एका जंगलाची गोष्ट...

Submitted by sachin kulkarni on 25 August, 2019 - 13:49

स्थळ: आटपाट नगराजवळचे घनदाट जंगल.

प्रसंग पहिला:
अवनी वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे...जय आणि राधा. जंगलातला आपला दरारा आपले बछडे कायम ठेवतील या विचाराने अवनी खुश आहे. पण यासाठी तिला पुढचे काही महिने जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. दोन्ही बछड्यांना तिला जंगलातील इतर प्राण्यांपासून आणि माणसांपासून वाचवावे लागणार आहे. माणसांचा जंगलातला वावर आता वाढला होता. जंगलातला वाघ पाहण्याच्या नादात माणसांनी जंगलाला पर्यटन स्थळ करून टाकले होते. अशाच एका रात्री अवनी आपल्या बछड्यांबरोबर आराम करत असतांना १५-२० माणसांच्या आवाजांनी तिला सावध केले. मोठ्या आवाजात गाणी वाजवत, नाचत आणि जंगलातल्या शांततेचा भंग करत, ही माणसे जंगलात पार्टी करत होते. पण बछड्यांच्या काळजीपोटी अवनीने तिकडे दुर्लक्ष केले. कोणाच्याही नकळत त्यातल्या २-३ अति-उत्साही माणसांनी अवनीला पाहिले. जळती मशाल घेऊन ते अवनीला आणि तिच्या बछड्यांना पाहण्यासाठी पुढे सरसावले...अवनी घाबरली...पण बछड्यांच्या संरक्षणासाठी आता तिला प्रतिकार करावा लागणार होता. डरकाळी फोडत अवनीने आपला पंजा उगारला आणि माणसांवर हल्ला केला. एकच पळापळ झाली...जळत्या मशाली कोरड्या गवतावर पडल्या आणि जंगलात आग लागली. अवनीच्या पंजांनी जखमी झालेल्या २-३ माणसांचा धुरामुळे जीव गुदमरून मृत्यू झाला...त्याचबरोबर जंगलातल्या आगीमध्ये कित्येक प्राणी आणि पक्षी यांनी आपला जीव गमावला. संपूर्ण गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली...अवनीचा माणसांवर हल्ला...३ माणसांनी जीव गमावला...अवनी नरभक्षक झाली !!!

प्रसंग दुसरा:
आपल्या शिकारीचा पाठलाग करत-करत चुकून अवनी गावात शिरली. सगळीकडे एकच घबराट पसरली...नरभक्षक अवनीचा गावावर हल्ला...काही माणसांनी अवनीवर हल्ला केला आणि झालेल्या झटापटीत एका माणसाचा जीव गेला तर माणसांच्या कुऱ्हाडीच्या वाराने अवनी घायाळ झाली...पण त्याची कोणालाच काही पर्वा नव्हती...

प्रसंग तिसरा:
अंधारात अवनी वाघीण आपल्या दोन बछड्यांबरोबर लपून बसलेली होती. दहा दिवसांपासून माणसांनी तिला शांत बसू दिले नव्हते. आपला आणि आपल्या दोन्ही बछड्यांचा जीव वाचवण्यासाठी अवनीने सगळी ताकद पणाला लावली होती; पण आता ती सुद्धा थकली होती. जय आणि राधा दोन दिवसांपासून उपाशी होते आणि आज अवनीला शिकार करण्यावाचून पर्यायच नव्हता. दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवून अवनी शिकारीला बाहेर पडली, पण घात झाला...माणसांनी आणि त्यांच्या शिकारी कुत्र्यांनी अवनीचा माग काढला होता...नरभक्षक झालेल्या अवनीला मारण्याचे आधीच ठरले होते. जीव वाचवण्यासाठी अवनी सैरभैर धावत होती आणि अचानक माणसाच्या बंदुकीच्या गोळीने अवनीचा वेध घेतला...माणसांच्या विरुद्धची जगण्याची लढाई अवनी हरली होती.
गावातल्या सगळ्या माणसांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि नरभक्षक झालेल्या अवनीच्या मृत्युनंतर एकच जल्लोष केला. काही माणसांनी अवनीला मारण्याचा विरोध केला होता, पण त्यांची संख्या कमी होती.

प्रसंग चौथा:
पोपट आकाशातून फिरत फिरत संपूर्ण जंगलात दवंडी देतो...
ऐका हो ऐका... वनराजांच्या आदेशानुसार, आज रात्री, चंद्र डोक्यावर आल्यानंतर, जंगलातल्या नदीजवळ, सर्व प्राण्यांची सभा बोलावली आहे हो.......
सर्व प्राणी एकमेकांत चर्चा करायला लागतात. अचानक बोलावलेल्या सभेचे कारण काय असेल? अवनी वाघिणीच्या खुनाबद्दल तर सभा बोलावलेली नसेल?
किंवा माणसांच्या जंगलातील वाढत्या हस्तक्षेपा बद्दल वनराजांना काही बोलायचे असेल ??
किंवा काल पाण्यावरून झालेल्या भांडणाबद्दल ???
सभेचे कारण जरी समजत नसले तरी वनराजांचा आदेश कोणी मोडू शकत नव्हते.

प्रसंग पाचवा:
रात्री सभेची वेळ: सर्व प्राणी जमलेले.
वनराजांनी खास आमंत्रण पाठवून मोती कुत्रा आणि मनी मांजर यांना गावातून बोलावले होते.
सर्व प्राण्यांची हळू आवाजात एकमेकांशी चर्चा सुरु होती...वनराज पुढे होऊन मोठ्या दगडावर उभे राहतात आणि सभेला सुरुवात होते.
वनराज: सर्व प्रथम आपण आपल्यात नसलेल्या अवनीला श्रद्धांजली वाहू आणि मग सभेला सुरुवात करू.
[सर्व प्राणी १ मिनिट शांत राहतात...आईच्या आठवणीने जय आणि राधाचे डोळे पाणवतात...]
वनराज: अवनीच्या मृत्यूनंतर माणूस आणि जंगलातले प्राणी यांच्यातली दरी वाढत चालली आहे. जंगल कमी कमी होत चालले आहे आणि माणूस जंगलात शिरत आहे...वृक्ष तोडीमुळे पाउस कमी पडत आहे आणि त्यामुळे प्राण्यांना अन्नासाठी भटकावे लागत आहे. या सगळ्यावर चर्चेसाठी आजची सभा बोलावण्यात आली आहे. प्रत्येकाने मोकळेपणाने आपले विचार मांडावेत.
जय बछडा: (रागाने) आमच्या आईला मारणाऱ्या माणसांना शिक्षा झालीच पाहिजे. त्यासाठी कसली चर्चा?
काळू बिबट्या: आमच्या जिवाला तर पावलोपावली धोका आहे. आम्ही राहत असणाऱ्या जंगलातील भागात माणसांनी स्वतंत्र वस्ती वसवली आहे आणि आता आम्हाला घुसखोर ठरवले जात आहे. दर १०-१५ दिवसांनी एका बिबट्याला पकडून जंगलापासून दूर नेले जात आहे. माणसांना योग्य धडा शिकवलाच पाहिजे. अन्न-पाण्यासाठी आम्ही गावात शिरलो तर माणसे आमच्यावर हल्ला करतात...मारतात...जखमी झालेल्या आमच्या पिल्लांना सुद्धा जिवंत सोडत नाहीत.
मोनू माकड: मागच्या आठवड्यात ५० माकडांनी आपला जीव गमावला विषारी वायूच्या वासाने...त्याची तक्रार आम्ही कोणाकडे करायची? उपासमारीने आम्ही गावात जाऊन काही खायला लागलो तर माणसे आणि त्यांची पाळलेली कुत्री आमच्यावर हल्ला करतात. माणसांबरोबरच ह्या फितूर मोती कुत्र्याला सुद्धा धडा शिकवला पाहिजे.
[सभेचे वातावरण तापू लागले होते...मोती कुत्रा काही बोलणार त्याच्या आधी म्हाताऱ्या चित्त्याने तोंड उघडले...संपूर्ण जंगलात त्याला मान होता...वयोवृद्ध प्राणी म्हणून...]
म्हातारा चित्ता: अवनीच्या मृत्यूत तिचा काहीच दोष नव्हता? १३ माणसांना तिने मारले विनाकारण...मग ताकदीने आणि संख्येने आपल्यापेक्षा जास्त असणाऱ्या माणसांकडून तुम्ही काय अपेक्षा बाळगणार?
राधा: [चित्त्यावर धावत जावून] आईने एकाही माणसाला विनाकारण मारले नव्हते...माणसांनी मला आणि दादाला आम्ही १० दिवसांचे असताना पकडायचा प्रयत्न केला होता...म्हणून आमच्या संरक्षणासाठी आईने त्यांच्यावर प्रतिहल्ला केला होता. खोट बोलणाऱ्या माणसांनी २ चा आकडा १३ पर्यंत फुगवला आणि आईला मुद्दामच नरभक्षक ठरवून ठार मारले.
[इतर प्राण्यांनी राधाला सावरले...म्हाताऱ्या चित्त्यावर धावून जाण्याची कृती कोणालाच आवडली नव्हती...पण राधाचे दुखः सगळेजण समजू शकत होते.]
म्हातारा चित्ता: सगळ्या प्राण्यांना समजुतीने वागावे लागणार आहे. माणूस आपल्यापेक्षा ताकदवान आहे. आपल्या शिकारीसाठी त्याच्याजवळ बंदूक आहे...आपल्याकडे काय आहे? माणसाशी न भांडता आपल्याला आपले जंगल सुरक्षित ठेवावे लागेल. सगळी माणसे सारखी नाहीत. अवनीच्या मृत्युविरुद्ध काही माणसे माणसांबरोबर लढत आहेत. जंगल आणि जंगलातले प्राणी वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत...आपण सुद्धा सबुरीने घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे. बिबट्याला गावात पाहून माणसे घाबरतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला पकडतात...
मोती कुत्रा: आमच्या पूर्वजांनी हाच समजूतदारपणा दाखवला होता. आम्ही माणसांची कामे करतो, घर राखतो आणि त्या बदल्यात माणूस आम्हाला जेवण आणि संरक्षण देतो, मारत नाही.
मनी मांजर: आम्ही सुद्धा हेच करतो आणि आज माणसांच्या गावात/घरात त्यांच्या घरातीलच बनून राहतो.
शेरु वाघ: (डरकाळी फोडत) माणसांच्या ताटाखालचे कुत्र/मांजर आम्ही होणार नाही...अस लाचार होऊन जगण्यापेक्षा अवनी सारखे २-४ माणसांना मारून मरण मला आवडेल...म्हाताऱ्या चित्त्याने दुसऱ्यांना उपदेश देण्यापेक्षा गप्प बसून राहावं. स्वतःच्या अंगात ताकद नसली की हे असले उपदेश सुचतात.
चतुर कोल्हा: [मध्येच बोलत] या सगळ्या गोष्टींपेक्षा जय-राधाची सुरक्षा सध्या महत्वाची आहे. माणसांनी त्यांना पकडण्याचा दोनदा प्रयत्न केला आहे.
जय-राधा: [त्वेषाने] आम्ही अवनीचे बछडे आहोत...कोणाच्या सुरक्षेची आम्हाला गरज नाही.
वनराज: शांत राहा...अजून शिकार करता येत नाही आणि माणसाच्या बंदुकीच्या गोळीपासून कसे स्वतःला वाचवणार? आजपासून तुम्ही दोघांनी आमच्या बरोबर राहायचे...[वनराजांनी आपल्या कुटुंबाकडे पाहिले आणि राणी सिंहिणीला इशारा केला...राणी सिंहीण आणि अवनी ची मैत्री जंगलात प्रसिद्ध होती...राणीनेही दोन्ही बछडयांचा सांभाळ करायला होकार दिला.]
[माणसांची जंगलातील घुसखोरी रोखण्यासाठी त्यांच्यावर हल्ला केला पाहिजे असा विचार शेरु वाघ, माकड, कोल्हा, बिबट्या यांचा होता. तर समजुतीने हा प्रश्न सोडवावा असे म्हातारा चित्ता, सुंदर हत्ती यांचे मत होते.]
सुंदर हत्ती: माणसांच्या विरोधातली लढाई आपण जिंकू शकत नाही, हे कटू सत्य आहे. त्यामुळे माणसांबरोबर आपण एक करार केला पाहिजे. माणसांनी इथून पुढे जंगल तोडायचे नाही, जंगलामध्ये घुसून माणसांना राहायला जागा करायची नाही आणि प्राण्यांना मारायचे नाही; प्राण्यांनी सुद्धा माणसांच्या गावात शिरायचे नाही आणि त्यांच्यावर विनाकारण हल्ले करायचे नाहीत. प्राण्यांतर्फे मी आणि मोती कुत्रा माणसांबरोबर चर्चा करू शकतो. (सुंदर हत्तीने प्रस्ताव मांडला. माणसांत राहून-राहून समिती नेमणे, चर्चा करणे, प्रस्ताव मांडणे असल्या माणसांच्या गोष्टी सुंदर हत्ती आजकाल बोलत असे...]
मोती कुत्रा: [मोठ्या अभिमानाने] भू...भू...मी तयार आहे.
[अचानक झटक्या घुबडाचा सभेत प्रवेश होतो...मानेला झटका देऊन झाडावर बसण्याच्या त्याच्या सवयीने त्याला हे नाव पडले होते. झटक्याला जंगलातले प्राणी सुद्धा अशुभ मानत असत...ब्रेंकिंग न्यूज देण्यासाठी तो कुप्रसिद्ध होता.]
झटक्या घुबड: सिम्बा वाघाने गावात शिरून एका माणसाला मारले. ‘खून का बदला खून’ म्हणत तो जंगलात दूर पळाला आणि माणसांनी सुद्धा त्याला नरभक्षक घोषित करून ठार मारण्याचे ठरवले आहे...सिम्बाचा शोध घेत माणसे जंगलात शिरण्याची शक्यता आहे...

[सभेमध्ये भयानक शांतता पसरते...न थांबणारे सूडचक्र सुरु झाल्याची चाहूल सर्वांना लागते.
सभा सोडून सर्व प्राणी घाबरून जंगलात सैरभैर पळत सुटतात.
जय-राधा वनराजांचे संरक्षण छत्र सोडून जंगलात दूर जातात...मनात धगधगणारी सुडाची आग जिवंत ठेवून...
सभास्थळी एकट्या राहिलेल्या वनराजांना जंगल अजूनच जास्त असुरक्षित वाटू लागते...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान लेख .
फारच वाईट अंत : अवनी चा किस्सा.
काय माहित, ह्या लोभी मनुष्यप्राण्याला कधी अक्कल येणार ते?

एकाच घटनेची दुसरी बाजु छान शब्दांत मांडलीये. पण हे दुष्टचक्र आता थांबणार नाही. मुक्या प्राण्यांची क्रुरतेने हत्या आणि स्थलांतर होत राहणार.