पाठवणी

Submitted by मिलिंद जोशी on 3 September, 2019 - 15:00

आपल्या जीवनात घडणाऱ्या काही घटना खूप छोट्या असतात पण त्यांच्यात सभोवतालचे वातावरण काही वेळासाठी का होईना पण बदलण्याची अफाट शक्ती असते. याचाच अनुभव मी काल घेतला.

माझ्या मित्राच्या बहिणीचे लग्न होते. आदल्या दिवशी पासूनच आम्ही लग्नघरी तळ ठोकला होता. काय आहे ना लग्नघर म्हटले की अनेक गोष्टी येतात. बरीच कामे असतात, धावपळ असते आणि घरातील लोकं आलेल्या पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात अडकलेले असतात. त्यामुळे कामासाठी जितके जण जास्त तितके चांगलेच. बरे अनेकदा तर मुलगी सासरी गेल्यावरही मित्रांची कामे संपतील असे नाही. असो.

लग्न खूपच छान लागले. मुलाकडील मंडळी खूपच चांगली असल्यामुळे लग्नात कोणताच बखेडा नाही की रुसवे फुगवे नाहीत. सगळे नवीन विचाराचे लोक. त्यामानाने मुलीकडील माणसं काहीशी जुन्या विचारांची वाटली. सगळ्यांची जेवणे झाली, झाल देण्याचा कार्यक्रम झाला आणि मग सगळ्यात महत्वाचा पण तितकाच हळवा असलेला कार्यक्रम सुरु झाला. मुलीची पाठवणी. खरंच किती भावूक क्षण असतो तो. ज्या घराला २०/२५ वर्ष स्वतःचं घर म्हटलं त्यालाच सोडून जायचं. ज्या आईने जन्म दिल्यापासून आपले पालन पोषण केलेले असते, आपल्या निर्णयाला पाठींबा दिलेला असतो त्याच आईला सोडून जायचं. ज्या वडिलांनी आई चिडली तरी तिला प्रसंगी अंधारात ठेवून आपले लाड पुरवलेले असतात त्यांनाच सोडून जायचं. ज्यांच्या सोबत जमत नाही पण त्यांच्या शिवाय करमतही नाही अशा भाऊ बहिणींना सोडून जायचं म्हटल्यावर कोणत्याही मुलीचा बांध फुटतोच. अगदी काही वेळापूर्वी असलेले आपले घर, आपला परिवार फक्त काही मंत्र म्हटल्याने आणि रजिस्टरवर सह्या केल्याने खरेच का परका होतो? पण तरीही मुलीला सांगितले जाते; ‘बाई गं... आता इकडचं सगळे विसरायचं... त्याच घराला आपलं घर मानायचं. तेच लोक तुझे आहेत, आम्ही आता परके झालो...’ काय अवस्था होत असेल त्या क्षणाला नवरीमुलीची?

तो प्रसंगही पहा कसा असतो, मुलीला जन्म दिल्यापासूनचे सगळे दिवस त्या आईला आठवत असतात पण त्याच बरोबर मुलीच्या भावी आयुष्याचे स्वप्नही ती माउली पहात असते. त्यामुळे एकीकडे तिच्या डोळ्यात पाणी असले तरी तिने मनाला खंबीर बनवलेले असते. मुलीच्या मागेमागे तीही फिरते... बहुतेक आपल्या मुलीचा आपल्याला तेवढाच जास्त सहवास लाभावा हेच त्यामागील मोठे कारण असावे असे मला नेहमी वाटते. इतर नातेवाईक बायका त्या मुलीभोवती कोंडाळे करून उभ्या असतात. मुलगी सगळ्यांच्या पाया पडत असते. एका बाजूला बाप उभा असतो. डोळ्यात पाणी, कंठ दाटलेला तरीही इतरांना आपण खंबीर आहोत हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. बऱ्याचदा भावाची गत अशी होते की डोळ्यातील पाणी थांबत नाही, पण ते इतरांना दिसू नये यासाठी त्याचे काम तो थांबवत नाही. शक्यतो अशा ठिकाणाहून तो जास्तीत जास्त लांब राहण्याचा प्रयत्न करतो. बाकी नातेवाईक मात्र नाही नाही त्या आठवणी काढून त्या मुलीला जास्तीत जास्त रडविण्याचा प्रयत्न करतात.

या सगळ्यात जास्त धावपळ असते ती फोटोग्राफर आणि व्हिडीओ शुटींग करणाऱ्या लोकांची. कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील भाव त्यांना कायम स्वरूपी साठवून ठेवायचे असतात.

कालच्या लग्नातही पाठवणीचा भावनिक कार्यक्रम चालू होता. मी माझ्या इतर दोन तीन मित्रांबरोबर तिथे उभा होतो. खरं तर मला हा कार्यक्रम मनापासून आवडतो. म्हणजे त्याच्या मागील भावनिक गोष्ट सोडून द्या. पण रडताना काही जणांचे चेहरे इतके विचित्र आणि चमत्कारिक दिसतात की काही विचारू नका. त्यातून काही भावनिक माणसं अशा गोष्टी बोलतात ना... त्यावर आपल्यालाच हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. याच एकमेव कारणाने मी उभा होतो. मुलीचे आईच्या गळ्यात पडून झाले, वडिलांच्या गळ्यात पडून झाले आता आली काकूची बारी. काकूने मुलीचे डोळे पुसले...

“अगं... किती छोटी होतीस... त्या वेळेस किती वरणभाताचा हट्ट करायचीस?... आणि आता सासरी जाते आहेस... आता या घराबद्दल विचार करायचा नाही... तेच तुझे घर आहे... आता फक्त त्याचाच विचार तुझ्या मनात असला पाहिजे...” असे एकामागून एक आठवणी बरोबर नवीन धडे ती मुलीला देत होती आणि त्यामुळे तर मुलीचे अश्रू अजूनच वाढत होते.

इतक्यात कुठूनतरी.... “पुंऽऽऽऽऽ“ असा लांबलचक स्वर ऐकू आला. सगळी कडे शांतता पसरली. आधी कुणालाच काय झाले ते समजले नाही पण जेव्हा लक्षात आले... त्यावेळेस हास्याचा स्फोट झाला. आवाज बराच वेळ लांबल्याने याचा कर्ता कोण हेही सगळ्यांना समजले. पुन्हा भेटीगाठी घ्यायला सुरुवात झाली पण मुलीच्या चेहऱ्यावरील गांभीर्य मात्र पूर्णपणे गायब झाले होते. तिच्या डोळ्यातले पाणी तर कुठल्या कुठे पळाले होते. ज्या वेळेस ती आत्याला भेटायला आली तेव्हाही ती हसतच होती. आता आपण हसतहसत तिला निरोप दिला तर नंतर ‘लोक काय म्हणतील?’ या विचाराने आत्या बिथरली.

“ए शुटींगवाल्या... जरा दम धर... बंद कर आधी तुझं शुटींग...” आत्याने व्हिडिओग्राफरला आज्ञा सोडली.

आता त्या बिचाऱ्याला काय करावे हे समजेना.

“अगं ताई... काय झाले? का शुटींग बंद करायला सांगते आहेस?” मुलीच्या वडिलांनी काहीसे वैतागूनच विचारले.

“का म्हणजे? त्या कॅसेटमध्ये जर मी रडताना दिसले नाही तर लोक काय म्हणतील? अन या माणसामूळं डोळ्यातलं पाणी पण आटलं...” काहीसे रागाने “त्या” माणसाकडे पहात आत्या म्हणाली.

“मी काय म्हणतो... जर आपण हा पूर्ण कार्यक्रम पहिल्या पासून चालू केला तर?” एकाने सुचवले आणि मग हो नाही करताकरता परत सगळे शुटींग करायचे ठरले. पण परत शुटींग करताना नवीनच समस्या आली. मुलगी एखाद्याच्या गळ्यात रडण्यासाठी पडली रे पडली की कुणीतरी खुसफूस करायचे आणि मुलीचा हसण्याचा बांध सुटायचा. किमान ३/४ वेळेस प्रयत्न केला, पण ती मुलगी काही केल्या रडायला तयार नव्हती. शेवटी आहे तेवढ्यावरच समारोप करायचे ठरले. त्यामुळे आत्या तर जास्तच भडकली होती. तिने जे काही मुलीला देण्यासाठीचे धडे मनात ठरवले होते, आता ते किमान कॅसेटमध्ये तरी येणार नव्हते.

“काय रे ए बाबा..! काही प्रसंगाचं भान तरी ठेवायचं.!! अजून थोडा वेळ कळ काढायची ना..!!! जरा थोपवून धरलं असतं तर काय बिघडलं असतं?” आत्याने मुलीला काही सांगण्याऐवजी त्या व्यक्तीकडे मोर्चा वळवला.

“अशा गोष्टी काय थांबवता येतात का?” तो माणूसही वैतागाने म्हणाला. एकतर इतक्या लोकांदेखत असे हसे झाले होते आणि त्यात ह्या म्हातारीचे बोलणे... आणि तेवढ्यात तेथील एकाचा मोबाईल वाजला... मोबाईलला रिंगटोन म्हणून गाणे लावलेले होते...

“पंछी, नदियाँ, पवन के झोंके...
कोई सरहद ना इन्हे रोके...”

मिलिंद जोशी, नाशिक...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@च्रप्स : ओके... मग हरकत नाही... तसेही प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आवडेलच असे थोडेच असते? खूप खूप धन्यवाद...