ऑगस्टच्या आठवड्यातली रोजनिशी !

Submitted by Charudutt Ramti... on 11 August, 2019 - 09:11

गेला संपूर्ण आठवडा प्रचंड उलथापालथ करून गेला.

सोमवारी सकाळ सत्राच्या कामकाजाची सुरवातच झाली ती संसदेत ‘कलम ३७०’ नावाच्या सुनामीने आणि त्याच बरोबर ‘कलम ३५ अ’ मोडीत काढण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानं झालेल्या विजेच्या कडकडाटा पासून. मोदींनी अहमदाबादेतून नागपूर मार्गे दिल्लीत आणलेला 'मोटा'भाई हे स्वतःच एक झंझावाती चक्रीवादळ आहे ह्याची पुरेपूर दखल संसदेतील सर्व सदस्यांना इच्छा असो वा नसो घ्यावी लागली. भारतीय सोशिक लोकशाहीत सर्व प्रश्न लोकशाही मार्गानेच सोडवले जातील हा गेल्या सत्तर वर्षातला काश्मिरी फुटीरतावाद्यांचा मोठा गैरसमज परवाच्या श्रावणी सोमवारी धुळीस मिळाला आणि कधी नव्हे ते गुजराती खमण आणि फाफड्यांचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काश्मिरी सफरचंद आणि अक्रोडांपेक्षा कितीतरी अधिक वधारला.

इतकं सोपं होतं तर मग इतके वर्ष आपले सत्ताधीश हे निर्णायक पाऊल का उचलत नव्हते काश्मीर बद्दल? ह्या प्रश्नाचे उत्तर मोटाभाईंनी स्वतःच संसदेत दिले. "केवळ तीन राजकीय कुटुंबांच्या वैयक्तिक लाभा करिता हे सर्व सुरु ठेवलं गेलेलं होतं" असा धडधडीत आरोप करत अमित शाह नावाची तोफ दिल्लीत दणाणली आणि तिकडे श्रीनगर मध्ये आधीच बर्फ साठून राहूनये म्हणून जरा तिरक्याच बांधलेल्या अब्दुल्ला आणि महेबुबा मुफ्ती कुटुंबियांच्या घरांची धाबी दणाणली. पण ह्या सर्व आरोप प्रत्यारोपात तिसरे लाभार्थी कुटुंब कोणते ह्याचे उत्तर शेवट पर्यंत गुलदस्त्यातच राहिले असले तरी ज्यांनी त्यांनी आपापल्या परीने , कुणी तिसरे कुटूंब म्हणजे 'सज्जाद गनी लोन ह्यांचे कुटुंब' तर कुणी तिसरे कुटूंब म्हणजे स्वतः नेहरुंचे कुटुंब कारण त्यांचे दिवंगत शेख अब्दुल्ला ह्यांच्याशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते असे आपापल्या परीने कयास बांधले. इकडे महाराष्ट्रातील काही नतद्रष्ट आणि आचरट कार्यकर्त्यांनी देशांतर्गत राजकारणात अत्यंत रस असला तरी त्यात काहीएक गती नसल्याने ती तिसरी फॅमिली म्हणजे आपली बारामतीची तर नव्हे? कारण कुठलाही “जागेचा आणि जमिनीचा” प्रश्न म्हणजे फक्त 'साहेबच सोडवणार' असे मानणाऱ्यानी सोशल मीडियावर आपापल्या परीने गुण उधळलेच.
असो एकंदर मोटाभाई नी पहिल्याच ओव्हरला हॅट्ट्रिक केल्यामुळे राजकीय वर्तुळात विरोधकांच्या गोटात खळबळ आणि सत्ताधारी मंडळींच्या तंबूंमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले.

पण ह्या सर्व राजकीय घडामोडींचा टी.व्ही. समोर सोफ्यावर पाय पसरून निवांतपणे आणि यथेच्छ आनंद उपभोगला तो फक्त पुणेकरांनी. कारण पुण्यात तीस पैकी तीन पूल पाण्याखाली गेले आणि तिकडे 'आ सिंधु-सिंधु पर्यन्ता, यस्य भारत: ' अशी गर्जना करणाऱ्या लोकसभेतील संघपरिवारातील नेतृत्वाचे मनोबल वाढावे म्हणून इकडे दक्खन च्या पठारावरील आणि मुळामुठेच्या व भीमेच्या खोऱ्यात वसलेल्या सतर्क पुणेकरांनी ‘आ-हिंज- हिंजवडी यत्र खराडी पर्यंत:’ सर्व आयटी कंपन्या शाळा ऑफिसेस आणि कारखान्यांना सुट्टी जाहीर केली. जे तीन पूल पाण्याखाली गेले ते खरं तर नदी पात्रातच बांधले गेलेले आहेत आणि ते अभियांत्रिकी दृष्ट्या 'ब्रिजेस' नसून खरं तर 'कॉजवे' आहेत. परंतु पुणेकरांना, (मुळातच इतरांना पाण्यात पाहायची खूप असली तरी ही) मुळेत अथवा मुठेत वाहतं पाणी पाहायची अजिबात सवय नाही! त्यामुळे जराकुठे नदीला पाणी आले की – “बाबाभिडे पूल पाण्यात गेला” , “पूर आला पूर आला” , “झेड ब्रिज चा कठडा पडला” अश्या तर्हेच्या फुटकळ बातम्या व्हाट्सअप वर फोटोसहित प्रसारित करून निष्कारण , झेड ब्रिज वर संध्याकाळचा अंधार शोधणाऱ्या बापुड्या प्रणयी युगुलां ची गैरसोय करून काय कपट साध्य होते? हे समजत नाही. खरं तर त्या झेडब्रीज वर रोज सूर्यास्तानंतर एवढी प्रणयी युगुलं त्या रेलिंग ला रेलून उभी असतात एकमेकांच्या कमरेत हाताचे विळखे घालून , त्यांच्या ओझ्याने जर झेड ब्रिज च्या कठड्याचे रेलिंग जर तुटले तर त्याचा पुराची काय संबंध? उगाच फुकाचे त्या शिमला हौस मधून पावसाचे अनुमान देणाऱ्या वेधशाळेच्या शास्त्रज्ञांच्या मागे लागायचं 'अंदाज चुकला अंदाज चुकला' म्हणत. अरे ती वेधशाळा आहे, चाणक्य एक्सिट पोल नव्हे सर्वच्या सर्व अंदाज खरे ठरायला. बिचाऱ्या वेधशाळेतल्या कर्मचाऱ्यांना संध्याकाळी सहा वाजले की घरी जायचे वेध लागतात , पण ह्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ आणि पोस्ट्स मुळे संध्याकाळी ऑफिसात उगाचच उशिरापर्यंत थांबून इन्सॅट उपग्रहानं पृथ्वीवर पाठवलेली आणि कुणालाच न समजणारी ढगाळ अशी श्वेतधवल चित्रं त्यांच्या संकेतस्थळावर वर अपलोड करावी लागतात. आणि एवढं करून परत स्वतःची मस्करी करून घ्यावी लागते चारचौघात. पण वेधशाळेचे एकंदर जेवढे अंदाज चुकलेत आजवर तेच बाकी पथ्यावर पडलं आहे. पुणे वेधशाळेचे पावसाचे सगळे अंदाज बरोबर आले असते तर हिंजवडीत कार आणि बसेस ऐवजी होड्यांचे आणि बोटींचे ट्रॅफिक जाम झाले असते हे नक्क्की. ' ह्या पुण्यातील लोकांना गाड्या नीट शिस्तीत चालवायला काय होतंय राओ ? ' अश्या त्रासिक तक्रारींऐवजी ' अरे ए भाऊ नीट वल्हव नं तुझी होडी, अरे तिकडे बघ न जरा जा की डावीकडे , आहे नं अजून पाणी त्या बाजूला इकडे कशाला कडमडतोयस इकडे तुझी बोट घेऊन ? आधीच उशीर झालाय , फेज थ्री पर्यंत जायचंय भावा ' अश्या स्वरूपाची भांडणं (होड्याहोड्यांमधून) चौकाचौकात ऐकू आली असती. आणि मेट्रोझिप वाल्यानी वायफाय एनेबलड ‘लाँच’च ‘लाँच’ केली असती. त्यामुळे वेधशाळेचे बरेचसे अंदाज चुकताहेत तेच बरं आहे, अशी गत आहे.

तिकडे संसदेत राजकीय सुनामी आणि इकडे बाबाभिडे पुलावर पाणी आल्याची बातमी येऊन धडकते न धडकते तोवरच तिकडे सुषमा स्वराज ह्यांच्या निधनाची दुःखद वार्ता रात्री कुणीतरी टीव्ही वर आल्याची पोस्ट टाकली आणि आधीच दुथडी भरून वाहणाऱ्या खडकवासल्याच्या मुठेतील पाण्यात आमच्या डोळ्यातून दाटलेल्या आणि गालावरून ओघळलेल्या अश्रुंचे दोन थेम्ब जाऊन मिळाले. काय ओजस्वी व्यक्तिमत्व ! शतकातुन काय सहस्त्रकातुन एकदाच घडावं असं तेजस्वी आणि ओजस्वी रूप आणि तितकीच धारधार पण संस्कारक्षम वाणी. चैत्र प्रतिपदेची सरस्वती आणि अष्टमीची काली एकाच देहात जन्म घेऊन आल्यातर काय घडेल ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे सुषमा स्वराज. सार्वजनिक जिवनातील आणि राजकारणातील स्त्रीनं कसं वागावं ह्याचा परिपाठ म्हणजे सुषमा स्वराज.

ह्या अश्या एकाच वेळी देश एकसंध होत असल्याचा जल्लोष करावयास लावणाऱ्या आणि त्याच बरोबर सुषमाजींच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या निधनाचा शोक करावयास लावणाऱ्या बातम्या आठवड्याभरात येत असतानाच तिकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली आणि कोल्हापुरात पुराने केलेल्या हाःहा:कराच्या बातम्या सुद्धा येऊन धडकल्या. एकीकडे झेलम आणि चिनाब परत एकदा आपल्या सिंधू संस्कृतीशी तद्रूप झाल्या पण इकडे आमच्या कृष्णेंनं आणि पंचगंगेनं मात्र रौद्र रूप धारण केलं. संह्याद्रीत पाऊस थांबायचं नाव घेईना. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांनी आणि तिच्या फुगलेल्या पात्रांनी हजारो घरं उध्वस्त केली आणि असंख्य संसार मोडकळीस आणले. सांगली आणि कोल्हापुरात अक्षरश: रस्त्यांवर सहासहाफुट खोल पाण्यात नावा फिरल्या आणि पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यात बऱ्याच अंशी यश प्रशासनास मिळालं. पण तरीही असंख्य लोकांची ही निसर्गानं केलेली बिकट अवस्था पाहून मनात 'काळजीनं आणि खिन्नतेनं मळभ' व्यापून राहिलं.

एकंदर संबंध आठवडा हा असा घडामोडींचा आणि उत्थापालथीचा...उत्तरेतून ऋषी कश्यपांच्या काश्मीर पासून ते रामदासांच्या दक्खनच्या पठारा पर्यंत आणि केंद्रशासित लद्दाखच्या उंच हिमालयात पसरलेल्या बर्फाच्छादित सरोवरांपासून पासून ते संह्याद्रीच्या रौद्र खळखळणाऱ्या आणि उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यांपर्यंत असा हा न विसरता येण्याजोगा एक आठवडा , प्रचंड उलथापालथींचा !

चारुदत्त रामतीर्थकर.
११ ऑगस्ट १९, पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

अरे हे भारीये की!

फक्त ते पुराच सोडून...पूर खरंच भयानक आहे.