विषवल्ली ! - 6

Submitted by अँड. हरिदास on 6 August, 2019 - 04:47

रात्रीचे जेवण उरकल्यावर राजेश आणि ताई काही वेळ व्हरांड्यात बोलत बसले होते. पण, राजेशचं कशातचं लक्ष लागत नव्हतं. क्षणाक्षणाला त्याच मन जास्तचं बेचैन होत होतं. 'या घरातून बाहेर पडावं!' असं त्याला प्रकर्षाने वाटू लागलं. त्याने स्वतः ला आवरण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु मनाला रोखणे आता त्याला शक्य होत नव्हतं. त्याची चलबिचल ताई लक्षपूर्वक न्याहाळत होत्या.' काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण, त्या बोलल्या काहीच नाही. शेवटी असह्य झाल्याने "जरा फिरुन येतो.." म्हणत राजेश उठला आणि बाहेर आला. रस्त्यावर येताच त्याला मोकळं मोकळं वाटू लागलं. तो रस्त्याने सहज फिरू लागला. कुठं जायचं हे त्याने ठरवलं नव्हतं. पाऊले नेतील तिकडे तो जात होता..! पण, त्याच्या पाऊलानी अनवधानाने वाड्याचा रस्ता धरला..!

राजेश वाड्याच्या समोर आला तेंव्हा दहाचा सुमार झाला असावा! वाड्यात दिवे लागलेले होते. त्याच्या 'वाड्यात कोण आलं असावं?' सहज कुतूहलाचा प्रश्न समोर आला. 'जाऊन बघावं !' त्याच्या मनात प्रचंड आकर्षन निर्माण झालं. पाऊले आपोआप वाड्याच्या दिशेने निघाली. दरवाजा उघडला गेला. राजेश वाड्यात आला..वाडा होता तसाच होता. सकाळीच तो वाड्यात येऊन गेला होता. याठिकाणी दत्तात्रय प्रभूची मूर्ती स्थापित केली होती..काहीही बदलले नव्हतं. 'मग वाडा कुणी उघडला असावा?' विचार करत करत तो समोर आला. दत्तप्रभूंच्या प्रतिमेसमोरील सकाळचं आरतीचं तबक तसंचं होत. बाजूला निरंजनी होती. त्याने थोडा शोध घेतला त्याला माचीस दिसली. निरंजनी लावावी यासाठी त्याने माचीसची काडी ओढली.. ज्वाला पर्जवलीत झाली.. पिवळा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पसरला. अचानक सगळीकडे आग पसरल्याचा त्याला भास होऊ लागला..त्या आगीत ज्वालारेषांनी कोरलेल्या चेहर्‍यांच्या आकृत्या होत्या ...मोठमोठे डोळे, वासलेले जबडे, विचकलेले दात...केवढाले राक्षसी चेहरे! क्षणात जवळ येत होते, क्षणात लांब जात होते...वाटत होतं, पुढच्या झोक्यात अंगावर आपटणारच! आणि मग तो चेहरा आला. अक्राळ विक्राळ, हिरवेगार, बर्फाळ, चकाकते, खुनी डोळे! मग शब्द आले! नुसतेच मनावर उमटले!

'किती काळ?, किती काळ स्वतः ला रोखणार तू ? डोक्यावर घन बसावे असा आवाज.. नंतर गडगडाटी हसण्याचा आवाज! राजेशची शुद्ध हरवली! '

वाडा पुन्हा शांत झाला, जणू काही घडलंच नाही अशी निरागस शांतता वाड्यात पसरली.

एक आकृती कपोऱ्यात बसून सगळा प्रकार बघत होता. राजेश बेशुद्ध पडताच ती आकृती लगबगीने बाहेर आली. बेशुद्धवस्थेत पडलेल्या राजेशच्या शरीराला स्वयंपाक घरात ओढत नेऊ लागली.. गुप्त खोलीचा दरवाजा उघडला गेला.. त्या आकृती ने राजेशचं बेशुद्ध शरीर त्या खोलीत ढकललं..!

**

राजेशचं अस एकाएकी उठून जाणं ताईला रुचल नाही..त्याचं अवेळी बाहेर जाणे धोक्याचे असल्याचेही त्यांना माहीत होते. परंतु तरीही त्यांनी त्याला रोखलं नाही..
“ सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील असं नाही, नियतीच्या उदरात काय दडलंय, हे कुणाला कळतं? ज्याचं त्याचं कर्म त्याला कधी चुकलंय का? शेवटी परमेश्वराची इच्छा..!”
असं म्हणून ताईंनी राजेशचा विचार बाजूला सारला. पण, फार काळ त्यांना तो विचार दूर ठेवता आला नाही. राजेशला जायला दोन तासाचा वेळ झाला तसा त्यांची अस्वस्थता वाढायला लागली. गेल्या दिवसात राजेश अनेकदा वाड्यातील शक्तीच्या संपर्कात आला होता. वाड्यातील जहरी शक्ती त्याला वश करून वाड्यात नेऊ शकत होती, किंबहुना राजेश वाड्यात गेल्याची जवळपास ताईंना खात्री झाली होती. त्याठिकाणी त्याला धोका होण्याची जाणही ताईंना होती. मात्र, घटनांमध्ये प्रत्यक्ष दखल देण्याची वेळ आली आहे की नाही?, यावर त्यांचं कुठलंच ठाम होत नव्हतं. शेवटी मनाची चलबिचल असाह्य झाल्याने त्यांनी गाडी काढली आणि वाड्याचा रास्ता धरला.
एव्हाना मध्यरात्र व्हायला आली होती. ताईंची गाडी वाड्याच्या समोर आली तेंव्हा अगदी योगायोगाने त्यांना एक गाडी वाड्यापासून सुसाट वेगाने जातांना दिसली. हेडलाईटच्या प्रकाशात गाडीत बसलेल्या जंगम वकिलाला त्यांना अचूक ओळखले. “ निश्चितच राजेशसोबत वाड्यात काहीतरी घातकी प्रकार घडला होता..” संशयाला जागाच उरली नाही. ताईंनी गाडी उभी केली. त्या वाड्याच्या दिशेने निघाल्या. वाड्यात प्रवेश करणार तोच त्यांच्या अंतःप्रेरणेने 'संकेत' भंग न करण्याचा इशारा दिला.

“ अमानवी, अघोरी शक्तींशी मुकाबला करण्याचा जसा ताईंना अधिकार होता..त्यांना जी शक्ती होती तिलाही काही बंधनं होती, नियम होते, संकेत होते. काळ वेळ होती. आणि 'ही ते वेळ नाही,' हे सांगणारा हा संकेत त्यापैकीचं एक !” त्यामुळेचं ताईंची द्विधा मनस्थिती झाली. "आपण राजेशच्या मदतीसाठी गेलो आणि ती अघोरी शक्ती आपल्यावर हावी झाली..त्यात आपला मृत्यू झाला तर त्या शक्ती चा नायनाट करणार कोण? एकाच्या जीवनमरणापेक्षा त्या अमानवीय शक्तीला मानवी जगापासून हद्दपार करणे अधिक महत्वाचे होते..! ताईंनी विचार केला.!

"राजेश वाड्यातील विषारी शक्तीच्या जाळ्यात अडकला आहे, यात दुमत नाही..याप्रसंगी त्याला मदत केल्या जाऊ शकते ! पण, कधी ना कधी त्याला स्वतःलाही त्या अभद्राचा सामना करावा लागणार आहे.. महत्वाचे म्हणजे, राजेश कोणत्या बाजूने उभा राहणार ? हे निर्वानीच्या क्षणीचं स्पष्ट होईल. तसेही त्याची निवड एक विशेष विधीसाठी झाली आहे..जोवर विधी पूर्ण होत नाही, तोवर किमान त्याच्या जीवाला धोका होण्याची श्यक्यता कमी होती...राहिला प्रश्न मानसिक पातळीवरचा तर हा लढा त्याचा त्यालाच द्यावा लागेल..!”
“ शेवटी काही गोष्टींची उत्तरं काळावरचं सोडून द्यावी लागतात..!”
ताईंनी नाईलाजाने आपली पाऊले मागे घेतली. वास्तविक त्यांची बुद्धी त्यांना वाड्यात जाण्यासाठी आणि राजेशला आपत्तीतुन बाहेर काढण्यासाठी उद्युक्त करत होती.. सारासार विचार आणि मेंदूचा कौल देखील त्याच बाजूने पडत होता. मात्र मनाचा, नव्हे तर अंतर्मनाचा ठाम कौल त्यांना मिळाला नव्हता.. आणि अशावेळो बुद्धी नाही तर अंतर्मनाचा संकेत महत्वाचा असतो, हे ताईला अनुभवाने माहीत होते. त्यामुळेचं त्यांनी आगळीक करण्याचा निर्णय रद्द केला..!

***

राजेश शुद्धीवर आला तेंव्हा आपण नेमकं कुठं आहोत, हेचं क्षणभर त्याला उमगलं नाही. कशाचेच संदर्भ आधी जुळले नाही... पण एक-एक सेकंद उलटत गेला तसे सर्व प्रसंग त्याच्या मनपटलावर साकार झाले. भय, आश्चर्य आणि हुरहूर अश्या भावनांचे विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवले..काही वेळापूर्वी घडलेल्या घटनांनी त्याच्या अंगावर काटे उठत होते. तो ज्या खोलीत होता तिचे तापमान इतके कमी जरी नसले तरी आपल्या हाडांना थंडी वाजत असल्याची जाणीव राजेशला होत होती. जरा वेळाने त्याच्या मनातील भीतीचा जोर ओसरून गेला. काहीसे विचार करण्याच्या अवस्थेत आल्यावर त्याने लक्षपूर्वक खोलीची पाहणी केली. पण अंधार असल्याने त्याला फारसे काही दिसले नाही. दरवाजा शोधण्यासाठी त्याने सगळ्या भिंती चाचपून बघितल्या मात्र त्याला दरवाजा सापडला नाही. शेवटी निराश होऊन तो एकाजागी बसला. या खोलीतून स्वतःची सुटका कशी करावी? यावर विचार करत असताना एकाएकी खोलीतील वातावरणात बदल झाला. जणूकाही खोलीतील प्रत्येक वस्तू जिवंत होऊन हालचाल करत असल्याचा त्याला भास होऊ लागला. अचानक कोठुनतरी प्रकाशाचा किरण आता आला त्याने त्या दिशेने बघितले, खोलीचा दरवाजा उघडला गेला होता. राजेश हळूच उठला..दरवाज्यातुन बाहेर आला. बाहेरचं वातावरण पाहून त्याचे डोळे दिपून गेले...!

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy