अशी पाखरे येती...२ (काळा शराटी)

Submitted by हरिहर. on 13 September, 2019 - 12:20

अशी पाखरे येती - १

मागील वर्षी भिगवणला असणाऱ्या मित्राचा फोन आला होता की त्याच्या शेताजवळ गेले दोन तिन दिवस काळा शराटी दिसतो आहे. खरं तर त्याचा पहिल्या दिवशीच फोन आला होता पण त्याला सांगितले की अजुन दोन दिवस दिसला शराटी तर पुन्हा फोन कर. मी येवून जाईन तिकडे. त्याप्रमाणे त्याने दोन दिवसानंतर फोन करुन सांगितले की शराटी अजुन येतो आहे. मी गाडी काढून भिगवणला गेलो पण शराटी काही आला नाही. दुसऱ्या दिवशीही दिसला नाही. मग मित्राकडे भिगवणचे मासे खावून परत पुण्याला आलो. एक मात्र अजुनही समजलं नाही की खरच शराटी आला होता आणि मी आल्यावर गेला की मला भिगवणला बोलावण्यासाठी मित्राने माझी आवड लक्षात घेवून शक्कल लढवली होती ते. तो कितीही शपथेवर सांगत असला तरी अशा बाबतीत माझे मित्र विश्वास ठेवायच्या योग्यतेचे नाहीत हे मला माहित आहे. अर्थात त्यावेळी पक्षी पहायला आवडायचे इतकेच. त्यामुळे फारसे वाईट वाटले नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासुन बर्ड फोटोग्राफीचा ताप चढल्यामुळे या शराटीची खुपच आठवण यायला लागली होती. विकीवर त्याची माहिती काढून झाली, पाठ करुन झाली, फोटो पाहून झाले. निघोजला हमखास शराटी दिसतो म्हणून तिकडेही भर पावसात चक्कर मारुन आलो पण हा आयबिस काही दर्शन द्यायला तयार नव्हता. एक दिवस सकाळी पोहे खात बाल्कनीत बसलो होतो. समोर करकोचे असल्यासारखे वाटले. बायकोला म्हणालो देखील की या करकोच्यांऐवजी शराटी आले असते तर काय बहार आली असती. तोवर बायकोने शराटी पाहिला नव्हता. ती म्हणाली निट पहा. करकोचे दिसत नाहीत ते. मी झटपट पोहे बाजूला ठेवले आणि कॅमेरा आणला. ते दोघेही माती खोदत, उकरत आमच्याच दिशेने येत होते. काही वेळाने जरा जवळ आल्यावर त्यांच्या डोक्यावरचे लाल त्रिकोन आणि पंखावरची निळसर झाक एकदम झळाळली आणि मला चक्क दोन शराटींचे दर्शन झाले. त्यानंतर ते तासभरतरी तेथे खाद्य शोधत फिरत होते. भरपुर फोटो काढले. त्यानंतर ते दोन दिवस येत राहीले. मीही सकाळी सकाळी त्यांची वाट पहात होतोच. फोटोही काढले खुप. पण दर्दैवाने तिनही दिवस आकाश ढगाळ असल्याने फोटो ठिक आले नाहीत. मधे गणपती आले आणि शराटी यायचे बंद झाले. ते नेमकी गणेश विसर्जनाच्या दिवशी अचानक अवतरले. पण त्या दिवशीही ढगाळ वातावरण असल्याने फोटो ठिक आले नाहीत. या दिवशी मात्र दोन्ही शराटींनी अन्न न शोधता देवराईच्या पलिकडील बाजूच्या कंपाऊंड वॉलवर तासभर स्वतःची मग एकमेकांची पिसे साफ केली. चोचीत चोच घालून काही गुजगोष्टी केल्या आणि गेले. मला फोटो जरी हवे तसे मिळाले नाही तरी त्यांचे फार व्यवस्थित निरिक्षण करता आले. ते भरपुर वेळ बसलेही असते कदाचीत पण दोन कुत्री त्यांच्या मागे लागली आणि ते उडून गेले. त्यांना निरखत बसणे या सारखा दुसरा आनंद नाही. फोटो जसे आलेत तसे तुमच्यापुढे ठेवत आहे. तुम्हालाही आवडतील.

(मराठी नाव: काळा शराटी किंवा काळा अवाक. इंग्रजी नाव: Red Naped Ibis (रेड नॅप्ड आयबिस) शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa (स्यूडिबिस पॅपिलोसा) आकार: साधारण २७ इंच, म्हणजे तसा बराच मोठा पक्षी आहे हा. रंग: फोटोत दिसत आहेच. नर व मादी एकसारखेच दिसतात. बाकी माहिती गुगलवर आहेच)

प्रचि: १

प्रचि: २

प्रचि: ३

प्रचि: ४

प्रचि: ५

प्रचि: ६

प्रचि: ७

प्रचि: ८

प्रचि: ९

प्रचि: १०

प्रचि: ११

प्रचि: १२

प्रचि: १३

प्रचि: १४

प्रचि: १५

प्रचि: १६

प्रचि: १७

प्रचि: १८

बोनस स्नॅपशॉट. अनंत चतुर्दशीला दिसलेली पिंगळ्यांची पिल्ले. (Spotted Owlet)
प्रचि: १९

प्रचि: २०

फोटोंना कॅप्शन काही सुचल्या नाहीत. तुम्हाला काही सुचल्या तर नक्की सांगा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्लॉसी आईबिस पाणपक्षी (तलावाकाठचे, कमी पाण्यातले पक्षी) आहेत.
हा black ibis काळा शराटी उघड्या माळावरचा आहे. तो बहुतेक गोगलगायींंचे शंख खातो. आँग आँग असा आवाज फक्त उडत असताना काढतो.

मी संजय मोंगा'चे पुस्तक वापरतो - बर्डस ओफ मुंबई. पक्ष्यांच्या स्थानाप्रमाणे (habitat) वर्गवारी दिली आहे. फोटोंसह चार ओळीत माहिती. मुंबई म्हणजे पालघर ते अलीबाग किनारा धरून इगतपुरी लोनावळा हा वरचा सह्याद्रीचा भाग धरून त्यामधला. सलीम अली'च्या पुस्तकात भारतातले सर्व पक्षी ( प्रजातिंच्या वर्गवारीने) वर्णनासह आहेत. जरा गोंधळ होतो. उदा. कबुतर ,बुलबुल यांचे सर्वच भाइबंद आपल्या निरीक्षणाच्या भागात नसतात.
-----
तुम्ही आतापासूनच पक्ष्यांची वर्गवारी करत जा. कोणत्या महिन्यात ,कुठे हेसुद्धा कारण पाहुणे पक्षीही असतात. डिजिटल माध्यमात सहज जमेल.

मस्त! पाषाण लेक ला ग्लॉसी आयबीस भेटलाय, हा नाही दिसला कधी!
--
बर्ड फोटोग्राफीचा ताप
--
>> हे बाकी खरंय, लय जड जातं 1 2 महिने कुठं पक्षी शोधायला गेलं नाही की!!

फार मस्त प्रचि Happy

प्रचि १९ >> दादा, फार वर मान करु नकोस रे...नाहीतर आईलाच सांगेन..माणसांकडे बघत होता म्हणून Happy

शालीदा ,
अप्रतिम फोटो..
पण दुर्दैवाने तिनही दिवस आकाश ढगाळ असल्याने फोटो ठिक आले नाहीत.>>>>>>> फोटो पाहून असं कुठेच वाटत नाही.
प्रचि ४, १७, १९, २० तर झक्कास ...
प्रचि १४ तर अगदी उपदेशामृत देणारा फॅमिली फोटो वाटतोय.
बोनस पिंगळ्यांचे पिल्ले खरोखरच बोनस आहेत.... क्युट

बर्ड फोटोग्राफीचा ताप
हा एकदा का चढला कि मग काही उतरत नाही, आणि तासंतास त्यांच्या हरकती पाहत बसावसं वाटत.

आयबीस दिसतात विचित्र,पण फोटो छान आले आहेत.पिंगळ्याची पिल्ले एकदम क्यूट!
रच्याकने पिंगळा आणि घुबड यात काय फरक आहे? पिंगळा आकाराने लहान असतो इतकेच वाचले होते.

सगळ्यांचे धन्यवाद!

@Srd मी सध्या फक्त नोंदी ठेवतो आहे. पक्षी कधी, कुठे, काय करताना दिसला. रंग, आकार, एखादे लक्षण वगैरे. दिवसाचे वातावरण इत्यादी नोंद करुन ठेवतो आहे. शक्य तितक्या अँगलने फोटो घ्यायचाही प्रयत्न असतो. माझ्याकडे सलिम अलींचे 'भारतीय पक्षी' आणि बिक्रम ग्रेवाल यांचे 'बर्डस् ऑफ इंडीया' हे फिल्ड गाईड आहे.

@देवकी पिंगळा ही घुबडाचीच प्रजाती आहेत. घुबडाच्या अनेक प्रजाती आहेत त्यातला पिंगळा हे आकाराने सगळ्यात लहान घुबड आहे. हे मानवी वस्तीतही आरामात राहते त्यामुळे सहज दिसते. मी फक्त तिन प्रकारची घुबडे पाहीली आहेत. फोटो नाहीत. वावेंनी पाठवलेला गव्हाणी घुबडाचा फोटो देतो येथे.

हे सगळे पक्षी तुम्हाला घरच्या आसपास दिसतात? हायला.....इथे घरातुन दोन चार पोपट, सनबर्ड, कोकिळा, कधीमधी किंगफिशर, एखादा बुलबुल, ताम्बट, गोल्डन ओरियोल दिसला की आम्हाला धन्य धन्य होतंय. तुमचं मागच्या जन्मीच्ं पुण्य थोरच असणार.

शपथ! मी कधीच प्रत्यक्ष पाहिला नाहीये हा पक्षी. काय मस्त दिसतोय!
सुरेख फोटोज.
घरातून असे पक्षी दिसतायत म्हण्जे तुम्ही एकदम लकी आहात खरंच!!