मृगजळ!

Submitted by अज्ञातवासी on 30 August, 2019 - 13:18

भुंग्याने बरीच फुले पोखरलीत...

भुंगा!
https://www.maayboli.com/node/71224

मृगजळ!

अजून चार महिने गोळ्या चालू ठेवाव्या लागतील.
विटलोय मी या सगळ्या गोष्टींना.
आजकाल तर ती डॉक्टर हॉट दिसते म्हणून मी तिच्याकडे जातोय का, असा संशय येतोय.
ती पण नको एंगेज निघायला...
मी तिला सांगितलं, की एंगेज मुली बघून मला राग येतो.
तिने गोळ्या दिल्या आहेत. बघूयात काहीतरी होतंय का.
पाचच दिल्यात. म्हटली दहाच्या या पॅकमधील पाच दुसऱ्या पेशंटला दिल्यात, उरलेल्या नंतर घेऊन जा.
चांगलय, पुन्हा लवकर बघता येईल तिला.
कुणीतरी शीळ घालत वर येतंय.
मुलगी आहे बहुतेक.....
◆◆◆◆◆
अशावेळी मी अधीर होतो,
पण फ्रिजर बघून थंडगार पडतो...
माझ्या हृदयाचे ठोके वाढतात,
सफाईच्या भीतीने अंगे गलितगात्र पडतात...
मोहक हसू मला वेड लावतं,
ती माझी नसण्याची कल्पना मला सैतान बनवतं...
मला प्रेम हवं असतं,
पण माझं प्रेम फक्त माझंच हवं असतं...
◆◆◆◆◆
ती माझ्या जवळ येतेय, आवाज वाढतोय.
दारावर टकटक होतेय...
मी सोफ्यावरुन पळत जाऊन दार उघडलं.
समोर तीच उभी. तीच माझी... डॉक्टर... मानसोपचारतज्ञ...
आत येऊ का?
सुंदर दिसत होती. एंगेज तर नसेल?
देवा नसुदे...नाहीतर...
आज पेशंट विजिट होती, म्हणून आले.
अग, दररोज आलीस तरी काही नाही, मी मनाशीच म्हटलं.
बराच वेळ झाला, आम्ही बोलत बसलो. तिच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत बसली.
तुमची गोळ्या घेण्याची वेळ झाली ना?
हो, मी म्हणालो.
पाण्यात मिसळून घेतात ना?
नाही.
या गोळ्या पाण्यात मिसळून घ्यायच्या असतात.
मी मध्ये जाऊन ग्लास भरून आणला, आणि एक गोळी पाण्यात मिसळली.
माझ्यासाठीही पाणी आणाल प्लिज... मलाही तहान लागलीय.
मी पुन्हा निघालो पाणी आणायला.
मला तिच्या बोलण्याचा आवाज आला...
हो रे जानू, एवढी विजिट संपवून तुझ्याकडेच निघतेय.
माझं डोकं फिरलं. हीसुद्धा एंगेज?
मी माझं छोटं कटर खिशात ठेवलं.
छोटं कटर, गळा कापला...तर आवाजही निघत नाही.
मी तिच्या समोर येऊन बसलो. ती अजूनही माझ्या समोर होती.
तिची पाठ माझ्याकडे असती, तर गळा कापणे जास्त सोपं होतं...
अजूनही भुंगा फुलावर भिरभिरत होता... अजूनही फूल कह्यात नव्हतं...
मी गोळी घेतली, आणि तिच्याशी बोलत बसलो.
बराच वेळ ती बोलत होती.
अचानक एका क्षणी ती म्हणाली, मला जावं लागेल आता...
तिची पाठ माझ्याकडे होती.
फूल जवळ होतं...
मी तिच्याकडे झेपावलो...
....आणि पुढच्याच क्षणी हृदयात जीवघेणी कळ येऊन खाली पडलो.
माझी हालचाल होत नव्हती. तोंडातून शब्द फुटत नव्हता.
ती वेड्यासारखी हसत होती...
...तुला मी त्या पाच गोळ्या काढून घेतलेला पाकीट का दिलं माहितीये? त्यांच रॅपर अजून आहे.
ड्रग्ज ओव्हरडोस... परफेक्ट रिजन...
...ती माझ्यासमोरच बसलेली होती...
★★★★★
मला पुरुष आवडत नाही,
स्त्रिया नावडणारे तर नक्कीच नाही.
माझ्याकडे अशाच केसेस येतात,
स्त्रियांवर नजर ठेवतात.
दुसरा पुरुष त्यांना सहन होत नाही,
त्या स्त्रीच अस्तित्व त्यांना सहन होत नाही.
मग मी अशीच एकेदिवशी बाहेर पडते,
त्यांना भेटायला जाते.
ते माझ्या रूपावर भाळतात,
....आणि मृगजळाच्या ओढीने मरतात...
★★★★★
मी तडफडत होतो...
ती शीळ वाजवत बाहेर निघाली होती...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

> रॅपर व ड्रग्ज ओव्हरडोस कसं ते कळलं नाही. > तो तिच्यासाठी पाणी आणायला परत आत गेला तेव्हा त्याच्या ग्लासात (आधी काढून घेतलेल्या) ५ गोळ्या मिसळल्या.

Super

Super