हास्य लहरी - सर्टिफिकेट! - अज्ञातवासी

Submitted by अज्ञातवासी on 10 September, 2019 - 05:23

शाळेत अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मी शिकलो होतो...
कॉलेजला इंटरनेट (वेगवान इंटरनेट) ही गरज त्यात ऍड झाली...
पण सर्टिफिकेट?????
आता कुणी सर्टिफिकेट म्हटलं तरी मी भ्याSSSSS करून रडतो.
त्यादिवशी असाच सुंदर दिवस होता. चार दिवसांच्या रिपरिपीनंतर मस्त उन पडलं होतं. फक्त बत्तीस किक मारल्यावर माझी स्कुटर चालू झाली होती, आणि त्यावर पेंडश्या कुत्सित हसला होता.
...माझं एक स्वप्न आहे, दसऱ्याला राम बनून या पेंडश्याच्या बेंबीवर भोक पडलेल्या बनियनवर नेम धरून या सोसायटी रावणाचा वध करावा...
"अहो पटवर्धन, नवीन घ्या की, स्कुटर..." पेंडश्या मुद्दाम सगळ्या सोसायटीला ऐकू जाईल अशा आवाजात ओरडला.
"खानदानी स्कुटर आहे आमची, आणि आम्हीसुद्धा खानदानी आहोत." (तुझ्यासारखा उपऱ्या नाही, हे मी मनातच गिळलं.)
टीप: आधी सोसायटीच्या जागेवर चाळ होती. ती पाडून फ्लॅट सिस्टीम बांधण्यात आली. चाळीतून फ्लॅटमध्ये गेलेले भूमिपुत्र आणि नविन रहायला आलेले उपरे असा सुप्त संघर्ष सोसायटीत चालत असे.
"खानदानी...हे...हे..." पेंडश्या नसलेले दात दाखवत हसला.
"हो... खानदानीच... दूधवाला दूध घालत नाही म्हणून शेजारच्या मुळीक वहिनीचं दूध चोरत नाही आम्ही."
मुळीक वहिनी तेव्हाच तुळशीला पाणी घालत होत्या हे गोष्ट मी मुद्दाम नजरेआड केली.
चालू झालेली स्कुटर घेऊन सोसायटीच्या बाहेर पडलो.
...अर्थात मुळीक वहिनींनी केलेला पेंडश्याच्या सात पिढ्यांचा उद्धार ऐकूनच...
मी ऑफिसला पोहोचलो. स्कुटर मुद्दाम राघवनच्या अल्टोसमोर लावली.
साला! अल्टोच्या गमज्या मारतो होय. बघ, निघायच्या वेळेस कसा माझ्या पाया पडत येईल.
"तू आजबी तुझा स्कुटर माझ्या गाडीसमोर लावला काय?" प्रवेश करताच त्याने विचारले.
"नाय!" मी साळसूदपणे उत्तरलो.
मी पटापट लॅपटॉप ऑन केलं. कालच्या मेल्सचा ढिगारा माझ्यासमोर होता.
"पटवर्धन, साहेबांनी बोलावलंय." बापू शिपाई येऊन म्हणाला.
सांग त्यांना, अर्धा तासात आलो...
हो, एवढी वटच होती माझी ऑफिसात.
अर्ध्या तासात चहा घेऊन, कँडी क्रशच्या दोन अवघड लेवल पार करून मी बॉसच्या केबिनमध्ये शिरलो.
"पटवर्धन, आला काय, या ना, बसा."
मी बसलो.
"तो कुलकर्णी उद्योगचा जरा इशू आला होता, पण यु डोन्ट वरी, मी सीसीमध्ये होतो. मीच सोडवला."
"गुड!" मी उत्तरलो.
मागे असाच एक इशू आला होता, पण 'मी मेल पाठवला, आणि तुम्हाला सीसी मध्ये ठेवलं, तेव्हाच तुम्हाला चूक का लक्षात आली नाही? मग तुम्हाला सीसीत ठेवण्याचं प्रयोजन काय? तुम्ही आमच्या चुकांमध्ये सुधारणा करावी म्हणूनच तुम्ही आमचे बॉस ना, नाहीतर तुमचं काम काय?' असा प्रश्न विचारुन मी त्याला निरुत्तर केलं होतं.
"तर आज तुम्हांला फक्त एक काम, जरा बाहेरचं काम आहे, पण यु डोन्ट वरी, पेड लिव घ्या. ऑफिसची गाडी घ्या, बाहेरचं जेवा, बिल ऑफिसला लावा..."
बोकड कापण्याआधी त्याला खाउपिऊ घालून ताजतवानं केलं जातं हे मी का विसरलो होतो????
"...मात्र काम पूर्ण झाल्याशिवाय परत येऊ नका..."
"म्हणजे?" माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच.
"म्हणजे हे बघा."
त्याने एक जाडजूड किल्ली हातात घेतली...
तो आपल्या जाडजूड खुर्चीतून उठला...
त्याने ती किल्ली एका जाडजूड कुलुपाला लावली...
...आणि कुलूप काढून त्या जाडजूड दरवाज्यातून एक जाडजूड पेटी बाहेर काढली...
ती पेटी त्याने माझ्यासमोर ठेवली. मनःपूर्वक हात जोडून तो काहीतरी पुटपुटला...
...आणि त्याने ती पेटी उघडली...
त्या पेटीमधून दिव्य प्रकाश का काहीतरी पडतोय असा मला उगीच भास झाला.
त्या हस्तिदंती पेटीत, सोनेरी कलाकुसर असलेल्या पेटीत, मलमलच्या कापडात, एक साधा...
...कागद होता...
कोरा कागद...
"करा!"
"काय करू," मी विचारले.
"हात पुढे करा."
मी हात पुढे केले, आणि त्याच्या घरादाराची सनद माझ्या नावावर करून द्यावी अशा रीतीने त्याने तो कागद माझ्या हातावर टेकवला.
"ह्या अशाच कागदावर, अगदी अश्याच, फक्त पन्नास सर्टिफिकेट प्रिंट करून आणायचेत. उद्या हरितक्रांती कॉम्पिटीशन आहे ना, सीएम येणार आहेत. स्पर्धकांना हे सर्टीफिकेट वाटायचे आहेत."
"सर्टीफिकेटचं मॅटर डिझाइन आपल्याला जमणार नाही," मी उत्तरलो.
बार्गेनिंग करायला रस्त्यावरचा भिकारीही आपला हात धरू शकत नाही...
"ते तर आम्हांला माहीतच आहे. हे घ्या." त्याने एक पेनड्राईव्ह पुढे सरकवला.
"यात सगळं मॅटर आहे. बेस्ट ऑफ लक..."
मी कागद घेतला, आणि निघालो. लवकरात लवकर हे काम करून मला घरी जाऊन घोरत पडायचं होतं.
"वेट! हा नंबर जवळ ठेवा. मधुसूदन लाल. मागच्या वर्षी हाच सर्टिफिकेट प्रिंट करायला गेला होता."
माझं व्हाट्सअप्प वाजलं, पण मी त्याच्याकडे ढुंकूनही बघणार नव्हतो.
मी बाहेर आलो, लॅपटॉप ऑन केला, पेन ड्राईव्ह लावला आणि मॅटर उघडलं.
अहाहा! काय ती मॅटरमध्ये हिरवाई... बॉर्डर म्हणून पानाफुलांची डिझाईन होती. बॉर्डरमध्ये सगळी वनराई खच्चून भरली होती. एखादा अरसिक ही काय गिचमीड करून ठेवलीये, असा ओरडला असता, पण याला शुद्ध मराठीत अबस्ट्रॅक्ट म्हणतात हे मी जाणून होतो.
बोर्डरच्या चारी कडांमधून हिरवे साप हिरवी जीभ काढून एकमेकांकडे बघून फुत्कारत होते...
वॉटरमार्क किंवा बॅकग्राऊंड म्हणून एक पानाफुलांची चड्डी घातलेला पुनीत इस्सरचा फोटो होता. ते बघून क्षणभर मलाच लाजल्यासारखं झालं.
मधला मजकूर वाचण्याच्या भानगडीत मी पडलो नाही.
पेन ड्राईव्ह घेतला, बॅग घेतली आणि सरळ पार्किंगला आलो.
बबन्या माझी वाटच बघत होता...
बबन्या म्हणजे माझा जानी दोस्त. कंपनीच्या गाडीवरची ड्रायव्हरची गादी तो चालवत असे. बबन्याला ओढायला बिडी आणि मळायला तंबाखू दिली की तो साखरेसारखा विरघळत असे.
"बबन, चल... आज एन्जॉय." मी आवाज दिला.
"कुठे घेऊ साहेब?"
"कॉलेज रोड..." मी म्हणालो.
कॉलेज रोड. तरुणाईचा पूर असलेलं ठिकाण... मीही तरुणपणात ट्राय मारला होता, पण...
...मी कधी त्या पुरात ओलं झालोच नाही,
माझ्या आयुष्यात ओलं करणारा पूर आलाच नाही...
मी जुन्या आठवणी झटकल्या. गाडीतून उतरलो.
समोरचं प्रिंटिंग, झेरॉक्स असली कामे करणारी अनेक दुकाने होती.
...आणि मी माझ्या विनाशाकडे पहिलं पाऊल टाकलं...

स्थळ - कॉलेज रोड!

पहिल दुकान:

सवाल - कागदावर कलर प्रिंट करून हविये.
जवाब - आम्ही कलर प्रिंट करत नाही

दुसरं:

सवाल - कागदावर कलर प्रिंट करून हविये.
जवाब - पेन ड्राईव्ह लावा
सवाल २ - या अशाच कागदावर करून हविये.
जवाब - असा कागद मिळणार नाही.

तिसरं:

सवाल- कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये.
जवाब - आम्ही प्रिंटिंगची कामे करणारे दिसतो का तुम्हांला?
...आणि मी त्या मेडिकलमधून बाहेर पडलो... चुकूनच समोर कॉम्प्युटर बघून घुसलो होतो...

चौथे:

सवाल - जर तुम्ही प्रिंटींगची कामे करत असाल, तर मला कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये.
जवाब - घुसवा!
"काय?" मी दचकून ओरडलो.
"अहो पेनड्राईव्ह घुसवा," तो शांतपणे म्हणाला.
मी पेनड्राईव्ह घुसवला, सॉरी, सिपीयूमध्ये खुपसला.
त्याने फाईल ओपन केली.
...समोरचं मॅटर बघून तो आधी खिदळू लागला, आणि मग पोट धरून हसू लागला.
त्याची अवस्था बघून त्याचे दोन साथीदार आले, त्यापैकी एकाची तीच अवस्था झाली...
...आणि दुसरा आजूबाजूच्या लोकांनाही हा अमूल्य आनंदाचा ठेवा बघायला मिळावा, म्हणून बोलवायला गेला...
आंबटशौकीन कुठचे!
मी गपचूप खुपसलेला पेनड्राइव काढला, आणि निघालो.

पाचवं दुकान:

सवाल - जर तुम्ही प्रिंटींगची कामे करत असाल, तर मला कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये. तेही मधल्या मॅटरकडे ढुंकूनही न बघता.
जवाब - येस माय चाईल्ड, आत ये.
पांढऱ्याशुभ्र कपड्यातला तो, पांढऱ्याशुभ्र दंतपंक्ती दाखवत हसला.
"कम इंटू दि वर्ल्ड ऑफ जीजस!"
"एका साध्या सर्टिफिकेटसाठी मी धर्म बदलणार नाही. " मी निक्षुन सांगितले.
त्याच्या चेहऱ्यावर नाराजीची छटा उमटली.
मी त्याच्या हातात तो कागद सोपवला आणि पुन्हा कॅसेट लावली...
'जर तुम्ही प्रिंटींगची कामे करत असाल, तर मला कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये. तेही मधल्या मॅटरकडे ढुंकूनही न बघता.'
"धिस पेपर इज सो स्पेशल," आता त्याने त्याची कॅसेट लावली.
"वन ऑफ अ काइंड. बघ, रफ आणि गुळगुळीत दोन्ही बाजू आहेत याला."
त्याने रफ बाजूने गाल खाजवला, आणि स्मूथ बाजूने गाल चोळू लागला...
"येSSSSS" मी तो पेपर हिसकावून घेतला. "आहे का तुमच्याकडे."
"नाय बुवा." तो पांढरे दात विचकत उत्तरला.
मी डोक्याच्या झिंज्या उपटत बाहेर पडलो...

एव्हाना मी प्रत्येक दुकानात फिरत असल्याने लोकांच्या संशयी नजरा माझ्याकडे वळत चालल्या होत्या...
बऱ्याच जणांना मी मुलं पळवणाराच्या टोळीतील वाटत होतो, असं मला वाटतं होतं.
एक बाई तर तिच्या रडणाऱ्या मुलीला 'शांत, नाहीतर भोकाडी तुला पळवून नेईल,' असं माझ्याकडे बोट दाखवून सांगत होती.
माझ्या सहनशीलतेचा अंत बघितला जात होता...

सहावं दुकान:

सवाल - जर तुम्ही प्रिंटींगची कामे करत असाल, तर मला कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये. तेही मधल्या मॅटरकडे ढुंकूनही न बघता, आणि कागद गालावर न चोळता.
जवाब - आम्ही कायला चोळू?
मी गप राहिलो. त्याचा प्रश्न रास्त होता...
आणि माझाही अनुभव ताजा होता...
"कागुद दाखवा."
मी गुमान त्याच्या हातावर कागुद टेकवला.
"पम्या बघ रे."
मी पम्यारावांकडे मोठ्या आशेने वळलो.
पम्या तिकडे कुणा सुंदरीशी बोलत होता.
"काय ग सुंदरे, शितली दिसत न्हाय कधीची," तो लडिवाळपणे म्हणाला.
"लगीन झालंय तिचं," सुंदरी खिदळत म्हणाली.
पम्याच्या हातातून झेरॉक्सचा गठ्ठा पडला. त्याच्या डोळ्यातून टचकन दोन अश्रू ओघळले...
त्याने तिथल्याच एका पेपरला अश्रू पुसले. घर्मबिंदुही पुसले...
आणि शो मस्ट गो ऑन या रीतीने तोच पेपर झेरॉक्ससाठी सरकवला...
मी माझा कागुद त्याला दिला.
त्याच्या तोंडातून अस्पष्ट 'नाही' असा उद्गार पडला.
पम्याच्या प्रेमकहाणीचा आणि माझ्या आशेचा दि एन्ड सोबतच झाला...

बारा वाजले होते घड्याळात आणि माझेही,
मी हताश होऊन गाडीत बसलो.
"पायजे काय?" बबन्या तंबाखू माझ्यासमोर करत म्हणाला.
मी तंबाखू खाणारा वाटलो का याला?
हे रागाने नव्हे तर आश्चर्याने म्हणत मी तंबाखू हातात घेतली...
"साहेब, एक सांगू का."
"बोला."
"आधी कागद शोधा, प्रिंटा शंभर मिळतील..."
एवढंसं लॉजिक माझ्या डोक्यात कसं आलं नाही?
"बबन्या, बबड्या!!!!" मी बबन्याला हर्षारितेकाने मिठी मारली.
ते बघून काही कॉलेज कन्यका कुत्सितपणे हसल्या.
बबन्या पूर्णपणे ओशाळला.
"चल गाडी काढ, प्रधान पार्कला..."मी अजूनही मिठी सोडली नव्हती.
बबन्याने निमूट गाडी काढली.
"एन्जॉय..." काही टवाळ पोरं मागून ओरडत होती.
प्रधान पार्कला गाडी पार्किंग करायला जागा मिळत नाही, म्हणून बबन्याने मला अर्धा किलोमीटर आधीच सोडलं.
धसकाच घेतला होता त्याने माझा...
पुन्हा प्रधान पार्कातील दुकाने बघून माझं हृदय धडधडू लागलं.

स्थळ - प्रधान पार्क

पहिलं दुकान -

सवाल - हा असा पेपर हवाय
जवाब - नाहीये

दुसरं दुकान, तिसरं आणि चौथे दुकान

सवाल - असा कागद हवाय
जवाब - कधीचा बंद झालाय.

पाचवं दुकान

सवाल - (कागद दाखवून) हवाय
जवाब - (मानेनेच नाही)

सहावे दुकान

सवाल - (कागद दाखवून 'दे बाई भाकर तुकडा' असे दीन भाव)
जवाब - (हातानेच पुढे चला)

सातवे दुकान

सवाल - (कागद दाखवला) आहे
जवाब - हे मोबाईलच दुकान आहे

आठवे दुकान

सवाल - खणखणीत आवाजात आहे का कुणी, गिर्हाईक आलंय, गिऱ्हाईकाला पाणी पाजा, वारा घाला. गिर्हाईक आता थकलंय, शांत झालंय, या निष्ठुर दुनियेच्या ठोकरा खात.
जवाब - माझ्यापेक्षाही खणखणीत आवाजात टू बी और नॉट टू बी...
...सोडा, सोडा म्हणत होतो, तरीही त्या नराधमाने अर्धा तास मला स्वगत ऐकवल्याशिवाय सोडलं नाही.

नववे दुकान -
सवाल - (कागद दाखवला)
जवाब - आहे...
मी हर्षारितेकाने नाचू लागलो... अजि सोनियाचा दीनु गाऊ लागलो... जमिनीवर गडबडा लोळू लागलो.
माझ्यातला बार्गेनर तेवढ्यात जागा झाला.
"केवढ्याला?"
"आम्ही पैसे घेऊन कागद विकत नाही."
माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं, असा पुण्यात्मा, धर्मात्मा माणूस पृथ्वीतलावर? परमेश्वरा, लक्ष दे...
"शंभर द्या!" ऊस गोड लागला म्हणून कोपरापासून...
'पाच किलो रद्दी द्या." इति पुण्यात्मा.
"रद्दी? कशाला?" मी.
"आम्ही रद्दीवर कागद विकतो."
"अहो साहेब, पैसे घ्या ना, मी गयावया करत म्हणालो.'
"ते आमच्या तत्वात बसत नाही."
'रद्दी घेऊन कागद देण्यात काय तत्व आलं?' असा प्रश्न मी गिळला.
"आणतो... तुम्ही ऐवज सांभाळून ठेवा."
आणि मी रद्दी आणायला निघालो.
रद्दीचं दुकान शोधत तीन वाजले.
बबन्याने दोन वडापाव मारले होते, माझ्या पोटात अन्नाचा कण नव्हता...
पण आधी लगीन कागदाचं...
पाच किलो रद्दी घेऊन मी त्या धर्मात्म्याकडे आलो.
"चालणार नाही." तो शांतपणे उद्गारला.
"का?" मी ओरडलो.
"इंग्लिश पेपर आहेत, वजन जास्त भरतं, पेपर कमी येतात."
"अहो तुम्ही सांगायचं ना, इंग्लिश पेपर चालत नाहीत."
"तुम्ही विचारलंत?"
मी निमूट रद्दीवाल्याकडे गेलो.
निवडून निवडून, शुद्ध मराठी पेपर काढून, एखाद्या इंग्लिश पेपरने रद्दी बाटवली तर नाही ना, हे चेक करून धर्मपंडीतासारखा मी त्याच्याकडे गेलो.
"शुद्ध मराठी पेपर!" मी रद्दी आदळली.
"चालणार नाही," तो शांतपणे उद्गारला...
"का?"
"देशदूत जास्त आहेत, पान खराब येतं."
"ओ साहेब, द्या ना आता, भलेही रद्दी घ्या वरून पैसे घ्या..."
"ते आमच्या तत्वात बसत नाही."
मी रडवेला झालो,
"साहेब एकदाच सगळ्या रिकवायरमेन्ट सांगा ना."
"घ्या लिहून." ते उत्साहाने सरसावले.
१. इंग्रजी पेपर चालणार नाही.
२. मराठीत देशदूत, दिव्य मराठी, पुढारी संध्यानंद, नवाकाळ चालणार नाही.
३. सामनाची रविवारची पुरवणी चालणार नाही. (शिरीष कणेकर त्यांना आवडत नाहीत.)
४. कुठलंही हस्ताक्षर असलेला पेपर चालणार नाही. (वाचकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण आमच्या तत्वात बसत नाही.)
५. स्टेपल केलेला, नीट घडी न घातलेला, मध्येच घडी घातलेला, विनाकारण घडी घातलेला, घडी विस्कटलेला, घडी मोडलेला, घडीवर घडी घातलेला, कोपरा दुमडलेला पेपर...
...चालणार नाही...
मी पुन्हा रद्दीवाल्याकडे गेलो. तीन तास प्रत्येक पेपरचा एमआरआय, सिटी स्कॅन, एक्स रे, सोनोग्राफी सगळं करून मी ती रद्दी आणली...
"चालणार..."
तो पुढे काही म्हणायच्या आतच मी मनात स्वगते म्हणून घेतली.
'नका रे, नका रे असा अंत पाहू, शेवटी मीही माणूस आहे, हाडा मांसाचा माणूस. मलाही मन आहे, जीव आहे, हात आहेत, पाय आहेत. सगळं आहे हो...'
"चालणार आहे... " त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं...
माझ्या डोळ्यातही आनंदाश्रू आले.
शंभर लखलख चमकणारे,सो स्पेशल, वन ऑफ अ काइंड, रफ आणि गुळगुळीत दोन्ही बाजू असलेले कागद घेऊन मी बाहेर पडलो...
"बबन्या," मी क्षीण आवाजात उत्तरलो, "जिंकलो आपण..."
"...नाही पार्था नाही, बघ, बघ हे शंभर कौरव कसे फडफड करतायेत, मार यांच्यावर सर्टिफिकेटचा शिक्का, आणि फेक बॉस नामक धृतराष्ट्रासमोर..."
सकाळपासून गाडी चालवून बबन्या स्वतःला कृष्ण समजत होता...
...आम्ही गाडी काढली...
...पुनः कॉलेजरोड!

पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं दुकान.
या कागदावर आमच्याकडे प्रिंट होत नाही.

पाचवं दुकान...
येस माय चाईल्ड,
...आणि मी तिथून धूम पळालो.

सहावं दुकान...
पम्याराव... डोळे थिजलेले, रडून चेहरा सुजलेले...
मी चौकशी करायच्या भानगडीत पडलो नाही...
प्रेमभंगाच्या दुःखात लोक जगाला आग लावतात, पम्या मलाच आग लावायचा...

ते १०० कागद माझी शंभरी भरली असं समजून फडफडत होते!!!
"साहेब, ह्ये तर पोरीचं लग्न करण्यापेक्ष्या मोठं काम झालं..." बबन्या उत्तरला
"लग्नाची पत्रिका छापून मिळेल, पण ही नाही," मी उत्तरलो!
लग्नपत्रिका...
प्रिंटिंग प्रेस...
माझी ट्यूब पेटली, मी गाडीत बसलो.
बबन्याने गाडी सुसाट सोडली...

स्थळ- रविवार कारंजा

दुकान १ -

सवाल - जर तुम्ही प्रिंटींगची कामे करत असाल, तर मला कागदावर कलर प्रिंट करून हविये, आणि अशाच कागदावर हविये. तेही मधल्या मॅटरकडे ढुंकूनही न बघता, आणि कागद गालावर न चोळता.
जवाब - आम्ही बाहेरची कामे घेत नाहीत.

दुकान २

सवाल - सेम
जवाब - आम्ही बाहेरच्या कागदांवर प्रमाणपत्रे छापायची, तर आमचे कागद पुंगळी करून....
...मी पुढचं न ऐकताच बाहेर पडलो.

दुकान ३

सवाल - सेम हो
जवाब - आम्ही बाहेरच्या मॅटरवर काम करत नाही.

दुकान ४

सवाल - सेम
जवाब -.... (काहीच नाही)

दुकान पाच

सवाल - तोच तो!
जवाब - साहेब जमेल हो, पण आज जरा दहाव्याची घाई आहे.
"कुणाच दहावं?" मी विचारलं
त्याने एका पासपोर्ट फोटोकडे बोटं दाखवला.
"तुम्ही दशक्रिया विधीही करतात."
"विधी नाय ओ, दहाव्याचे कार्ड छापायचेत."
मी घड्याळाकडे बघितलं.
"अहो माझं काम आधी करा, नाहीतर माझं दहावं घालायची वेळ येईल."
"बरं..." त्याने एक विजिटिंग कार्ड माझ्या हातात दिलं. "तुम्ही स्वतः विचारायला आलात म्हणून तुमच्या कार्डांवर दहा टक्के सूट."
"कार्ड नाही, सर्टिफिकेट..."
"मी दहाव्याच्या कार्डची गोष्ट करतोय. ठेवा ते कार्ड, वेळेवर पंचायत नको..."
हा नराधम माझ्या दहाव्याची तयारी करत होता...
मी रागाने त्याचं कार्ड फेकलं...
...आणि त्याच्या पायाशी लोळण घेतली...
"आता या शेवटच्या क्षणी, तूच माझा तारणहार आहेस. जोपर्यंत हे सर्टीफिकेट छापून होत नाहीत, तोपर्यंत मी तुझे पाय सोडणार नाही..."
"अहो सोडा, पायजमा सुटेल माझा..."
"सुटू दे, आज इस भरे बाजार मैं दोनो की इज्जत का लिलाव होणे दे..."
मी वेडा झालो होतो...
त्याचे दोन्ही पाय कवटाळून मी रडू लागलो...
त्याने माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याच्या पायांना घट्ट आवळलं...
तो धाडकन पडला...
...आणि माझ्या कानावर ती आरोळी आली...
"...साहेब...करतो... सोम्या, सोड ते दहावं, नाहीतर हे येडं माझं दहावं घालेल."
माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आनंदाश्रू ओघळणार, तेवढ्यात मी स्वतःला आवरलं.
सोम्याने घाबरत माझ्याकडून पेन ड्राइव्ह घेतला...
त्याने पेन ड्राईव्ह खुपसला...
मी प्रिंटरला कागद खुपसले.
छपाई सुरू झाली....
"साहेब चहा घेणार का," सोम्याने विचारलं...
"हो!" मी आनंदाने म्हणालो.
"जा समोरच्या टपरीवर, मस्त चहा मिळतो. येताना माझ्यासाठी विमल आणा...केशर, इलायची..."
त्याचा गाल थोबडावून त्यावर केशरी रंग आणून त्याची 'बोले जुबा केसरी!' करायची अनावर इच्छा माझ्या मनात आली.
मी समोर गेलो, चहा घेतला. बबन्यालाहि दिला.
आणि विमल आणून त्याच्या नरड्यात घातली...
"साहेब... हे सर्टिफिकेट... "
झालं? झालं छापून? इतक्यात... अरे माझा जीव आटवून, पिळटळून, आत्माच्या चोथा करून टाकणारं काम तुला इतकं सहजसाध्य व्हावं?
फेकून द्यावी हि पांढरपेशा समाजाची लक्तरे, टाकावी प्रिंटिंग प्रेस... एन्जॉय करावं लग्न...
...आणि दहावंसुद्धा...
मी पहिलं सर्टिफिकेट नवजात अर्भकाला कुशीत घ्यावं तसं कुशीत घेतलं. तरीही मागून बबन्या 'हळू' असं ओरडलाच...
ऍबस्ट्रॅक्टची आता खरोखर गिचमिड झाली... सापाची डोके कुणीतरी ठेवली...पुनीत इस्सरची पानाफुलांची चड्डी इतस्ततः विखुरली...
"...माय माय, लै शाई पसरली कागदावर!" सोम्या त्यातल्याच एका सर्टिफिकेटने 'केसरी जुबा' पुसून हिरवट करत म्हणाला.
आणि मी तिथून पळालो. दूर... दूर...
जिथे कुणी नाही... कुणीही नाही... ना कॉलेज रोड, ना प्रधान पार्क, ना रद्दीच दुकान....

मानवा, तू एक तुच्छ प्राणी,
कुणी विचारे का तुला पाणी?
दहा दुकाने हिंडून,
तू मोकळाच राही!!!!

संपली तुझी सद्दी,
तुझ्यापेक्षा मूल्यवान रद्दी,
गेलं तरी चालेल तुझं सत्व,
तुझ्यापेक्षा महत्वाचं तत्व!!!

शाई माझी सांडली ग,
कागुद छापताना ग छापताना,
माझ्या काळजावर शाई आज सांडली,
कशी नशिबाने थट्टा आज मांडली!!!!

दुसऱ्या दिवशी मुखमंत्री आले. सर्टिफिकेट वेळेत झाले नाहीत, म्हणून बॉसच्या बॉसनेही मला झापलं, आणि माझी बदली दूर खेड्यात केली.
त्यादिवशी सहज मी तो नंबर फिरवला... लालचा नंबर...
"तू सर्टिफिकेट कसं छापलं," मी विचारलं...
त्यावर तो भ्याssssss करून रडला. मी जे समजायचं ते समजलो.
मुलगा 'आता दुकान दुकान खेळूया' असं म्हटलं तरी माझा बीपी हाय होतो....
'हे बघा मला सर्टिफिकेट मिळालं' असं म्हटलं तरी मला ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागतो....
आणि मी भ्याssssss करून रडतो....
---------------------------------------------------------------------------------------------
माझ्या जागी पटवर्धन होता, लै त्रास दिला बॉसने माझ्या.
पण मीही बारा गावच पाणी पिलोय.
मी बॉसच्या केबिनमध्ये गेलो.
"साहेब आठवडाभराची सुट्टी हवीये."
"अहो, गेल्या पाच महिन्यात ही तिसरी सुट्टी."
"शनी शिंगणापूरला जायचंय...आमदारासोबत?"
आपली वटच तेवढी होती..
बॉस हसला.. तो उठला...
त्याने एक जाडजूड किल्ली हातात घेतली...
तो आपल्या जाडजूड खुर्चीतून उठला...
त्याने ती किल्ली एका जाडजूड कुलुपाला लावली...
...आणि कुलूप काढून त्या जाडजूड दरवाज्यातून एक जाडजूड पेटी बाहेर काढली...
ती पेटी त्याने माझ्यासमोर ठेवली. मनःपूर्वक हात जोडून तो काहीतरी पुटपुटला...
...आणि त्याने ती पेटी उघडली...
त्या पेटीमधून दिव्य प्रकाश का काहीतरी पडतोय असा मला उगीच भास झाला.
त्या हस्तिदंती पेटीत, सोनेरी कलाकुसर असलेल्या पेटीत, मलमलच्या कापडात, एक साधा...
...कागद होता...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी आहे हे! Lol

धुन्द रवी यांचि पुण्यातली लुन्गी खरेदी आणि जनगणना ह्या दोन्ही गोष्टी आठवल्या Happy

छान आहे.
धुंद रवी यांची लुंगी खरेदी आठवली.

किल्ली+११
अज्ञा..खुपच हसवलंस आज. Rofl Rofl

जबरदस्त!!!! Rofl
काही पंच तर अगदी जबरा आहेत. ..

मेले Rofl

डिस्क्लेमर टाका वर, सार्वजनिक ठिकाणी वाचू नये!

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद!
धुंद रवी हे माझे मायबोलीवरचे आवडते लेखक. ते आता का लिहीत नाहीत कुणास ठाऊक!
आणि बरीच अतिशयोक्ती सोडली तर वरील प्रसंग अस्मादिकांच्या आयुष्यात घडून गेला असल्याचे नम्रपणे नमूद करतो...
(त्या प्रसंगानंतर मी नम्रच झालोय Lol

Lol

@तुरु - हो, सगळी ठिकाणे नाशिकमधलीच आहेत. आणि त्या त्या ठिकाणची खासियत लेखात नमूद केली आहेच (तरुणाईचा पूर इ.) Lol

@निलसागर - प्रधान पार्क म्हणजे स्तंभाजवळ पोहोचलोच ओलमोस्ट.
तरीही भविष्यात अशोकस्तंभ, पंचवटी, गंगापूर रोड, म्हसरूळ, सिडको, सातपूर, अंबड, द्वारका, आडगाव, शरणपूर रोड, दूधबाजार यांवरही लेख लिहिला जाईलच याची वाचकांनी खात्री बाळगावी.
Wink

Pages