भाग ४: मुन्सियारी

Submitted by मंजूताई on 22 August, 2019 - 06:25

मुन्सियारी TRH वर आलो. रुममधून थेट हिमालय दर्शन झालं पण अगदी थोड्या वेळाकरीता !

IMG-20190819-WA0028.jpg
संध्याकाळी नंदादेवी मंदिरात गेलो तिथून छान पंचचूली दिसत होतं पण तिथेही लगेच ढग आल्याने रूमवर आलो. पाऊस असेल तर भजी खाल्लीच पाहिजेत, शास्त्र असतं ना ते.....लगेच किचनला फोन! गरमागरम कुरकुरीत भजी मस्तच होती ती आयती मिळाल्याने जास्तच चविष्ट लागली. भज्यांचा आस्वाद घेत मॅच बघत बसलो.

मुन्सियारी खलिया टाॅप ट्रेकसाठी प्रसिध्द आहे. खलिया टाॅपवर पण TRH आहे. एक दिवस चढून जायचं मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी उतरायचं,असं ट्रेकर्स करतात. आरामात उठून नाश्ता करून एक छोटासा ट्रेक करून गायत्री मंदिरात गेलो. छान मंदिर आहे. देव दर्शनाचा पाच वर्षाचा कोटा ह्या पाच दिवसांत पूर्ण करून घेतला.आजचं मुख्य आकर्षण होतं - आर्य फॅमिलीकडचं पारंपारिक कुमांऊ जेवण!

20190820_153625.jpg
आर्य फॅमिलीकडे एक वाजता जेवायला जायचं होतं तोवर निव्वळ टाईमपास म्हणून कुमांऊ म्युझीयम बघायला गेलो. आम्ही तिघंच पर्यटक. तिथला कर्मचारी लोळत टीव्ही बघत होता. गाईड बिईडची भानगड नसावीच असं समजून आम्ही बघायला सुरूवात केलेली पाहून कर्मचार्‍याला काय वाटले माहीत नाही तो म्हणाला की, दारापासून सुरुवात करा. मी कॅसेट लावतो. कॅसेट लावून तो परत आडवा झाला. ही कॅसेटची आयडीया भारी वाटली. त्यामुळे नुसतीच नजर न टाकता प्रत्येक वस्तु बारकाईने पाहिल्या गेली.

20190820_153758.jpg
आज जी मंडवाची रोटी व भट्टका डुबका खायचा होता त्या धान्याचे सॅम्पल्स लावलेले होते. मंडवा म्हणजे नाचणीच, जे मला वाटत होतं त्यावर शिक्कामोर्तब झालं. भट्ट की दाल म्हणजे आपल्या चवळीचं भावंडं! हा प्रदेश तिब्बेटला लागून असल्याने त्यांच्याशी व्यापार मोठ्या प्रमाणात व्हायचा त्यामुळे तिथल्या जीवनमानावर तिब्बेटचा प्रभाव खूप आहे. भारत चीनच्या सरहद्दीवर असलेलं मिलाम हे गांव. ह्या गावाचे बासष्टच्या युध्दापूर्वीचे व नंतरचे फोटो लावलेले आहेत. युध्दाच्या काळात लोकं विस्थापित होऊन आजूबाजूच्या गावात विखुरल्या गेली. आता मिलाम नव्याने वसवल्या व विकसीत केल्या जातंय एक प्रमुख पर्यटनस्थळ व गिर्यारोहकांसाठी बेसकॅम्प म्हणून. बरेच जुने दस्तावेजही जतन करून ठेवले आहेत. परंपरेतून आलेली माहिती व ज्ञान जतन करणारं हे छोटसंच म्युझीयम छान आहे.

काल ठरलं होतं की सौ. आर्या माझ्यासमोर काही पदार्थ करतील. म्युझीयम बघण्यात अपेक्षेपेक्षा जास्तच वेळ गेल्यामुळे आमची वाट पाहून त्यांनी अर्धा स्वयंपाक करून टाकला होता. आमच्यासमोर भांग व अंगणातून तोडून आणलेल्या पुदीन्याची चटणी ( त्यांनी लिंबाचा अर्क भांगेच्या चटणीत टाकला होता. त्याची प्रक्रिया व साहित्य म्युझीयममध्ये ऐकलं, पाहिलं होतं. तांब्याच्या कढईत लिंबाचा रस घट्ट होईपर्यंत उकळवून बाटलीत भरून ठेवायचा. वर्षानूवर्षे हा रस टिकतो) पाट्यावर वाटली व मंडवाची रोटी हातावर थापून केली.
20190822_144744.jpg
आर्यांची मुलगी हल्द्वानीला कायद्याचं शिक्षण घेतेय. तिच्याशी भरपूर गप्पा झाल्या. तिच्या शिक्षणाचा तिच्या गावात फारसा उपयोग नाही. एक तर तिथे भांडणं, चोऱ्यामाऱ्या, दरोडे, खुन ह्याचं अत्यल्प प्रमाण आहे आणि असलेच तर पंचायत निवाडा देते किंवा 'गोलूबाबाला' साकडं घातल्या जातं. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात इथे लोकांना जायची फारशी गरज पडत नाही. डाॅक्टरच्या दवाखान्याचीही चढत नाहीत का? चढायला ना डाॅक्टर दिसले ना इस्पितळं. फक्त एक सरकारी दवाखाना. शुध्द हवा, शुध्द आहार ( बहुतेक लोकं नैसर्गिक शेती करतात) व कंपल्सरी व्यायाम (रोज डोंगरावरची चढउतार ) म्हणून फिट असावेत. सौ आर्या फक्त सहावीपर्यंत शिकलेल्या आहेत . मुलांनी चांगलं शिकावं म्हणून त्या संसाराला हातभार म्हणून रेडिमेड कपड्यांच दुकान चालवतात. मुलगा आयआयटीची तयारी करतोय दिल्लीला व गीता लाॅ करतेय. सुखी, समाधानी व मनमिळाऊ कुटुंब !
20190822_144849.jpg
डोंगरावर असलेल्या घराच्या अंगणात आमची अंगतपंगत मस्त जमली. त्यांच्या खाण्याच्या पध्दतीप्रमाणे मि. आर्य मंडवाच्या रोटीवर भांग चटणी पसरवून आम्हाला देत होते. अंगणातलाच मुळ्याचा पाला व कोवळ्या राजमाच्या शेंगाची भाजी, डुबका व भात. बेत एकदम फक्कड!

आम्ही जेवायला येणार म्हणून सौ आर्यांची आई शेजारच्या गावाहून खास आली होती घरचं तूप घेऊन! काय लिहू? शब्द नाहीयेत भावना व्यक्त करायला..... डोळे पाणावले....या महिन्यातला उत्तम आदरातिथ्याचा व चविष्ट जेवणाचा हा दुसरा अनुभव.

(जून महिन्यात कोल्हापूर, पन्हाळा, कणेरी मठ, न.वाडी, खिद्रापूर , सांगली असं तीन दिवसात फिरून आलो. एका मैत्रिणीने सांगितलं होतं 'सोमण' खानावळीतच जेवायचच. आदल्या दिवशी संध्याकाळी खानावळ शोधत होतो .....आमचं बोलणं ऐकून एक मुलगा म्हणाला आता बंद असते फक्त अकरा ते दोन चालू असते.मी देतो तुम्हाला नं. तो नं देऊन गेला आणि लगेच परत आला साॅरी चूकीचा नं दिला म्हणून.... बरोबर नं दिला व म्हणाला सचिनकडे जेवल्याशिवाय जायचं नाही हं......आमचा फोन काही लागला नाही.... दुसर्या दिवशी सकाळी टपरीवर चहा पित असताना तिथल्या मुलीला खानावळ केव्हा उघडते वै चौकशी करत होतो तर ती पण म्हणाली सोमणांकडे जेवल्याशिवाय जायचं नाही हं....
खानावळीत गेलो.. पाटी:सोमण खानावळ , कांदा लसूण विरहीत. आमची कोठेही शाखा नाही. सचिन सोमण. पांढरा पायजमा, बंडी घातलेला, डोळ्तायत भाजीच्या पिशव्या घेऊन चाळीशीतला मुलगा आला ... तोच सचिन!
आम्ही तीनजण आहोत
आज फार गर्दी नाहीये त्यामुळे काही प्राॅब्लेम नाही.
तुमच्या खानावळीबद्दल इतकं ऐकलंय...
एक गोड विनम्र हास्य
कोण स्वयंपाक करतं ?
मीच ! बाकी कामाला बायका आहेत...
मसाले काय वापरता?
मीच करतो ...
त्याला स्वयंपाक करायची घाई होती म्हणून मुलाखत लांबवली नाही.
खिद्रापूरला जाऊन बारा वाजता पोचलो तर छोट्याश्या प्रतिक्षालयात बसावं लागलं . दहा मिनीटातच नंबर लागला. जेमतेम पंधराजण बसतील असं बोळकांड म्हणजे खानावळ ! आम्ही बेंचवर बसल्यावर सचिनने डेस्क आत सरकवले जेणेकरून वाढप्यांना मोकळी जागा मिळेल. स्टीलची ताटं मांडल्या गेली. डाव्या बाजूला लिंबानंतर दोन लोणची मिरची व आंबा , आंबेडाळ व काको , उजव्या बाजूला फ्लाॅ.ब भाजी, वांग्याचा रस्सा, मसूर, वाटीत आमटी व बासुंदी,मध्ये पापड कुरडया,भात, पिवळं धमक वरण त्यावर तुपाची धार ! हे असं भरलेलं ताट बघून डोळे, मन तृप्त झाले. गदिमाच्या कविता आठवली. मगआल्या मऊसुत पोळ्या व टम्म पुर्या ! वाढायला एक बाई व स्वत: सचिन, सबकुछ स्वयंपाकी, वाढपी, कॅशियर! एकही पदार्थ मागावा लागला नाही. एका पाठोपाठ एकेक पदार्थ येतच राहिला.... बासुंदी लिमीटेड असावी असं वाटत असेतोच बासुंदी आली आणि मग सुरू झाला सचिनचा प्रेमळ आग्रह ... आता ह्या बासुंदी बरोबर गरमागरम पुरी घ्या .... मग पुरी बरोबर बासुंदी हवीच ना म्हणून परत बासुंदी .... आता आमटी नुस्तीच पिऊ व मागल्या भाताला रामराम देऊ मनोमन ठरवताच आला गरमागरम मसाले भात व ताक .... आग्रह कमी वाटला की काय तर ताकभाताशिवाय जेवण कसं बरं पूर्ण होईल म्हणत घासभर पांढरा भात वाढलाच.... किती वर्षात असं पंक्तीत बसून अगत्याने आपुलकीने वाढलेलं जेवलोच नाही ..... डोळे पाणावले ..... बिल पाहून विश्वासच बसेना..... आजच्या भौतिकवादी जगातला हा असा अनुभव हेलावून गेला..... मनापासून भरलेल्या ढेरीने ढेरभर धन्यवाद व अन्नपूर्णा प्रसन्ना राहोतच्या शुभेच्छा देत बाहेर पडलो.....)
अतिथी देवो भव! अतुल्य भारत!
https://www.maayboli.com/node/71166 : भाग ५
https://www.maayboli.com/node/71115 : भाग ३
https://www.maayboli.com/node/71089 : भाग २
https://www.maayboli.com/node/71078 : भाग १

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो ट्रेकचा फोटो झक्कास आहे. भांग चढत नाही का हो? खैके पान बनारसवाला, जय जय शिव शंकर वगैरे गाण्यात दाखवतात म्हणून विचारलं. आंबेडाळ व काको.....काको म्हणजे काय? शॉर्ट फॉर्म आहे का कसला? स्थानिक लोकांकडे जेवायला मिळालं म्हणजे सही आहे. म्युझियममधले काही फोटो असतिल तर टाका ना प्लीज.

अप्रतिम लेख. खऱ्या सज्जनांना सगळीकडे सज्जन लोकच भेटतात हे तुमच्या बाबतीत आहे असे मनापासून वाटलं. सचिन विषयी तर आदर वाटतो. धन्यवाद.

हर्पेन, Happy
स्वप्ना, आंह्याची डाळ चैत्रगौरीला करतात ती व काको काकडी कोशिंबीर. आम्हीही विचारलं आर्यांवा तर ते म्हणाले भांगेच्या बियांची (आळीवा सारखं दिसायला) चटणीरकरतात ती चढत पण पानं चढतात.

अप्रतिम लिहिले आहे. असे कुठे जाऊन तिथे स्थानिक जेवायला मिळाले तर सोने पे सुहागा...

अप्रतिम लिहिले आहे. असे कुठे जाऊन तिथे स्थानिक जेवायला मिळाले तर सोने पे सुहागा...

सोमण खानावळ म्हणजे भोजनालय का? नेटवर भोजनालय येतेय.

अप्रतिम लेख. खऱ्या सज्जनांना सगळीकडे सज्जन लोकच भेटतात हे तुमच्या बाबतीत आहे असे मनापासून वाटलं. सचिन विषयी तर आदर वाटतो. धन्यवाद. >>> यू सेड इट...

फारच मस्त लिहिलंय...

साधना, शैलजा, वावे, शशांकजी, मनापासून धन्यवाद!
अमर, एवढी मोठी काॅम्पलिमेंट दिलीत की काय लिहावं सूचलंच नाही. मी प्रवास खूप करते. केंद्राच्या कामानेही पूर्वांचलच्या दूर्गम भागातही बरीच फिरले एकटीने खरं सांगते एकही वाईट अनुभव आला नाही उलट हेलावून टाकणारेच अनुभव खूप आले. परत एकदा मनापासून धन्यवाद!

मी confuse झाले, आर्या आणि लगेच सोमण ? मध्ये काहीतरी लिंक लागत नाहीये. लोकल घरगुती जेवायला मिळणे म्हणजे पर्वणी. बाकी मी इथे गेले तर तुमच्या ह्या मस्त वर्णनाचा परिणाम Happy

राजसी, या महिन्यातला उत्तम आदरातिथ्याचा व चविष्ट जेवणाचा हा दुसरा अनुभव.>>>>>>> पहिला अनुभव आर्यांकडचा व खाली लिहिलेला दुसरा!
कुमार१, राजसी, सोनाली मनापासून धन्यवाद!

मला , सौ आर्या मायबोलीवरची कोणाचीतरी आयडी वाटली आणि तिच्या घरी जेवलात.
तो सोमणांचा नंबर द्याल का?

मंजुताई झकास लिहिताय!
सचिनचा अनुभव कंसात लिहाल का?मुन्सियारीतील आर्यांकडचा अनुभव वाचताना मधेच एकदम सचिनचा अनुभव वाचला. एकदम वाटले या माणसाला इतक्या भाज्या वगैरे तिथे कशा मिळाल्या? नंतर परत वाचले तर सचिन,खिद्रापूरचे आहेत.रसभंग झाल्यासारखा वाटतो.

झंपी, सचिनचा नं फक्त डायल करून ठेवला होता सेव नव्हता केला. खूप गर्दी असेल तर वर्दी द्यावी लागते एेरवी काही फार थांबाव लागत नाही.
देवकी, दैनंदिनीत हा प्रसंग लिहून ठेवला होता. इतका चांगला अनुभव सगळ्यांना सांगावा वाटला म्हणून इथे काॅपी पेस्ट केला. चांगली सूचना टाकते कंसात
सूर्यगंगा, धन्यवाद!

तुमच्या साधेपणात गोडी मानणार्‍या वृत्तिला शतशः प्रणाम. आर्य आणि सचिनसारखी माणसं खूप असतिल पण त्यांच्या बडेजाव नसलेल्या अतिथ्याला दाद तुमच्यासारखी माणसंच देउ शकतात.