मोजदाद

Submitted by अजिंक्यराव पाटील on 19 September, 2019 - 13:26

तुझी माझी सये एक,
गोष्ट कधीच सरलेली,
तरी देखील कधी कधी
दोघांच्यात उरलेली

डोळ्यातून डोळा चुकवून
वाहे एक चुकार आसू
पुसता पुसता त्याला
ओठी फुटते उगाच हासू..
हसू आणि आसवाच्या
आसपास हरवलेली.....

जुनी पुराणी पत्रे आणि
पारावरले भकास गाणे,
उदास पिंपळ झाकोळणारा
अन डोळ्यात तुझे तरळून जाणे
कोरड्या पिंपळपानासारखी
चाळण मनाची झालेली

चंद्र सुद्धा हल्ली नालायक
शत्रुत्व जुनं उकरून काढतोय,
तुझ्यासवे मोजल्या त्या
चांदण्यांची संख्या विचारतोय
कसं सांगू त्याला अजून
मोजदाद नाही सरलेली....

-राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults