घडलेली कहाणी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 31 August, 2019 - 12:59

घडलेली प्रेमकहाणी.

कच्चा माल : https://www.maayboli.com/node/57826

"आरं ए हेकण्या, तिकडं बघ आली बघ येष्टी.. चेन तरी लाव अय.."
तर इसगावच्या फाट्यावर गण्यानं अशी हाक दिली न बाळा उर्फ बाळासाहेब भानावर आले.. च्यायला या जिंच्या प्यांटीची चैन वेळेवर कधी चटकन लागतच नाही, बरेच आडवेतिडवे कष्ट करून अखेर बाळ्यानं चैन लावली आणि येष्टीकडं पाहत विमलची एक पुडी तोंडात सोडली. नेहमीसारखी शेवटून तिसऱ्या खिडकीत गंगीला पाहून त्यानं विमलमधली सुपारी करकर चावून आधी घश्याच्या शिरा ताणल्या, अन ओठावर दोन बोटे ठेवून चुळ्ळूक असा आवाज काढत एक पिचकारी हाणली रस्त्याच्या कडेला..
इतक्यात कंड्याक्टरनी घंटी दिली तसा बाळ्या गण्याच्या येमेटीवर बसला. त्याच्या उण्यापुऱ्या ५फूट २ इंच आकार आणि 48 किलो वजनाच्या देहाला नेहमी सारखा येमेटी निघतानाचा झटका सहन झाला नाही, अन बाळ्या जरा मागं कलला. "मारतो का आता?" तशी गंगी खुदुक करून हसली, आणि बाळ्याची विकेट आजपण पडली.. पुढल्या स्टॉपपर्यंत तिला बघत, अधनंमधनं गाडी मागे पुढे झाली तर गण्याला शिव्या देत बाळ्या जात रहायचा. तिसगावला शाळेत जाणारी बरीचशी चिल्लीपिल्ली पोरं उतरल्यावर जवळपास मोकळ्या बसमध्ये जाऊन बाळ्या बसायचं ते नेमकं गंगीच्या शेजारच्या लायनीत..
आता गंगीचं खरं नाव काय गंगी नव्हतं, खरंतर बाळ्याला तिचं नाव माहितीच नव्हतं. बाळ्या होता कुंभाराच्या घरातलं एक गाडगं, अन त्याला आवडायचं पिक्चर ते गाढवाचं लग्न, आणि येष्टीतली गंगी, सावळा कुंभाराच्या गंगीगत दिसती असं गण्या, बाळ्या, बंड्या, सुज्या वगैरेंनी एकमताने मान्य केलं होतं..

गाडीत बसल्याबरोबर आधी बाळ्या झोपल्यागत पुढं सरकला, त्याची बॉडी काटकोनातून विशालकोनात गेली, डाव्या हातानं पँटच्या उजव्या खिश्याचा कापड हातात धरून त्यानं उजवा हात खिशात घातला आणि खुप कष्टाने आपला लावा फोन बाहेर काढला. मोबाईल काढल्याबरोबर स्प्रिंग निघाल्यागत बाळ्या परत काटकोनात आला. नकळतपणे हुश्श करून बाळ्या मनात म्हटलं "जरा जास्तच टाईट झालीय प्यांट, स्टेचेबल सांगून साधीच प्यांट खपवली बहुतेक सुज्यानं आपल्याला".

एव्हाना गंगी खिडकीतून बाहेरच पाहत होती. तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी बाळ्यानं आपल्या सुनील शेट्टीचं गाणं लावलं, "झान्जरिया" गाण्यात जेवढ्या वेळा पॉझ येत होता तेवढ्या वेळा बाळ्या केसांची झुलपं मानेला झटका देऊन उडवायचा. झान्जरिया (झटका) उसकी झनक गयी चुनरी भी (झटका) सरसे सरक गयी (झटका). कारण गाणं सुनील शेट्टीचं असलं तरी बाळ्या अजय देवगण सोबत एकनिष्ठ होता. तशी झुलपं उडवता यावीत म्हणून तर लहानपणी निपटून काढलं तर भजी तळता येईल एवढं तेल चोपडणारा बाळ्या आता तेलाचा थेंब पण केसाला लागू द्यायचा नाही. चार चिक शाम्पूच्या पुड्या सुज्याच्या दुकानातून गायछापसोबत आणायचा आणि दीड तास केसांना चोपडत बसायचा त्याचं चीज झालं की बाळ्या खुश. तर पुढं.. मेरी नजर उनसे मिली तो -इथं बाळ्या अजय देवगण सारखे डोळे बारीक करून गंगीकडं बघायचा अन गंगीपण ममता कुलकर्णी सारखी खाली नजर करायची. पुढं गंगी उतरली की बाळ्या पण उतरून टमटमने माघारी यायचं.. तासगावला टाईमपास करून कधी एखादी झिंगारू मारून बाळ्या परत घरी. तर असा हा क्रम गेले २ महिने सुरू असताना बाळाच्या मनात पुढं काय असा प्रश्न आला आणि त्या दिवशी बाळ्यानं सहा पुड्या शाम्पू आणला. अंघोळ झाल्यावर z पावडरचा दहा रुपयांचा डबा काखेत आणि छातीवर, थोडा चेहऱ्यावर वगैरे उपडा करून बाळ्या पिवळी प्यांट लाल शर्ट काळा चष्मा, हातात म्हाताऱ्याचं सोनेरी घड्याळ अन पायात गण्याचे पांढरे बूट घालून तयार झाला. सुज्याच्या दुकानात जाऊन त्यानं विमलच्या ऐवजी आरेमडी मागितली तसं सुज्यानं त्याला वरपासून खालपर्यंत पाहिलं, अन म्हटला "आज काय गंगी वाचत न्हाय.. भाऊ शिकारच करणार बहुतेक आज" तसं बाळ्या आपला चष्मा नाकावर जरा पुढं ताणून, भुवई आणि चष्म्याच्या फटीतून सुज्याला म्हटला "हा.. मंग, कसा हाय लुक आपला?"
एक नंबर ना भाई, दुकान नसतं आता तर मी पण लुना घेऊन आलो असतो, एक पाय माझ्या लुनावर, दुसरा गण्याच्या येमेटीवर ठेवूनच एण्ट्री केली असती आज तुझी.." बाळ्याला एवढी हवा पुरेशी होती, तो लगेच आकाशात नजर लावून स्वतःला त्या सीन मध्ये पाहत होताच की मागून गण्याची येमेटी आली.. गण्यानं अश्या आशाळभूत नजरेने बाळ्याच्या हातातल्या आरेमडीकडं पाहिलं की सुज्यानं स्वतःहुन एक विमल गण्याला दिली.. छुपा दुश्मन असला तरी सुज्या अन गण्या मित्रच होते. शितलीचा म्याटर सोडला तर त्यांच्यात काही वाकडं नव्हतं.

"अहं आज याला पण आरेमडी" बाळ्या म्हटला तसं गण्यानं एक तुच्छ कटाक्ष टाकून विमल परत करून आरेमडी घेतली. सावकाश दोघांनी पुड्या फोडून तोंडात रिकाम्या केल्या, स्टॉक म्हणून अजून दोन दोन पुड्या सोबत घेऊन गण्या बाळ्या निघाले.. स्टॉप वर पोचल्यावर थोड्यावेळात येष्टी आली आणि चेन लावत लावत बाळ्या स्टॉपकडं धावला. शेवटून तिसऱ्या खिडकीत आज गंगी होती पण नेहमीसारखं तिनं बाहेर पाहिलं नव्हतं. गण्यानं येष्टीच्या सोबतच येमेटी रेमटवली आणि नेहमीप्रमाणे तासगवला बाळ्या उतरून येष्टीत बसला..

दोन तास झाले तरी बाळ्या येईना म्हणून गण्या विचार करत बसलेला असतानाच गण्याचा फोन वाजला, अननोन नंबर पाहून गण्या खाकरला, हातानं शर्टाची कॉलर नीट केली, कंबरेतून हलकासा वाकून मान खाली झुकवून त्यानं फोन कानाला लावला आणि एकदम स्टाईलमध्ये म्हणाला "ह्यालव..."
"आँ" मान सरळ, कंबर ताठ..
"कुणी" हातात गाडीची चाबी घेऊन
"कुठं"
"बरं बरं आलोच" गाडीवर बसता बसता गण्या म्हटला आणि फोन ठेवणार इतक्यात काहीतरी आठवुन त्यानं परत फोन कानाला लावला अन म्हटला "पण गेले ना ते सगळे नक्की?"
..
"न्हाई मी न्हाई घाबरत रे, पण पोरं आणायची की काय असं म्हणून विचारलो, बरं आलो धा मिंटात.."

तासगावच्या दोन स्टॉप पुढं एका कॉइन बॉक्स पाशी बाळ्या बंद शटरला पाठ लावून बुड न टेकवता बसलेला. चष्म्याची एक काच गायब, त्याऐवजी निळा पडून सुजलेला डोळा. हनुवटीपाशी थोडं रक्त.. सहा पुड्या लावलेले केस विस्कटलेले, त्यांच्यात थोडी धूळ, लाल शर्ट खिश्यापासून पोटापर्यंत, आणि एक बाही खांद्यापासून कोपरापर्यंत फाटलेली, त्यातून हातावर पडलेले वळ दिसत होते, पिवळी प्यांट तर कलर बदलून वेगळ्याच रंगाची झालेली, एक बूट गायब असा बाळ्याला पाहून गण्या पुढं सरसावला आणि त्यानं हात देऊन बाळ्याला गाडीपर्यंत आणलं अन म्हटला "बस"
"बसता यायचं नाही"
"आं"
"बसता येणार नाही, कुठून तरी एक रिक्षाचा टायर घेऊन ये"
"कशाला?"
"आरं सगळं मारून झाल्यावर माझे एकानं पाय धरले, एकानं हात धरले, हवेत उचलला अन माझाच बेल्ट घेऊन ढुंगणावर मारलं रे"
ऐकल्याबरोबर गण्या टायर आणायला धावला. येमेटीच्या मागच्या सीटवर टायर, त्यावर बाळ्या अशी ही स्वारी निघाली घरला.
सुज्याच्या दुकानापुढून गाडी गेली तसा सुज्या धावत बाहेर आला, अन म्हटला "अरारा लैच हाणला की रे तुला, कोण हुता"

बाळ्या म्हटला...

"सावळा कुंभार!"

-राव पाटील

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

लय भारी पाटील. एक लंबर.
फकस्त गण्याच्या डोळ्यांवर गॉगल ठेवा आणि कपाळावर येणारे केस हायड्रोजन peroxide लाऊन गोल्डन करा.

Rofl Rofl वरून Sad Sad लय मारला वाटतं हिरोला...

पण जबरी लिहलंय खरंच. निरीक्षणशक्ती आणि वर्णन करायची हातोटी आहे तुमच्याकडे _/\_ मग इतके दिवस छुपे रुस्तम का बरे राहिलात? असो आता नियमीत लिहा (पण टाईपकास्ट होणार नाही याचीपण काळजी घ्या)

> छुपा दुश्मन असला तरी सुज्या अन गण्या मित्रच होते. शितलीचा म्याटर सोडला तर त्यांच्यात काही वाकडं नव्हतं> ही लिंक भारीय. आधी लक्षात आली नव्हती.
===

अजय, गुड स्पिरीट!

अजयदा.. Keep it up..
तुझ्या कथेमुळे भारी विडंबन पाटलांकडुन वाचायला मिळालं.. Happy

लाल शर्ट ,पिवळी पँट,पांढरे बुट, सोनेरी घड्याळ आणि काळा गॉगल!!
बाळ्या अगदी डोळ्यासमोर उभा ठाकला.. पण बिचार्याला शेवटी फक्त मारच खावा लागला राव.. Rofl

@ ॲमी : धन्यवाद! मला आधी कल्पना सुचायच्या त्या कथा फार दवणीय होत्या, आणि तश्या कथांचा रतीब मायबोलीवर इतर लेखक घालत होतेच म्हणून लिहायचाच कंटाळा यायचा. आताशा हे विडंबन वगैरे लिहावंसं वाटतं, पण माझा जास्त वेळ मी हिंदी गझल लिहिण्यात घालवतो. आता लिहत जाईन हळुहळू.
>>पण टाईपकास्ट होणार नाही याचीपण काळजी घ्या<< हाच विचार माझ्या मनात आला आज पोस्ट करताना.

@ मन्या s: धन्यवाद!