तारे नभात होते अन चांदणे उशाशी

Submitted by द्वैत on 29 August, 2019 - 10:59

तारे नभात होते अन चांदणे उशाशी
माझे मला न कळले नाते कधी कुणाशी

होतो कुठे निघालो आहे कुठे उभा मी
केला कधीच नाही संवाद पावलांशी

सोडून गाव जेव्हा शहराकडे निघालो
गेला तुटून मागे संपर्क जीवनाशी

बदलून पाहिले मी चष्मे तरी दिसेना
घ्यावी करून म्हणतो तडजोड ह्या जगाशी

असतो जरी मी बोलत ठेऊन स्मित ओठी
असते सदैव बोचत एक वेदना उराशी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!.

शेवटच्या द्वीपदीमध्ये मात्रांची गडबड झाली आहे.

बा द वे, द्वीपदी हा शब्द बरोबर आहे की द्विपदी? कुणी सांगू शकेल काय?

बा द वे, द्वीपदी हा शब्द बरोबर आहे की द्विपदी? कुणी सांगू शकेल काय?>>>>>>> द्विपदी.

पण मुळात ही कविता नसून गझल आहे. त्यामुळे तो शेर आहे.
शेवटच्या शेरात एक मात्रा कमी आहे.

होतो कुठे निघालो आहे कुठे उभा मी
केला कधीच नाही संवाद पावलांशी>>>>> वाह! अगदी छान! अनेकदा हाच प्रश्न पडतो जीवनात.