मुक्तविहारी

Submitted by सामो on 10 September, 2019 - 09:43

संघर्षाचीही सवय होऊन जाते इतकी की अचानक तो आयुष्यातून निघून गेल्यानंतर पोकळी जाणवते. तिला जर कोणी हे ६ महिन्यापूर्वी सांगितले असते तर नवल वाटले असते, तडजोड फक्त अंगवळणीच पडत नाही तर आयुष्याचा ती अविभाज्य हिस्सा बनून जाते. यु मिस एडजस्टमेन्ट. मिळालेल्या स्वातंत्र्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. पर्याय आ वासून चोहो बाजूंनी खाऊ पहातात. सकाळ उजाडते ती फक्त आपल्यासाठी, स्वतः:साठी याबद्दल गुन्हेगारीची भावना निर्माण होते. चहा आणि विविधभारतीवरील बातम्या घ्या ना किंवा एक फनकार, फौजीभाईयोकी सिफारीश, रंग एक रूप अनेक , हवामहेल ..... . वाह! खरं तर हे असे विना कटकट विना झगडा ऐकायला मिळणं हे वैभव. आपल्या वेळेवरती आपला हक्क असणं हे अप्रूप. मग तिला ते उपभोगता का येत नव्हते?
अर्णव अचानक हार्ट अटॅक येऊन गेला काय, २-४ नातेवाईक आणि परिचित मित्र मैत्रिणींनी सांत्वन केले काय. सर्व अचानक, अनपेक्षितपणेच घडले. सावरायला वेळच मिळाला नाही.तरी अरु म्हणाली - "आई माझ्याबरोबर पेन्सिल्व्हेनियाला चला." आपण तिला उत्तर दिले - "मला माझे नशिबाचे तुकडे वेचून घेऊन इथेच कोलाज करू देत.तुला तुझे स्वतंत्र आयुष्य असेल, उमेदीचा काळ असेल , मी माझे बघून घेईन. मला इथली इतकी सवय झालेली आहे की परत कुठल्या तरी नवीन जागी जाऊन अड्जस्ट व्हावेसेही वाटत नाही." यावर अरुने हट्ट धरला, मनधरणी केली, रुसली, तिच्यातही शेवटी अर्णवचाच हेकटपणा होता. हां तितका पराकोटीचा नसेल पण काही प्रमाणात होताच. शेवटी अगदीच नाईलाज झाल्यावरती अरु परत गेली. अरु परत गेली आणि श्रियाचा नवा जन्म झाला. नवीन वेगळेच आयुष्य सुरु झाले. नवे दालन उघडले गेले.
सकाळी उठल्यावर आपली कॉफी बनविण्या आधी, अर्णवची कॉफी बनवायची तेदेखील 'कार्नेशनची एक पाकीट, ३/४ कॉफी, बाकीचे क्रिमर आणि दीड चमचा साखर." ते झाले की आपल्या चहाचे आधण ठेवायचे. मग रेडिओ ऐकायचा तर सवालच नसायचा, त्याचीच इंग्रजी गाणी वाजू लागायची. सकाळ ही काय इंग्रजी गाणी लावायची वेळा आहे का! भक्तीगीत, भावगीतांचा वेळ ती पण सांगणार कोण आणि पटणार कोणाला. मग मुकाट्याने ढणांण ढण संगीताच्या माऱ्यात कामे आटपून डबा घेऊन ऑफिसलाय जायचे. संध्याकाळी तशीच गाणी, तेच ते संवाद, वाद, वागण्यावर , खाण्यापिण्यावरती बंधने का तर उतारवयात आजारी पडलो तर ...... आर्थिक, शारीरिक, मानसिक भार कोणी उचलायचा. शेवटी झाले काय? तोच गेला ना आपल्याआधी. ना त्याचा भार आपल्यावरती पडला, ना आपला त्याच्यावरती. मग का मन मारून जगत राहिलो आपण - का त्याने निवडलेले अन्न खात राहिलो, त्याने सांगितलेले सारे मुकाट गरीब गाईसारखे ऐकत राहिलो. खायचं काय, झोपायचं केव्हा, ऐकायचं काय, व्यायाम किती-केव्हा , करायचा, खर्च किती कसा, कशावर करायचा, प्रत्येक पैचा हिशोब द्यायचा, पगारातला कितवा हिस्सा रिटायरमेंट फंडात टाकायचा. हे काय आयुष्य होतं? सतत दडपण. दिनदहाडे गुलामी होती ती.
श्रिया तो विचार झटकून उठली, कारण कोळसा कितीही उगाळा काळाच राहाणार होता. तिचे त्याच्यावर प्रेम नव्हते असे नाही पण इतके करकचून आपण बांधले जाऊ, नात्यात थोडीही स्पेस उरणार नाही, आपले व्यक्तिमत्व पूर्ण झाकोळून जाईल हे तिला कुठे माहीत होते आणि या ऑपरेसेसिव्ह गुदमरलेपणात त्याच्यावरच्या प्रेमाचे रंग कधी उडाले कळलेच नाही. असो.
पहाटे, तिने मस्त चहा केला, विविधभारती लावली,आरामात आंघोळ केली. ड्न्किन डोनटस चा ब्रेकफास्ट ती घेणार होती. सकाळी घेतलेला, एक एग न चीझ क्रोसाँ दुपारी चारापर्यंत आरामात पुरतो. पहिले काही दिवस हे अचानक मिळालेले स्वातंत्र्य भारी गेले. पावलापावलांवरती गुन्हेगार वाटत राहीले. अर्णव कुठे असेल, तो बघत असेल तर त्याला काय वाटेल... आपण त्याच्याशिवाय मजा मारतोय, हवे ते खातोय-पितोय-लेवतोय. हे नक्की बरोबर आहे का? मोठ्या बाईच्या शरीरात, मानसिक वाढ खुरटून लहानच राहिलेली मुलगी होती श्रिया. ना स्वतः:ची मते होती ना आग्रह, ना आत्मविश्वास ना आयडेंटिटी. वेळोवेळी अर्णवचं ॲप्रुवल शोधणारी, आत्मविश्वास पार गमावून बसलेली. दाव्याला बांधली गेलेली.
पण ६ महीन्यात हळूहळू सुरवंटाचे फुलपाखरू होत होते, स्वतः:ला हवे तसे वागले तर काडीचेही गुन्हेगार वाटून न घ्यायला ती शिकत होती. ५३ व्या वर्षी का होईना, तीच मनस्वी आयुष्य सुरु झाले होते. पहाट फटफटत होती, सूर्य उगवायच्या आधी क्षितीजावरती लाल, जांभळ्या, केशरी रंगांची उधळण झालेली होती आणि विविधभारतीबवर पद्मजा गोळे यांचे गाणे लागले होते -
.
मी एक पक्षीण आकाशवेडी
दुजाचे मला भान नाही मुळी
डोळ्यात माझ्या असे एक आकाश
श्वासात आकाश प्राणातळी.
.
स्वप्नात माझ्या उषा तेवते
अन निशा गात हाकारीते तेथुनी
क्षणार्धी सुटे पाय नीडांतुनी
अन विजा खेळती मत्त पंखातुनी.
.
अशी झेप घ्यावी, असे सूर गावे
घुसावे ढगामाजी बाणापरी,
ढगांचे अबोली भुरे केशरी रंग
माखुनी घ्यावेत पंखांवरी.
.
गुजे आरुणी जाणुनी त्या उषेची
जुळे का पहावा स्वरांशी स्वर
बघावी झणत्कारिते काय वीणा
शिवस्पर्श होताच तो सुंदर.
.
किती उंच जाईन, पोचेन किंवा
संपेल हे आयु अर्ध्यावरी,
आभाळ यात्रीस ना खेद त्याचा
निळी जाहली ती सबाह्यांतरी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच छान... २ दिवसांपूर्वी ,,एका नव्यानेच ओळख झालेल्या ताईंना पाहून असेच विचार आले होते मनात.

सामो, तुमच्या कथेतील नायिका योगायोगाने स्वातंत्र्य अनूभवू शकली. पण हा नशीबाचा भाग झाला. आता अशी नायिका रेखाटा, जी संघर्ष करुन पुन्हा कणाकणाने आत्मविश्वास गोळा करेल आणि डॉमिनेट करणार्या व्यक्तिला देखील टक्कर देईल. कृपया नक्की आणि लवकर लिहा Happy