श्रीकृष्ण

Submitted by चैतन्य रामसेवक on 9 August, 2019 - 09:52

श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे )

काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म. व्यास काय लिहतात ते जाणले नाही तर तुम्ही महाभारत वाचले नाही: ना तुम्हाला श्रीकृष्ण कळला. आता तुम्ही म्हणाल " महाभारत न वाचताही आम्ही लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाला जाणत आलो आहोतच.कीं ! अगदी खरे. तुम्ही भगवान कृष्णा ला ओळखत आलात. पण महाभारतात "विश्वदर्शन, जयद्रथवधाच्यावेळी सूर्य झाकाळणे, पांडवांच्या मृत नातवाला जिवंत करणे असे मोजके प्रसंग सोडले तर म. व्यासांनी श्रीकृष्णाला भगवान म्हणून वर्णलेच नाही. तो या पृथ्वीवरील एक मानवच आहे, मान्य, महामानव आहे, पण मानव च.

महाभारतात श्रीकृष्ण कसा रेखाटला आहे हे पहाण्याआधी आपण श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याकडे
वळू. दोघेही विष्णूचे अवतार मानले जातात. अवतार का घेतले जातात ? गीतेत त्याचे उत्तर आहे "अभ्युत्थानार्थ धर्मस्य " प्रत्येक युगातल्या धर्माच्या पालनाकरिता, धर्म नष्ट होऊ नये, म्हणून
अवतार. आता प्रत्येक युगात धर्म एकच असता तर भगवानाचे काम सोपे झाले असते. पण तसे दिसत नाही.

राम व कृष्ण यांच्या समोर धर्म म्हणून जी तत्वे होती ती अगदी निरनिराळी होती. समाजाच्या संघटनेत कुटुंब हा पहिला घटक व अनेक कुटुंबे वा कुल यांनी बनणारा समाज हा दुसरा घटक. या दोन घटकांचा धर्म भिन्न भिन्नच असणार. रामाच्या वेळीं कुटुंब हा प्रमुख घटक होता व त्यामुळे कुटुंबाचा प्रमुख जो "पिता", त्याची आज्ञा सर्वांनी पाळणे हा "धर्म" होता. ती आज्ञा चूक कीं बरोबर याला महत्व नव्हते. लक्ष्मण रामाला ती आज्ञा चूक हे पटवून देण्याचा प्रयत्न अनेक वेळा, परोपरीने करतोही. रामही ते कवूल करतो. पण ती आज्ञा मोडावयाचे तो नाकारतो. रामाच्या वेळच्या धर्माचे पालन तो करतो.
कृष्णाच्या वेळीं परिस्थिती बदलेली असते. आता विस्तारलेल्या लोकसंख्येमुळे, अनेक कुलांमुळे, समाज हा प्रमुख घटक झालेला असतो. समाजाच्या धर्मात पित्याने दिलेली आज्ञा जर चुकीची असेल, त्याने समाजावर विपरित परिणाम होणार असेल तर ती पाळणे धर्माच्या विरुद्ध झाले असते.
महाभारतात म्हटले आही कीं
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत !
ग्रामं जानपदस्यार्थे आत्मार्थं पृथिवीं त्यजेत !!

कुळासाठी कुटुंबातील एकाचा त्याग करावा, गावासाठी कुलाचा, देशासाठी गावाचा आणि आत्म्यासाठी पृथ्वीचा.
इथे स्पष्टपणे देशासाठी, समाजासाठी व्यक्तीचा-कुळाचा त्याग करावयास सांगितले आहे. रामाच्या जागी कृष्ण असता तर त्याने दशरथाची आज्ञा मुळीच पाळली नसती.

हे सर्व प्रथम सांगण्याचे कारण महाभारतातील कृष्ण समाजपालनासाठी झगडला आहे. "परित्राणाय साधूनाम, विनाशाय च दुष्कृताम" कशासाठी ? तर समाजधारणेसाठी. पण हे सर्व त्याने "मनुष्य" रूपाने निभावले आहे.
समाजरक्षण हा धर्म ठरवल्यानंतर त्याने अत्यंत विवारपूर्वक "धर्म" म्हणजे काय ह्याचा अभ्यास केला. गीतेमधे सर्व उपनिषदांचे सार आहे असे म्हणतात. याचा अर्थ त्याने सर्व उपनिषदांचा खोल अभ्यास केला होता हे स्पष्ट दिसून येते. आपल्या तत्वज्ञानात एकमेकाविरुद्ध विचार प्रकट झालेले आहेत. कृष्णाने आपल्याला पटलेले विचार उचलले.
त्याकाळी प्रचलित असलेल्या धर्मकल्पना, जशा युधिष्टिराच्या होत्या, त्यांना त्याने विचारपूर्वक मुरड घातली. भीष्म-द्रोणाचार्य यांसारखे महात्मे अन्यायाच्या बाजूने लढतात हे विदारक सत्य आहे व धर्माने लढून त्यांना जिंकणे अशक्य आहे हे त्याला माहीत होते. "अश्वथामा मेला" अशी अफवा पसरवून द्रोणांना शस्त्रसंन्यास घ्यावयास लावून त्यांचा वध करणे त्याला मान्य होते. भले त्यामुळे युधिष्टिराचा रथ चार अंगुले खाली उतरून जमिनीला टेकला याची त्याला पर्वा नव्हती. नच, तो रथ जमिनीत गाडला गेला असता हे तो पुरेपुर जाणून होता. कृष्ण मोठा व्यवहार पंडित होता. मानवी व्यवहारातील शक्याशक्यतेच्या मर्यादा तो जाणून होता. तारतम्याचे अवलोकन हे त्याच्या बुद्धीचे वैशिष्ट्य होते. त्याच्या मते धर्माची विचारसरणी म्हणजे व्यवहारपांडित्य. जयद्रथ-दुर्योधन वचाच्या वेळीं त्याने हा दृष्टिकोन ठेवला. अशा सर्व वेळीं त्याचा धर्म "मानुष" होता. भगवान श्रीकृष्णाला असे करावयाची गरजच पडली नसती.

जरासंध हा जुलुमी सम्राट होता.पण तो अतिशय शूर होता. सतरा वेळा युद्ध करूनही त्याचा बिमोड करणे शक्य नाही हे पाहिल्यावर कृष्ण नुमाटपणे द्वारकेला निघून गेला. तो राजसूय यज्ञाच्या वेळी युधिष्ठीराला म्हणतो " तीनशे वर्षे लढूनही आम्हाला त्याला जिंकता आले नसते." एका मानवा "ची कबुली.

जयद्रथ वचाची अर्जुनाची प्रतिज्ञा ऐकून तो म्हणतो, "आम्हाला न विचारता तू अशी मूर्खासा
रखी प्रतिज्ञा कां केलीस ?" त्याला रात्रभर झोप येत नाही. तो दारुणाला, आपल्या सारथ्याला, आपला रथ सज्ज कराववास सांगतो. "अर्जुनाला अपयश आले तर मी युद्ध करून कौरवांचा पाडाव करीन" असे तो म्हणतो. इथेही कृष्ण मानवच आहे.

पांडवांवर आलेला सर्वात घोर प्रसंग म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण.यावेळी तो पांडवांना उपयोगी पडत नाही. पुढे वनात असलेल्या पांडवांना तो भेटतो तेव्हा तो म्हणतो ’मला याची कल्पना नव्हती; मी दुसरीकडे गुंतलो होतो;नाही तर मी द्युत होऊनच दिले नसते." हीही एका मानवाची कबुली. भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवली अशी कथा महाभारतात नाही.

जरासंधाला युद्धात जिंकणे शक्य नाही हे जाणून तो त्याला भीमाकडून वैयक्तिक युद्धात मारतो. इथेही तो माणुस आहे; नाहीतर भगवानाला एका राजाला मारणे अशक्य होते काय ? त्या पुढील भाग महत्वाचा आहे. जरासंधाने कैदेत टाकलेल्या राजांना तो मुक्त करतो व जेव्हा त्यांनी कृतज्ञतापूर्वक विनविले "आम्हास काही सेवा सांगा" त्या वेळी त्याने "तुम्ही युधिष्ठिरास साह्य करावे अशी आज्ञा केली. पांडवांना उद्या गरज लागली तर या सर्व राजांची मदत निश्चित केली. त्याने जरासंधाचे राज्य खालसा न करिता त्याच्या मुलाला दिले हे लक्षात घेण्यासारखे आहे ही इहलोकातील राजकीय खेळी आहे.

मानवी स्वभाव हा विश्वातला एक मोठा चमत्कार आहे. परस्पर विरोधी गुण त्याच्या मनात एकाच वेळीं नांदू शकतात..विवेक, व्यवहारदृष्टी, स्थिर प्रज्ञा, हा कृष्णाच्या प्रकृतीचा स्थायी भाव पण त्याचे वंयक्तिक जीवनातले रागद्वेष अतिशय तीव्र होते असे दिसते

शिष्टाईकरिता कृष्ण जाणार होता त्यावेळी द्रौपदीला भीती वाटली की हा युधिष्ठिराच्या इच्छॆनुसार समेट वगैरे करतो कीं काय.. तिच्या आक्रोशाला उत्तर देतांना कृष्ण म्हणतो ’कृष्णे, भिऊ नकोस. कौरव स्त्रीया विधवा होऊन रडत असलेल्या लवकरच तुझ्या दृष्टीला पडतील रणांगणात कौरवांची प्रेते कोल्हेकुत्री खातांना दिसतील यात शंका बाळगू नकोस." आपल्या प्रिय भगिनीची दुर्दशा करणा‍‍‍र्‍या
कौरवांबद्दल त्याच्या मनात इतका द्वेष होता की तो शिष्टाईकरता गेला नव्हताच. त्याला युद्ध पाहिजेच होते . कौरवांकडे जाण्याचे कारण कुंतीला भेटावयाचे आणि कर्णाला फोडता येते का हे पहावयाचे एव्हढेच होते

तो शिष्टाईकरिता आला असतांना दुर्योधन त्याला भोजनाचा आग्रह करू लागतो. कृष्ण प्रथम सौम्यपणे ते नाकारतो पण फारच आग्रह होऊं लागल्यवर ताडकन सांगतो "लोक दुसर्‍याकडे भोजनाकरिता जातात ते दोन कारणांनी. पहिले म्हणजे दोघांमधील प्रेमाने व दुसरे म्हणजे घरी जेवावयास काही नाही म्हणून. तुझ्या माझ्यात प्रेम नाही व मी अन्नाला अजून महाग झालेलो नाही." एका तडफदार माणसाने द्यावे असेच हे उत्तर आहे.

यादवीच्या वेळी शक्य असूनही तो ती टाळत नाही. नियतीशी संघर्ष करण्याऐवजी शांतपणे एकांतात, अरण्यात तो आपली जीवनयात्रा संपवितो.

असो. जास्त उदाहरणे देण्याची गरज नाही. पण त्याच्या जीवनकालातच भीष्म, विदूर, कुंती अ शा ज्येष्ठ व्यक्ती, आणि सर्वसाधारण माणसे त्याला "अवतार" मानत होते असे दिसते. याचे कारण म्हणजे त्याची श्रेष्ठ नीतीमत्ता, असाधारण शौर्य, अलौकिक धर्मधारणा, सत्य-असत्य यातील सूक्ष्म फरक जाणण्याची प्रगल्भता. सर्वथा योग्य असूनही त्याने कधीही सम्राटपदाची इच्छा बाळगली नाही. स्वत:करिता काहीही न अपेक्षिता समाजकल्याण हे एकच ध्येय त्याच्या समोर होते. युद्धानंतर गांधारी त्याला "तू हे युद्ध टाळण्यास समर्थ असतांना तसे कां केले नाहीस ? असे विचारते व त्याला शापही देते. कृष्ण तो शांतपणे स्विकारतो.
महाभारत हे भारतभूमीचे वैभव आहे. कृष्ण हा त्या वैभवातला कौस्तुभमणी
साभार : - शरद जी
( हा लेख कॉपी पेस्ट केलेला आहे. हरकत असल्यास उडवण्यात यावा.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रामायण तत्वनिष्ठ, आदर्शवादी आहे तर महाभारत वास्तवादी. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती हे आताच्या काळातील समर्पक आहेत. म्हणजे तुम्हाला आज दुर्योधन भेटेल, अर्जुन भेटेल, कुंती भेटेल, द्रोणाचार्य भेटतील.
<<<समाजाच्या धर्मात पित्याने दिलेली आज्ञा जर चुकीची असेल, त्याने समाजावर विपरित परिणाम होणार असेल तर ती पाळणे धर्माच्या विरुद्ध झाले असते.>>> हे बरोबर. भीष्माचार्यनी प्रतिज्ञा पाळून कुरु कुळाचा नाशच केला कि. भीष्म हेच शेवटचे कुरु. भीष्म द्रोणाचार्य विदुर हे अशाच तत्वनिष्ठतेला बांधले गेले आणि स्वतःशी झगडत राहिले.

धन्यवाद शीतलकृष्णा. हा लेख प्रकाशित करण्यामागे श्रीकृष्णाला आपण देवत्व बहाल केले आहे. पण वेळोवेळी तो मानवाप्रमाणे वागला आहे. आपण असामान्य कामगिरी करणाऱ्या लोकांना जे शतकांतून जन्म घेतात त्यांना देव करून टाकतो. त्याने जगून दाखवलेली आचार , विचार यांच्या वाटेवरून घालण्याऐवजी व्यक्तिपुजा सुरू होते. हेच शिवरायांच्या बाबतीत, इतर महान व्यक्तींच्या बाबतीत घडलं आहे. कोणी काही नेत्रदीपक कामगिरी केली की त्याला दैवी शक्तीशी जोडायचे ही आपली मानसिकता आहे. भारतीय सैन्यातील एका जवानाने एकट्याने चिनी आक्रमण रोखले त्या सैनिकाचे मंदिर बांधले आहे.
पितामह भीष्म यांनी पांडवांची बाजू उघड घेतली नाही पण आतून त्यांना दुर्योधनाचे वागणे पटत नसणार, त्यामुळेच त्यांनी युध्दात पांडवांना मारलं नाही.

कॉपी पेस्ट केला असला तरीही मी पहिल्यांदा वाचते आहे.
सगळयाच नाही पण यातल्या खुप काही गोष्टी पटणार्या आहेत हे मात्र नक्की.

सिध्दी जी मिसळपाववर शरद यांचा हा लेख आहे. मला त्यांनी लिहिलेल्या खजिन्याचा शोध लागला आहे. मी तिकडेच वाचन करत आहे. आपणही त्यांचं लिखाण वाचावे असे सुचविन.

शिवाजी सावंत यांनी युगंधर मृत्युंजय मध्ये असच मांडला आहे, श्रीकृष्णाला दैवत्व न देता त्याचा जीवनपट मानवीरित्या कसा होता.

पण मग कर्ण श्रीकृष्णाला तुच माझ्या चीतेला अग्नी द्यावा असे म्हणतो. मृत्युंजय वाचून तीस वर्षे झाली नीट आठवत नाही. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

हे तत्कालीन "राजनियम" म्हणजे फार मोठा विनोदच असावा.

धृतराष्ट्र जन्मजात आंधळा म्हणून राज्य सांभाळायला नालायक ठरवला गेला आणि पांडुला राजा बनवण्यात आले. पुढे हाच पांडु जेंव्हा शापदग्ध होऊन वनात निघून गेला तेंव्हा मात्र सगळ्यांना लगेच धृतराष्ट्र राजा म्हणून चालून गेला. तेव्हा कुठलेही नियम वगैरे आड आले नाहीत. पण ह्याच धृतराष्ट्राची मुले मात्र वारस नाहीत, वारस फक्त पांडुची मुले. >> हा एक युक्तिवाद सापडला कौरवांचाच राज्यावर हक्क होता हे सांगणारा.

नाही पटले...
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमश्रितम् |
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ||

श्रीकृष्णाचे जीवन अगदी जन्मापासूनच चमत्कारांनी भरले आहे. जन्मल्यानंतर तुरुंगाची दारे उघडणे, अंगठा लागून यमुनेचा पूर ओसरणे, पाळण्यात असताना अनेक मायावी राक्षसांचा संहार करणे, कालिया मर्दन, करंगळीवर गोवर्धन उचलणे, यशोदा मातेला तोंडामध्ये ब्रह्माण्ड दाखवणे, सांदिपनी ऋषींच्या मृत बालकाला परत पृथ्वीवर आणणे, तुलाभार मध्ये सत्यभामेला दाखवलेला चमत्कार, सुदामाला चमत्काराने दिलेले ऐश्वर्य, युद्धाआधी शांतिदूत बनून गेल्यावर दुर्योधनाने अटक करण्याची भाषा केल्यावर विराट देहाची दाखवलेली झलक, संपूर्ण जीवनात अनेक राक्षसांचा केलेला वध, सुदर्शनचक्र सारखे बिनतोड असणारे शस्त्र, भगवान शंकराशी केलेली लढाई या आणि इतर अजूनही अनेक केलेल्या चमत्कारांमुळे कृष्णाला देवत्व बहाल झालय जे महामानवाच्याही कक्षेपलीकडे जाते.आता यातील महाभारतात नक्की किती गोष्टी आल्यात ते ठाऊक नाही परंतु कृष्णजीवनविषयीचे इतर ग्रंथ जसे की भागवत पुराण वाचून कळते की कृष्ण हा महामानवाच्याही पलीकडे होता आणि त्याला मिळालेले देवत्वही पटते.

भागवत पुराण वाचून कळते की कृष्ण हा महामानवाच्याही पलीकडे होता आणि त्याला मिळालेले देवत्वही पटते.>>> +++१

भगवतात तर लिहीलंय..
एते चांशकलाः पुंसः कृष्णस्तु भगवान स्वयम्
इन्द्रारिव्याकुलं लोकं मृडयन्ति युगे युगे .

http://www.esahity.com/
इथे महाभारतावर बरेच साहित्य आहे. महाभारत प्रेमींनी भेट द्यावी असे मला वाटते.
कोहंसोहं जी, पद्म जी धन्यवाद!