विषवल्ली ! -7

Submitted by अँड. हरिदास on 7 August, 2019 - 23:10

राजेश शुद्धीवर आला तेंव्हा आपण नेमकं कुठं आहोत, हेचं क्षणभर त्याला उमगलं नाही. कशाचेच संदर्भ आधी जुळले नाही... पण एक-एक सेकंद उलटत गेला तसे सर्व प्रसंग त्याच्या मनपटलावर साकार झाले. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले..काही वेळापूर्वी घडलेल्या घटनांनी त्याच्या अंगावर काटे उठत होते. तो ज्या खोलीत होता तिचे तापमान इतके कमी जरी नसले तरी आपल्या हाडांना थंडी वाजत असल्याची जाणीव राजेशला होत होती. जरा वेळाने त्याच्या मनातील भीतीचा जोर ओसरून गेला. काहीसे विचार करण्याच्या अवस्थेत आल्यावर त्याने लक्षपूर्वक खोलीची पाहणी केली. पण अंधार असल्याने त्याला फारसे काही दिसले नाही. दरवाजा शोधण्यासाठी त्याने सगळ्या भिंती चाचपून बघितल्या मात्र त्याला दरवाजा सापडला नाही. शेवटी निराश होऊन तो एकाजागी बसला. या खोलीतून स्वतःची सुटका कशी करावी? यावर विचार करत असताना एकाएकी खोलीतील वातावरणात बदल झाला. जणूकाही खोलीतील प्रत्येक वस्तू जिवंत होऊन हालचाल करत असल्याचा त्याला भास होऊ लागला. अचानक कोठुनतरी प्रकाशाचा किरण आता आला त्याने त्या दिशेने बघितले, खोलीचा दरवाजा उघडला गेला होता. राजेश हळूच उठला..दरवाज्यातुन बाहेर आला. बाहेरचं वातावरण पाहून त्याचे डोळे दिपून गेले...!
संपूर्ण वाडा राजमहलासारखा उजळून निघाला होता.. पुरातन परंतु उंच प्रतिचं फर्निचर, मखमली परदे, आकर्षक आणि किमती झुंबर.. वाड्यातील एकूण एक वस्तू राजेशाही ऐश्वर्याच्या खुण दर्शवित होती. " हे सगळं ऐश्वर्य आपलंच आहे..!' विचार चोर पाऊलानी राजेशच्या मनात दाखल झाला, आणि त्याच संपूर्ण भावविश्व बदलून गेलं. त्याचा उर भरून आला..डोळ्यात चकाकी आली..चाल बदलली. एकाद्या महाराजासारखा डौलत डौलत तो बाजूच्या खोलीत दाखल झाला. खोलीत असलेल्या कपाटावर त्याची नजर गेली. त्याने कपाट उघडलं. पहिला खाना सोन्या चांदीच्या दागिन्यांची भरला होता. दुसऱ्या खाण्यात नोटांची बंडल खच्चून भरली होती. “किती ही संपप्ती, किती हे सुख..!” तो हवेत तरंगू लागला. कपाट व्यवस्थित लावून घेत तो पुढे झाला. पुढचा दरवाजा त्याने उघडला..तो शयनगृहाचा होता. बाहेरच्या दालनापेक्षा शयनयान कितीतरी पट आलिशान होते.
वेगवेगळ्या नक्षीकामानी सजवलेला भला मोठ्ठा डबल बेड..त्यावर रेशमी भरजरी वस्त्रांनी ल्यायलेली, दागिन्यांनी मढलेली अतिशय सुंदर चेहऱ्याची एक विशीतली मुलगी बसली होती. असे सौंदर्य त्याने त्याच्या आयुष्यात पाहीलेले नव्हते. गोरापान रंग, काजळ भरलेले मादक डोळे, लाल-गुलाबी गोबरे गाल, डाव्या नाकपुडीवर चमचमणारा एक नाजूक चमकी खडा, लालभडक लिपस्टिक लावल्यानं गोर्‍या चेहर्‍यावर उठून दिसणारे ओलसर ओठ. राजेश मंत्रमुग्ध होवुन तिच्याकडे पहातच राहिला. आज त्याच्या शरिरात काही वेगळीच भावना निर्माण होत होती.. ती त्याच्याकडे पाहत हसली तसे तिचे छोटे सफेद दात चमकले. राजेश पुरता खल्लास झाला. ती सुंदरी उठली राजेश समोर आली तिने आपले दोन्ही हात त्याच्या गळ्यात टाकून त्याला मिठीत ओढलं. त्या मुलायमी स्पर्शने राजेशचं बाह्यजगाशी कनेक्शनचं तोडून टाकलं. तो पूर्णपणे तिच्यात वाहवत जाऊ लागला. हळूहळू दोघांच्याही शरीरावरील एक एक कपड्याचा अडसर दूर होऊ लागला. त्या सुंदरीने आपल्या नाजूक हाताने त्याच्या छातीवर हात फिरवत प्रश्न केला.
“ मी तुम्हाला माझं सर्वस्व अर्पण करेल, माझी एक इच्छा पूर्ण कराल..?"

'सांग', "तुझ्यासाठी काय करु? तुला मिळविण्यासाठी मी काहीही करू शकतो..!"

राजेशने धुंदीत उत्तर दिलं

“तुमची शपथ पूर्ण कराल! हे सगळं ऐश्वर्य, सुख तुमच्या पुढ्यात ज्यांन उभं केलं त्या माझ्या मालकाला परत आणण्यासाठी तुम्ही घेतलेली शपथ पूर्ण करा"

शपथ?, राजेश काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करु लागला..स्मृती हळूहळू परत आली. वाडा, जंगमने दिलेली शपथ, ताई- सगळं सगळं राजेशला आठवलं.
' राजेशच्या डोळ्यासमोर त्याच ते निरस आयुष्य तरळलं. चार हजाराचा पगार..कबर मोडून टाकणार काम..दहा दहा रुपयांसाठी होणारी ओढाताण..मालकसमोर मान खाली घालून कुत्रीसारखी शेपूट हलवून करावी लागणारी कसरत पाहून राजेशचं तोंड कडवट झालं. दुसरीकडे त्याला ऐश्वर्यसंपन्न आयुष्य दिसू लागलं. सर्व सुखसोयीनी भरलेला वाडा.. सोन, चांदी पैश्याने भरलेलं कपाट.. मिठीत असलेली जगातील सर्वात सूंदर युवती..तिचं ते मदमस्त यौवन! हे सगळं त्याचं होणार होतं! फक्त त्याला एक विधी पूर्ण करायचा होता!
"होय फक्त एक विधी, हे सगळं तुझं आहे.. यावर तुझाच अधिकार आहे..!"
मिठीतली सुंदरी त्याला विनवीत होती.
" एकीकडे जगण्याचा संघर्ष, दुसरीकडे स्वर्गासारखं परमसुख!"
'काय निवडावं?'
राजेशच्या मनात द्वंद्व सुरू होतं. एक एक घटना त्याच्या डोळ्यासमोरुन सरकत होती.

“ घेतलेली शपथ पूर्ण कर, हे सगळं सुख, संपत्ती तुझीच आहे..तू सर्व शक्तिमान होशील, जगातली कोणतीच गोष्टअश्यक्य राहणार नाही !”

कुणाचे तरी शब्द त्याच्या मनावर उमटत होते..!

“ हा सगळा भास आहे..मोहमायात अडकू नकोस, धोका आहे..धोका आहे..!”

लक्ष्मीताईंचा सात्विक स्वर त्याला सावध करत होता..!

निर्वानीचा क्षण आला होता..! कोणत्या मार्गाने जायचं ते राजेशला ठरवावं लागणार होतं. राजेश विचार करू लागला. काय करावं? काय मिळवावे, काय गमवावे?....!

राजेशच्या मनातला संघर्ष टोकाला पोहचला..एक मोठी विचित्र अवस्था त्याची झाली होती. सत्ता, स्त्री आणि संपप्तीचं त्याला प्रचंड आकर्षन वाटत होतं. मात्र त्या बाजूने झुकायला त्याच्या मनाचा एक भाग प्रखर विरोध करत होता. आपण ज्याकडे आकृष्ट होत आहोत ते साहजिक भावनेने होत नाही आहोत.. तर, काहीतरी वाईट आपल्याला तिकडे खेचीत असल्याची जाणीव त्याला होत होती. शरीर संपूर्ण विकारांनी भरून गेलं होतं..इंद्रिये सुखासाठी आसुसलेली होती. पण विचार त्याला साथ देत नव्हते. वास्तविक, माणसाच्या विकारांवर विचारांची सरशी फारच थोड्या वेळा होते. वाईट आहे, अयोग्य आहे हे माहीत असूनही माणूस शारीरिक विकारांच्या आहारी जातोच! मात्र, राजेशच्या बाबतीत घडीचे काटे नेमके उलट्या दिशेने फिरले..
“या घातकी मोहिनीला आपण वश होता कामा नये...!”
हा विचार त्याच्या मनात दृढ होऊ लागला. जसा विचार मनात उमटला तसा वाड्याचा मूड बदलला..आतापर्यंत वाटणारी सुरक्षिततेची भावना तडकली गेली. मनात पुन्हा एकदा भीतीची भरती आली. ऐका एकी वाड्याचं सगळं वातावरण दूषित झालं..आजूबाजूची हवा भारल्यासारखी झाली..वाड्यात काहीतरी दाखल झालं होतं.. राजेशची नजर सैरभैर झाली.. सुटकेचा मार्ग शोधू लागली. मात्र अचानक त्याच्या दृष्टीला ते पडलं..काळजाला हिसका बसला.
एक तरल, धूसर आकृती हॉलमधून सरकत सरकत स्वयंपाकघराच्या दिशेने जात असल्याचा राजेशला भास झाला. त्यापाठोपाठ भेसूर आवाजाचं, हालचालीचं घोंघावणारं वादळ वाड्यात उभं राहिलं. नंतर तो आवाज त्याच्या कानावर आला. शब्द ऐकू आले की मनावर उमटले? हे त्याला समजलं नाही. पण शब्दांचा अर्थ स्पष्टपणे उमगला..!

“ तुला मी वारसदार नेमला, सत्ता संपत्तीचा मालक केला, जगाचं सुख तुझ्या पायात टाकलं. पण, प्रेमाची भाषा नाही समजली हो तुला..! तुला मुक्त करत होतो रे मी....पण....तू त्या वकीलासारखा हुशार निघाला नाहीस. निवड चुकली म्हणायची हो माझी..! त्या भिकारणीच्या नादी लागून माझी आज्ञा धुडकावतोस काय? आता मेला हो तू..! तुला तर मृत्यूदेखील साधा मिळणार नाही...! रक्ताचा पाट अन मांसाचा घास घेण्यासाठी टपलाय धनी माझा...आता कुठ धावणार तू .... गाठ माझ्याशी आहे..!”

गडगडाटी हाष्यत संपूर्ण वाडा जणू शहारून गेला. राजेशचे हातपाय भीतीने थरथर कापू लागले. काय करावं? त्याला सुचेनासे झाले. सुटकेचा कोणताच मार्ग त्याला दिसत नव्हता. हतबल होऊन दगडासारखा तो एकाजागी उभा राहिला. 'कदाचित हा हा शेवट आहे !' त्याच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. 'आता कोण वाचवणार आपल्याला? कोण येणार मदतीसाठी?' "लक्ष्मीताई" एक नाव त्याच्यासमोर आलं. पण, त्यांना कसं कळणार, आपण इथं अडकलोय ते? नाही, आता सुटका नाही..!' निराशा आणि भीतीने त्याचं मन भरुन गेलं. असाह्य असल्याचा त्याला संताप होऊ लागला. 'मी असाच भेकडासारखा मारणार नाही..!' छे छे! असं भिऊन उपयोग नाही- तो मनाशीच म्हणला. काहीतरी मार्ग शोधलाचं पाहिजे. एकादी वीज चमकवी आणि प्रकाश व्हावा, तसा तो विचार त्याचं मन प्रकाशून गेला.
" वाड्यात कुठं तरी सकाळी आपण दत्तप्रभूची मूर्ती स्थापित केली होती..ती शोधली पाहिजे..आता त्यांचाच सहारा आहे..”
मनातली भीती कमी झाली..जमिनीला चिटकलेली पाऊले हलू लागली.. तो समोरच्या दिशेने पुढे झाला. दिवाणखान्याची खोली दिसताचं त्याची पाऊले जलदगतीने उचलल्या जाऊ लागली. 'दिवाणखान्यात गेलो की तिथं दत्तप्रभु..!' एकाएकी त्याची पाऊले अडखळली. रास्तात तो उभा होता.. ओळखायला एक क्षणही लागला नाही..हाच पटवर्धन! पण काय ते ध्यान!
सुरवातीला नुसतीच आकृती.. क्षणभराने आकृती मोठी झाली, स्पष्ट झाली... जवळ आली. त्याने दोन्ही हात पुढे केले होते, चेहरा विकृत झाला होता, डोळे वटारले होते, रक्ताने माखलेली जीभ बाहेर आली होती, चेहऱ्यावर क्रूर हाष्य होतं. भयंकर, भयंकर दृश्य! राजेशची शुद्ध पुन्हा एकदा हरवली..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users