मराण

Submitted by बिपिनसांगळे on 29 August, 2019 - 14:02

मराण
-----------------------------------------------------------
आज्ज्याने लैच तरसवलं होतं !...
म्हंजी जित्तेपणी तर तरास दिला व्हताच ... बराबर कळलं तुमाला .
आजा लै म्हातारा व्हता ,लै आजारी व्हता . पार काडी ! एके दिशी गडी झाला की गुल ! आजी धाय मोकलू रडाया लागली. चार मानसं गोळा झाली .सारीकडं बातमी पसारली .
जुना माणूस ! सारा गाव गोळा झाला .न्हेला त्याला मसणात.
त्यात पावसाचे दिस. त्येला इसाव्याला ठिवलं अन बदाबद पाऊस कोसळायला लागला.
अन बसला कि उठून पठ्ठ्या !... जे पळापळ झाली म्हणताय. मला तर हसायचं याया लागलं .पर जुनी जाणती मानसं सावारली. गोळा झाली. आजा जित्ता होता. आणला घरी .
म्हातारी खुश ! पार द्येवाला निवदाला शिराच मंग म्हाराज !
थोड्या दिसांनी पावसानं उघडीप दिली. आम्ही सारे शेतावर होतो. भातलावणीला. आन म्हातारी आली की बोंबलत.
म्हातारा गेला होता .
त्येला तपासलं. डाक्टरला दोन दोन टेम इचारलं. त्योबी साला नवशिका , सरकारी दवाखान्यातला.
म्हातारा गचकलाच होता.
न्हेला पुन्ना त्याला मसणात !
माहितगार माणसं चिता रचायला लागली. बाकीचे पांगले. लोक झाडाखाली बसले. खोडाला टेकले. बिड्या -काड्या बाहेर निघाल्या .तंबाकूच्या चंच्या सुटल्या .
अन मेल्या माणसांच्या गोष्टी निगल्या . मी बसलो थितंच फतकल मारून ते ऐकत . लै भारी . अंगावर ह्यो काटा येत हुता.
पावसाचे दिस होते .लै गवात, हिरवंगार. लै बेडकं झाल्याली .शेकडो पिल्लं त्यांची .छोटी, टुबुक उड्या मारणारी .अन त्यांच्या मागं आला की बाबा - सरपटणारा ! काळसर इटकरी.
कोणीतरी बघितलं अन बोंबाललं. जरा पळापळ झाली. कोणीतरी चितेचंच लाकूड काढलं त्याला हाणायला .
जनावर तेज होतं. ते फडा काढून बसलं. नेम धरत. नेमकं बॉडीच्या जवळच.
अन उठला की म्हातारा पुन्यांदा ! त्याला आरडाओरडा -धावपळ कळली की काय कोना ठावं ?
पुढच्या क्षणाला ते जनावर म्हाताऱ्याला डसलं. म्हातारा अस्फुट किंचाळला . आडवा झाला.
जनावर सरसरत कुठं गेलं .
अन म्हातारा गेला .
ह्या टायमाला - कायमचा !
-----------------------------
बिपीन सांगळे
Bip499@hotmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त...
पण सरकारी दवाखान्यातले डॉक्टर नवशिके नस्त्यात.... घाट घाट का पानी पिया होता है उन्होंने

माझ्या लहानपणी एका प्रौढ माणसाचं असं झालेलं ऐकलं होतं, गावातलीच घटना पण लहान असल्याने डोळ्यांनी पाहिली नव्हती. पान लागलं ( साप चावला) म्हणून मरण पावलेल्या माणसाला अंत्ययात्रेत नेत असताना अचानक हालचाल करू लागला. म्हणून परत घरी नेले पण घरी गेल्यावर खरोखरच मृत झाला. गावाकडे भेदरं पान लागलं असं म्हणतात. म्हणजे बिनविषारी साप चावला तरी भीतीने माणूस मरतो.