युगांतर आरंभ अंताचा भाग २४

Submitted by मी मधुरा on 8 August, 2019 - 03:14

"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे."
"अनुमती आहे."
"महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी."
'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली.
भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही! गांधारी, जर तू मला पुत्र देऊ शकत नसशील तर मी अन्य मार्गाने तो मिळवेन.'
त्याने राज्यसभेतून काढता पाय घेतला. त्याच्या अहंकारावर, स्वाभिमानावर एक खोल घाव लागला होता. वार करणारे हात गांधारीचे आहेत असे त्याला वाटतं होते. डोळ्यांवर पट्टी तिने आपला अपमान करायलाच बांधली होती, असेही त्याला वाटू लागले. 'या कृत्रिम अंध नारीला धडा शिकवायलाच हवा.' दासाला हाक मारत त्याने सोमरस मागवला. रागाच्या आणि नशेच्या भरात त्याने गांधारीच्या परिचारिकेला कक्षात येण्याची आज्ञा केली!

------
सुर्यदेवांचा अस्त झाला आणि वाऱ्याने वादळाचे रुप घेतले. कोल्हे बेसूर कोल्हेकुई करू लागले. कुत्रांचे अवेळी भुंकणे रडणे सुरु झाले. भली मोठ्ठी झाडे वाऱ्याच्या उद्वेगाने कोसळत होती. नगरवासी घाबरले होते.
"महामहीम, काहीतरी अशुभ घडण्याचे संकेत दिसताहेत."
"विदुर, काय म्हणायचे आहे तुला?'
"महामहीम, अभद्र शक्तीच्या आगमनाच्या वेळी निसर्ग विलाप करतो. एखादा दुरात्मा हस्तिनापुरात अवतरणार आहे, असे दिसते." तितक्यात धृतराष्ट्र दालनात आला.
भीष्मांना काहीतरी आठवले....
"महाराज, विदुर आपल्याला वेदव्यास ऋषींच्या आश्रमात जायला हवे."
"महामहीम? शुभ वार्ता आली आहे?" उत्कंठेने धृतराष्ट्राने विचारले.
"अजून नाही महाराज!"
चेहऱ्यावर निराशा घेऊन धृतराष्ट्र म्हणाला, "महामहीम, अशी वार्ता येईल असेही वाटत नाही आता. आणि आली तरी ती शुभ नसेल माझ्याकरता."
"असे का म्हणता महाराज? वेदव्यासऋषींवर विश्वास नाही तुमचा?"
"आहे विदुर. पण कैक पटीने जास्त अविश्वास गांधारीवर आहे. तिला जर मला पुत्र द्यायचे असते तर ते तिने केव्हाच दिले असते."
"महाराज.... महाराणींचा काय दोष यात?"
"का नाही विदुर? का नाही? माझा राज्याभिषेक न होण्याचे कारण जर माझे अंधत्व असू शकते तर माझ्या पुत्रांना राजगादी न मिळण्याचे कारण गांधारी का असू शकत नाही?" विदुर शांत राहिला.
"सर्वात आधी गर्भधारणा झाली होती ना महाराणींना विदुर? मग त्या मानाने का होईना माझ्या पुत्रांना मला न लाभलेले राज्याभिषेकाचे भाग्य लाभेल? आणि जर नाही, तर हा दोष गांधारीचा का नाही?"
"महाराज, फक्त राजगादी मिळणे हेच ध्येय असते का जिवनाचे?" भीष्माचार्य म्हणाले.
"महामहीम, राजेपद सोडण्याचा निर्णय तुम्ही स्वतः घेतलात. स्वतंत्रपणे. पण स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या निर्णयाचे भार वेगवेगळे असतात महामहीम. माझे पुत्र जन्माला आले तरी कपाळी दासत्व घेऊन येतील. राजगादीवर बसलेल्या व्यक्तीच्या निर्णयाचे ओझे वाहत जगण्यात काय ध्येय असणार माझ्या पुत्रांच्या जिवनाचे?"
या अश्या प्रश्नांना काय उत्तर द्यावे हेच दोघांना कळेना. धृतराष्ट्र काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. " शिवशंकरांनी वरदानरुपी शापच दिला गांधारीला. आणि गांधारी सुद्धा एक शापच आहे या अंध धृतराष्ट्राला मिळालेला." अगतिक झाल्यासारखा तो बोलत राहिला.

मोठमोठ्या घड्यांनी भरलेल्या त्या आंधारलेल्या गुफेत गांधारी बसून राहिली होती. हिंस्र प्राण्यांच्या आवाजाने ती थोडी बिचकली होती. हवेतल्या गारव्याने अंगावर शहारे आले होते.
'एकशे एक घडे! आपल्या गर्भाला विभागून भरलेला एक-एक घडा.... वेदव्यासऋषींनी वनऔषधी उगाळून, रस काढून, पिसून त्या घड्यांत अभिमंत्रित केले. म्हणाले, " गांधारी, या घड्यांमध्ये मी गर्भपोषक वातावरण तयार केलं आहे. शंभर पुत्र आणि एक कन्या या घड्यांतून जन्म घेतील." आज ऋषीमुनी नसते तर....? महामहीम भीष्माचार्यांनी हा मार्ग सुचवला नसता तर....? देवांनी दिलेल्या वरदानाचे काय झाले असते? माझ्या पुत्रांचे काय झाले असते? नाही... नाही, गांधारी, असे विचार देखील मनात आणू नकोस. कोणत्याही क्षणी आपले पुत्र जन्म घेतील.... आपले पुत्र.... !'
तितक्यात एक आवाज वनांतून येणाऱ्या भयाण आवाजांमध्ये मिसळला. "खाड...." गांधारीने घाबरून तिथल्या सेविकांना हाका दिल्या.
सेविका धावत आल्या आणि पाहिलं तर एक घडा फुटून त्यातून लहान पाऊल बाहेर आलं होत.

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घड्यांतुन जन्म?! कौरवांचा जन्म कसा झाला, हे पहिल्यांच वाचतीये.>>> star plus च्या महाभारत मध्ये दाखवला होता. तसा बरोबरच आहे म्हणा 100मुलांना कसं जन्म देणार

मस्त लिहिता तुम्ही !!

फक्त माझ थोड वेगळ मत आहे .

असा एकद्म दुर्योधन पार व्हिलन करणे हा महाभारतावर अन्याय वाटतो मला .
महाभारत हा काही सज्जन वि दुर्जन असा सामना नाही आहे , त्यासाठी रामायण आहे .
माझ्या मते महाभारतात सगळेच थोडे फार चांगले वाईट आहेत .

द्रौपदीची वस्त्रे उतरवण्याचा प्रयत्न करणारा दुर्योधन अन दु:शासन नीचच , पण तिला पणाला लावणारा युधिष्ठीर ही माझ्यामते तित्काच नीच आहे , किमान तुम्ही त्याला जस्टीफाय करणार नाही , एवढीच आशा , बाकी लेखन तुमचे त्यामुळे निर्णय सर्वस्वी तुमचाच आहे धन्यवाद . Happy

केदारजी, हे अगदी खरे आहे की युधिष्टीरने केलेले उचित नव्हते. आणि त्याबद्दल त्याला कोणी माफ करणारही नाही.

पण एक मुद्दा आहे..... चांगल्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याला क्षमा नाही देत आपण. तर मग वाईट व्यक्तीच्या असंख्य गुन्ह्यांना नजर अंदाज का करायचे?

आपल्याच चुलत भावाला लाडवांतून विष देणे हे कुठल्या निरागस लहान मुलाला शोभते?
लाक्षागृहाबद्दल काय म्हणणे आहे तुमचे? आपल्या भावांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणारा चांगला कसा असू शकतो?
नारी सन्मानाबद्दल तर त्यांची ख्याती आहेच.

शकुनीने दुर्योधनाचे कान भरवले वगैरे मान्य! पण त्याचं कितपत ऐकायचं हे ठरवणे त्याच्या हाती होते.
कृष्णाने प्रथम दुर्योधनाला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो स्पष्टपणे म्हणाला, " मला धर्म कळतो. पण त्या मार्गी मला जायचे नाही."

.....आणि मी माझ्या तर्फे, प्रत्येक व्यक्तीरेखेला खऱ्या रंगात रंगवायचा प्रयत्न करेन. Happy

मी दुर्योधनाला चांगला म्हणतच नाही , पण तो फक्त वाईट्च होता अन तोच फक्त वाईट होता अस नाही एवढ्च माझ म्हणण आहे Happy

कुरूक्षेत्रावर युध्दाला नकार देणारा, वडील, गुरूंवर हत्यार कसे चालवावे म्हणून व्याकुळ झालेला अर्जुन खरा मानवतावादी होता. पण कृष्णाने अनेक प्रकारे समजावून त्याला युध्दाला प्रवृत्त केले व अनेक असामान्य युक्त्या वापरून युद्ध जिंकुनही दिले. पण पांडवांना देखील युध्दातून काहीच हाती लागले नाही. जो कृष्ण अफाट बुद्धिमत्ता, कौशल्य वापरून युद्ध जिंकुन देऊ शकतो तो तितक्या मुत्सद्दीपणाने युद्ध टाळू का शकला नाही. तसेच पांडवांचा खरा हितरक्षक असता तर पांडवांना द्यूत खेळूच दिले नसते त्याने. हेमावैम.

पांडवांना देखील युध्दातून काहीच हाती लागले नाही.>>>> न्याय मिळाला. सत्तापालट झाला. कौरव फक्त पांडवांवर
अन्याय करत नव्हते. समस्त हस्तिनापुर त्रासलेले होते कौरवांच्या अधर्मी शासना मुळे.

द्यूतच काय कृष्ण युद्धही थांबवू शकला असता की. आता 'कृष्णाने का थांबवले नाही युद्ध?' याचं कथा पुढे जाईल तसे उत्तर नक्की मिळेल.
पण युध्द होणे वाईट आहे असे का मानता आहात सगळे?

----
महत्त्वाचे हे की, लाथोंके भूत, बातोंसे नही मानते !
आणि काय करणार होते ते समेट घडवून?
इतिहासात स्त्री चा अपमान होऊनही सर्व शांत राहिले असं वाचायला आवडले असते आपल्याला?

आपल्या देवदेवतांची कुठलीही मूर्ती बघा. त्यात त्यांच्या हाती शस्त्र असतात. कश्यासाठी?

खरचं योग्य ध्येयासाठी, न्यायासाठी केलेली हिंसा पाप असते का, याचा विचार व्हायला हवा.

हे सर्व खेळकर (sportingly chatting environment) चर्चासत्र आहे, असे मानून लिहित आहे. कृपया गैरसमज नसावा. Happy

मी देखील सिरियस नाही. पण युध्दाने झालेली हिंसा फार भयानक होती. तिची किंमत पांडवांना मुलं गमावून चुकवावी लागली. माझ्या मतांना फार सिरियस घेऊ नका मधुरा जी.

समस्त हस्तिनापुर त्रासलेले होते कौरवांच्या अधर्मी शासना मुळे.

>> This is interesting , I have never read or heard about this , on the Contrary I read he was a good ruler .
Also most kings willingly wanted to join their side.

Can you please give some references if you have. Again no compulsion , asking just out of curiosity as I had never heard about this aspect .

द्रौपदी ने आंधळ्याचा पोरगा आंधळा हे म्हणणे कोत्या मनाचे व सुड, तिरस्कार भावनेचं लक्षण आहे. रच्याकने दुर्योधन, भीष्म पितामह, अश्वत्थामा, अंगराज कर्ण हेच माझे हिरो आहेत. मला त्यांची बाजू सत्याची वाटते. हेमावैम आहे.

चैतन्य जी, या विषयावर गप्पा मारणारे मिळाले म्हणून मला तर आनंद झाला आहे.

युध्द आलं म्हणल्यावर रक्तपात आलाचं. नुकसान दोन्ही बाजूंना झेलावे लागणारचं.

केदारजी,

कथेत याचे उत्तर सविस्तररित्या देईन.
पुरावे म्हणाल, तर महाभारत घडल्याचे ही नाहीत.
पण इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापुर असे दोन भाग केलेले असतानाही दुर्योधनाने द्यूताचा डाव का मांडला यातचं त्याचं उत्तर आहे.
मला वाटते कथेतून उत्तर मिळणे जास्त श्रेयस्कर राहिल. वाचत रहा. Happy

दुर्योधन, भीष्म पितामह, अश्वत्थामा, अंगराज कर्ण हेच माझे हिरो आहेत. >>>> मग चैतन्य, मन घट्ट करा. तुमच्या हिरोज् ना माझे हिरोज् 'कही के नही छोडनेवाले!'
Need a spoiler alert? Wink
कर्ण आणि दुर्योधनाला तर डायरेक्ट वरतीच पाठवणार आहेत. Wink Lol

कृपया हलके घेणे.

Right Akki.
Everyone paid for thier sins.

तुम्ही कोण वर पाठवणार. ते अमरच आहेत. दुर्योधनाने जरी निती सोडली असेल लाक्षागृह सारख्या प्रकरणात, पांडवांनी सुध्दा सरळ युद्ध केले नाही. कुंतीने मुलांसाठी वरदान मागितले कर्णाकडे. नरो वा कुंजरो करून द्रोणांना संपवले. घटोत्कच राक्षसाच्या मायावी शक्तीचा वापर करून घेतला. तुम्ही महाभारताचा शेवट नीट अभ्यासा. नुसत्या मालिका डोळ्यापुढे आणून लिहू नका.
शेवटी अर्जुन त्याचे गांडिव धनुष्य सुध्दा पेलू शकत नाही. त्याच्या देखत दस्यु लोक स्त्रियांना पळवून नेतात ते वाचा.

Need a spoiler alert? Wink
कर्ण आणि दुर्योधनाला तर डायरेक्ट वरतीच पाठवणार आहेत. Wink Lol
>> असं लिहिणं हे उथळ पाण्याला खळखळाट फार हेच दर्शवते. Spoiler alert ची काय गरज तुमच्या माहितीसाठी सांगतो संपूर्ण महाभारत मला माहितच आहे. कृपया हलके घ्या. धन्यवाद!

चैतन्य??? इतके चिडण्यासारखे काय आहे?

महाभारताची पात्र अमरच आहेत आणि राहतील. मी वरती आधीच लिहिलंय की ही कथा एका विशिष्ट व्यक्ती बद्दल नाही. मी ज्या माझ्या हिरोज् चा उल्लेख केला, ते फक्त पांडव नाहीत.

आणि या कथेत अर्जुनची एंट्री पण नाही झालीये. मग तुम्ही हा तर्क कसा काढलात की मी फक्त मालिका बघून लिहिते आहे?

चर्चेत जर व्यक्तिगत टिका होणार असेल आणि मजा खपणार नसेल तर काय फायदा?

आता तुम्ही शकुनीलाही हिरो म्हणलात तरी मी उत्तर देणार नाही. कारण तुम्ही स्त्री चा अपमान करणाऱ्यांना हिरो म्हणता हे योग्य (?) आणि मी पांडव त्यांना वर पाठवणार म्हणलं की लगेच उथळ पाणी वगैरे लिहिले जाते.

मी चिडलेलो मुळीच नाही. माझी बाजू सांगितली. Spoiler alert म्हणजे काय. याचा अर्थ कथानक तुम्ही लिहिलंय, इतरांना हा विषय पुर्णपणे नवीन आहे.

प्रामाणिकपणे सांगायचं तर अशा कथा लिहिणे वेळेचा मोठाच अपव्यय आहे. म्हणजे आजवर हजार लोकांनी तेच तेच ऊगाळून सांगितलेलं आहे सगळ्यांना लहानपणापासून ह्या गोष्टी वाचून, अनेकानेक मालिका पाहून तोंडपाठ आहेत, विषयाचा मोठ्या काळासाठी अभ्यास नसल्यास भाषाही कृत्रिम वाटत रहाते.
विचार करून बघा काय अर्थ आहे हे बाड लिहिण्यात. प्रतिसादांची संख्या बघता एकंदर वाचणारेही खूपच कमी असतील. (तुमच्याच दुसर्‍या कथेशी तुलना करून बघा). पुढे अनेक भाग लिहिण्याचा मानस असल्यास एकदा नक्की विचार करा. तुम्ही एवढे सगळे लिहिणार ह्या कल्पनेने मलाच दडपण आल्यासारखे वाटले.
ईतर कथाविषय डोक्यात असल्यास त्या कथा प्राधान्याने लिहून काढाव्यात असे सुचवू ईच्छितो.

अर्थात तुम्हाला जे लिहितांना आनंद वाटत असेल ते तुम्ही जरूर लिहित रहा.
नाऊमेद करण्याचा किंवा ऊत्साहावर विरजण टाकण्याचा हेतू नव्हता. गैरसमज नसावा.

हायझेन बर्ग, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
स्वतःच्या कथा मी नक्की लिहिन.
प्रतिसाद निवडक असले तरी चालतील पण महाभारतावर काहीतरी लिहावे असे वाटते म्हणून हे सुरु आहे. जर एकालाही वाचावंस वाटलं नाही तर बंद करेन.

Pages