विषवल्ली ! -9

Submitted by अँड. हरिदास on 8 August, 2019 - 13:34

राजेश वाड्यात पोहचला..वाड्याच बाह्य रूप काळ्या अंधारात एखाद्या घात घालून बसलेल्या सैतानासारख वाटत होत. तो जसा आता आला तसा त्या गुप्त खोलीत दाखल झाला. जंगम वकील त्याठिकाणी आधीच हजर होता. विधीची बहुतेक तयारी पूर्ण झाल्याचे दिसत होते. होम मांडल्या गेला होता. विधीचं साहित्य एकाबाजूला ठेवलं होतं. कोपऱ्यात हात बांधलेल्या अवस्थेत एक सोळा-सतरा वर्षाची मुलगी बेशुद्धवस्थेत पडलेली होती. राजेश आला तसा होमच्या एका बाजूला जाऊन बसला. त्याच्या समोर कोण्यातरी अघोरी देवतेची मूर्ती स्थापित केली होती. निर्विकारपणे राजेश मूर्तीच्या समोर येऊन बसला. आजूबाजूच्या परिस्थितीची त्याला कुठलीचं जाणीव नव्हती. घटना समजून घेण्याची संवेदनाचं त्याच्यात उरली नव्हती. त्याच्या मनाला जो आदेश मिळत होता, त्याचं फक्त तो पालन करत होता. एकाएकी वाड्यात काहीतरी संचारल्याची जाणीव झाली. राजेशचं नाही तर त्याच्या बाजूला उभा असलेला जंगम सुद्धा त्या बदललेल्या परिस्थितीने हादरून गेला. होमात अग्नी पर्जवलीत झाला. राजेशची मान आपोआप डावीकडून उजवीकडे हलू लागली. अनाहरुतपणे त्याचे हात चालू झाले बाजूला ठेवलेली एक एक वस्तू तो होमात टाकू लागला. प्रत्येक वस्तू होमात टाकली की दोन्ही हातानी मूठभर कुंकूमिश्रित वस्तू तो त्या समोरच्या मूर्तीवर उधळत होता. हळूहळू त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडू लागले. शब्दांचा मंत्र झाला..कोणत्यातरी किचकट आणि पुरातन भाषेतला मंत्र. एरवी त्याला हा मंत्र कितीही प्रयत्न करून ठिकपणे उच्चारता आला नसता, पण सध्या त्याच्या तोंडातून लयबद्ध मंत्रोउच्चार सुरू झाला होता. प्रत्येक आवर्तनाबरोबर खोलीतील वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. समोरच्या मूर्तीचे डोळे चकचकीत होऊ लागले होते. राजेश पूर्णपणे भान हरपून एकएक वस्तू होमात टाकत होता. त्याचबरोबर मंत्र उच्चाराचा वेग वाढत होता. खोलीतील हवा आता भारल्यासारखी झाली होती. तिच्यात एक घातकीपणा आला होता. राजेशची क्रिया यंत्रवत सुरू होती. जंगम ठरविल्या प्रमाणे एक एक वस्तू त्याच्या हातात देत होता. एका क्षणी जंगम ने राजेशच्या हातात एक सूरी टेकवली. राजेशने डाव्या हाताची करंगळी कापून तो हात होमात धरला. त्याचं रक्त जणू काही पेट्रोलचं काम करत होत. जसजसा रक्ताचा थेंब होमात पडत होता, तसतसा होमातील अग्नी खवळल्यासारखा पेट घेत होता. थोडया वेळाने होमातील अग्नीचा रंग बदलला. पिवळा सोनेरी रंग जाऊन नुसत्या काळ्या रंगाच्या लाटा होमातून बाहेर पडू लागल्या. त्या काळ्या लाटातून एक एक हिडीस आकृती बाहेर येत होती. अक्राळविक्राळ आकृत्यांनी संपूर्ण खोली भरून गेली. होमातून बाहेर आलेल्या त्या हिडीस आणि अमानवीय आकृत्यां राजेशच्या भोवती फेर धरून नाचू लागल्या. शेवटी तो क्षण आला. जंगम ने बाजूला पडलेल्या युवतीला धरुन होमाच्या बाजूला बसविले. तिच्या अंगावरील सर्व कपडे ओरबाडून काढले. अंगावर पाण्याचा भरलेला हंडा ओतला. थंड पाण्याच्या स्पर्शाने ती भानावर आली..आपली अवस्था पाहून तिने एक मिठी किंकाळी मारली..सुटकेचा प्रयत्न केला. पण , तेथून सुटणे कुणाला शक्य होते?
इकडे राजेश आपल्याच तालात विधी पुर्ण करत होता. त्याचं संपूर्ण रूप आता बदललं होतं. त्याला कशाचेच भान उरले नव्हतें. त्याने शेवटचा मंत्र अगदी मोठ्याने म्हटला.. एकवार आकाशाकडे नजर टाकून कुणाला तरी आव्हान केले..हातात सूरी उचलली..हातातली सूरी वर गेली, ती खाली येऊन त्या निष्पाप मुलीचा बळी घेणार तोच खोलीचा दरवाजावर कुणी तरी आघात केला..धाडकन दरवाजा उघडला गेला..राजेशचा वर गेलेला हात तसाच हवेत राहिला...! खोलीत एकच खळबळ उडाली. होमातून उत्पत्ती झालेल्या आकृत्या सैरभैर झाल्या..राजेशची नजर पहिल्यांदाचं त्याच्या 'स्व इच्छेने 'दरवाज्याकडे वळली. दारात ताई उभ्या होत्या..लखलखीत भगवं वस्त्र, केस मोकळे, कपाळावर कुंकू माखलेंल.. गळ्यात माळा, खांद्याला झोळी, हातात बारीक काट्याची काडी आणि डोळ्यात अंगार. राजेशला दुर्गामातेचे साक्षात रुप पाहिल्याची अनुभूती झाली. त्याने ताईंच्या डोळ्यात बघितलं.. मोहिनी उतरली..राजेश भानावर आला..त्याने आजूबाजूला बघितलं, त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. किळस, घृणा ,भय,आश्चर्य सर्वच्या सर्व राजेशच्या चेहऱ्यावर एकसाथ आले...!

“ राजेश, भानावर ये! उठ ! वाड्याच्या मागे बाभळीच्या काड्यांचा गंज आहे..त्याखाली देवाच्या मुर्त्या गाडलेल्या आहेत. त्या बाहेर काढ. याजागी पुन्हा ईश्वराचे अधिष्ठान उभं राहिलं पाहिजे..!”

ताईंचा खणखणीत स्वर कानावर येताच राजेशमध्ये चेतना संचारली. तो लगबगीने पुढे झाला. दारातून जातांना आजवर केली नाही ती कृती त्याने केली. खाली वाकून ताईंच्या चरणाला स्पर्श केला. ताईंनी त्याच्या पाठीवर हात ठेवला..तेव्हड्याने कितीतरी ऊर्जा त्याला
प्राप्त झाली.. तो वाड्याच्या मागच्या दिशेने निघाला.
विधी उधळला गेल्याने संपूर्ण वाडा जणूकाही पेटून उठला होता..वाड्यातील प्रत्येक वस्तू जागृत झाली होती..घात लावून बसलेल्या शिकऱ्यासारखी ताईंचा घास घेऊ बघत होती.
ताईंनी खोलीत प्रवेश केला तसा जंगम त्यांना आडवा आला. पण, चमत्कारी काडीच्या एकाच फटक्यात त्याचं काम फत्ते झालं. त्याच्या प्रमादाची शिक्षा त्याला क्षणात मिळाली. त्याचं निष्प्राण कलेवर तिथंचं पडलं. ताईंनी समोर होऊन बंदीस्त तरुणीला मोकळं केलं अंगावरची शाल तिला पांघरायला दिली, आणि तिला बाहेर जाऊन गाडीत बसायला सांगितलं..!नंतर त्यांनी खोलीत एक नजर टाकली.. खोलीत काहीतरी दबा धरुन बसलं होतं! एकाएकी खोलीतील काळी हवा एका जागी जमा होऊ लागली..हळूहळू त्याला आकार आला. भयंकर विकृत असा आकार खोलीत प्रकट झाला.

“इथ या जागी माझ्या परवानगीशिवाय कुणीही पाउल ठेऊ शकत नाही....आता आलीस इथे तर मृत्यूला सामोर जा हरामखोर...”

एक करडा घोगरा आवाज ताईच्या कानी पडला त्या आवाजाने संपूर्ण वाडा जणू संतापून थरथरू लागला.

“ सैताना !...तू मला मारणार..! अघोऱ्याच्या मदतीने काळ्या कपोऱ्यात लपणारा तू या जगन्नाथपंतांच्या पट्टशिष्येला मारणार..! ये मग जरा समोर..!”

आव्हान दिल्यावर समोरची आकृती वेगाने ताईच्या दिशेने झेपावली..काळ्या रंगाचं अजस्त्र जनावर बेभान होऊन अंगावर आलं..ताईंनी हातातली काडी समोर धरली.. मुखातून मंत्रोच्चार सुरु झाला. काडी निखार्यासारखी गरम झाली. तिचे काटे ठिणग्या होऊन जागोजागी पसरू लागले. प्रत्येक ठिणगी एका एका आकृतीचा वेध घेत होती. 'फिस' आवाज करत काळी आकृती त्या ठिणगीने जाळून खाक होत होती. ताईवर झेपवलेलं ते अजस्त्र जनावर जवळ आलं तस त्याला काडीचा स्पर्ष झाला. वेदनेची एक मोठी किंकाळी वाड्यात उमटली. त्या आवाजाने वाड्याच्या भिंतीदेखील हादरून गेल्या. पटवर्धनाच्या अघोरी अंशाची एका क्षणात राख झाली..!

इकडे राजेश वाड्याच्या मागील बाजूस आला. अंधार अजून घनदाट झाल्याचे त्याला वाटत होते. अंधारात वेड्यावाकड्या सावल्या हलत असल्याचा भास होत होता. भीतीने गाळन उडाली होती, घश्याला कोरड पडली होती पोटरीत गोळे येत होते पायात काटे बोचत होते पण तरीदेखील तो थांबला नाही... वाड्याच्या मागच्या बाजूला आला. बाभळीच्या काड्याचा गंज समोर पडला होता. मोठ्या हिमत्तीने तो समोर गेला. एक एक काडी बाजूला केली. खालची जमीन इतक्यात कुणी उकरलेली दिसत होती. त्याने वेग वाढविला. हाताने माती उकरत असतांना त्याच्या हाताला श्री दत्तप्रभूंची मूर्ती लागली. ही मूर्ती त्यानेच वाड्यात स्थापित केली होती. 'ही इथं कशी आली..?'.. "जंगम ने आणून पुरली असावी..!" मनाच्या प्रश्नाला मनानेच उत्तरं दिलं. त्याने अजून माती उकरली हाताला काळ्या कपड्यात बांधलेलं गाठोडं लागलं. त्याने उघडून बघितलं सोन्या-चांदीच्या ईश्वराच्या मुर्त्या त्यात बांधून ठेवल्या होत्या. 'पटवर्धनच्या देव्हाऱ्यातिला देव..कदाचित त्यानेच पुरले असावे..!' राजेशच्या मनात विचार येऊन गेला. आता घाई करायला हवी..! त्याने लगबगीने सगळे देव घेतले आणि निघणार तोच त्याला कशाची तरी चाहूल लागली. काहीतरी वाड्यातून त्याच्या दिशेने येत होतं. राजेशची भीतीने गाळण उडाली. हातातले देव त्याने छातीशी आवळून धरले, आणि धूम ठोकली. पळता पळता तो ताईलाचं जाऊन धडकनार होता पण ताईने त्याला सावरलं. ताईला बघताच त्याच्या जिवात जीव आला. त्याने ताईला हातातलं गाठोडं दाखवल. काळ्या कपड्यात बांधलेले देव पाहून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली.

“ चांडाळ !, ईश्वराला जमिनीत लपवायला निघाला होता, आता तोच पाताळात गाडला गेला आहे..! भोग म्हणा आता कर्माची फळं..!”

"म्हणजे ताई, पटवर्धन..!"

"होय, पटवर्धनचे जे काय याठिकाणी उरलं होतं, त्याचा नायनाट झाला आहे..!"

“म्हणजे हे वास्तू आता धोक्याची राहिली नाही..!”

“ राजेश, पटवर्धन फक्त एक प्यादा होता. त्याचा जो स्वामी आहे, त्याच्याशी आपला खरा मुकाबला आहे..! त्याने जागृत केलेल्या त्या शक्तीशी आपल्याला आमना सामना करायचा आहे. मन घट्ट कर, ईश्वरावर विश्वास ठेव..! आता कुठे लढाईला सुरवात झाली आहे.!”

“चल, आपल्याला या वाड्यातला देव्हारा शोधला पाहिजे.! त्या देवांना त्या कपड्यामधून बाहेर काढावे लागेल...जेणे करून त्यांच्या उपस्थितीमध्ये त्याची शक्ती कमजोर पडेल अशक्त होईल..! ”

दोघेही पाऊल उचलणार तोच बाजूच्या खोलीत काहीतरी हालचाल होत असल्याचा आवाज त्यांना आला ! 'वेळ आली असल्याची जाणीव ताईंनी झाली' त्यांनी खांद्याची झोळी खाली ठेवली कुंकूमिश्रित अंगाऱ्याने दोघाभोवतीही एक रिंगण काढलं.

“काहीही झालं तरी या रिंगणाच्या बाहेर जायचं नाही..!"

राजेशला ताकीद देऊन ताईंनी पुढची तयारी सुरू केली. झोळीतून एक बाटली काढली, त्यात पाणी होतं. बाटली दोन्ही हातात धरुन काही मंत्र पुटपुटत त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित केलं. क्षणात बाटलीतून वाफा निघायला लागल्या. ताईंनी ते पवित्र तीर्थ रिंगणाच्या चहू बाजूने टाकलं.
ज्या खोलीत पटवर्धनने विधी मांडला होता त्या खोलीत आता खळबळ उडाली होती. धुसफूसीच्या आवाजाने सगळा वाडा हादरून गेला. आणि ते त्या खोलीच्या बाहेर आलं..इंच इंच गोल बटणासारखे डोळे,झाडाच्या फांद्यासारखे हात, कोयत्यासारखी नखं.. कधी अजगरासारखं जमिनीवर सरपटत,कधी एखाद्या महाकाय माणसासारखं लांब लांब ढांगा टाकत, कधी जंगली श्वापदासारखं चौखूर उधळत ते समोर येत होतं. त्याच्या तोंडातून निघणार फिस् फिस् आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत होता. राजेशची अवस्था कठीण झाली. भीतीने त्याचे हातपाय थरथर कापू लागले. इकडे ताईंनी सुद्धा मुकबल्याचा पवित्रा घेतला होता. मुठी आवळल्या गेल्या, हातातली काडी समोर आली..काडीतुन पुन्हा तेच निखारे निघू लागले. त्यातील ठिणग्या त्या अजस्त्र अमानवी आकारावर जाऊन आदळू लागल्या. गुरगुराट आणि त्याच्या गर्जनांनी सगळा वाडा भरुन गेला.
' कोणतीही अभद्र शक्ती हे रिंगण पार करु शकणार नाही..!' याचा ताईला विश्वास होता. त्यामुळे रिंगणात राहून त्यावर वार करण्याचा त्यांचा मनोदय होता.
तो अभद्र आकार रिंगणाजवळ आला. दोघांची नजरा नजर झाली. ताईंचा स्थिर आवाजात मंत्रोच्चार सुरु होता. राजेश घटनांचा फक्त मूक साक्षीदार असला तरी काय घडतंय हे त्याला जाणवत होतं. दोन दाहक शक्तींमधला वेगळ्याच पातळीवरच्या संघर्षाच्या खुणा त्याला दिसत होत्या. त्याने तिरक्या नजरेतून ताईकडे बघितलं तेंव्हा त्याला त्यांची उंची काहीशी वाढल्याचे जाणवलं. त्यांच्या अंगाभोवती सोनेरी प्रकाश लवलवत असल्याचा भासही त्याला झाला. आणि समोर पाहून त्याची दातखिळी बसण्याची वेळ आली. एक अजस्त्र काळा आकार आपल्या शेकडो सोंडानी वळवळत वार करत होता. राजेशने डोळे मिटून घेतले. बराच वेळ हा संघर्ष सुरु होता.
एकाएकी वाड्यात वीज कडाडल्यासारखा आवाज झाला. राजेशने डोळे उघडले. त्याला दिसलं की, त्या अभद्र शक्तीने रिंगणात प्रवेश केला होता.. सुरक्षेचं कवच तडकलं होतं. ताई पूर्ण शक्तीने त्या शक्तीला थोपविण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांची शक्ती कमी पडत असावी! गुलाल उधळावा तस रिंगणावरील अंगारा उधळत 'ते' रिंगणात घुसलं..ताईच्या हातातील काडी जळून संपायला आली होती. शेवटचं केवळ एक टोक त्यांच्या हाती उरलं होतं.
'आता काय करावं? आपण काय करू शकतो?' त्याला आठवलं, ताईंनी सांगितलं होतं सामान्य माणसाच्या मनात असामान्य शक्ती असते..! ती शक्ती मला कशी समजेल! त्याच्या मनावर ताण आला..'अतिशय सामान्य पापभीरु माणसाच्या मनाला सुद्धा सीमा असतात, त्यावर ताण पडला कि तो माणूस तुटतो.. तर कधी कधी ज्वालामुखी प्रमाणे उद्रेक करून जातो.' राजेश सुद्धा तुटून पडला..त्याच्या मनात संतापाचा उद्रेक झाला. आपला सगळा संताप त्याने त्या समोरच्या आकृतीवर फेकला. देवांच्या प्रतिमा कापडातून मुक्त केल्या.. दत्तप्रभूंची मूर्ती एका हाताने छातीशी कवटाळून दुसरा हात ताईंच्या हातात देत तो त्यांच्या बरोबरीने उभा राहिला..!
समोरची आकृती क्षणभर हडबडली.. एक पाऊल मागे सरली! पण तरीही दोघांची शक्ती कमी पडत होती. पुन्हा त्याने एक पाऊल पुढे टाकलं. वाड्यात गडगडाटी हाष्य उमटलं!

‘‘माझ्या नाशाची मूर्ख स्वप्ने पाहणाऱ्या किड्यांनो,
मला नाश नाही! मी अविनाशी आहे! मी सर्वांचा स्वामी आहे!’’ आता तुम्हाला असा चिरडून टाकतो!’’

त्याचा दुहेरी आवाज गर्जत होता...! क्षणाक्षणाला त्यांची शक्ती क्षीण होत होती. पण, लक्ष्मी ताई हार मानायला तयार नव्हत्या..!

“आजवरच्या चारी युगात तुझ्यासारख्या दानवाचा भयानक अंत झाला आहे..याही युगात तुझं अंत अटळ आहे..! आता मी मेले तरी बेहत्तर.. पण तुला या जगात राहू देणार नाही..!”

ताईंनी आपली सगळी शक्ती एकाजागी केंद्रित करायला सुरुवात केली..! त्यांचं शरीर प्रकाशमान होऊ लागलं..! ताई काय करणार आहेत, याची राजेशला सुरवातीला काहीच कल्पना आली नाही..! मग त्याच्या लक्षात आलं! ताई आपल्या शरीरात सर्व शक्ती एकत्रित करुन..शरीरालाच शस्त्र बनवून त्याच्यावर एकच शेवटचा घाव घालणार होत्या..!

“राजेश, आता माझ कर्म संपल...शेवटी सगळं त्या परमेश्वराच्या हाती..!”
निरोपाचे शब्द एकूण राजेशच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं..! पण ताई काही क्रिया करणार इतक्यात आकाशातून दोन सोनेरी किरणं वाड्यात अवतरले. दोन पांढरक्या सावल्यामध्ये दोन तेजस्वी मानवी आकृत्या प्रकट झाल्या. एकाने ताईच्या तर दुसऱ्याने राजेशच्या बाजूने त्यांच्या हाताला स्पर्श केला..!

“ लक्ष्मे, तुला सांगितलं होतं, इशारा दिल्याशिवाय या भानगडीत पडू नको! पण, तू ऐकायची नाहीस..! आणि आता काय करायला निघाली होतीस..?
अंगावर भगवी कफनी..हातात कमंडलू घेतलेली आकृती ताईला दरडावत होती. एका एकी तिचा स्वर मऊ झाला..!
“ हरकत नाही! आता याला पाहतो..!अविनाशी काय..? बघ तुला पाताळात धाडतो की नाही..!”

राजेशचा आता वेगळ्याच मितीत प्रवेश झाला होता...एक अनोखी शक्ती त्याच्या अंगात संचारु लागली होती..! ईश्वरी शक्तीच्या सानिध्यात येण्याचा काहीतरी अंश त्याच्यात उतरणार होताच..त्याचं दिव्यत्वाची त्याला आता अनुभूती होत होती.

“नाना, लक्ष्मीला काय बोलता..या शिंच्याच्या सोंडा धरून आवळा बर का..!नुसता फुरफुरतो आहे..!”

दुसऱ्या आकृतीतून आवाज आला. भगवी कफनी घातलेल्या त्या आकृतीने कमंडलू समोर धरलं.. ताईंनी त्यातून दोन पाण्याचे थेंब हातावर घेतले..तीघांनीही कुठलातरी मंत्र म्हटला आणि ताईने ते थेंब त्या आकृतीवर फेकले. मोठा बॉम्ब स्फोट व्हावा तसा कानठळ्या बसवणारा आवाज झाला. समोरच्या आकृतीचा हिरवट प्रकाश क्षीण होऊ लागला. पाण्याचे ते दोन थेंब त्याच्या शरीराच्या आरपार घुसत होते. त्या पवित्र तीर्थाचा स्पर्श अत्यंत दाहक असावा..! अनैसर्गिक आस्तत्वाचा नाश करण्याची शक्ती त्या दोन थेंबात साठवली असावी..! कारण त्याचं सगळं शरीर वितळत होतं..अघोरी भक्तांच्या क्रूर विधींनी घडवलेल्या रक्तरंजित देहाचा भुगाभुगा होत होता. बघता बघता तो विषारी आकार पूर्णपणे वितळला.. हिरवं पाणी जमिनीवरून वाहून गेलं. वाडा शांत झाला होता. दोघेही थकून गेल्याने तिथेच जमिनीवर खाली बसले.
राजेशने बघितलं समोर दोन पवित्र आत्मे उभे होते.. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित होतं..
ताईंचे हात जोडले गेले..त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलसर झाल्या.. “ बाबा,!” इतकाच शब्द त्यांच्या मुखातून निघाला.
राजेशनेही त्या पवित्र आत्म्यांना हात जोडले.. त्याच्या मनात एकच विचार आला..!

“तुम्ही सज्जनांचे रक्षक आहात.. त्याचा नाश तुम्हास सहज शक्य होता! का नाही पूर्वीच त्याचा नाश केलात? कित्येकांचे जीव वाचले असते..!”

खूप दूरवरून आवाज त्याच्या कानी पडला.!

“ त्या ला नाश नाही..! जोवर माणसाच्या विकृती संपुष्टात येत नाही तोवर 'तो' अविनाशी आहे..!त्याची उत्पत्ती मानवाच्याच विकृत कल्पनेतुन झाली होती..पापाचं परिमार्जन मानवाच्याच हातून व्हायला हवं होतं.!”

हळूहळू तो आवाज क्षीण होत गेला..समोरच्या आकृत्याही पांढऱ्याशुभ्र धुराच्या वलयात विरघळून गेल्या..!

ताई आणि राजेशचंही कार्य याआटोपलं होतं. थकलेल्या पावलांनी ते बाहेर जाण्यासाठी माघारी वळले...!

***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड भारी...
फक्त एक टायपिंग मिस्टेक आहे. अग्नी प्रज्वलित पाहिजे. ते परजवलीत झालं आहे

कथा चांगली आहे.
पण बरेच अशुध्द लिहीले आहे. चुका सुधारा.

कथा चांगली आहे.
पण बरेच अशुध्द लिहीले आहे. चुका सुधारा.+१

छान कथा आवडली. थोड्या शुद्धलेखनचाच्या चूका सुधारल्यात तर वाचायला आणखी मजा आली असती.

अजून नवीन अश्याच कथा टाका.