@अनन्या

Submitted by onlynit26 on 10 September, 2019 - 02:44

अनन्याची सकाळपासूनच लगबग चालू होती. आज ती खूश होती, कारण शाळा सुरू होणार होती. तिची आई तिच्यासाठी चपाती आणि भाजी करून कामाला गेली होती. लूळा बाप कोनात झोपून होता. मोठा भाऊ सकाळीच शाळेला गेला होता. वह्या , पुस्तके , पेन , पेन्सिल आणि बरेच शालेय साहित्य तिने एका मोठ्या दफ्तरवजा बॅगमध्ये भरले होते. शिवाय एक चॉकलेट्सची बरणीही सोबत घेतली. थोड्याच वेळात ती निघणार होती. बारा वर्षाची चिमुरडी अनन्या भलतीच चुणचुणीत होती. स्वताची तयारी करायला ती लहान वयातच शिकली. शिवाय आईला घरकामात मदत करायला ती पुढे असायची. आजही तिने सगळे घर स्वच्छ करून अंथरुणावर असलेल्या बापाला गरम पाण्याने पुसून काढले होते. ते तिचे आवडीचे काम होते. मशीनमध्ये दोन्ही हात गमावलेल्या बापाला तिने कधी हात नसल्याची जाणीव करून नाही दिली.
आजही तिने बापाला पुसून झाल्यावर त्याला नाष्टा भरवला आणि निघाली..

अनन्याला रोड क्रॉस करायचा होता. ती सिग्नल पडायची वाट पाहत होती. सिग्नल पडला. ती रोड क्रॉस करून मध्यभागी आली. पाठीवरचे दफ्तर खाली ठेवले.
" काका, कसे आहात? " मधाळ हसत तिने ट्राफिक हवालदाराला विचारले.
तो विचारात पडला. ही कोण शाळकरी मुलगी आपल्याला काका बोलतेय? इतक्यात ती त्याच्या जवळ गेली आणि दोन चॉकलेट त्याला देऊ केली.
" बेटा, लहान मुलांनी चॉकलेट द्यायची नसतात, घ्यायची असतात." असं बोलून त्यांनी ती चॉकलेट्स घेत परत तिच्यापुढे धरली.
" बरं एक तुम्ही घ्या आणि एक मला " असं बोलून ती पुढच्या तयारीला लागली.
तिला जास्त वेळ दवडून चालणार नव्हता.
तिच्या उत्तराने हवालदारही खूश झाला.
सिग्नलला सगळ्या गाड्या थांबल्या होत्या. तिने दफ्तारातील पेन, पेन्सिल , दोन वह्या आणि बोधपर कथा असलेल्या पुस्तकांचे सेट बाहेर काढले आणि लगेच थांबलेल्या गाड्यांमध्ये फिरू लागली. शाळेच्या युनिफॉर्ममधील टापटीप वेणी घातलेली मुलगी काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतेय हे उभ्या असलेल्या गाडीतील लोकांनी पाहिले. कुतूहलापोटी काहींच्या काचा खाली झाल्या. काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले. हे सर्व तो हवालदार पाहतच होता. सिग्नल सुटला. तिचा एकही सेट विकला गेला नाही.
ती परत मध्यभागी आली.
" बेटा हे तू काय करतेस ? असं कोणी नाही विकत घेणार तुझ्या वस्तू.."
" काका, सगळीच लोकं सारखी नसतात , कोणीतरी घेईलच." असे बोलून ती दुसऱ्या बाजूला थांबलेल्या गाड्यांकडे पळाली. तिथेही तिला अपयश आले. आकाशात ढग भरुन आले होते. तिला खूप टेंशन आले. पुढच्या वेळेस प्लास्टिक कागद सोबत आणायला हवा असं तिने ठरवले.
" तुझं नाव काय गं?"
" अनन्या ."
" बरं तू हे शाळेत जायच्या वयात का करतेस..?"
" सांगते नंतर. "असे बोलून ती थांबलेल्या गाड्यांकडे पळाली.

अशी तिची तासभर पळापळ चालली होती. हवालदाराला तिची दया येत होती पण तो काही करत शकत नव्हता.
' मंगेश दादाने सांगितलेली कल्पना फसतेय की काय ?' ती मनातल्या पुटपुटली. पण ती जिद्द सोडणार नव्हती.
गाड्या सिग्नलला थांबली असताना एका गाडीत तिला एक मुलगी दिसली. सोबत बसलेली तिची आई आणि ड्रायव्हिंग करत असलेले तिचे बाबा असावेत असे अनन्याला वाटले. तिला त्यांच्यामध्ये संभाव्य गिऱ्हाईक दिसले ती लगेच तिकडे धावली.
" काका" ती काचेवर चिमुकल्या हातानी थाप मारून तो सेट घ्यायला सांगत होती. तो माणूस काही काच खाली करत नव्हता. आतली मुलगी अनन्याकडे पाहून तो सेट खरेदी करण्यासाठी आग्रह करत होती. पण दोघांपैकी कोणीही प्रतिसाद देत नव्हते. वेळ निघून जात होता. कारमध्ये मुलगी पाहून आशेने आलेली अनन्या निराश झाली. ती वळून मुलीकडच्या बाजूला आली इतक्यात आत बसलेल्या मुलीने हाक मारली
" दिदी " त्या छोट्या मुलीने थोडी काच खाली करून शंभर रूपयाची नोट तिला देऊ पाहत होती.
अनन्याने पुस्तकाचा सेट द्यायला हात पुढे केला पण तिच्या आईने ते झिडकारल्यामुळे तो सेट खाली पडला. कार सुरु झाली. छोट्या मुलीने तिच्या हातातील नोट खाली टाकली. अनन्याने त्या नोटीला हात देखील लावला नाही.

भराभर वेळ जात होता. अनन्या निराश जरूर झाली होती पण उमेद हारली नव्हती.
" कसा दिला एक सेट ?" स्कुटीवरून आलेल्या एका मोठ्या मुलीने तिला विचारले.
" शंभर रूपयाला." अनन्याने लगेच उत्तर दिले. पहील्यांदाच कोणीतरी किंमत तरी विचारली होती.
" ओके, तुझ्याकडे आता किती सेट आहेत ?" हवालदार हे सारं दुरून पाहत होता.
" दहा. "
" दे सगळे मला " हे शब्द कानावर पडताच अनन्या आनंदीत झाली. तिने ' बघीतलत' अशा नजरेने हवालदार काकांकडे पाहत डोळे मिचकावले. हजार रूपये मोजताना तिचे डोळे आनंदाने चमकत होते, चेहरा कमालीचा फुलला होता.
हवालदार काकांच्या कानात हसून काहीतरी पुटपुटत ती दफ्तर पाठीला लावून निघून गेली.

" काका , बरं केलंत तुम्ही मला फोन केलात ते."
" सागरिका खरं सांगू, अनन्याचा 'कष्ठाला फळ मिळतेच' हा समज खोटा पडू द्यायचा नव्हता. तिची धावपळ गेले चार तास पाहत होतो. भावनाशून्य लोकं तिच्या या धडपडीकडे तुच्छतेने पाहत होती. खूप विचार केला. शेवटी तू आठवलीस. तू नक्कीच मदत करशील वाटले म्हणून तुला कॉल केला.
" काका माझं पण बालपण सिग्नलवरच गेलंय आणि आज मी स्वतः च्या पायावर उभी आहे. त्यावेळी एका माणसाने केलेली मदतीने मला कष्ठाचे महत्त्व समजले. सगळीच लोकं सारखी नसतात , कोणीतरी असतेच." असे बोलून तिने स्कुटर स्टार्ट केली
शेवटचे वाक्य ती अनन्यासारखेच म्हणाली.
कोणीतरी असतेच...

समाप्त...

सदर लघुकथा सकाळ - पुणे Today या वर्तमानपत्रात दिनांक २८/०७/२०१९ रोजी प्रकाशित झालेली आहे .

© या लघुकथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत. लेखकाच्या नावासहीत ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही. तसे न झाल्यास कायदेशीर कारवाई अनिवार्य आहे.
-------------------------------------------------------
लेखक - नितीन दशरथ राणे.
सातरल - कणकवली
सध्या वास्तव्य - डोंबिवली (ठाणे )
मोबाईल नं. ९००४६०२७६८
दिनांक - २४.०६.२०१९

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults