स्मरणरंजन.... आठवणींचा जागर! - २

Submitted by संयोजक on 8 September, 2019 - 05:24

माणूस हा मूळत: गप्पीष्ट प्राणी आहे. गप्पा मारायला त्याला फार आवडतात. दोन गप्पावेल्हाळ माणसे भेटली की मग त्यांना स्थळकाळाचेही भान राहत नाही. एकातुन दुसरा... दुसऱ्यातुन तिसरा असे लडी लागल्यासारखे विषय निघत जातात.
गप्पा वाफाळत्या चहाबरोबर रंगतात, गप्पा गरमागरम पोह्यांसोबत रंगतात, तश्या त्या भरल्या पानावरही रंगतात अन गावच्या पारावरही रंगतात.
मायबोली हा तर आपल्या सगळ्यांचा हक्काचा अड्डा.
इथे अनेक धागे, अनेक पाने केवळ गप्पांना वाहिलेली आहेत.
एखादा जरा नॉस्टेल्जिक व्हायचा अवकाश, सगळे लगोलग भूतकाळातल्या सफरीवर निघून जातात. किश्श्यामागून किस्से आठवले जातात आणि आठवणींचा महापूर येतो
तर या गणेशोत्सवाच्या निमित्ताने असाच आपल्या आठवणींचा जागर घालूया!

या स्मरणरंजनातला दुसरा विषय आहे:
"मी आणि मोदक"

गणपती बाप्पा आणि मोदक यांचे नाते अतूट आहे. मोदक बनवण्यात; नंतर ते नैवेद्य म्हणून सजवण्यात आणि प्रसाद म्हणून फस्त करण्यात एक वेगळाच आनंद आहे!
एका गणपतीत मी आणि माझा छोटा भाऊ आयते घरात सापडलो त्यामुळे आईने आम्हाला "सगळे आले पाहिजे" या तिच्या ब्रीदवाक्यानुसार मोदक बनवताना हाताशी घेतले. छोट्या भावाला त्याच्या छोटेपणाचा ॲडव्हांटेज मिळून मोदकपात्र मिळाले आणि मला मात्र हाताने पाऱ्या करायचा 'ड' गटाचा प्रश्न आला. सुरुवातीला खुप टाळमटाळ केली पण हळूहळू जसे जमू लागले तशी मजा यायला लागली. मग मोदकपात्राशिवायही माझे हाताने केलेले मोदकच कसे जास्त रेखीव झालेत हेही मिरवून झाले. त्यानंतर कित्येक गणेशोत्सव आईला न चुकता मोदक बनवायला मदत केली आणि त्या सरावावर पुढे बायकोकडूनही शाबासकी मिळवली Wink

हा झाला माझा किस्सा
तुमच्याकडेही अश्याच मोदकांच्या गमतीजमती असतील ना?
फक्त मोदकच नाही तर बाप्पाच्या कुठल्याही प्रसादाच्या आठवणी सांगितल्या तरी चालतील.
मोदक बनवण्याच्या, पैज लावून खाल्ल्याच्या आणि खास मराठी पदार्थ म्हणून मिरवल्याच्याही!
वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या चवीचे, खव्याचे, तळणीचे, उकडीचे मोदक, त्यांच्या स्पेशल रेसिपीज, तुमच्या टीप्स सगळ्यासगळ्याच्या गप्पा मारुया!
चला तर मग!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<मोदकपात्राशिवायही माझे हाताने केलेले मोदकच >
इथे मोदकाचा साचा हवं. मोदकपात्र म्हणजे ज्यात उकडीचे मोदक वाफवतात ते भांडं. जुनं ते सोनं धाग्यावर त्याचा फोटो आलाय.

21 मोदकांची चतुर्थी(उपास) केली होती काही वर्षांपूर्वी.
पहिल्या चतुर्थी ला चंद्रोदयाला खुप उशीर होता. खूप भुक लागली होती. आणि खाताना पहिलेच मोदक मिठाचे लागले. समोर असून पण मोदक खाता आले नाही.
Happy

उकडीच्या मोदकाची एक आठवण आहे.
मी पहिल्यांदा स्वतः उकड तयार करून, मोदक बनवायला घेतले होते. सारण व्यवस्थित तयार झाले. पण उकड थोडी कडक झाली.
आईने आधीच सांगितले होते, " मोदक एकटीने करु नकोस, तुला जमणार नाही."
पण मी ऐकले नाही. उलट तिला म्हणाले, " जेवढे मोदक व्यवस्थित होणार नाहीत , किंवा तुटतील,ते मी खाणार, आणि चांगले तुम्हाला देणार".
गंमत अशी की, एकही मोदक बिघडला नाही, सगळे व्यवस्थित झाले.
आणि ठरल्या प्रमाणे, घरी सगळे मला चिडवू लागले, एकही मोदक न बिघडल्याने, सगळे मोदक आम्ही खाणार आहोत. तुला काहीही मिळणार नाही. Sad