेण्यापासून वंचित ठेवण्यामागेही त्याचा काहीतरी हेतू निश्चितच असेल. आपण त्याच्यावर भरवसा ठेवून त्या 'उचित' वेळेची वाट बघायची.

कैक गिरनार वार्‍यांचं पुण्य प्रत्यक्षात तिथे न जाताही आहेच गं. !! >>>> बायो, पुण्य आणि पापही मोजणारे आपण कोण?

>> त काहीतरी योजना असावी. काय ते आपल्याला माहीत नाही. पण एक नक्की की एखादी गोष्ट पूर्ण होतेय असं वाटत असता हातून निसटणे यामागे नक्की परमेश्वरी योजना आहे. तो त्याच्या लेकरांना 'उचित' तेच देत असतो. भक्तांना दर्शन घेण्यापासून वंचित ठेवण्यामागेही त्याचा काहीतरी हेतू निश्चितच असेल. आपण त्याच्यावर भरवसा ठेवून त्या 'उचित' वेळेची वाट बघायची.>> सुंदर प्रतिसाद.
.
>>बायो, पुण्य आणि पापही मोजणारे आपण कोण?>> Happy

मस्त वर्णन!

मी गेलो होतो तेंव्हा गिरनारच्या वाटेवर सिंह दिसत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे मनात धाकधुक होती पण पहिल्या पायरीला हात लावल्यावर भिती कुठच्या कुठे पळून गेली होती. मग चढताना वाटू लागले आता सिंह दिसला तर किती मजा येईल! हे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार असे होते. पण ती आयजीच अशी आहे की सगळ्या बायज्या तिच्या भरवशावर असतात. Happy

आपला कम्फर्ट झोन सोडून कम्फर्टची अपेक्षा न करणं म्हणजे तिर्थाटन बाकीचं पर्यटन! >>> क्या बात मंजूताई!

@स्वप्ना, मी जानेवारीत गेलो होतो. तलेठीत (पायथ्याचे गाव) प्रचंड थंडी होती पण ५०० पायर्‍यांनंतर घाम यायला सुरुवात झाली होती. त्यामूळे थंडीची फार काळजी करू नकोस. ग्रूप नाही मिळाला तरी काsssssही हरकत नाही. आयजीला बरोबर घेऊन जा, तिच्या जीवावर काहीही गमजा करू शकशील.