श्रावणसरी

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 August, 2019 - 06:40

श्रावणसरी

असा हिंदोळला श्रावण
त्याच्या धारा रुपेरी
झुला झुलती झाडाला
उभार सरीवर सरी

चिंब न्हाले डोंगर
रानफुले कडेवर
हरवली पायवाट
जड झाला गंधभार

ओलेत्या हिरवाईला
नक्षी गढूळल्या रेषा
धुंधावले रान सारं
वारा प्यायल्या दिशा

अलगद निसटले
सुवर्णकण मेघातून
नाच-या थेंबावर
मोरपंखी पखरण

सरी श्रावण अशा
माहेरवाशीणी आल्या
नागपंचमी खेळूनीया
नांदायला घरी गेल्या

© दत्तात्रय साळुंके
३-८-२०१९

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! सुरेखच!
अगदी लयबध्द आणि अलवार.
नाधोंची आठवण करुन दिली कवितेने.

छान..

@ शाली खूप आभार एवढी मोठी दाद दिलीत. माझी कविता भरभरुन पावली.
@ सिध्दिताई काही अपरिहार्य कारणामुळे नाही झाले प्रकाशन कवितेचे. ही रचना ३-८ ला केली आहे. सरत्या श्रावणाने आठवण झाली. खूप आभार.
@ अजय, अमर आपलेही खूप धन्यवाद, असाच लोभ असूद्या.

अलगद निसटले
सुवर्णकण मेघातून
नाच-या थेंबावर
मोरपंखी पखरण >>>>> सुंदरच... Happy