रुपगड

Submitted by योगेश आहिरराव on 9 September, 2019 - 00:38

रुपगड

मागे नाशिकला राहुलच्या घरी मी सुदर्शन व हेमंत जमलो असताना. सुदर्शनने रुपगडचा विषय काढला, महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डांग भागातील सोनगड माहित होता पण रुपगड बद्दल त्याचे वर्णन ऐकून उत्सुकता वाढली होती.
IMG_0007.JPG
नंतर राहुलने जेव्हा नाशिकहून रुपगड ट्रेकचा मेसेज टाकला, पहिलं तर रविवार होता. त्यात शनिवारी नाशकात चुलत भावाच्या साखरपुडासाठी जायचं होतं. मग काय.. थोडक्यात चांगलाच योग जुळून आला. साखरपुडा आटपून घरी आल्यावर गप्पा टप्पा मग झोपायला साडेबारा वाजले तरी ट्रेकसाठी पहाटे लवकर उठून साडेपाच वाजता मुंबई नाक्यावर ठरल्या प्रमाणे सहपरिवार दाखल झालो. राहुल सुदर्शन आणि ‘वैनतेय गिरीभ्रमण’ संस्थेतील मोजकी दिग्गज मंडळी. आमच्या गाडीत सोबत होती ती नाशिक स्थित ज्येष्ठ अनुभवी ट्रेकर सुषमा मराठे यांची. त्याकाळी हिमालयीन बेसिक आणि एडवान्स कोर्स यशस्वी रित्या पूर्ण केलेल्या नाशकातील पहिल्या महिला सदस्या. अजूनही फार्मा क्षेत्रातील क्वालिटी आणि रेग्युलेटरी मधील प्रोफेशन सांभाळून ट्रेक करतातच. मी स्वतः फार्मा फिल्डमध्ये असल्यामुळे नोकरी आणि छंद या दोन्ही गोष्टींमुळे गप्पा रंगल्या हे सांगायला नकोच. त्यात अधून मधून निशांत आणि चार्वीची बडबड गोंधळ.
नाशिक सापुतारा वणी मार्गे रस्त्याचे काम सुरू असल्याने राहुल भाऊने दिंडोरी लखमापूर पर्यायी मार्ग सुचविला त्याप्रमाणे निघालो. लहान वाड्या खेड्यातून जाणारा हा रस्ता तसा अरुंद थोडफार खड्डेयुक्त पुढे कोशिंबेहून उजवीकडे वळून जवळपास तासाभराने हातगड बोरगाव अलीकडे सापुतारा नाशिक या मुख्य रस्त्यावर आलो. रस्त्यावरची धूळधाण आणि कामं पाहून बरं झालं ते या रस्त्याने आलो नाही ते. हातगड उजवीकडे ठेवत छोटासा घाट उतरून महाराष्ट्राची सीमा पार करून सापुतारा मध्ये साडेआठ नऊच्या सुमारास पोहचलो. चहा नाश्ता करून पुढचा पल्ला आहवा मार्गे किल्ले रूपगड. ४०-४५ किमी वळणावळणाच्या घाट रस्त्याने आहव्यात आलो. इथेच सुदर्शनच्या ओळखीचे ‘किशोर गावित’ यांच्या घरी जाणे झाले. गावित हे आहवा डांग भागातील स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन विविध उपयोगी तसेच शोभेच्या वस्तू तयार करतात तसेच सेंद्रिय शेती उत्पादने. गावित बाहेर गेले असल्याने भेट होऊ शकली नाही पण पुन्हा कधी या भागात येणं झाले तर नक्की भेटून अधिक माहिती घ्यायला आवडेल.. असो. डांग जिल्ह्यातील आहवाहून महल मार्गे पूर्णा अभयारण्यातील वळणावळणाच्या चांगल्या रस्त्याने बर्डीपाडा पोहचायला दुपारचे बारा वाजले. सापुतारा ते बर्डी पाडा जवळपास ८० किमी. प्रवासात झालेल्या अपुऱ्या झोपेमुळे निशांत थोडफार कुरकुर करू लागला त्यात दुपारचे उन पाहता अश्विनीने निशांत सोबत खाली गावात थांबणे पसंत केले. आम्ही सारे पुन्हा गाडीत बसून बर्डीपाड्याचा पुढे चार ते पाच किमी अंतरावर थांबलो. तसे पाहिले तर रूपगड साठी तीन मुख्य प्रचलित मार्ग.
पहिला.. वाडी रूपगड हून तीव्र चढाईचा. तर दुसरा कालीबेल हून सोपा पण लांबचा व तिसरा आम्ही घेतलेला सोयीस्कर असा बर्डीपाड्यातून.
यासाठी जसे वर म्हणालो चार पाच किमी अंतर गाडीने आल्यावर डावीकडे पार असलेले मोठे आंब्याचे झाड तिथेच मोकळ्या जागेत गाड्या लावल्या. ही जागा ओळखायची खूण म्हणजे हे आंब्याचे झाड, बाजूलाच असलेला सुबिर तालुका आणि वघई तालुका यांच्या हद्दीचा व पूर्णा वन्यप्राणी अभयारण्याचा बोर्ड तसेच दहा पावलांवर असलेले देवीचे मंदिर.
सर्व तयारीने पिट्टू घेऊन निघालो. रस्त्याच्या पलीकडच्या टेकडीवर वाट चढून वळसा घेत ओढा ओलांडून पुन्हा वर गेल्यावर उजवीकडे पहिल्यांदा रुपगडाचे दर्शन झाले. माथ्यावर बऱ्यापैकी तटबंदी धारण केलेला हा किल्ला पाहून मला रोहिडा किल्ल्याची आठवण झाली.
IMG_0006.JPG
पानगळ झालेलं जंगल आणि बेताची उंची असलेला समोर दिसणारा किल्ला पाहून काय तासाभरात आरामात वर जाऊ अर्थात मलातरी तसेच वाटलं. पण दिसतं तसं नसतं याचाही प्रत्यय आलाच. किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या सोंडेवरून चढाई होती. सुरुवातीला छोटे छोटे टप्पे पार करून डावीकडे वळसा घेत सोंडेवर आलो. या भागातही अतिशय विरळ झाडी त्याला जोड काही ठिकाणी जाळलेले रान यामुळे उन्हाची तीव्रता चांगलीच जाणवत होती. क्वचित कुठे लहान झाड जरी दिसले तर थोडं सावलीत थांबून घोटभर पाणी पिऊन निघायचं.
IMG_0019.JPG
तासाभराने पुढच्या टप्प्यात कालीबेल गावाकडून येणारी वाट या वाटेला मिळाली. इथून किल्ल्याचा दक्षिणेचा बुरुज अगदी हाकेच्या अंतरावर.
IMG_0026.JPG
दहा मिनिटांची सोपी चढाई बुरुजाला डावीकडे ठेवत लहानसा कातळकडा पार करत, कधीकाळी तटबंदीत अस्तित्वात असलेल्या दरवाजातून ? किल्ल्यात प्रवेश केला. या भागात दोन्ही ठिकाणी तटबंदी मागे वळून बुरुजावर गेलो असता आम्ही आलो ती बोडक्या सोंडेवरची वाट.
IMG_0035.JPG
किल्ल्याच्या पूर्व भागात बऱ्यापैकी तटबंदी आणि काही खोदलेली पाण्याची टाकी, अर्थातच या दिवसात पूर्ण कोरडे व आटलेले. किल्ल्याच्या माथ्यावर सावली देतील अशी झाडे नाहीत. थोडाफार त्रिकोणी व मध्यभागी टेपाडासारखा उंचवटा असा हा गडमाथा. माथ्यावर आल्यावर किल्ल्याचे प्रमुख आकर्षण असलेला मोठा आयताकृती तलाव.
IMG_0050.JPG
दोन्ही बाजूला आत उतरायला कातळकोरीव पायऱ्यांच्या सोपान. एवढा मोठा तलाव तो सुद्धा कोरडाठाक. या दिवसात उन्हामुळे बाष्पीभवन खूप तसेच नीट निरखून पाहिलं तर तळाला कातळात मोठं मोठ्या भेगा आणि चिरा न जाणो ते गळतीच एक कारण असू शकते जसे लोहगडाच्या हत्ती तळ्याबाबत झाले आहे तसे. किल्ल्याच्या उत्तर टोकावर जाऊन तापी नदीच्या खोऱ्यातील, रूपगडचा जोडीदार सोनगड ओळखायचा प्रयत्न केला.
IMG_0043.JPG
पूर्णा अभयारण्यात गिरा नदीच्या खोऱ्यातील अनेक लहान गावं खेडी असा बराच मोठा भाग इथून व्यवस्थित न्याहळता येतो. यावरून डांग भागातील किल्ल्याचं मोक्याचं स्थान लक्षात येते.
IMG_0063.JPG
गडफेरी आटोपती घेत उत्तरेच्या बुरुजा कडून उतराई सुरू केली छोटासा कातळ टप्पा उतरून लगेच समोर माथेरानच्या वन ट्री हिल सारखा भाग आमच्यातील काही हौशी त्यावर चढून गेले. फोटोग्राफी करून पुन्हा वाटेला तसेच थोड उतरत डाव्या हाताला कड्याला बिलगून अरुंद पायवाट गेलेली त्याच वाटेने जात कातळात कोरलेले लहानसे खांब टाके त्याच्या पुढे काही पावलांवर एक कपार त्यात थोडेफार पाणी आतमध्ये दगडाला शेंदूर फासून झेंडा लावलेला.
IMG_0066.JPG
उन्हाळ्यात किल्ल्यावर आपत्कालीन परिस्थितीत हमखास उपयोगी असा हा एकमेव पाण्याचा साठा. पुन्हा मागे येत उजवीकडे वळून अरूंद अशा मुरमाड घसरड्या वाटेनं उतराई.
सोबतच्या सहकाऱ्यांनी छोट्या चार्वीला तिची बडबड प्रश्न ऐकत खूपच चांगले सांभाळून घेतले. खास करून सुषमा मॅडम आणि विद्या ताई सोबत तिची चांगली गट्टी जमली. पंधरा वीस मिनिटांत घसरडा उतार संपवत. माची सारख्या भागात आलो समोरच हनुमानाचे मंदिर त्यावर नव्याने बांधलेली पत्र्याची शेड.
IMG_0073.JPG
मारुतीचे मंदिर आणि त्या भागात असलेला तोफेचा तुकडा. थोडफार झाडोरा असलेल्या या भागात जेवणाला या सारखी जागा मिळणं ही खूप मोठी गोष्ट. आधी पोटपूजा मग प्रत्येकाने आपली ओळख आपले अनुभव सांगितले.
राहुल, सुदर्शन, भाऊसाहेब कानमहाले, योगेश जोशी, डॉ. पारस, आशिष, किरण, सुषमा मॅडम ई. अनेक दिग्गज मंडळी. (बाकी नाव आठवत नाही या बद्दल क्षमस्व)
सुदर्शनने किल्ल्याचा इतिहास सांगितला तो थोडक्यात देतो....
सोनगड रूपगड या किल्ल्यांचा इतिहास जोडला जातो तो सरदार पिलाजीराव यांच्या सोबत. १७२१- १७३२ अशी जेमतेम अकरा वर्षांची कर्तबगार कारकिर्द. पेशवे शाहू महाराज यांच्या पदरी असलेल्या सरदार दाभाडे यासोबत पिलाजीराव गायकवाड असत, त्यांची तलवारकी आणि मर्दुमकी पाहून सेना सरनोबत ही पदवी देऊन गुजरातच्या या डांग भागात पाठविलें. पश्चिमेला सुरत तर घाटावर मोगल भाग. थोडक्यात खानदेशला सुरत सोबत जोडणारा प्राचीन मार्ग. हा मधला भिल्ल आदिवासी भाग तसा दुर्लक्षित व मोकळा होता. या भागातून कुणालाही जायचे असल्यास या आदिवासी भिल्ल राजांशी वाटाघाटी करायला लागायच्या. खुद्द शिवाजी महाराजांनी याच भागातून सुरतेची लूट स्वराज्यात नेलेली. त्या काळी भरपूर जंगल असल्यामुळे हा भाग बराचसा वन आच्छादित त्यामुळे भरपूर वनोपजक मिळे. डिंक, मध तर इथली लाकडे सुरतेला जहाज बांधणीसाठी वापरली जात. सुरुवातीला पिलाजीरावांचा या भिल्ल आदिवासी सोबत संघर्ष झाला पण त्यांनी वेळीच ओळखून संघर्ष करण्यापेक्षा यानांच हाताशी घेऊन इथे १७२१ मध्ये सोनगड व रूपगड या किल्ल्यांची निर्मिती केली. नावं पण अशी खास ‘सोनगड’ सोन्याचा
किल्ला तर ‘रुपगड’ म्हणजे रौप्य चांदीचा किल्ला. सोनगड तसा मुख्य रस्त्याला लागून असल्यामुळे त्या गावामुळे प्रसिध्द तर रुपगड त्या तुलनेत बराच दुर्लक्षित. सोनगड हि त्याकाळी पिलाजीरावांची राजधानी पुढे काही कारणास्तव त्यांनी बडोदा येथे हलवली.
IMG_0079.JPG
तास सव्वा तासात पावणे चारच्या सुमारास निघालो. आता किल्ल्याला उजवीकडे ठेवून तुरळक झाडी असलेल्या पदरातून वाट. थोडक्यात चढाई दक्षिण टोकाकडून तर उतराई उत्तर बाजूने. या भागात सागाचे आणि बांबूचे प्रमाण जास्त. वीस मिनिटं आडव जात पुन्हा तीव्र घसरण. छोटे छोटे दृष्टिभय नसलेले तरी सावधगिरीने उतरणे हेच महत्त्वाचं. खालच्या भागात हीच वाट सकाळच्या मुख्य वाटेला येऊन मिळाली. थोडक्यात आमचे वर्तुळ पूर्ण झाले तर. बरोब्बर साडेचार वाजता आंब्याजवळ जिथे गाड्या लावल्या होत्या तिथे आलो. जवळच पाण्याची हाफशी तिथेच फ्रेश होऊन बर्डीपाड्यात आलो. बघतो तर निशांत बराच रमला होता दुपारची झोप काढून चांगलाच टवटवीत. पुन्हा आल्या मार्गे परतीच्या वाटेवर, अंतर जास्त आणि वेळ नसल्यामुळे देवळी कराडच पुरातन मंदिर आणि हातगड जवळील कांचन घाट स्किप करावे लागले. सूर्यास्त वाटेतच झाला पुढे सापुतारा मध्ये चहा हलका नाश्ता करून नाशिकला परतलो तेव्हा दहा वाजून गेलेले. वेगळ्या प्रांतातील अनोख्या किल्ल्याची अनुभूती घेऊन मन मात्र प्रसन्न झाले...

अधिक फोटोसाठी पहा : https://ahireyogesh.blogspot.com/2019/04/roopgad.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागरण , त्यानंतर वेडा-वाकडा प्रवास , कडक ऊन अशा थकवणार्या परिस्थितीत चढ-उताराची पायपीट...
पण तो आळस झटकला आणि एक पाउल टाकलं कि पुढचा मार्ग एकदम आनंददायी !
आणि निसर्गाच्या लोभस सानिध्यात पूर्ण थकून खाल्लेले रुचकर दोन घास आणि निर्मळ विहिरीच्या पाण्याचे घटचट प्यायलेले पाणी, तेच खरे स्वर्गसूख.

नेहेमीप्रमाणे रमवणारे वर्णन आणि निववणारे फोटो. छानच !

निसर्गाच्या लोभस सानिध्यात पूर्ण थकून खाल्लेले रुचकर दोन घास आणि निर्मळ विहिरीच्या पाण्याचे घटचट प्यायलेले पाणी, तेच खरे स्वर्गसूख. >>> क्या बात है ! अगदी १०० % ...

खूप वेगळ्या ठिकाणचे गड पाहिले जात नाहीत. सापुतारा,डांग,आहवा भाग म्हणजे बरेच दूर. रेल्वे तर कित्येक आदिवासींनी पाहिलेली नसते.
लेख छान झाला आहे.