पणू

Submitted by आर के जी on 11 August, 2019 - 00:33

तो आज खेळून खेळून खूपच दमला होता. लाल्या माशाबरोबर पळापळी खेळता खेळता सगळा दिवस संपून गेला. रात्र झाली तशी पणूला पिवळ्या झाडाची फांदी आठवली. तिच्या पानावर बसून तिच्याकडून गोष्टी ऐकत पाण्यावर डुलत डुलत त्याला झोप लागली.

पाणी! काय होतं हे पाणी म्हणजे? ती एक गंमतच आहे! आपल्या पणू सारखे चिक्कार पणू एकत्र येऊन एकत्र डोलायचे. आणि बघणारा त्याला पाणी म्हणायचा. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच की आपला पणू दुसरा तिसरा कोणी नसून पाण्याचा एक थेंब होता!

तर.. आपण परत एकदा आपल्या पणूकडे जाऊ. सकाळ झाली. पणूने डोळे उघडले आणि इकडे तिकडे पाहिलं. आजचा माहोल त्याला जरा वेगळाच वाटला. त्याला त्याच्या काही मित्रांची रडारडी ऐकू आली. 'का रडतो आहेस रे?' पणूने त्याच्या मित्राला, गोलूला विचारलं. गोलू म्हणाला, 'बघ ना पणू, इकडे बहुदा कसलीतरी रोगाची साथ आली आहे. आपले सगळे मित्र तापाने आजारी पडत आहेत. काही जण तर आकाशात निघून जात आहेत.' पणू चरकला. पिवळ्या झाडाच्या फांदीने त्याला आकाशात जाण्याबद्दलची गोष्ट सांगितली होती. 'म्हणजे आपलं सगळं संपलं तर!', पणूच्या मनात विचार आला. एवढ्यात पणूला एकदम चक्कर आल्यासारखं वाटलं. अवती भवती सगळं गोल गोल फिरायला लागलं. सगळीकडे गरम गरम चटके बसायला लागले. गोलू म्हणाला, 'अरे पणू, तू ठीक आहेस ना? बापरे! तुला पण ताप आला? म्हणजे तू पण जाणार मला सोडून?' पणूला रडू आलं. पण त्याच्या हातात आता काहीच राहिलं नव्हतं. तो हळू हळू इतर मित्रांच्या मधून तरंगत वर जाऊ लागला. त्याला खरं तर चटके अजिबात सहन होत नव्हते. पण तो तरी काय करणार?

वाईट वाटतंय ना आपल्या बिचाऱ्या पणू साठी? पण आता पुढची गंमत ऐका.

काही वेळातच तो त्याच्या नेहमीच्या जगापासून अलगदपणे वेगळा झाला आणि हवेत तरंगायला लागला. हे नवीन जग त्याने कधीच पाहिलं नव्हतं. आता त्याला चटकेही बसत नव्हते. तो स्वतःच बदलला होता. हलका झाला होता. थोडा सैलावला होता. त्याने खाली डोकावून पाहिलं तर त्याचे सगळे मित्र अजूनही गोंधळ करत होते. पणूने विचार केला, 'अरेच्चा! हे ताप येणं काही इतकं वाईट नाहीये. मित्रांना सांगायला पाहिजे की घाबरू नका. पण कसं सांगणार?' हवेतच गटांगळ्या खाता खाता त्याची नजर वर गेली. आणि त्याला त्याचे बाकीचे मित्र दिसले. त्यांना बघून तो जाम खुश झाला. तो म्हणाला, ‘हुर्रे! आता इथे पण दंगा करूया!' त्याचा मित्र टप्पू त्याला त्याच्या डोक्यावरच दिसत होता. तो त्याच्या शेजारी जाऊन बसणार तेवढ्यात वाऱ्याने त्याला थोडं लांब फेकलं. आणि तो बोरूच्या शेजारी जाऊन बसला. 'बोरू, please इथे तरी मला बोर करू नकोस हां!', पणूने बोरूला दामटले. बोरू बिचारा वरून दिसलेल्या गमती जमती सांगण्याच्या तयारीत होता. पण पणूचा हा अवतार बघून तो घाबरून गप्पच बसला.

आता पणू त्याच्या जागेवर जरा स्थिरावला आणि खालची गंमत पाहू लागला. वेगवेगळ्या रंगाच्या, आकाराच्या चिक्कार नवीन गोष्टी. आधी कधीच न पाहिलेल्या! बराच वेळ तो त्या आनंदात रमला. एवढ्यात त्याचे इतर काही मित्र त्याला येऊन धडकू लागले. अगदी त्याच्या समोर स्थिर झाले. त्यामुळे आता त्याला खाली पाहता येईना. त्याला मित्रांचा राग आला. पण ते तरी काय करणार? वाऱ्याने जागा दाखवली तिथे मुकाट्याने बसले होते सगळे. काहीच वेळात सगळ्यांनी मिळून तिथे छान दंगा सुरु केला. जो कोणी सगळ्यात खाली असेल त्याने खालची मजा सांगायची असा ठरलं. वारा होताच मदतीला. कधी पणू खाली तर कधी टक्कू. पणू मित्राला म्हणाला, 'टक्कू, खालच्या पाण्यापेक्षा इथल्या पाण्यात जास्त मजा येतीये नाही?' टक्कू म्हणाला, 'अरे ह्याला आता पाणी नाही, ढग म्हणतात'. 'हो का? काहीही म्हणा. पण वरून खाली बघायला जाम मजा येतीये’. 'आत्ताच मजा करून घे. एकदा आपण खाली गेलो की लवकर परत वर नाही येता यायचं!' टक्कू मोठ्ठया माणसासारखं बोलला. 'आपण परत खाली जाणार? कधी?' पणूने त्याला विचारलं. 'हो तर. कसे जाणार ते माहीत नाही. पण जाणार हे नक्की.' टक्कू फारच हुशार होता. पणूला वाईट वाटलं. कारण त्याला हे नवीन जग खूपच आवडलं होतं. पण त्याने विचार केला, 'अजून काही दिवस तर आहोत ना आपण इकडे. मग नंतरचा विचार करून कशाला रडत बसायचं. आत्ताची धमाल अजिबात सोडायला नको'. आणि परत त्याने दंगा सुरु केला.

ह्या सगळ्या मस्तीमध्ये किती दिवस गेले त्यांना समजलंच नाही. एक दिवस अचानक पणूला जोरदार धक्का बसला. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिलं. समोरूनच एक मोठ्ठा ढग त्यांच्यावर चाल करून येत होता. पण त्या ढगामध्येही सगळे जण जाम टरकलेले दिसत होते. 'अच्छा, वाऱ्याची दादागिरी चाललीये होय!', पणूला बरोबर समजलं. तो सुद्धा आता हुशार झाला होता. ढगांच्या धडकाधडकीमुळे जोरदार आवाज आला. आणि एक मोठ्ठा दिवा अचानक लागला आणि लगेच बंद झाला. 'हे काय रे?', पणूने घाबरून बोरूला विचारलं. बोरू म्हणाला, 'मला काय माहीत? मला तर जाम भीती वाटतीये'. बोरू येऊन पणूला चिकटला. दोघांनी मिळून आजूबाजूला पाहिलं तर टप्पूसुद्धा घाबरून रडवेला झाला होता. इतर मित्रांचीही तीच परिस्थिती होती. 'घाबरू नका. एकमेकांना घट्ट धरून ठेवा', पणू आता मोठ्या माणसासारखा इतर मित्रांना धीर देऊ लागला. सगळे जण एकमेकांना घट्ट पकडून ठेवू लागले. तशी गंमतच झाली. जसे जसे एका ग्रुपमधले मित्र वाढू लागले तसे तसे ते खाली खाली जाऊ लागले. 'अरे, कुठे चाललात तुम्ही. हात धरा आमचा'. असं म्हणून पणूने आपला हात मित्राच्या हातात दिला आणि… त्याच क्षणी तो पण त्याच्याबरोबर खाली खेचला गेला. पणूला अचानक आठवलं. 'टक्कू म्हणाला होता त्याप्रमाणे खाली जायची वेळ आलेली दिसतीये.' तो आधी ढगातून बाहेर आला. मग त्याला एकदम थंडी वाजू लागली. त्याचा खाली येण्याचा वेग अचानक वाढू लागला. खालून जोरात ओढ बसू लागली. जोरात.. अजून जोरात.. सूर्रर्र.. टप्प!!!

आंब्याच्या झाडाच्या हिरव्या पानावर एक टपोरा थेंब पडला. मग तिथून त्याची घसरगुंडी झाली. पानावरुन देठावर, तिथून खोडावर, तिथून घसरत घसरत तो थेंब हळूच जमिनीवर पडला आणि जमिनीतलं नवीन जग बघायला जमिनीतच मुरून गेला.

Group content visibility: 
Use group defaults

मस्त!