शांताबाई बाबुराव कानफाडे

Submitted by उडन खटोला on 13 September, 2019 - 00:19

आटपाटनगर होते. त्या नगरात एक अत्यंत धार्मिक कुटुंब रहात होते. त्या कुटुंबात ६ सदस्य होते. आई वडील, एक रिक्षा चालवणारा सोनू नामक मुलगा आणि ३ मुली असा एकंदरीत आटोपशीर कारभार होता. अर्थातच ते सर्वजण गणेशभक्त होते. सर्व प्राणी पक्षांवर प्रेम करता करता, देव देव करत हे कुटुंब, गरिबीत जगत होते. १२ वर्ष काहीही न खाता पिता, त्यांनी गणपती प्रसन्न व्हावा म्हणून गाणी गात आणि नृत्य करत तपश्चर्या केली. भरपूर गुलाल उधळला. शेवटी हे उधळलेले गुण आणि गुलाल बघून, कन्फ्यूज झालेला गणपती त्यांना प्रसन्न झाला. तो कुटुंबप्रमुखास म्हणाला, "बाबूराव, काय पाहिजे ते सांगा पण ही भक्ती थांबवा." बाबूरावांनी सहकुटुंब सहपरिवार फेमस होण्याचा आशीर्वाद मागितला. गणपती म्हणाला, "ठीक आहे. जोपर्यंत या भूतलावर माझा उत्सव साजरा केला जाईल, तोपर्यंत तुम्हाला कोणीही विसरणार नाही. माझ्यावर लिहिलेल्या आरत्यांपेक्षा, तूमच्यावर लिहिलेली गाणी जास्त प्रसिद्ध होतील." बाबूरावांनी सद्गदित होवून आपल्या पत्नीकडे म्हणजेच शांताबाईकडे बघितले. शांताबाई धोरणी होत्या. त्या बाप्पाला म्हणाल्या, "वक्रतुंडा, आमच्या ३ मुलींचे, रिक्षावाल्या मुलाचे आणि आम्ही पाळलेल्या प्राणी पक्षांचे काय? " गणपती विचारात पडला. शिवाय त्याला चतुर्दशीलाच पृथ्वीवरून निघायचे होते. ( फार पूर्वी तशीच पद्धत होती. ) तो म्हणाला, "ठीक आहे. त्यांच्यावरही गाणी तयार होतील. ती प्रसिद्धही होतील. तेही अमर होतील." असा स्वतःचा आशीर्वाद एक्सटेंड करून गणपती अंतर्धान पावला. आनंदीत झालेल्या बाबूरावांनी, तिन्ही मुलींना बोलावले. त्यांच्या ३ मुली म्हणजेच मुन्नी, शीला आणि पारू या पलीकडेच विविध मुलांबरोबर डॉक्टर डॉक्टर खेळत होत्या. त्या बाबूरावांकडे पोचल्या. गल्लीतल्या नाक्यावर विनाकारण वाट बघत असलेला रिक्षावालाही तिथे पोचला. मग चिक्क मोत्यांची माळ घातलेल्या शांताबाईनी, पाळलेला नवीन पोपट, शेजारची काळी मैना, ऑऑऑ करणारा कोंबडा, लंगडी घालणारी कोंबडी, तसेच एक डुलणारा नागोबा व बरीच वर्षे न मेलेला एक मुंगळा यांसकट सर्व कुटुंबाची साश्रू नयनांनी दृष्ट काढली. अशा प्रकारे हे धार्मिक कुटुंब तेव्हापासून प्रसिद्ध झाले.

तात्पर्य : उगाचच या गाण्यांना नावे ठेवू नयेत. यांना दैवी वरदान आहे. शिंत्रोपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे.

( संपादित )
स्रोत : साभार , मिलिंद शिंत्रे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हीन अभिरुची च्या लोकांनी अत्यंत हीन दर्जाची ही गाणी गेले दहा दिवस वाजवून नुसता वात आणला होता.

प्रॉब्लेम काये नक्की? गाणी की आवाज की सार्वजनिक गणेशोत्सव? यापैकी काही गाणी आवडतात मला. ठेका चांगला आहे.

लेख मजेशीर आहे. वैताग समजू शकते.

मजेशीर!!!
बाकी सगळे संदर्भ लागले पण 'बरीच वर्षे न मेलेला मुंगळा' हे काही समजले नाही

Lol

Lol काय imagination काय imagination. भारी... मी तर मुंगळ्याला विसरले की काय असे वाटून उदास होत होतो.