आहे पिटुकली पण कामाला दमदार

Submitted by कुमार१ on 4 August, 2019 - 11:08

अ‍ॅड्रिनल ग्रंथी आणि तिची हॉर्मोन्स

शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशीना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्स ही एक महत्वाची आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून ५० हून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात.

या ग्रंथींपैकी थायरॉइड, स्वादुपिंड आणि जननेंद्रिये ह्या अगदी परिचित ग्रंथी. याव्यतिरिक्त ज्या ग्रंथी आहेत त्या सामान्यांना सहसा माहित नसतात. अशाच एका काहीशा अपरिचित पण महत्वाच्या ग्रंथीचा या लेखात परिचय करून देत आहे. त्या ग्रंथीचे नाव आहे अ‍ॅड्रिनल (adrenal) ग्रंथी. आपल्या प्रत्येक मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूस या ग्रंथी वसलेल्या आहेत. वैद्यकाच्या इतिहासात या ग्रंथींचा शोध तसा उशीराने लागला. वैज्ञानिकांचा सुरवातीस असा समज होता की ‘अ‍ॅड्रिनल’ हा मूत्रपिंडाचाच एक विशेष भाग आहे. अखेर १९व्या शतकात पुरेशा अभ्यासानंतर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध झाले. मूत्रपिंडालगत (renal) त्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांना अ‍ॅड्रिनल (ad-renal) हे नाव मिळाले. जेमतेम ५ ग्राम वजन असलेली ही पिटुकली ग्रंथी आहे. मात्र तिच्यात अनेक महत्वाची हॉर्मोन्स तयार होतात. त्या सर्वांचेच कार्य मोलाचे आहे आणि त्यातील काही तर जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत.

लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधाराने करतो:
१. ग्रंथीची रचना व भाग
२. ग्रंथीतील हॉर्मोन्स
३. हॉर्मोन्सचे कार्य

४. ग्रंथीचे आजार
५. हॉर्मोन्सचे औषधी उपयोग

ग्रंथीची रचना व भाग
ही लहानशी ग्रंथी प्रत्येक मूत्रापिंडाच्या वरच्या बाजूस असते. तिचा रंग पिवळसर असतो (चित्र पहा).

adrenal.jpg

या ग्रंथीत रक्तवाहिन्यांचे दाट जाळे असते. ग्रंथीचे दोन स्वतंत्र भाग
असतात – बाह्यपटल (cortex) आणि गाभा (medulla). हे दोन्ही भाग जरी एकत्र नांदत असले तरी त्यांची हॉर्मोन्स ही पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाची आहेत; अगदी वेगळ्या कुळातील म्हणता येतील. त्यांची आता माहिती घेऊ.

ग्रंथीतील हॉर्मोन्स

१. बाह्यपटल भाग: इथे ३ प्रकारची हॉर्मोन्स तयार होतात:

अ) Glucocorticoids : यातले Cortisol हे मुख्य असते.
आ) Mineralocorticoids : यातले Aldosterone हे मुख्य.
इ) Androgens : ही लैंगिक हॉर्मोन्स आहेत पण इथे ती अत्यल्प प्रमाणात तयार होतात.

वरील सर्व हॉर्मोन्स कोलेस्टेरॉल या मेदापासून तयार होतात. त्या सर्वांना ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स असे म्हणतात.

२. गाभा : इथे Catecholamines तयार होतात आणि त्यातले मुख्य असते Adrenaline. ही हॉर्मोन्स एका अमिनो आम्लापासून बनतात.

हॉर्मोन्सचे कार्य
१. Cortisol : हे हॉर्मोन मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीच्या नियंत्रणात असते. ती ग्रंथी ACTH हे हॉर्मोन सोडते आणि त्याच्या उत्तेजनातून अ‍ॅड्रिनल Cortisol तयार करते. याच्या उत्पादनाचे एक वैशिष्ट्य आहे. त्याचे प्रमाण रोज सकाळच्या वेळी (८ वाजता) सर्वाधिक असते तर मध्यरात्री सर्वात कमी. हे निसर्गनियमानुसार आहे कारण सकाळच्या वेळेत आपल्याला सर्वाधिक तरतरीची गरज असते. निसर्गातील दिवस-रात्र या चक्रानुसार शरीरात एक ‘वेळनिर्देशक’ यंत्रणा असते आणि ती काही जनुकांच्या नियंत्रणात असते. त्याद्वारा या हॉर्मोनचे प्रमाण वेळेनुसार ठरवले जाते. परिणामी आपल्याला सकाळच्या वेळेस सर्वाधिक कार्यक्षम राहण्याची प्रेरणा मिळते.

या हॉर्मोनची दोन महत्वाची कार्ये अशी आहेत:
अ) पेशींतील चयापचयात ते महत्वाची भूमिका बजावते. ते इन्सुलिनच्या विरोधी गुणधर्माचे हॉर्मोन आहे. जेव्हा ग्लुकोजची रक्तपातळी कमी होऊ लागते तेव्हा ते ती वाढवायला मदत करते. तसेच जेव्हा आपण अतिरिक्त ताणतणावांना सामोरे जातो तेव्हा त्याची पातळी बरीच वाढते. म्हणूनच त्याला ‘स्ट्रेस हॉर्मोन’ असे म्हणतात.
आ) दाह-प्रतिबंधक क्रिया: जेव्हा कुठल्याही कारणाने शरीरात दाह (inflammation) होतो तेव्हा ते त्या प्रक्रियेला नियंत्रणात ठेवते.

२. Aldosterone : याचा शरीरातील सोडियमच्या चयापचयाशी महत्वाचा संबध आहे. त्याच्या मूत्रपिंडातील कार्यामुळे रक्तातील सोडियम तसेच पोटॅशियम यांची पातळी योग्य राखली जाते. परिणामी रक्तातील पाण्याचे प्रमाण आणि रक्तदाब हे सर्व नियंत्रणात ठेवले जाते.

३. Adrenaline (Epinephrine) : ग्रंथीच्या गाभ्यात तयार होणारे हे प्रमुख हॉर्मोन. ते शरीरात जोश निर्माण करते. विशेषतः आपल्याला जेव्हा एखाद्या अवघड परिस्थितीला ‘जिंकू किंवा मरू’ या आवेशाने सामोरे जायचे असते तेव्हा हे हॉर्मोन महत्वाचे ठरते. त्याची विविध कार्ये अशी आहेत:
अ) हृदयाचे ठोके आणि त्याची आकुंचन क्षमताही वाढवणे, रक्तदाब वाढवणे
आ) श्वसनाचा वेग वाढवणे आणि श्वासनलिका रुंदावणे

इ) यकृतातील चयापचय क्रियांवर परिणाम करून रक्तातील ग्लुकोज पातळी वाढवणे. या बाबतीत ते इन्सुलिनच्या विरोधी गटातील हॉर्मोन आहे.
दणकून व्यायाम करणे, भावनिक आंदोलने, तीव्र भीती वाटणे, महत्वाच्या स्पर्धा अथवा परीक्षेला सामोरे जाणे यासारख्या परिस्थितींत Adrenalineचे प्रमाण वाढते. त्याच्या शरीरातील वरील क्रियांमुळे आपण त्या परिस्थितीस तोंड देण्यास सज्ज होतो.

एखाद्या आणीबाणीच्या (crisis) परिस्थितीत तर ते खूप मोठ्या प्रमाणात उसळते (rush) आणि त्यातून एखाद्या माणसात अचाट ताकद निर्माण होते. अशा प्रसंगी एरवी ‘काडीपैलवान’ असलेली व्यक्ती प्रचंड मोठे वजन उचलणे किंवा अशक्य वाटणारी मारामारी करणे असली कृत्ये करू शकते !
Adrenaline मुळे शरीरात निर्माण होणारा जोश हा एक प्रकारे मर्दानगीचे प्रतिक समजला जातो. या कल्पनेचा वापर व्यापारजगतात केलेला दिसतो. शर्यतींसाठी वापरल्या जाणाऱ्या काही वेगवान मोटारसायकल्स व कार्सना “Adrenaline वाहने” असे संबोधले जाते. एखाद्या तरुणाला जर सनसनाटी, धाडशी आणि बेदरकार कृत्ये करायची सवय असेल तर त्याला “Adrenaline junkie” असे म्हणतात.

ग्रंथीचे आजार
हे आजार तसे दुर्मिळ आहेत. दोन शक्यता असतात:

अ) क्षयरोग किंवा ऑटोइम्यून आजारांत या ग्रंथीचा नाश होऊ शकतो. त्यामुळे तिच्या सर्व हॉर्मोन्सची कमतरता होते. अशा रुग्णांत वजन कमी होणे, उलट्या, डीहायड्रेशन, रक्तदाब कमी होणे अशी लक्षणे दिसतात.

आ) काही विशिष्ट ट्युमर्समुळे या ग्रंथीची हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्त्रवतात. तसेच ही हॉर्मोन्स जर उपचार म्हणून दिली असल्यास त्यांचेही दुष्परिणाम दिसू शकतात. अशा रुग्णांत चेहरा सुजणे, पोट सुटणे व वजनवाढ, हाडे ठिसूळ होणे आणि स्नायूंचा अशक्तपणा ही लक्षणे दिसतात.

हॉर्मोन्सचे औषधी उपयोग
A. वर आपण पहिले की ग्रंथीच्या बाह्य विभागात ‘स्टिरॉइड’ हॉर्मोन्स तयार होतात. त्यातील Cortisol हे मुख्य आहे. त्याच्याच गुणधर्माची काही कृत्रिम ‘स्टिरॉइड्स’ औषधे म्हणून वापरली जातात ( उदा. Dexamethasone). आधुनिक वैद्यकात त्यांचा वापर बऱ्यापैकी होतो. त्यांच्या गुणधर्मानुसार ती मुख्यतः खालील प्रकारच्या आजारांत वापरतात:
१. दाह कमी करण्यासाठी : दमा, सांधेदुखीचे आजार
२. अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी
३. तीव्र जंतूसंसर्ग (sepsis) झाला असताना

४. अवयव प्रत्यारोपणानंतर प्रतिकारशक्ती दाबण्यासाठी (Immunosuppresants)
५. अ‍ॅड्रिनल ग्रंथीचा पूर्ण नाश झालेला असल्यास ही हॉर्मोन्स औषधी रुपात कायम घ्यावी लागतात.

अशा विविध आजारांत स्टिरॉइड्सचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा लागतो. उपचाराचा डोस आणि कालावधी यानुसार त्यांचे दुष्परिणाम होऊ शकतात. विशिष्ट आजारांत स्टिरॉइड्सची बहुमोल उपयुक्तता बघता त्यांचे अटळ दुष्परिणाम सहन करावे लागतात. अर्थातच ही औषधे नेहमी वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यायची असतात हे वेगळे सांगायला नकोच !

B. Adrenaline हे तातडीच्या वैद्यकसेवेत इंजेक्शनद्वारा देतात. त्याचे २ मुख्य उपयोग असे:
१. ‘शॉक’ अवस्थेतील रुग्णात जेव्हा त्याचा रक्तदाब खूप कमी झालेला असतो तेव्हा.
२. एखाद्या तीव्र अ‍ॅलर्जीक प्रतिक्रियेने रुग्ण ‘शॉक’ मध्ये गेल्यास.

समारोप

मूत्रपिंडाच्या निकट सानिध्यात असलेली अ‍ॅड्रिनल ही एक लहानशी पण महत्वाची हॉर्मोन-ग्रंथी आहे. तिच्या बाह्यपटलात तयार होणारी स्टिरॉइड् हॉर्मोन्स ही जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्यापैकी रोज सकाळी अधिक प्रमाणात सोडले जाणारे Cortisol हे एक निसर्गाशी निगडित कुतूहल आहे. तर ग्रंथीच्या गाभ्यातून निघणारे Adrenaline हे आपल्यात गरजेनुसार जोश निर्माण करते. आयुष्यातील ताणतणावाच्या प्रसंगी या दोन्ही हॉर्मोन्सचे कार्य महत्वाचे असते. नैसर्गिक स्टिरॉइड् हॉर्मोन्सच्या गुणधर्माशी जुळणारी कृत्रिम ‘स्टिरॉइड्स’ ही वैद्यकातील महत्वाची औषधे आहेत. अनेक किचकट आणि गंभीर आजारांत त्यांचे योगदान मोलाचे आहे.
****************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील सर्वांचे चर्चा व सूचनांबद्दल आभार.
सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

खूप छान लेख आवडला अतिशय किचकट विषय सरळ करून सोप्या भाषेत सांगायचे तुमची हातोटी चांगली आहे.
प्रत्येक ग्रंधीचे कार्य हे चैन पद्धतीने चालू असतं का म्हणजे त्या ग्रंधी पूर्ण शरीराचे कार्य व्यवस्थित चालावे म्हणून सहकर्यानी काम करत असतात का ?
म्हणजे थोडक्यात एका ग्रंधित बिघाड झाला तर त्याचा परिणाम दुसरी वर होतो का

राजेश, धन्यवाद !
तुमचा प्रश्न चांगला आहे. उत्तर असे:

बहुसंख्य हॉर्मोन्स- ग्रंथी स्वयंभू नसून त्या मेंदूतील एका प्रमुख ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असतात. तर ही ‘सर्वोच्च नियंत्रण ग्रंथी’ म्हणजे hypothalamus . हिच्यातून विविध ‘प्रवाही’ हॉर्मोन्स स्त्रवतात.

पुढे ही हॉरमोन्स pituitary या मेंदूतल्या दुसऱ्या ग्रंथीत पोचतात आणि तिला उत्तेजित करतात. मग ही ग्रंथी त्यांना प्रतिसाद म्हणून स्वतःची ‘उत्तेजक’ हॉर्मोन्स तयार करते आणि रक्तात सोडते.

पुढे ही हॉर्मोन्स (त्यांच्या प्रकारानुसार) थायरॉइड, adrenal ग्रंथी किंवा जननेंद्रिये यांच्यात पोचतात आणि त्या ग्रंथींना उत्तेजित करतात. सरतेशेवटी या ग्रंथी त्यांची स्वतःची हॉर्मोन्स तयार करतात आणि मग ती विविध पेशींमध्ये पोचून आपापले कार्य करतात.
आता या ३ पातळींवर जो समन्वय आहे तो अफलातून आहे. एका ग्रंथीचा बिघाड संबंधित दुसरीवर नक्की परिणाम करतो.

शरीर हे अजब रासायनिक जाळं आहे. संपुर्ण जैवरासायनिक प्रक्रिया समजुन घेणे जवळपास अशक्य आहे कारण सगळं एकमेकात गुंतलेलं आहे.

VB, धन्यवाद.

केशव,
अगदी सहमत. कितीही संशोधन झाले तरी मानवी शरीर एक गूढच राहते !

Pages