गौराई

Submitted by राजेंद्र देवी on 3 September, 2019 - 23:52

गौराई...

झाली तीच्या आगमनाची घाई
आता जोडीने येईल गौराई

दारी उमटतील पाउले कुंकवाची
सुख शांती अन समृद्धींची

सजतील लेऊन शालू भरजरी
असेल मध्ये गणराया मखरी

दोन दिसांची असेल माहेरवाशीण
पंचपक्वान्नाचे असेल जेवण

देता निरोप येईल डोळा पाणी
गौराई माझी लाडाची गं राणी

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कायप्पावरून साभार!
(ज्याने लिहिले त्याला वंदन!)
.
.
"सगळं घर साफ केलं ना "? "माजघर झाडलं का ? पावलं रेखली का ? उंबरठा धुवून कुंकू लावून ठेवायचाय . रांगोळीच्या पावलांमध्ये कुंकू मागे आणि हळद पुढे घालायची. चंदनाची पावलं शेजघरातच रेखायची, तिथेच शांत शीतलता हवी. कोठीच्या खोलीत बळदाकडे थांबायचं . तेलाचे दिवे उजळवून ठेवलेत, तुपाच्या निरंजनी चारही कोन्यात लावायच्या. रेशमी खण तयार ठेवलेत ना ? अक्षता, दुधाची चांदीची वाटी , कोमट पाण्याचा गडू ताटात ठेवायचा . आरतीच्या तबकात सुपारी अक्षतांसोबत ओवाळायला अंगावरचा दागिना उतरवू नका, सोन्याची वेढणी ठेवा. लेकीचं स्वागत करायला, सुनांनी अंगावरचे डाग उतरवायचे नाहीत, तो त्यांचा अंगावर चढवलेला समृद्धीचा मान आहे. ओवाळून टाकायची खोबऱ्याची वाटी नीट ठेवलीय ना ? वाजवायला झांजा घ्या, थाळ्या वाजवून पोचे पाडून ठेवाल नी मग ती तरंगती ताटली जेवायला कुणी घेणार नाही.... वर्षातून एकदा लेकी घेरी येणार, हसून स्वागताला उभ राहायचं , कंबर कसून सरबराई करायची लेकीची. ... "

पंचांग पाहून, सजलेल्या उजळलेल्या लेकी दारात हजर व्हायच्या, शंख घंटा, थाळ्या , झांज़ा वाजवत ताटभर ताह्मणातून, सालनकृत लेकी अंगण ओलांडून उंबरठ्यात उभ्या व्हायच्या. " गौर आली सोन्याच्या पावलांनी " म्हणत खापरपणजी कौतुकाने दुधाने मग कोमट पाण्याने लेकींचे पाय धुवून, साजूक तुपाच्या निरांजनाने ओवाळून हळद कुंकू लावून, औक्षण करून लेकींना घरात घ्यायची. मग हळदी कुंकवाच्या पावलांनी लेकी दोन दिशांनी घरभर फिरायच्या. आईने हातातला कंदील वर करून दाखवलेल्या प्रकाशात घर बघताना लेक विचारायची, "इथे काय आहे" ? घरातली सून सांगायची " इथे सुख आहे, समृद्धी आहे " लेक म्हणायची, "उदंड असू दे". माहेरचा चौसोपी वाडा फिरत लेकी माजघर, साठवणीची खोली, कोठी, शेजघर हिंडत विचारायच्या , "इथे काय आहे"? आणि घरातल्या सुना सांगायच्या , "इथे काय? विद्या आहे", "इथे काय? धन आहे", "इथे काय? धान्य आहे" , "इथे काय? गोधन आहे, वस्त्र आहेत,भरभराट आहे" ऐकून लेकी समाधानाने हसायच्या, माजघरात दोन्ही दिशाना हिंडून आल्यावर दोघी एकत्र भेटून देवघरात पाटावर जाऊन बसायच्या." माहेरी सगळं समृद्ध आहे, उदंड आहे हे बघून सुखावून ऐटीत पाटावर बसून लांबून आल्यावर गुळाचा, दुधाचा नैवेद्यरुपी पाहुणाचार घेऊन मोठ्या मोठ्या डोळ्यांनी आईचा आणि तिच्या सुनेचा प्रेमसंवाद ऐकत बसायच्या. खापरपणजी म्हणायची, "आज साधच वाढायचं, लांबून आल्यात , आरामात बसुदे, उद्या पुरणवरण आहेच." रात्री घर निजायचं नी देवघरात मायलेकींचा सुखसंवाद सुरु असायचा. समईच्या शांत ज्योती प्रसन्न की आपली शांत माय अन्नपूर्णा जास्त प्रसन्न ? अशा वातावरणात वर्षभराची सुख लेकीला मूकपणे सांगायची नी दुःख लपवायची कारण लेक वर्षातून एकदाच येते ना ? घरभरातले दिवे शांतावत, तेव्हाची सून येऊन देवघराच्या दारात उभी राहायची आणि सासूला "झोपायला येताय ना "? म्हणत घेऊन जायची. दुसऱ्या दिवशी, पहाटेपासून , पुरणाचा घमघमाट, एकवीस भाज्या, दोन चटण्या , अळूवडी , दोन कोशिंबिरी, कुरडया , खान्देशी कढी मसालेभात , पोळ्या , पुरणपोळ्या, खान्देशी मांडे आणि लेकीसाठी खान्देशी गव्हाची खीर , शेवयांची खीर , कळीदार भात आणि साधा वरण तयार ठेवून , खास गौरींसाठी बनवून ठेवलेलं खान्देशी लोणकढी तूप नैवेद्याच्या चांदीच्या ताटात वाढून ताट तयार केलं जायचं . लेकीला काठाची साडी, रेशमी खण , बांगड्या , शेवंतीची वेणी , हार देऊन सन्मान केला जायचा आणि हातभर ताम्हणात एकवीस तुपाच्या वातींची , पुरणाची आरती केली जायची. मध्यान्हाला दोन सवांष्णींसोबत लेकी जेवायच्या आणि आग्रह करकरून जेवण वाढलं जायचं. घर पोटभर जेऊन तृप्त व्हायचं, घरातली माय अन्नपूर्णा सुखावायची आणि पारख्यांच्या लेकी आनंदून समाधानाने विसावलेल्या भरल्या घराकडे रात्रभर डोळे भरून पाहायच्या. तिसऱ्या दिवशी , तड लागलेलं पोट , आनंदाने भरलेलं मन माहेरचा मान घेऊन रेंगाळत्या पावलांनी आणि भरल्या डोळ्यांनी निघायची तयारी करायचं. सासरी परत जाताना, प्रवासात त्रास नको म्हणून ताज्या वाफाळत्या भाताला विरजलेली कवड मोडून दही लावलं जायचं आणि लेकींसमोर ठेवलं जायचं. ओटी भरून , कुंकू लावून घरातल्या सुना म्हणायच्या की "बाई, सरबराई करायला चूक झाली असेल तरी राग नको मानूस , पुढच्या यावर्षी परत ये, तुझी वाट पाहू." माय अन्नपूर्णा थरथरत्या हातानी आणि भरल्या डोळ्यांनी हळद कुंकवाची बोटं लेकीच्या कपाळी उमटवून म्हणायची, " पुढच्या वर्षी मी असेंन नसेन, तुझं माहेर नक्की असेल. उतू नकोस मातू नकोस, माहेरची वाट विसरू नकोस. परत ये आम्ही वाट पाहू " लेकीचा तरी पाय कुठे निघायचा माहेरच्या माजघरातून ? पण जायला हवंच ... " माहेरी सुख समृद्धी समाधान उदंड असू दे , माझं माहेर सुखरूप राहू दे" म्हणत आशिर्वादत पुढच्या वर्षी असाच सोनपावलांनी येण्याचं वचन देत लेकी दिवसा उजेडी आपल्या घरी रवाना व्हायच्या. लेकी गेल्यावर डोळे पुसून, नातवाच्या पाठवणीची तयारी करायला आजी आणि मामी दडप्या पोह्यांना भिडायच्या .

पाच पिढ्या हेच चक्र अव्याहत सुरु आहे. समृद्ध माहेराने मधे व्युतपन्न दिवसही पाहिले पण लेकी माहेराला यायला विसरल्या नाहीत. माहेर पुन्हा समृद्ध झालय, कंदिलांची जागा लखलखीत लाईट्सनी घेतलीय आणि चौसोपी वाड्याची जागा प्रशस्त फ्लॅटने. पण "गौर आली सोन्याच्या पावलांनी " म्हणणारी मी आत्या , आणि वाजत गाजत आल्यावर दूध पाण्यानी पाय धुवून स्वागत करून आई आणि वहिनी नामक माय अन्नपूर्णा त्याच आहेत. माहेरी जाताना कस नीटनेटकं जायचं म्हणून तोंडावर शेवटचा हात फिरवून तयार होणाऱ्या आम्ही , आणि "गौर आली सोन्याच्या पावलांनी" म्हणत आमची वाट पहाणार माहेर .... अगदी तसच आहे , पाच पिढ्यांपुर्वीसारखं .... या दिवसाची ओढ लावणारं.

गौर निघाली सोन्याच्या पावलानी, गौर आली सोन्याच्या पावलांनी ......