विषवल्ली ! - 8

Submitted by अँड. हरिदास on 8 August, 2019 - 10:35

राजेशला वाड्यात धोका असल्याचे माहीत असूनही लक्ष्मी ताईंनी घटनात प्रत्यक्ष दखल देण्याचा आपला बेत रद्द केला, आणि त्या परत घरी आल्या. मात्र त्यांचे चित्त ठिकाणावर नव्हतं. आल्या आल्या त्यांनी देव्हारा गाठला आणि अनुष्ठान मांडलं. प्रत्यक्षरीत्या नाही तर किमान मानसिक पातळीवर त्या राजेश पाठराखण करणार होत्या..! अनुष्ठांन लागलं..मनाची सगळी दार उघडी झाली. त्या राजेशच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. मात्र वाड्याची दरवाजे त्यांच्यासाठी बंद होती. मानसिक तरंगलहरीद्वारे वाड्यात घुसण्याचा त्यांनी अनेकदा पर्यंत केला मात्र यश मिळालं नाही. मध्यरात्रीच्या प्रहरात दोन चार सेकंद त्यांचा राजेशशी संपर्क झाला..मात्र लगेचचं पुन्हा मनाची सगळी दार बंद झाली..काहीतरी विपरीत घडल्याचा संकेत त्यांच्या अंतर्मनातून सातत्याने उमटत होता..!

“आता कोणत्याच नियम आणि संकेतांच्या बंधनात गुंतायचे नाही, तर तात्काळ राजेशच्या संरक्षणासाठी वाड्यात हजर व्हायचे !”

शेवटी, ठाम निश्चय करून ताई वाड्याच्या दिशेने निघाल्या.. त्यांना पोहोचायला जरा उशीरच झाला होता. एव्हाना सकाळचे तीन वाजायला आले होते.. गाडी वाड्यासमोर जाऊन धावत जाऊन ताईंनी वाड्याचा दरवाजा उघडला. रात्रीच्या घटनांचा निचरा होऊन त्याचे अवशेष जागोजागी पसरले होते. त्यांची नजर राजेशला शोधत शोधत दिवाणखान्याच्या दरवाज्यात अडखळली. राजेश अस्ताव्यस्त होऊन बेशुद्धवस्थेत पडला होता. त्याच्या चेहऱ्यावरील भयाच्या खुणा पाहून तो किती चमत्कारिक आणि भीतीदायक प्रसंगातून गेला असावा, याची कल्पना येत होती. ताईंनी त्याला तात्काळ वाड्यातून हलविण्याच्या व्यवस्था केली. एकंदर राजेशची अवस्था पाहून त्याला दवाखान्यात दाखल करण्याचा विचार ताईंच्या मनात आला. पण, त्याला शारीरिक पेक्षा मानसिक जखमा अधिक झाल्या असाव्यात असा अंदाज बांधून त्यांनी त्याची रवानगी थेट आपल्या घरी केली. सगळे सोपस्कार आटोपल्यावर त्यांनी वाड्यात एक चक्कर टाकली. स्वयंपाकघरात आल्यावर साहजिक ती गुप्त खोली त्यांच्या नजरेसमोर आली. पण तिचा शोध घेण्याचा खटाटोप त्यांनी केला नाही. 'वेळ आल्याशिवाय हस्तक्षेप करायचा नाही!' ही गुरुजींची शिकवण त्यांनी पक्की लक्षात ठेवली होती.. !

*
राजेशला शुद्ध आली तेंव्हा दुपारची वेळ झाली होती. कितीतरी वेळ तो त्या खोलीत तसाच नुसता बसून राहिला. शरीर व मन दोन्ही विलक्षण थकले आहे असे त्याला वाटत होते. कोणतीही हालचाल किंवा कोणताही विचार नकोसा वाटत होता. शरीरधर्म म्हणून नैसर्गिक क्रिया उरकण्यासाठी त्याने हालचाल केली, तीही नाईलाजानेचं. शेवटी अंघोळ वैगरे उरकून तो पुन्हा आपल्या बिछान्यावर येऊन बसला. त्याचं मन जणू काही रिकामं झालं होतं. कोणताच विचार त्यात येत नव्हता. शून्यात नजर लावून तो नुसता बसून राहिला.
राजेशची विचारपूस करण्यासाठी ताई खोलीत आल्या तेंव्हाही तो तसाच दगडासारखा बसून राहिला. ताईंनी त्याला अनेकदा आवाज दिला मात्र कोणतीच प्रतिक्रिया झाली नाही. तो नुसती शून्यात नजर लावून बसून राहिला. ताईंनी देव्हाऱ्यात ठेवलेलं तीर्थ मागवलं आणि दोन थेंब त्याच्या चेहऱ्यावर शिंपडले तेंव्हा कुठे त्याच्या शरीरात चेतना संचारली.. स्मृतीची दरवाजे पटापट उघडल्या गेले... आतापर्यंत थांबलेल्या विचारांचं काहूर उठलं..भाव-भावनांना उधाण आलं. शेवटी हा ताण सहन न झाल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू चमकले. ताईंनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मनावरचा ताण हलका व्हायला बराच वेळ लागला. राजेश थोडं सावरल्याचं लक्षात आल्यावर ताईंनी त्याला बोलत केलं. रात्रीचा भयानक प्रसंग सांगताना वेळोवेळी राजेशच्या अंगावर भीतीने शहारा येत होता.. त्याचा चेहरा काळवंडून जात होता. प्रत्येक घटना, प्रत्येक प्रसंग जसा आठवेल तसा, जसा वर्णन करता येईल तसा त्याने ताईसमोर ठेवला. त्याला कुठेच न अडवता ताई त्याची हकीकत लक्षपूर्वक एकूण घेत होत्या. राजेशची हकीकत सांगून संपल्यावर त्याला विश्रांती घ्यायची सांगून ताई देवघरात दाखल झाल्या.

राजेशची हकीकत ऐकून ताईंना अनेक गोष्टींचा उलगडा झाला. पटवर्धनने काहितरी कुटील हेतूने राजेशची निवड केली असल्याचा त्यांचा अंदाज अखेर खरा ठरला होता..! आपला हेतू साध्य करण्यासाठी वाड्यातील पटवर्धनची अघोरी शक्ती फार काळ धीर धरेल, असं त्यांना वाटत नव्हतं. काल रात्री मोठ्या दैवयोगाने राजेश त्याच्या तावडीतून वाचला होता. त्याने खंबीर भूमिका घेतली नसती किंव्हा त्याच्या आमिषाला तो बळी पडला असता तर त्याचं कलेवर सुद्धा कुणाला सापडलं नसतं ! एकदा वेळ निभावून गेली पण पुन्हा पुन्हां ती निभावून जाईलचं याची शास्वती ताईंनाही नव्हती. कालची रात्र कशीतरी संपली, पण येणारा अंधार राजेशसाठी अंत्यत घातक ठरणार याची जाणीव ताईंना होत होती. क्षणा क्षणाने निर्वानीची वेळ जवळ येत असल्याचे त्यांना समजत होतं. पण, हवा तो कौल अजूनही मिळत नव्हता. ताईंचं चित्त उद्विग्न झालं. असं याअगोदर कधी झालं नाही, पण यावेळी त्यांची कसोटी लागली होती.
बघता बघता सूर्य मावळतीला आला..सूर्याची किरण सोनेरी झाली..आणि, काही क्षणांतचं सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं. वेळ जसजसा पुढे सरकू लागला तसतशी ताईंची अस्वस्थता वाढू लागली. त्यांनी मन एकाग्र केलं..समाधी लावली..अगदी काकुळतीला येऊन कौल मागितला. पण शेवटी हाती निराशाचं आली. हवा तो संकेत त्यांना मिळालाचं नाही. देवाच्या कृपेने, गुरुजींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कठोर साधनेने त्यांना जी शक्ती प्राप्त झाली होती ती जणू काही आज स्तब्ध होऊन बसली होती.
द्विधा मनस्थितीतंच ताई देवघरातुन बाहेर आल्या. राजेश अजूनही त्याच्या खोलीत असावा, असा त्यांचा समज होता. पण तो पूर्णपणे चुकीचा ठरला. राजेशची खोली रिकामी होती. 'तो कुठं गेला असावा?' विचार करण्याची गरजचं नव्हती. राजेश वाडयातल्या अघोरी शक्तीच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला होता..दुपारी त्याची अनेक लक्षणे दिसून आली होती.
'आता फार विचार करण्यात अर्थ नाही..आज जर आपण काही केलं नाही तर पुन्हा काहीच करण्यासारखं उरणार नाही..!'

ताईंनी विचार केला..!

'जिवात जीव आहे तोवर आपल्यावर आलेली जबाबदारी आपण नेकीने पार पाडायला हवी ! यशापयशाची काळजी आपल्याला कशासाठी? आणि करून काय उपयोग? काही काही गोष्टी आपल्या हातात नसतातच..! शेवटी करता करविता तो ईश्वर आहे..रक्षण करणारा ही तोच आहे..संहार करणाराही तोच..! आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं !'
जे होईल ते दैवावर सोडून ताईने अखेर वाड्यात जाऊन प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. फार उशीर करण्यात अर्थ नसल्याने त्यांनी आपली झोळी खांद्याला अडकवली आणि त्या वाड्याच्या दिशेने रवाना झाल्या..!
**

ताईला रात्रीची हकीकत सांगितल्यावर राजेशच्या डोळ्यावर पुन्हा ग्लानी आली..तो तसाच बिछान्यावर पहुडला. तास दोन तास तो तसाच पडून होता. मग अचानक काहीतरी घडले. राजेश पडला होता तसाच उठला आणि चालायला लागला. अंगात कपडे व्यवस्थित आहेत का, पायात पादत्राणे आहेत का? कशाचेच त्याला भान नव्हतं. एकाद्या यंत्रासारखी त्याची हालचाल होत होती. नाकासमोर नजर ठेवून तो नुसता चालत होता. रस्त्यात अडथळा आहे, पायाखाली दगड येतोय, याशी त्याला काहीही कर्तव्य नव्हते. त्याला रस्ता सुचवला गेला होता, त्यादिशेने तो निघाला होता..!

"सहमतीने राजेश तयार होत नसल्याने त्याचा संपूर्ण ताबा घेऊन आपला कार्यभाग उरकण्याचा डाव पटवर्धनच्या रूपातील अघोरी शक्तीने रचला होता. तसेही, त्यांना फक्त राजेशच्या हातून तो विशेष विधी उरकून घ्यायचा होता. त्यासाठीचं त्याला मोहिनी घालण्यात आली होती. आणि, त्या मोहिनीखाली राजेश वाड्याकडे निघाला होता."

***क्रमशः***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरी.